प्रिया लग्न करून पराग सोबत तिच्या गावापासून खूप दूर मुंबईला राहायला आली होती. परागची नोकरी मुंबईला होती. त्याची मोठी बहीण मधुताई सुद्धा मुंबईतच रहायची. परागच्या फ्लॅटपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ती राहायची. प्रियाच्या हाताला चांगली चव होती. कितीही माणसांचा स्वयंपाक असला तरी प्रिया लगेच तयार करायची.
स्वयंपाक वाढण्यात सुद्धा प्रिय तरबेज होती. त्यासोबत घरातील इतर कामही हातोहात उरकायची. त्यामुळे मधूच्या घरी काहीही कार्यक्रम असला की मधु सगळं काही प्रियावर सोपवून निर्धास्त व्हायची. प्रियाने सुद्धा कोणत्याच कामाला कधी नकार दिला नव्हता. अगदी मधुताईच्या घरची भांडी घासण्यापासून ते लादी पुसण्यापर्यंत सगळेच काम करायची प्रिया.
कधी कधी मधू तिच्या घरूनच प्रियाला फोन करून सांगायची की आज तिला बरं नाही तर आज स्वयंपाक करून पाठव. प्रिया सगळ्यांसाठी स्वयंपाक करून पाठवायची. कधी कधी कधीतरी बाहेर गेली की दिवसभर मुलांना प्रियाकडे ठेवायची. प्रिया अगदी मायेनं मुलांना सांभाळायची.
लग्न झालं तेव्हापासून प्रिया एकदाही माहेरी जाऊ शकली नव्हती. मात्र आता अचानक तिच्या माहेरून फोन आला आणि तिला कळले की तिच्या चुलतभावाचे लग्न ठरले आहे ते. पराग घरी आला तशी प्रिया एकदम उत्साहाने त्याच्या समोर गेली आणि त्याला म्हणाली.
” अहो…माझ्या चुलतभावाचं लग्न ठरलंय…15 दिवसाने साखरपुडा आहे…आपल्या एक दिवस आधीच बोलावलं आहे…”
” हो अगं…मला तुझ्या काकांचा फोन आला होता…ते सांगत होते लग्न जुळल्याच…” पराग म्हणाला.
” आपली कार नादुरुस्त आहे सध्या. त्यामुळे तुम्ही आताच रेल्वेच तिकीट पाहून ठेवा…नाहीतर वेळेवर गडबड होईल…” प्रिया म्हणाली.
” हो…” पराग म्हणाला आणि मोबाईल मध्ये डोकं घालून बसला.
प्रिया खूपच उत्साहात होती. तिने आतापासूनच तयारीला सुरुवात केली होती. प्रियाच्या लग्नानंतर तिच्या माहेरी ही पहिलंच लग्न होतं. तिच्या दोन्ही बहिणी, एक चुलत बहिण सगळ्या फोनवर एकमेकींच्या तयारीची माहिती घेत होत्या. कोणती साडी घालायची, कसे फोटो काढायचे सगळंच ठरत होतं.
दुसऱ्या दिवशी मधुताईचा परागला फोन आला होता. तिने सांगितले की तिच्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे आणि ती त्याच्या काही ओळखीच्या नातेवाईक आणि मित्रांना त्या दिवशी जेवायला बोलावणार आहे. तर त्या दिवशी प्रियाला माझ्याकडे पाठवून देशील. ते ऐकून तो म्हणाला.
” ताई, त्या दिवशी तर प्रियाच्या चुलतभावाचा साखरपुडा आहे आणि तिला गावी जायचं आहे.”
” अरे नुसता साखरपुडाच आहे ना, लग्न थोडीच आहे. आणि तिच्या भरवशावर मी हे सगळं करायचं ठरवलं आहे. तिला नको पाठवू गावी सध्या मला तिची जास्त गरज आहे माझ्या घरी.” मधुताई म्हणाली.
———-
” ठीक आहे ताई.” पराग म्हणाला.
त्याने प्रियाला ह्याबद्दल काहीही सांगितले नाही. साखरपुड्याला आठ दिवस राहीले तसे प्रियाने पुन्हा परागला आठवण करून दिली.
” अहो…तिकीट झालंय ना आपलं…”
” मी म्हटलं ना तुला मी बघून घेईन. तू काळजी करू नको.” पराग म्हणाला.
खरेतर प्रियाला विचारायचं होतं की कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेची ट्रेन आहे. पण त्याने खात्री दिली होती की ती बघून घेईन. शिवाय सध्या त्याचा मूड ठीक नव्हता म्हणून तिने फार काही विचारले नाही.
” ठीक आहे. ” ती एवढंच म्हणाली.
त्यानंतर जायच्या एक दिवस आधी ती पुन्हा परागला म्हणाली.
” अहो. गाडीच तिकीट मला पाठवता का. म्हणजे मी वेळेत तयारी करेन उद्या. “
” तिकीट ?” पराग ने काहीही न कळल्या सारखे विचारले.
” अहो आपल्याला उद्या माझ्या गावी जायचे आहे ना. परवा माझ्या चुलतभावाचा साखरपुडा आहे ना. त्यासाठी तुम्ही जे ट्रेन चे तिकीट काढले आहे ते. नाहीतर मला गाडीची वेळ सांगा. म्हणजे मी त्यानुसार तयारी करून घेईल.” प्रिया म्हणाली.
क्रमशः
पुढील भाग इथे वाचा 👇