प्रतीक्षा गणपतराव आणि शालिनीबाईंची लहान मुलगी. एक मोठा भाऊ रोहन, प्रतीक्षा आणि आई बाबा असा चौकोनी परिवार.
गव्हाळ वर्ण, मोठे बोलके डोळे, चेहऱ्यावर निरागसपणा आणि मनात संसाराची असंख्य स्वप्नं. गरीब घरात जन्मली असली तरी आई-वडिलांनी तिला खूप चांगले संस्कार दिले होते.
तिचे वडील गणपत काका घरच्या शेतात दिवसरात्र काम करायचे. जमिनीचा छोटासा तुकडा होता त्यांच्याकडे. त्यावरच सगळा उदरनिर्वाह चालायचा. आई शालिनीबाई सोबतीला मशीनकाम करायच्या. घरात फारसा पैसा नव्हता, पण माया खूप होती.
प्रतीक्षा लहानपणापासूनच समजूतदार होती. आईला घरच्या कामात हातभार लावायची. तिने कुठल्याही गोष्टीसाठी कधीच आईवडिलांकडे हट्ट केला नव्हता.
“आई मी मोठी झाली की तुला कोणत्याच कामाला हात लावू देणार नाही बघ. सगळी कामं मी करत जाईल.” असे ती नेहमी आईला म्हणायची.
“बाळा, मुलीच्या नशिबात तिचं स्वतःचं घर असतं. तिथे सुखी राहा, तेच आमचं सुख.” आई तिला म्हणायची.
एक दिवस दुपारी गावातल्या देवकी वहिनींनी शालिनीताईंना येऊन बातमी दिली.
“शालिनी वहिनी, तुमच्या मुलीसाठी एक खूप चांगलं स्थळ चालून आलंय.”
“कोणाचं स्थळ ?” शालिनी ताईंनी विचारले.
“अभिजीत देशमुख नाव आहे मुलाचं. शहरात मोठा व्यवसाय आहे. घरदार भारी आहे.”
गणपत काका घरी आले तेव्हा शालिनीबाईंनी ही बातमी सांगितली.
“आपल्या मुलीचं एवढ्या मोठ्या घरात लग्न? आपल्याला झेपणार आहे का ही सोयरिक…” ते अविश्वासाने म्हणाले.
” देवकी सांगत होती की मुलाकडचे खूप चांगले आहे आणि त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव सुद्धा आहे…” शालिनी ताई म्हणाल्या.
मग गणपतराव सुद्धा काहीच बोलले नाहीत.
दोन दिवसांनी पाहणी ठरली. त्या दिवशी प्रतीक्षा फिकट गुलाबी साडी घालून बसली होती. हात थरथरत होते. ती सारखी पदर सावरत होती.
दारातून अभिजीत आत आला. उंच, गोरा, नीटनेटका. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं. प्रतीक्षाने पहिल्यांदा त्याच्याकडे पाहिलं… आणि लगेच नजर खाली केली. वनमालाबाई मात्र सगळं निरखून पाहत होत्या.
“मुलगी घरातील कामं करते ना?” त्यांनी विचारलं.
“हो… घरातली सगळी कामं करते ती… सगळं येतं तिला…,” शालिनीबाई नम्रपणे म्हणाल्या.
थोडीफार जुजबी बोलणी होऊन ही सोयरिक ठरली. वनमालाबाईंना खरंतर होकार द्यायला वेळ घ्यायचा होता. पण अभिजीत ने मुलीला पसंत केल्यामुळे मग सगळं काही ठरवूनच ते निघाले. आधीच वनमालाबाईंना एखाद्या गरीब घरची मुलगी हवी होती. जेणेकरून त्यांच्या हाताखालची राहील आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागेल.
लवकरच साखरपुडा उरला आणि लग्न मोठ्या थाटामाटात झालं.
सनई वाजत होती. मंडप फुलांनी सजला होता. गावभर लग्नाची चर्चा होती.
“गणपतच्या मुलीचं नशीब जोरावर आहे,” लोक म्हणत होते. प्रतीक्षा नवरीच्या वेषात खूप सुंदर दिसत होती. मंगलाष्टक सुरू झालं आणि अंतरपाट खाली झाला. तिने अभिजीतकडे पाहिलं. तो हलकंसं हसला.
त्या हसण्यात तिला आयुष्यभराची साथ दिसली. लग्नानंतरची पाठवणी आली तेव्हा शालिनीताई रडत होत्या.
“स्वतःला जप गं,” त्यांनी मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं.
प्रतीक्षा गळ्यात पडून रडू लागली.
“आई… मी जाईन कशी तुम्हाला सोडून?”
गणपत काकांनी डोळे पुसले.
“आता तेच तुझं घर आहे बाळा.” ते तिला म्हणाले.
थोड्या वेळाने गाडी निघाली. प्रतीक्षा मागच्या काचेतून आई-वडिलांना पाहत राहिली. जोपर्यंत ते दिसेनासे झाले नाहीत… तोपर्यंत.
थोड्याच वेळात ती सासरी पोहचली. देशमुखांचं घर मोठं होतं. दोन मजली बंगला. अंगणात तुळस. घरात नोकरचाकर. प्रतीक्षाला सुरुवातीला सगळंच नवीन वाटत होतं. पहिल्या दिवशी तिने सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. वनमालाबाईंनी वरवर हसून तिला उचललं.
“घराची अब्रू राख. या घराची जबाबदारी आता तुझ्यावर आहे..”
“हो आई,” प्रतीक्षा नम्रपणे म्हणाली.
आणि प्रतिक्षा आणि अभिजीतचा संसार सुरू झाला. अभिजीत सुरुवातीला खूप प्रेमळ होता. रात्री तो तिच्याशी गप्पा मारायचा. तिला फिरवायला घेऊन जायचा.
“तुला शहर आवडलं का?” त्याने एकदा विचारले.
“हो… पण अजून भीती वाटते.” प्रतीक्षा म्हणाली.
“मी आहे ना.” अभिजीत तिचा हात हातात घेऊन म्हणायचा.
हे ऐकल्यावर ती लाजून जायची. मनातून मोहरुन जायची. कधी तो तिला आईस्क्रीम खायला घेऊन जायचा. कधी नवीन साडी आणायचा.
प्रतीक्षाला वाटू लागलं होतं की “मी खूप नशीबवान आहे.”
पण दिवस पुढे सरकू लागले तसे वनमालाबाईंचा खरा स्वभाव दिसू लागला. त्यांनी घरातील नोकरांना काढून टाकले होते. त्या घरातील सगळी कामे प्रतीक्षाकडून करून घ्यायच्या. त्यांना प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता हवी होती.
“पोळी गोल नाही.”
“भाजीला मीठ जास्त.”
“घरात कामाला गती नाही.”
प्रतीक्षा शांतपणे सगळं ऐकायची. एक दिवस ती तापातही स्वयंपाक करत होती. तिच्या कपाळावर घाम होता. वनमालाबाईंनी पाहिलं आणि म्हणाल्या,
“आजकालच्या मुलींना थोडं काम केलं तरी आजार होतो.”
प्रतीक्षाने ऐकले पण काही उलट उत्तर दिलं नाही.
“आई माझ्यावर नाराज आहेत का?”रात्री अभिजीतला ती म्हणाली,
तो मोबाईलमध्ये बघत म्हणाला,
“तू जास्त मनाला लावून घेतेस बघ. असं काहीच नाहीये..”
अशातच पहिली दिवाळी आली. प्रतीक्षाने घर सुंदर सजवलं. रांगोळी काढली. फराळ केला. अभिजीत तिच्याकडे पाहत म्हणाला,
“तू आल्यापासून घर खूप बदललंय. घराला घरपण आलं तुझ्यामुळे…”
त्याचे बोलणे ऐकून ती मनापासून हसली.
त्या रात्री दोघं छतावर बसले होते. आकाशात फटाके फुटत होते.
“आपल्याला मुलगा झाला तर?” अभिजीत अचानक म्हणाला.
“आणि मुलगी झाली तर?”प्रतीक्षा लाजत म्हणाली.
“तुझ्यासारखी असावी.”
ती हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. त्या क्षणी तिला वाटलं की
हे सुख कायमचं आपल्या आयुष्यात आहे. पण नियती शांतपणे काहीतरी वेगळंच लिहित होती. असंच वर्ष सरलं. लग्नाला वर्ष झालं.
घरात मात्र एक गोष्ट वारंवार बोलली जाऊ लागली—
“गोड बातमी.”
सुरुवातीला प्रतीक्षा लाजायची.
“देवाच्या मनात असेल तेव्हा होईल.”
पण वनमालाबाईंचे टोमणे दिवसागणिक वाढत गेले.
“आमच्या घराला वारस हवा. आता तर लोक सुद्धा विचारतात की लग्नाला वर्ष झालं तरी सुनेने गोड बातमी नाही दिली. सून वांझ तर नाही म्हणून…”
प्रतीक्षा ऐकायची आणि मनातून दुःखी व्हायची. अभिजीतला काहीच सांगायची सोय नव्हती. कारण तो सुद्धा आता या विषयावर चिडायचा. कारण वनमालाबाईंनी त्याला सुद्धा हा प्रश्न विचारून हैराण करून सोडले होते. तो प्रतिक्षाला घेऊन डॉक्टरांकडे सुद्धा गेला होता. डॉक्टर सुद्धा म्हणाले की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुम्ही जरा वेळ जाऊ द्या.
पण वनमालाबाईंना मात्र वाटायचे की प्रतीक्षा वांझ आहे आणि तिला मूल होऊ शकत नाही. एक दिवस कुणी नातेवाईक आले होते. त्यांच्यासमोरच वनमालाबाई म्हणाल्या,
“काही लोकांचं नशीबच पांढरं असतं.”
हे ऐकून प्रतीक्षाच्या डोळ्यांत पाणी आलं.
तिने अभिजीतकडे पाहिलं. पण तो शांत बसला होता. त्या रात्री ती रडत म्हणाली,
“तुम्ही आईंना काही बोलत का नाहीस?”
“आईचं मन आहे, तिला सुद्धा वाटतं ना नातवंड हवेत म्हणून…” तो चिडून म्हणाला.
” पण मग माझ्या मनाचं काय? ह्यात माझी काय चुकी आहे…”
तिच्या या प्रश्नावर तो काही बोलला नाही. तो दुसरीकडे चेहरा करून झोपी गेला. त्या रात्री पहिल्यांदा दोघांमध्ये शांततेची भिंत उभी राहिली.
त्या दिवशी सकाळपासूनच वातावरण तणावाचं होतं.
प्रतीक्षा स्वयंपाकघरात काम करत होती. तिच्या हातून चुकून चहाचा कप खाली पडला. काच फुटल्याचा आवाज झाला. आवाज ऐकून वनमालाबाई धावत आल्या.
“हे काय?”
“हातातून निसटलं आई…”
“तुझ्याकडून दुसरी अपेक्षा सुद्धा काय करणार ?”
प्रतीक्षा च्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. पण ती गप्पच होती.
पण वनमालाबाई बोलायच्या थांबल्या नाहीत.
“घरात पाय टाकल्यापासून अशुभच सुरू आहे.”
“आई, मी एवढी वाईट आहे का?” तिने न राहवून विचारले.
“आमच्या घराला मूल नाही देऊ शकलीस. आणि काय म्हणून तुला चांगलं म्हणावं मी ?” वनमालाबाई चिडून म्हणाल्या.
“त्यात माझी काय चूक आहे?” तिने म्हटले.
वनमालाबाई संतापल्या.
“ मला उलट उत्तर देतेस?”
अभिजीत बाहेर हॉलमध्ये उभा होता.
“अभिजीत!” वनमालाबाई ओरडल्या.
“तिला लगेच तिच्या माहेरी सोडून ये.”
क्षणभर सगळं शांत झालं. प्रतीक्षाला वाटलं अभिजीत आईला विरोध करेल. तो म्हणेल — “आई, प्रतीक्षा कुठेही जाणार नाही.”
पण तो फक्त एवढंच म्हणाला—
“ प्रतीक्षा… जा तयार हो.”
त्या एका शब्दाने तिचं हृदय तुटलं. ती खोलीत जाऊन तयार झाली.
अभिजीत ने तिची बॅग गाडीत ठेवली आणि ती सुद्धा गाडीत जाऊन बसली. गाडीत पूर्ण शांतता होती. दोघेही एकमेकांशी शब्द ही बोलले नाहीत.
प्रतीक्षा खिडकीबाहेर पाहत होती. डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते.
गाडी तिच्या घरा समोर थांबली. गाडीचा आवाज ऐकून शालिनीबाई दारात आल्या. मुलीचा रडलेला चेहरा पाहून त्यांच्या काळात धस्स झालं.
“काय झालं प्रतीक्षा?” त्यांनी विचारले.
प्रतीक्षा काही बोलली नाही तेव्हा त्यांनी अभिजीतला विचारले.
” काय झाले जावईबापू..?”
” प्रतीक्षा काही दिवस राहायला आली आहे…,” अभिजीत कोरड्या आवाजात म्हणाला.
एवढे बोलून तो बाहेरूनच निघून गेला. प्रतीक्षा त्याच्या गाडीमागे पाहत राहिली. तिला अजूनही वाटत होतं की तो परत येईल. तिची माफी मागेल आणि तिला घेऊन जाईल. तिचा संसार पुन्हा आधीसारखा होईल.पण नियतीने तिच्यासाठी दुःखाची खरी सुरुवात अजून राखून ठेवली होती…
क्रमशः