विश्वासघात ( एका फसवणुकीची कथा) – भाग २

मी नाही काढलं तिकीट.” पराग बेफिकिरीने म्हणाला.

 

” काय…? तुम्ही माझी गंमत करताय ना…?” प्रिया अविश्र्वासाने म्हणाली.

 

” गंमत कशाला करणार मी. माझ्या लक्षात नाही राहिले तिकीट चे. ”

 

” मग. उद्या कशाने जायचं?” प्रियाने विचारले.

 

” आता तिकीट नाही म्हटल्यावर कशाला जायचे ? राहू दे ना. साखरपुडाच तर आहे. लग्न थोडीच आहे.” पराग पुन्हा बेफिकीरीने म्हणाला.

 

” अहो पण तुम्ही म्हटले होते ना की तू काळजी करू नकोस. मी तिकीट करेन म्हणून.”

 

” नाही लक्षात राहिलं, त्यामुळे नाही केलं. एवढी मोठी गोष्ट नाही. लग्नाला जा ना. साखरपुड्याला राहू दे.” पराग म्हणाला.

 

” जर मी तुम्हाला आधीच सांगितले होते की या तारखेला माझ्या चुलतभावाचा साखरपुडा आहे आणि तुम्ही सिद्ध तिकीट करायला तयार झाला होतात तर मग केले का नाही तिकिट. माझ्या घरच्यांना किती वाईट वाटेल आपण नाही गेलो तर. आणि माझ्या बहिणी काय विचार करतील. त्यांना किती कधीपासून सांगतेय मी येत आहे म्हणून. आम्ही किती वेळ तुमच्यासमोरच फोनवर बोलत होतो ना तयारीबद्दल. तरीसुद्धा तुमच्या लक्षात नाही आले तिकीट करायचे आहे म्हणून.?” प्रिया रडकुंडीला येत म्हणाली.

 

” विसरलो मी. यात रडण्यासारखं काय आहे. काहीतरी कारण सांगून दे घरच्यांना.” पराग म्हणाला आणि खोलीतून बाहेर निघून गेला.

 

प्रियाला मात्र खूप रडू येत होते. एकतर लग्नानंतर माहेरी पहिलेच कार्य होते आणि त्यात सुद्धा पराग आणि तिची सगळे जण आतुरतेने वाट पाहत होते. लग्नानंतर एवढ्या दिवसानंतर सगळे एकत्र येणार होते पण प्रिया मात्र जाऊ शकत नव्हती. त्यातही एवढ्या क्षुल्लक कारणामुळे. आपण एवढी तयारी करतोय ते त्यांना दिसत असूनही एवढा निष्काळजीपणा. लग्नाला अजून आठच महिने झालेत पण अजूनही माझ्या मनात काय आहे हे ह्यांना समजू नये म्हणजे काय असा विचार करून प्रिया उदास होऊन बसली होती.

 

तिने घरच्यांना फोन करून परागला बरं वाटत नसल्याने येऊ शकत नाही असे सांगितले. घरच्यांना पण खूप वाईट वाटत होते पण जावयाची तब्येत बरी नसताना जास्त आग्रह करणे बरोबर नाही म्हणून घरच्यांनी फार आग्रह केला नाही. घरच्यांशी खोटे बोलताना प्रियाला वाईट वाटत होते पण आता काही करू सुद्धा शकत नव्हती. कारण इतक्या लवकर तिकीट मिळणे कठीण होते. शिवाय परागच्या बोलण्यावरून प्रियाच्या हे लक्षात आले होते की त्याला साखरपुड्याला जायला फारसा इंटरेस्ट नाही.

 

ती परागवर रुसली होती. पण त्याला ह्या गोष्टीची जाणीव सुद्धा नव्हती. तो आपल्याच विश्वात मग्न होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला तिच्या सासूबाईंचा फोन आला आणि त्या म्हणाल्या.

 

” अगं प्रिया…तुझं अजून आवरलं की नाही…लवकर जायला लागेल ना..?”

 

सासूबाई साखरपुड्याला जाण्याबद्दल बोलत आहेत असे वाटून प्रिया त्यांना म्हणाली.

 

” नाही आई. मी साखरपुड्याला जात नाही आहे.”

 

” साखरपुड्याला नाही म्हणत आहे ग मी…तुला मधुकडे जायचं आहे ना आज…त्यासाठी आवरलं का ते विचारत आहे…”

 

” मधुताईंकडे ? मला तर काही माहीत नाही आई ?”

 

” पराग ने सांगितले नाही का तुला ? तो तर म्हणाला होता की सकाळीच पाठवेन प्रियाला ताईकडे. ” सासूबाई म्हणाल्या.

 

” असे हे म्हणाले होते ?” प्रियाने आश्चर्याने विचारले.

 

” हो अगं…मधुच्या सासरेबुवांचा वाढदिवस आहे आज. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांच्याकडच्या काही नातेवाईकांना बोलावलं आहे. तर एवढं सगळ मधु एकटी कशी करणार म्हणून मीच त्याला सांगितले होते आठ दिवसांच्या आधीच की प्रियाला पाठव म्हणून. तर तो हो म्हणाला होता.”

 

” काय ? मला तर काहीच माहित नाही.” प्रिया म्हणाली.

 

” हो. आधी मला वाटले होते की तू तुझ्या चुलतभावाच्या साखरपुड्याला जाशील गावी. पण परागच म्हणाला की तुझं नक्की नाही जायचं म्हणून. मग मीच म्हटलं की मधुकडे जायला सांग प्रियाला म्हणून.” सासूबाई म्हणाल्या.

 

आता मात्र प्रियाच्या लक्षात आले की परागने जाणूनबुजून तिचे तिकीट केले नव्हते म्हणून. आता मात्र दुःखाची जागा संतापाने घेतली. तिने सासूबाईंचा फोन कट केला आणि पराग जवळ जाऊन त्याला म्हणाली.

क्रमशः

पुढील भाग इथे वाचा 👇

विश्वासघात (एका फसवणुकीची गोष्ट ) – भाग ३ अंतिम भाग

Leave a Comment