मीनाताई यावर काही बोलणार त्या आधीच सारंगच्या मनाचा बांध फुटला.
तो मोठ्याने म्हणाला,
“बस!..आता हद्द झाली सुमेधा. घरासाठी राबतेस म्हणजे काय ? आजवर एकदाही घरात पैसे खर्च केलेस का तू ? मला एखाद्या खर्चासाठी मदत केलीस का नोकरी करत आहेस तेव्हापासून. एखादं सामान तरी आणलं आहेस का घरात. तू तुझ्या पाच सात हजार पगारांचा जो तोरा दाखवतेस ना माझ्या आईला ते तुलासुद्धा पुरत नाहीत. पण तरीही फक्त आईने म्हटले की तिला हौस आहे तर करू दे म्हणून मी काही बोललो नाही तर तू एकदम आईला कामवाली बाईच समजून वागू लागली.”
त्याचा आवाज मोठा झालेला पहिल्यांदाच ऐकल्याने सुमेधा दचकली.
“आजपर्यंत मी शांत होतो. कारण मला वाटलं तुला तुझी चूक कळेल. खूप साऱ्या स्त्रिया आज बाहेर जाऊन नोकरी करतात. पण सोबत घर सुद्धा छान सांभाळतात. पण तू तर नुसत्या आईला ऑर्डर सोडतेस. अन् आई या वयात बिचारी काम करते. तिला दमायला होतं हे तुला दिसत नाही का.”
तो पुढे म्हणाला,
” तू ज्या खोलीतून आईला बाहेर जायला सांगत आहेस ती खोली आईची आहे. एवढंच नव्हे तर तू ज्या घरात राहतेस…ज्या घरावर अधिकार दाखवतेस…ते घर माझ्या आईच्या नावावर आहे.”
क्षणभर सुमेधा निःशब्द झाली.
“हे घर आईने आणि बाबांनी आयुष्यभर कष्ट करून उभं केलं. पण तिने कधीही तुला तिचा मालकी हक्क जाणवू दिला नाही. तू तुझ्या एवढ्याशा पगाराच्या जीवावर आईला नको ते सुनावतेस. तिला मुद्दामहून कमीपणा दाखवतेस, तिला मोलकरणी सारखे राबवून घेतेस. ती माझी आई या एवढ्या मोठ्या घराची मालकीण असूनही कधी एका शब्दाने तुला कमीपणा दाखवत नाही. केवळ तुझी हौस पुरवण्यासाठी तिने मला तुला नोकरी करू देण्याबद्दल राजी केले होते. आणि तू त्या माझ्या आईला इतकी वारंवार वाईट शब्दांनी दुखावतेस. तुझ्या नोकरीचा तोरा दाखवतेस.” सारंग म्हणाला.
“बाबा गेल्यावर आईने एकटीनं मला वाढवलं. माझ्या शिक्षणासाठी स्वतःचे दागिने विकले. आज मी जे काही आहे, ते तिच्यामुळे. आणि त्या माझ्या आईला तू एवढं काय काय बोलतेस ते ऐकून जीव तुटतो माझा. पण आईने मला सांगितले की सुमेधाला दुखावू नकोस म्हणून आजपर्यंत एक शब्दानेही काही बोललो नाही तुला. मला वाटलं की तुझं तुलाच कळेल की तू चुकत आहेस. पण तू तर चुकांची मालिकाच लावली आहेस. आणि आता तर माझ्या आईला तिच्याच खोलीतून बाहेर काढायला निघाली आहेस.
आणि आज तू त्यांनाच त्यांच्या खोलीतून बाहेर जायला सांगतेस. उद्या घरातून बाहेर काढायला सुद्धा विचार करणार नाहीस.”
—
हे ऐकून सुमेधाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. तिने पहिल्यांदाच मीनाताईंकडे नीट पाहिलं. त्यांच्या हातावरील भाजल्याच्या खुणा, वयामुळे आलेला थरथरता हात आणि डोळ्यांतील निःशब्द वेदना, तरीही चेहऱ्यावर हसू घेऊन वावरायच्या. तिला हवं नको ते विचारायच्या.
तिला आठवलं की ती आजारी असताना मीनाताई रात्रभर तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसल्या होत्या. तिला ऑफिसला उशीर होऊ नये म्हणून स्वतः तापातही उठून डबा बनवला होता. एकदाही त्यांनी उपकारांची भाषा केली नव्हती. पण तिने त्यांना कधी आई मानलंच नव्हतं.
—
सुमेधा रडत त्यांच्या पायाशी बसली.
“आई… मला माफ करा.”
तिला असे पाहून मीनाताईंना कसेतरीच वाटले. त्या तिला म्हणाल्या.
“अगं, उठ.”
“नाही आई. जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही.”
ती हुंदके देत म्हणाली,
“मी नोकरी करू लागले… थोडे पैसे कमवायला लागले… आणि मला वाटलं मीच मोठी आहे. पण आज समजलं…मोठेपणा पगारात नसतो… तो मनात असतो.”
मीनाताईंच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी तिला उचलून मिठी मारली.
“मुलं चुकतात म्हणून आई प्रेम करणं सोडत नाही बाळा. तू पण मला माझ्या सारंग सारखीच आहेस. माझ्या मनात तुझ्याबद्दल अजिबात राग नाही बघ.”
तिने माफी मागितली आणि आईने सुद्धा तिला माफ केले म्हणून सारंगला जरा बरे वाटले होते.
—
दोन दिवसांनी पूजा आली. सुमेधाने तिचं स्वागत केलं. तिला स्वतःच्या खोलीत राहायला सांगितले आणि सारंग काही दिवस हॉलमध्ये झोपला. सुमेधा आणि मीनाताईंनी मिळून पूजाचे छान आदरातिथ्य केले. पंधरा दिवसांनी पूजा तिच्या घरी परतली.
काळ पुढे सरकत गेला. आता सकाळी दोघी मिळून स्वयंपाक करायच्या.
स्वयंपाकघरात आता हसत खेळत दोघी सासू सुना काम करायच्या. सुमेधा त्यांना हवं नको ते विचारायची. जास्तीत जास्त कामे स्वतःच करून जायचा प्रयत्न करायची. जेणेकरून सासूबाईंना दुपारी जरा आराम मिळेल. त्यांच्याशी आदराने बोलायची. तिच्यातला हा बदल पाहून सारंग सुद्धा सुखावला होता.
—
काही महिन्यांनी. मीनाताईंचा वाढदिवस होता. सुमेधाने त्यांना नवीन साडी भेट दिली. एक सुंदर केक आणला. सगळ्यांसमोर ती म्हणाली,
“आज मी ज्या घरात आनंदाने जगते, त्या घराची खरी आधारवड माझ्या आई आहेत. मला सासूच्या रुपात आईच मिळाली आहे.”
मीनाताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले.
त्यांनी सुमेधाचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या,
” आजवर मुलगी नसल्याची खंत होती पण आज मुलीप्रमाणे जपणारी सून मिळाल्याचा आनंद आहे.”
आणि संपूर्ण घर टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं.
घरात पैसा असणं महत्त्वाचं असतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रेम, आदर आणि कृतज्ञता. ज्येष्ठांनी आयुष्यभर आपल्या सुखासाठी केलेल्या त्यागाची किंमत पैशांनी मोजता येत नाही. अहंकाराने नाती तुटतात, तर नम्रतेने ती पुन्हा फुलतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा—तोरा पदाचा किंवा पैशांचा नसावा; तो संस्कारांचा असावा.
समाप्त.
ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा 😊 आणि अशाच काही हृदयस्पर्शी कथा इथे वाचा 👇
©® आरती निलेश खरबडकर.