रोहिणीचा स्वाभिमान – भाग २ (अंतिम भाग)

“रोहिणी! अहो रोहिणी कुठे राहिलीस? इकडे बघ जरा, त्या काकूला जरा व्यवस्थित साडी पिन अप करून दे आणि इथे हा पाण्याचा ग्लास खाली खाली पडलाय, तो कोण साफ करणार? आणि हो, दारावर फुलांची सजावट नीट झालीय का बघून ये पटकन!”

 

रोहिणीने वैतागून आरशात पाहिले, तिचे केस विसकटलेले होते, चेहऱ्यावर घाम होता. तिने बाहेर येऊन ती कामे पटपट आटोपली. पुन्हा ती आपल्या खोलीत जाऊन तयार होऊ लागली, तोंच काव्याने हाक मारली,

 

“अगं रोहिणी! माझं हे ब्लाऊजची हुक जरा मोकळी कर, अडकलीये ही. आणि माझा मेकअपचा बॉक्स कुठेतरी ठेवलाय मी, जरा शोधून आणशील का?”

 

रोहिणीचे मन नाराज झाले. आज योगेशचे लग्न आहे, तिलाही थोडं छान तयार व्हावंसं वाटत होतं. काव्याने तर स्वतःसाठी शहरातून एका मोठ्या पार्लरवाल्या बाईला घरीच बोलावले होते. काव्या छान तयार होत होती.

 

 रोहिणीने मोठ्या हिमतीने तिला विचारले,

 

“काव्याताई, ती पार्लरवाली आलीये ना? मी पण तिच्याकडून थोडं तयार होऊ का? खूप वेळ नाही लागणार मला.”

 

हे ऐकताच काव्याच्या आधी कमलताई म्हणाल्या!

 

“काय म्हणालीस? पार्लरवालीकडून तयार होणार तू? काय गरज आहे? तू काव्याची बरोबरी करायला निघाली आहेस का ? काव्याची बरोबरी करायचे कुठून आले तुझ्या डोक्यात? काव्या नवरदेवाची बहीण आहे, तिचं दिसणं महत्त्वाचं आहे. तुला कुठे पुढे पुढे मिरवायचंय? घरची कामे करायची सोडून नटायला चाललीस मोठी!”

 

रोहिणीचे डोळे भरून आले. पण ती काहीही बोलली नाही, तिने मान खाली घातली. उमेश हे सगळं दुरून पाहत होता. आता मात्र त्याच्या संयमाचा बांध सुटत चालला होता. त्याने पाहिले की त्याची पत्नी, जी अहोरात्र राबत आहे, तिला साधा दोन मिनिटांचा श्वास आणि सन्मानाने तयार होण्याचा अधिकारही नाकारला जात आहे.

 

थोड्या वेळात लग्नाची वेळ जवळ आली. कमलताई आणि काव्या घाईघाईने तयार झाल्या. नवरदेवाची गाडी निघत होती. निघताना कमलताई रोहिणीला थंड आवाजात म्हणाल्या,

 

“रोहिणी, या गाडीत जागा नाहीये. आम्ही निघतोय आधी. तू मागच्या गाडीने थोड्या वेळानं ये, आणि येताना घर आवरून घे जरा.”

 

गाडी स्टार्ट झाली आणि सासू व नणंद दिमाखात निघून गेल्या. रोहिणी मागच्या खोलीत गेली, तिने डोळ्यातले पाणी टिपले. पण आज तिच्या मनात दुःखापेक्षा जास्त अपेक्षाभंग सलत होते. तिच्या लग्नाला एक वर्ष झालं होतं. या एका वर्षात तिने खूप प्रयत्न केला होता सासूबाईंचे मन जिंकण्याचा. त्या नादात किती राबली ती न काय काय ऐकून घेतले तिने. पण सासूबाई मात्र तिच्याशी अशा वागत होत्या.

 

इकडे लग्न मंडपात पाहुण्यांची गर्दी फुलली होती. भव्य रोषणाई, सनईचे सुरेल स्वर आणि सभोवतालचा आनंदमय माहोल पसरला होता. कमलताई आणि काव्या पाहुण्यांमध्ये मिरवत होत्या. काव्या मेकअप करून स्वतःच्या सौंदर्याची आणि साडीची शेखी मिरवत इकडेतिकडे फिरत होती. कमलताई सुद्धा वरमाय म्हणून दिमाखात मिरवत होत्या.

 

तेवढ्यात मंगलवाद्यांचा गजर वाढला आणि दाराकडे सर्वांचे लक्ष गेले.

दारात एक गाडी येऊन थांबली. आणि गाडीतून रोहिणी बाहेर आली. आणि क्षणभर जणू तो मंडप स्तब्ध झाला!

 

रोहिणीने नेसलेली ती डाळिंबी रंगाची डिझायनर साडी, त्यावर अगदी शोभून दिसेल असा साधा पण लक्षवेधी मेकअप, केसांची सुंदर अंबाडा बांधून घातलेला मोगऱ्याचा गजरा आणि चेहऱ्यावर असलेले आत्मविश्वासाचे तेज पाहून कोणाचेही डोळे तिच्यावरून हलेनात. ती नेहमीसारखी अंग चोरून चाललेली नव्हती, तर तिची चाल राजस आणि स्वाभिमानी होती. तिच्या अंगावरील ती साधी चमक आणि मनातील आत्मसन्मान तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

 

“अरे बापरे! ही कोण आहे? नवरदेवाची भावजयच का ती?” एक पाहुणी कुतुहलाने म्हणाली.

 

“किती छान दिसतेय! खूप देखणी दिसत्येय रोहिणी!” दुसऱ्या एका महिलेने कौतुकाने उद्गार काढले.

 

संपूर्ण मंडपाची नजर आता रोहिणीवरच खिळली होती. लोक आपापसात तिची प्रशंसा करू लागले. रोहिणीने आज कोणत्याही कोपऱ्यात न बसता, ताठ मानेने पाहुण्यांमध्ये फिरत सर्वांचे स्वागत करण्यास सुरुवात केली. ती हसतमुख चेहऱ्याने सर्वांना भेटत होती.

 

तिकडे कमलताई आणि काव्याचे डोळे विस्फारले. त्यांचे तोंड उघडेच राहिले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काव्याचा चेहरा रागाने आणि जळफळाटाने काळा पडला. सासूबाई कमलताईंचा राग अनावर झाला. त्या धावतच रोहिणीजवळ गेल्या आणि तिला एका कोपऱ्यात नेत म्हणाल्या.

 

“अगं रोहिणी! हे काय चाललंय तुझं? एवढी चांगली कशी काय तयार झालीस तू अचानक? आणि पार्लरमध्ये जाऊन पैसे उधळलेस का? पैसे कोणी दिले तुला ? तुला लाज वाटली नाही का घरचा पैसा असा वाया घालवायला?” कमलताई रागाने म्हणाल्या.

 

” हो ना आई…बघ ना कशी घुमी आहे ही. आपल्या समोर तर मान वर करून बोलत सुद्धा नाही आणि आपल्या मागे घराबाहेर पडून पार्लर मधून तयार होऊन आलीय ही.” काव्या म्हणाली.

 

त्या दोघींचे हे आक्रमक आणि अपमानकारक बोलणे ऐकून रोहिणीचे डोळे पाणावणार होते पण इतक्यात मागून एक आवाज आला.

 

” बस..आता रोहिणीशी कोणीही अशाप्रकारे बोलणार नाही.”

 सासूबाई आणि काव्याने वळून बघितले. तो उमेश होता. उमेश अगदी वेगाने पुढे आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याने आपल्या आईकडे आणि बहिणीकडे पाहिले, आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तो स्पष्ट आणि ठणकावून बोलू लागला.

 

“आई, आणि काव्या, तुम्ही दोघी आता थांबता का! किती खालच्या पातळीला जाऊन बोलणार तुम्ही रोहिणीशी? मघापासून मी बघतोय, घरात तुम्ही तिला घालून पाडून बोलता, लग्नात तिला कामवालीसारखं राबवून घेतलंत, साधी तयार होऊ दिली नाही आणि आता ती छान दिसत्येय तर ते सुद्धा तुम्ही बघू शकत नाही आहात?”

 

कमलताई थक्क झाल्या. त्यांनी कधीच उमेशचे असे रूप पाहिले नव्हते. त्या अडखळत म्हणाल्या,

 

“उमेश, तू… तू तुझ्या आईशी असा बोलतोयस? त्या बायकोसाठी?”

 

“होय आई, मी माझ्या पत्नीसाठी बोलतोय!” उमेशचा खंबीर आवाजात म्हणाला.

 

“रोहिणीने या लग्नासाठी स्वतःला विसरून अहोरात्र मेहनत घेतली आहे. तिने कधीही एका शब्दाची तक्रार केली नाही. आणि तुम्ही? तुम्ही तिला पैशांची उधळपट्टी म्हणून हिणवताय? अरे, तिने कोणतेही पार्लरचे पैसे उधळले नाहीत! काल रात्री मी, हो मी स्वतः माझ्या पगाराच्या पैशातून रोहिणीसाठी ती साडी आणली होती आणि तिला पार्लरवाल्याची गरज पडली नाही, तिने स्वतः स्वतःला इतकं सुंदर सजवलंय कारण तिलाही हक्क आहे या घरात मान सन्मानाने जगण्याचा!”

 

उमेशचे हे शब्द ऐकून कमलताई आणि काव्या दोघीही खजील झाल्या. त्यांच्या अंगातील तो उर्मटपणा, तो आक्रमकपणा क्षणात विरघळून गेला. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची स्वतःचीच चूक आरशासारखी उभी राहिली. त्यांना समजले की आपण केवळ आपल्या मुलीच्या फुशारकीपायी आणि स्वतःच्या अहंकारापोटी आपल्या घरातील खऱ्या लक्ष्मीचा असा अपमान केला आहे.

 

काव्याची मान खाली गेली. तिने जमिनीवरून नजर वर केली नाही. तिला तिच्या त्या अरेरावीपणाची आणि स्वार्थीपणाची लज्जा वाटू लागली.

रोहिणीने हळूच पुढे येऊन उमेशचा हात धरला. तिच्या डोळ्यात आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. आजपर्यंत कोणीही तिच्या बाजूने उभे राहिले नव्हते, आज तिचा नवरा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला होता.

 

योगेशच्या लग्नातील ते दृश्य घरासाठी एक मोठा धडा ठरले. कमलताईंना आपली चूक उमगली होती. लग्नानंतरच्या विधींमध्ये जेव्हा सून घराबाहेर पडली किंवा ओवाळणीची वेळ आली, तेव्हा कमलताईंनी स्वतः पुढे येऊन रोहिणीचे औक्षण केले आणि भरल्या डोळ्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवून माफी मागितली,

 

“रोहिणी बेटा, मला माफ कर…मी तुझ्याशी असे वागायला नको होते.”

 

काव्यानेही मान खाली घालून रोहिणीची क्षमा मागितली. रोहिणी ने सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ केले. त्यानंतर रोहिणीला सगळे मानाची वागणूक द्यायला लागले. हे पाहुण योगेशची बायको सुद्धा आपल्या जाऊला योग्य तो मान द्यायला लागली होती.

 

पाहुण्यांसमोर आणि संपूर्ण कुटुंबासमोर रोहिणीचे घरातील स्थान आता एका साध्या सुनेचे नसून, त्या घराच्या खऱ्या स्वामिनीचे आणि आदराचे बनले होते. उमेशच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि रोहिणीच्या संयमाने घराचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते.

 

आता रोहिणीला कोणासमोरही हात जोडण्याची किंवा कोणाची परवानगी घेण्याची गरज उरली नव्हती. ती ताठ मानेने, हसमुख चेहऱ्याने आणि सर्वांच्या आदरास पात्र ठरून शहाणे कुटुंबात आनंदाने राहत होती. ज्या बायकोच्या पाठीशी तिचा नवरा खंबीरपणे उभा राहतो तिला घरात आणि समाजात आपसूकच मान मिळतो हे आता रोहिणीला कळून चुकले होते.

 

समाप्त.

Leave a Comment