फोन कट करून मीना वैशालीजवळ गेली आणि तिला म्हणाली.
” माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे वैशाली…आणि वहिनी खूप जास्त आग्रह करत आहे की वैशालीला पण घेऊन ये…”
” अहो ताई कशाला उगीच…तुम्ही जाऊन या ना…घरी पण कुणीतरी हवं ना…” वैशाली म्हणाली.
” अगं आई आहेत ना घरी…तू चल माझ्यासोबत…वहिनी खूप आग्रह करत होती आणि मलापण वाटतंय की तू यावं माझ्यासोबत…” मीना म्हणाली.
वैशाली नाही म्हणत होती पण मीनाचा एवढा आग्रह पाहून ती सुद्धा सोबत जायला तयार झाली होती.
दोघीजणी वेळेच्या बऱ्याच आधी तिथे पोहचल्या. दोघांचेही नवरे संध्याकाळी केक कापायच्या वेळेवर येणार होते. वैशाली तिथे गेली आणि पाणी पिताच लगेच त्यांच्या स्वयंपाकघरात गेली आणि म्हणाली.
” वहिनी…मी काही मदत करू का…मला सांगा काय करायचं ते…”
” काही जास्त नाही अगं…मी सर्वांसाठी चहा ठेवत होते…पण तू आलीस तर एवढा चहा ठेव…मी जरा हॉलमध्ये हवेत जाऊन बसते थोडावेळ…” मीनाची वहिनी म्हणाली.
” ठीक आहे वहिनी…जा तुम्ही…मी येते चहा घेऊन…” वैशाली म्हणाली.
वहिनी हॉलमध्ये मिनाजवळ जाऊन बसली. दोघींच्या गोष्टी सुरू होत्या तोवर वैशालीचा चहा तयार सुद्धा झाला. चहा ट्रे मध्ये घेऊन ती हॉलमध्ये येत होती. तेवढ्यातच तिचा कानावर मीना आणि तिच्या वहिनीचे संभाषण पडले.
” वन्स तुम्ही एकदम बरोबर बोलत होत्या की वैशाली आली की आपल्याला काही काम करायची गरजच पडणार नाही… खरंच आल्याबरोबर तिने किचनचा ताबा घेतला सुद्धा…”
” हो अगं वहिनी…म्हणून मी तुला म्हणत होते की कामाला बाई नको सांगू म्हणून…उगाच कशाला खर्च करायचा…दोन प्रेमाचे शब्द बोलले की शंभर माणसांचं काम हसत करते ती…” मीना म्हणाली.
” बरं सुचलं बाई तुम्हाला…तेवढाच माझ्या जीवाला पण आराम मिळाला…” मीनाची वहिनी हसत म्हणाली.
” हो…आणि माझ्या जीवाला सुद्धा…म्हणूनच एवढा आग्रह करून आणलंय तिला…नाहीतर कशाला बोलावलं असतं एवढ्या आग्रहाने…” मीना म्हणाली.
असे म्हणत दोघीही एकमेकांना टाळी देत हसल्या.
वैशालीला मात्र हे ऐकून अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. आपल्या चांगुलपणाचा असा फायदा घेतला जातो हे पाहून तिला धक्का बसला. मीनाताई फक्त आपला कामापुरता वापर करून घेतात आणि आपल्याला गरज असली की मदत करत नाहीत ह्याची जाणीव तिला झाली. ती चहाचा ट्रे घेऊन त्या दोघींच्याही समोर आली आणि म्हणाली.
” अच्छा…म्हणून कामाला बाई लावली नाही तर आज…”
तिचे बोलणे ऐकून दोघीही एकमेकींकडे पाहू लागल्या. मग मीना तिला म्हणाली.
” अगं काय बोलतेय तू…मला काही कळत नाही आहे बघ…”
” मी तुमचं सगळ बोलणं ऐकलं आहे ताई…मी तुमच्यावर मोठ्या बहिणीसारखं प्रेम केलं आणि तुम्ही माझ्या चांगुलपणाचा असा गैरफायदा घेतला…तुम्ही जर मला म्हटले असते की तुमच्या वहिनीला कामाची मदत हवीय तरीसुद्धा मी आले असते…पण तुम्हाला कामवाल्या बाईचे पैसे द्यायला लागू नये म्हणून तुम्ही मला इथे येण्याचा आग्रह केला हे तुम्ही खूप चुकीचे वागला आहात…” वैशाली म्हणाली.
” अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय बघ…आम्ही काहीतरी वेगळं बोलत होतो…” मीनाची वहिनी म्हणाली.
” माझा काहीही गैरसमज झालेला नाही आहे ताई…उलट आज माझा गैरसमज दूर झाला आहे…तुम्ही माझ्या बाबतीत असा विचार करत असाल ह्याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता…” वैशाली म्हणाली.
” अच्छा…असा काय वेगळा विचार केला ग मी तुझ्याबद्दल…तू खेड्यातली आहेस…तुला आहे सवय काम करायची म्हणूनच आणलंय तुला इथे…घरी पण करतेसच ना…काय झालं माझ्या वहिनीच्या घरी थोडं काम करायला…तुमच्या घरी कामवाल्या बायका परवडत नाहीत म्हणून तुम्हाला एवढं काम करायची सवयच असते…आम्हाला कधी गरज पडत नाही एवढ काम करायची म्हणून आम्हाला सवय नाही…त्यामुळे एवढे नखरे दाखवायचे काही काम नाही…” मीना उलट तिलाच म्हणाली.
” मला कामांची सवय आहे म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जाऊन कामं केली पाहिजेत असं काही नाहीय…आणि माझं माहेर खेड्यात आहे म्हणजे आम्ही खूप गरीब आहोत असं नाहीये…तुमच्या भावाच्या घराच्या चारपट मोठं घर आहे आमचं गावात…फक्त आपल्या कुटुंबातल्या लोकांची कामं करणं ही आमची प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आहे…पण तुम्ही तर त्याचा चक्क फायदा घ्यायला निघालात…” वैशाली म्हणाली.
त्यानंतर तिने तिची पर्स उघडली. त्यातून मीनाच्या भाच्यासाठी आणलेलं गिफ्ट काढून मीनाच्या वहिनीच्या हातात दिले आणि म्हणाली.
” मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद…पण आता निघते मी…”
असं म्हणून ती आपली पर्स घेऊन निघाली सुद्धा. ह्या दोघी तिला जाताना नुसत्या पाहत उभ्या होत्या. तिला थांबवण्याची या दोघींचीही हिंमत होत नव्हती. बाहेर गेल्यावर तिने तिच्या नवऱ्याला फोन लावला आणि म्हणाली.
” अहो तुम्हाला माझ्यासोबत मूव्ही बघायला जायचं होतं ना…आता तिकीट उपलब्ध असेल तर जाऊयात ना…”
” वा…आज वेळ मिळाला तर बाईसाहेबांना…मी बघतो तिकीट मिळते का ते…” असे म्हणत त्याने तिकीट चेक केले तर तिकीट उपलब्ध होते.
त्यानंतर ते दोघेही शांतपणे चित्रपट बघायला गेले. त्यानंतर रात्री बाहेरून जेवूनच घरी परतले. मीना घरी आली होती. पण वैशाली तिच्याशी न बोलता सरळ आपल्या रूम मध्ये गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदीची शाळा होती. पण वैशाली मात्र आरामात झोपून होती. शेवटी मीना झोपेतून उठली आणि आनंदीची शाळेची तयारी करायला लागली. कामांची सवय नसल्याने तिची खूप चिडचिड होत होती. पण तिला जाणीव मात्र झाली होती की वैशाली पुन्हा तिच्या गोड बोलण्यात येणार नाही.
आज वैशालीच्या डोक्यावरच चांगुलपणाच ओझं जरा कमी झालं होतं. आजपासून ती इतरांच्या आधी स्वतःचा विचार करणार होती.
आपल्याही आयुष्यात असं बरेचदा घडतं. समोरच्याला काय वाटेल, समोरच्याचे मन दुखावेल, ह्याचा विचार करत आपण स्वतःचा कधी विचार करत नाही. इतरांसाठी निस्वार्थीपणाने काहीतरी करतो. पण समोरचा मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी आपला वापर करून घेतो.
तुमच्याही आयुष्यात आहे कधी घडले आहे का…तुमचा अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा…वैशालीची कथा तुम्हाला काही वाटली ते सुद्धा नक्की कळवा…पुन्हा भेटू
या एका नवीन कथेसह… धन्यवाद 😊
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
अजून एक हृदयस्पर्शी कथा वाचा.



