Friday, June 12, 2026
मितवा
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
मितवा
No Result
View All Result

एक अनोखे धोंडेजेवण

alodam37 by alodam37
June 12, 2026
in मितवा
0
एक अनोखे धोंडेजेवण
0
SHARES
3.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती सावीच्या माहेरच्या तुलनेत बरी होती.

 

सावीचे वडील सरकारी कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरी करून निवृत्त झाले होते. मिळणाऱ्या पेन्शनवर आणि थोड्याफार बचतीवर त्यांचा संसार चालत होता. आई गृहिणी होती. मोठा भाऊ नोकरी करत होता. पगार जास्त नव्हता, पण तो आणि त्याची पत्नी अत्यंत काटकसरीने संसार सांभाळत होते.

 

लग्नानंतरचे सगळे सण सावी मोठ्या उत्साहाने साजरे करत होती. तिचा आणि सुमितचा हा पहिलाच धोंड्याचा सण होता. गावात आणि नातेवाईकांत या सणाला खूप महत्त्व दिले जायचे. नवविवाहित मुलगी आणि जावयाला माहेरच्या घरी जेवणासाठी बोलावले जाई.

 

एक दिवस सावी मोबाईलवर सोशल मीडियावरील फोटो पाहत बसली होती. कुणाच्या धोंड्याच्या सणात मोठमोठे मंडप, डीजे, फुलांची सजावट, महागडे कपडे आणि सोन्याचे दागिने दिसत होते. तेवढ्यात तिच्या जाऊबाईंचा फोन आला.

 

“काय सावी, या वर्षी तुझा पहिला धोंड्याचा सण आहे. तयारी सुरू झाली का धोंड्याच्या सणाची?”

 

” पहिला धोंड्याचा सण आहे ताई, पण अजून काही ठरलं नाही. आईचा फोन आला होता दोन दिवसा आधी. म्हणत होती की तू आणि जावईबापू घरी या म्हणून. मी म्हटलं की ह्यांना विचारून कळवते.” सावी ने सांगितले.

 

“आमच्याकडे तर माहेरच्यांनी खूप मोठा कार्यक्रम ठेवला आहे. मला सोन्याची अंगठी आणि ह्यांना पण अंगठी देणार आहेत.” तिची जाऊबाई म्हणाली.

 

 हे ऐकताच सावीच्या मनात तुलना सुरू झाली.

 

त्या रात्री ती आईला फोन करून म्हणाली,

 

“आई, यावर्षी माझा पहिला धोंडा आहे. तुम्ही काय काय तयारी केली आहे…?”

 

” तू कधी येणार आहेस ते सांग जावईबापूंना विचारून…तयारीला काही वेळ लागणार नाही…तुझी वहिनी निशा सुगरण आहे…ती सगळा साग्रसंगीत स्वयंपाक करून ठेवेन…” आई म्हणाली.

 

” फक्त स्वयंपाक…अगं बाकीची पण तयारी करावी लागेल ना…?” सावी म्हणाली.

 

” बाकीची कसली तयारी अगं…?” आईने प्रश्न केला.

 

” मला पण मोठा सोहळा हवा. सगळे नातेवाईक बोलवा. छान डेकोरेशन वगैरे करा…मला आणि सुमितला दोघांनाही सोन्याची अंगठी करा…” सावी म्हणाली.

 

आई थोडी गोंधळली.

“सावी बाळा, आपण साधेपणाने करू. वाटल्यास जवळच्या नातेवाईकांना बोलावू, छान जेवण ठेवू. तुझ्यासाठी चांदीची जोडवी पण आणून ठेवली आहे निशाने…”

 

“नाही आई! आमचा पहिला धोंड्याचा सण आहे. आणि फक्त चांदीची जोडवी करणार आहेस का. लोक हसतील मला. माझ्या सासरचे लोक काय विचार करतील. सुमितसारखा एवढा चांगला जावई मिळाला आहे तुम्हाला. मग त्या मानाने त्याचे कौतुक नको का व्हायला. मला आणि सुमितला सोन्याच्या अंगठ्या करून द्या. जाऊबाईंच्या माहेरून सुद्धा ते अंगठ्या देत आहेत…” सावी हट्टाने म्हणाली.

 

फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली.

 

“सावी, एवढा खर्च झेपेल का तुझ्या दादाला. बाबांची पेन्शन सुद्धा घरखर्चात जाते अगं. तुझ्या जाऊबाईच्या माहेरचे लोक श्रीमंत आहेत. आपण त्यांची बरोबरी कशी करणार बाळा…” आईचा आवाज थरथरला.

 

“आई, माझा पहिला धोंड्याचा सण आहे. लोक काय म्हणतील? माझ्या मैत्रिणी धोंडे जेवणाचे स्टेटस ठेवत आहेत. मलापण मिरवायचे आहे सगळ्यांमध्ये…” सावी म्हणाली.

 

आईने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही.

फोन ठेवला गेला, पण त्या रात्री सावीच्या आई-वडिलांच्या डोळ्याला डोळा लागला नाही.

 

” रिटायर्ड झाल्यानंतर पैशांची सोय करणे कठीण आहे. अजून कर्ज काढून हे कसं करायचं? सागरने सुद्धा सावीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं. ते सुद्धा अजून फेडतो आहे तो. त्याच्यावर अजून किती जबाबदारी टाकायची ना…” वडील हतबल होत म्हणाले.

 

हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले.

 

“पोरीचा हट्ट आहे. पण आपली ऐपत नाही. तिला हौस आहे या सगळ्याची पण आपली परिस्थिती अशी आहे तर काय करायचं ना.”

 

दुसऱ्या खोलीत बसलेला सागर आणि निशा सगळं ऐकत होते. आई वडिलांना इतके हतबल झालेले पाहून सागर आणि निशा दोघेही त्या खोलीत आले आणि म्हणाले.

 

“बाबा, गरज पडली तर मी काही पैसे देतो. बघतो कुठून मिळाले तर”

 

” अहो आधीच घेतलेल्या कर्जासाठी लोक वारंवार फोन करतात तुम्हाला…मग आणखी कशाला…” निशा पटकन बोलून बसली.

 

सागरने तिच्याकडे पाहिल्यावर मग तिच्या लक्षात आले की आई बाबांसमोर ही नव्हते बोलायचे. मग न राहवून तीच म्हणाली.

 

” मी काय म्हणते…माझ्याकडे माझ्या लग्नातील अंगठी आहे…तीच आपण सावी ला दिली तर…”

 

” अगं पण ते तुझं स्त्रीधन आहे…ते तुझ्याकडेच असू देत…” बाबा म्हणाले.

 

” बाबा…ते स्त्रीधन अशावेळीच कामाला येते ना…ह्यांच्याकडे पैसे आले की हे करून देतील मला पुन्हा…पण आताची नड भागायला हवी…” निशा म्हणाली.

 

इकडे धोंडे जेवणाचे रिल्स पाहणाऱ्या सावीला माहेरच्यांच्या अडचणीची कल्पनाही नव्हती.

तिच्या मनात फक्त एकच विचार होता…

“माझा धोंडा सगळ्यांपेक्षा मोठा आणि चांगला झाला पाहिजे. रिल्स आणि फोटो चांगले आले पाहिजेत.”

 

माहेरी जाण्याचा दिवस जवळ येत होता. एका संध्याकाळी सावी आनंदाने सुमितला म्हणाली,

 

“ऐका ना, आईबाबांना मी सांगितलं आहे. ते मला आणि तुम्हाला सोन्याच्या अंगठ्या देणार आहेत.”

 

“तू मागितल्या?”सुमित आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला.

 

“हो. मीच सांगितलं त्यांना की मला अंगठ्या पाहिजेत. त्यात काय एवढं? सगळीकडे देतात ना आजकाल.”

सुमित काही क्षण शांत राहिला.

मग तो म्हणाला,

 ” बरोबर बोलत आहेस तू सावी…आजकाल सगळेजण करत आहेत…कालच अनघा सांगत होती की तिला पण तिच्या आवडीच्या वस्तू हव्या आहेत.”

 

” तिला काय काय हवंय ?” सावी ने विचारले.

 

” तिने तिच्या नवऱ्यासाठी सोन्याची चेन आणि स्वतःसाठी नेकलेस मागितला आहे.” सुमित म्हणाला.

 

” काय…अहो सोनं किती महाग आहे…सोन्याची चेन आणि नेकलेस लाखोंच्या घरात जाईल…आपलं पुढच बजेट कोलमडून जाईल…आपल्या नवीन फ्लॅटचा हफ्ता आहे…गाडीचे हप्ते अजून बाकी आहेत…बचत सुद्धा एवढी जास्त नाही आपल्याकडे…” सावी काळजीने म्हणाली.

 

” अगं पण तिची हौस आहे.. आणि तसेही आजकाल सगळेच देतात ना…मोठा थाट आणि सोनं…” सुमित म्हणाला.

 

सावी शांत झाली. मग थोड्या वेळाने म्हणाली.

 

” अहो पण अनघा ने विचार करायला हवा ना… आपण एवढं नाही करू शकत ना…अशाने आपल्या भविष्याच्या योजना मागे पडतील.”

 

” अच्छा…अनघाने विचार करायला हवा पण तू तुझ्या घरच्यांनी परिस्थिती नसताना एवढी मोठी मागणी केलीस तेव्हा त्यांचा विचार केला का…” सुमित ने विचारले.

” ते…मी…” सावीला आता बोलणं सुद्धा सुचत नव्हतं.

 

” त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा कितीतरी साधी आहे. त्यांनी निवृत्तीनंतर एवढा खर्च कसा करायचा?…आपण आपल्या आनंदासाठी आईवडिलांना अडचणीत टाकणं योग्य आहे का?”सुमित पुढे म्हणाला.

 

हे ऐकून सावीच्या मनात विचारांचे काहूर दाटून आले. तिची चूक तिच्या लक्षात आली. तिला वडिलांचा थकलेला चेहरा आठवला. आईच्या जुनाट झालेल्या साड्या आठवल्या. भावाच्या मुलाला नवीन स्कूल बॅग पाहिजे होती तेव्हा कितीतरी बहाणे करून आपण पुढच्या वर्षी नवी बॅग घेऊ हे पटवून देणारी वहिनी आठवली. आपण माहेरी गेल्यावर रोज आपल्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येणारा भाऊ आठवला. भावाची धावपळ आठवली. वहिनी महिनाअखेर खर्च जुळवताना कशी काळजी घ्यायची, हे आठवले. त्या रात्री सावीला झोप लागली नाही. पहिल्यांदाच तिने स्वतःच्या हट्टाकडे दुसऱ्यांच्या नजरेतून पाहिले. आणि तिला जाणवले…ती किती मोठी चूक करत होती.

 

दोन दिवसांनी सावी माहेरी गेली. आई स्वयंपाकघरात होती. वडील वर्तमानपत्र वाचत बसले होते. सावी घरात आली आणि थेट आई-वडिलांसमोर उभी राहिली.

 

“आई… बाबा… मला तुमच्याशी बोलायचं आहे.”

 

तिला असे अचानक आलेलं पाहून दोघेही घाबरले.

 

“काय झालं बाळा?” बाबांनी विचारले.

 

“माझी चूक झाली बाबा.” हे बोलताना सावीच्या डोळ्यात पाणी आले.

 

आई-वडील एकमेकांकडे पाहू लागले.

 

“मी तुमच्याकडे सोन्याच्या अंगठ्या मागितल्या… मोठा कार्यक्रम करा म्हणून हट्ट केला…पण आपली परिस्थिती एवढी नाही ह्याचा विचारच केला नाही.” सावी रडत म्हणाली.

 

“अगं, ती रडू नकोस. मुलांचा हक्कच असतो आईवडिलांकडे हट्ट करण्याचा.” आई म्हणाली.

 

“नाही बाबा. तो हट्ट नव्हता, तो माझा स्वार्थ होता. फक्त दिखाव्यासाठी मी तुम्हाला अडचणीत टाकणार होते.”

 

हे ऐकताच आईच्या डोळ्यात पाणी आले.

 

“तुम्ही माझ्यासाठी आयुष्यभर कष्ट केलेत. आता माझ्यामुळे तुम्हाला कर्ज काढावं लागेल, ही कल्पनाच मला सहन होत नाही.” सावी पुढे म्हणाली,

 

“मला माफ करा.” असे म्हणत ती वडिलांच्या पायाशी बसली.

 

वडिलांनी तिला उठवले आणि म्हटले.

 

“वेडी आहेस का? आम्हाला वाईट नाही वाटले. तू अल्लड आहेस आणि या वयात एवढा विचार नाही करत आजकालचे मुलं…”

 

“यंदा धोंड्याचा सण साधेपणाने साजरा करूया. आणि मला भेट म्हणून काही द्यायचंच असेल तर…” सावी म्हणाली.

 

“काय हवं तुला?” आईने विचारले.

 

“फक्त चांदीची जोडवी.” सावी म्हणाली.

 

“एवढंच?” आई आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली.

 

“हो. कारण मला सोन्यापेक्षा तुमचा आशीर्वाद जास्त महत्वाचा आहे.” सावी म्हणाली.

 

आईवडील दोघांनाही आज सावीकडे बघून समाधान वाटत होते.

 

धोंड्याचा दिवस उजाडला. घरात साधी पण मनापासून केलेली सजावट होती. प्रेमाने जेवण वाढले जात होते. कार्यक्रमाच्या शेवटी आईने सावीच्या हातात चांदीची सुंदर जोडवी ठेवली. सावीने ती डोळ्याला लावली आणि पायात घातली. त्या छोट्याशा भेटीत तिला आईवडिलांचे प्रेम, त्याग आणि संस्कार दिसत होते.

 

घरी परतताना सुमितने विचारले,

” काय मग, समाधान झालं?”

 

“आज मला समजलं की श्रीमंती दागिन्यांत नसते…”सावी हसत म्हणाली.

“मग कशात  असते?” सुमित ने विचारले.

सावीने माहेरच्या घराकडे पाहत उत्तर दिलं,

“जिथे आपल्यासाठी माणसं मनापासून झटतात, आपल्यावर प्रेम करतात. तिथेच खरी श्रीमंती असते.”

आणि त्या दिवशी सावीने केवळ धोंड्याचा सण साजरा केला नाही…

तर तुलना, दिखाऊपणा आणि हट्ट यांच्यावर मात करून नात्यांची खरी किंमत ओळखली. ❤️

समाप्त.

आपल्याला ही कथा कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अशाच काही हृदयस्पर्शी कथा इथे वाचा.

 https://mitawaa.com/भूतकाळ/

माझिया माहेरा

पैशांनी सगळंच मिळत नाही.

समाधानातील सुख

मराठी कथा – जाणिव

BUY NOW

Previous Post

चांगुलपणाचे ओझे – भाग २ (अंतिम भाग)

alodam37

alodam37

नमस्कार, मला लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडते. मी लिहिलेल्या कथा ह्या माझ्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर आधारित असतात. लिखाणातून मला निखळ आनंद मिळतो. तुम्हाला ही माझ्या कथा आवडतील अशी अपेक्षा आहे. 😊

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय

एक अनोखे धोंडेजेवण

एक अनोखे धोंडेजेवण

by alodam37
June 12, 2026
0

  सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका...

चांगुलपणाचे ओझे

चांगुलपणाचे ओझे – भाग २ (अंतिम भाग)

by alodam37
June 4, 2026
0

फोन कट करून मीना वैशालीजवळ गेली आणि तिला म्हणाली.   " माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे वैशाली...आणि वहिनी खूप जास्त आग्रह...

चांगुलपणाचे ओझे

by alodam37
June 4, 2026
0

" वैशाली...जरा लवकर कर ना...दादा वहिनीला भूक लागली असेल अगं..." मीना आपल्या लहान जावेला म्हणाली.   " हो ताई...मी बस...

हरवलेलं प्रेम

हरवलेलं प्रेम – भाग ५

by alodam37
May 22, 2026
0

      लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता. आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली.   हा...

हरवलेलं प्रेम

हरवलेलं प्रेम – भाग ४

by alodam37
May 22, 2026
0

मेघनाने हळू आवाजात विचारलं,   "तू… काय म्हणालास?"   मिलिंद शांतपणे म्हणाला,   "मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल…...

हरवलेलं प्रेम – भाग ३

हरवलेलं प्रेम – भाग ३

by alodam37
May 22, 2026
0

  एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो...

हरवलेलं प्रेम – भाग ३

हरवलेलं प्रेम – भाग २

by alodam37
May 22, 2026
0

    तो घरी आला आणि तडक आपल्या रूम मध्ये गेला. मनिषा सुद्धा रात्रभर झोपली नव्हती. आता काय होईल ह्याची...

Load More
  • Home
  • About us
  • contact us
  • Disclaimer
  • Privacy Policy

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

error: Content is protected !!