महिने वर्षांत बदलू लागले पण केस काही पुढे सरकत नव्हती. प्रतीक्षा आणि गणपत काका वारंवार कोर्टाच्या फेऱ्या मारत होते. सकाळी पहाटे बस पकडायची. शहरात जायचं. तासन्तास कोर्टात बसून राहायचं.
आणि शेवटी—“पुढची तारीख.”
कधी अभिजीत यायचाच नाही. कधी त्याचा वकील काहीतरी कारण द्यायचा की माझे क्लायंट शहराबाहेर आहेत. कधी तब्येत ठीक नाही.
तर कधी व्यवसायाचं काम आहे. प्रतीक्षाच्या मनात चीड वाढत होती.
एक दिवस कोर्टाबाहेर ती चिडून म्हणाली.
“त्याला माहितीय मी गरीब आहे. म्हणून तो मला थकवतोय.”
“हेच होतं बहुतेक वेळा.” देशपांडे शांतपणे म्हणाले.
“मग न्याय कुणाला मिळतो?” तिने विचारले.
देशपांडेंकडे याच उत्तर नव्हतं.
गावात आता लोक तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले होते.
“अजून केस चालू आहे?”
“काय उपयोग?”
“नवरा परत येणार नाही.”
शेजारच्या एका बाईने तर थेट म्हटलं,
“बाईने इतकी हट्टी नसावं.”
प्रतीक्षा सगळ ऐकून शांतपणे निघून जायची. पण आईला मात्र विचारायची.
“मी माझा हक्क मागतेय… मग लोकांना एवढा त्रास का होतो?”
शालिनीबाई तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या,
“कारण समाजाला लढणारी बाई सहन होत नाही बाळा.”
दरम्यान प्रतीक्षाचा लहान भाऊ रोहनचं लग्न ठरलं. घरात काही दिवस पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. शालिनीबाई लग्नाच्या तयारीत गुंतल्या. गणपत काका कर्ज काढून व्यवस्था करत होते. प्रतीक्षाही स्वतःचं दुःख बाजूला ठेवून काम करत होती.
लग्न झालं. नवीन वहिनी — पूजा — घरात आली. सुरुवातीला ती व्यवस्थित वागत होती. पण काही दिवसांनी तिचा स्वभाव दिसू लागला.
तिला प्रतीक्षाचं घरात असणं आवडत नव्हतं. एक दिवस ती शेजारणीशी बोलताना मुद्दाम मोठ्याने म्हणाली,
“ मुलगी सासरी नांदली नाही की त्या मुलीमुळे पूर्ण घराचं वातावरण खराब होतं.”
प्रतीक्षा आतून सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण ती काही बोलली नाही.
इकडे देशपांडे वकिलांमध्येही हळूहळू प्रतीक्षाला काहीतरी विचित्र जाणवू लागलं. अॅडव्होकेट देशपांडे आधीसारखे लक्ष देत नव्हते. कधी फाईल विसरायचे. कधी तारखा गोंधळायचे. कधी म्हणायचे,
“ही केस अवघड आहे. तू घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर आणि त्याचा न सोडून दे.”
एक दिवस कोर्टात त्यांनी महत्त्वाचा मुद्दाच मांडला नाही. प्रतीक्षा बाहेर येऊन म्हणाली, “सर, तुम्ही ते सांगितलंच नाही.”
तेव्हा ते चिडून म्हणाले, “मला माझं काम माहितीय.”
काही दिवसांनी कोर्टातल्या एका क्लार्कने तिला बाजूला बोलावलं.
तो हळू आवाजात म्हणाला,
“ताई… एक गोष्ट सांगू?”
“काय?”
तो आजूबाजूला पाहत म्हणाला,
“तुमच्या नवऱ्याने तुमच्या वकिलाला मॅनेज केलंय असं ऐकलंय.”
क्षणभर प्रतीक्षाच्या पायाखालची जमीन सरकली.
“काय?”
“मी खात्रीने नाही म्हणत… पण कोर्टात चर्चा आहे.”
प्रतीक्षा स्तब्ध झाली. तिच्या कानात आवाज घुमू लागले.
“मॅनेज केलंय म्हणजे काय…”
तिच्या डोळ्यांसमोर अंधार यायला लागला.
ती कोर्टाबाहेरच्या बाकावर बसली. तिच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. “माझ्याकडे उरलं तरी काय आहे?” तिने स्वतःशीच विचारलं.
ज्याच्यावर प्रेम केलं त्याने धोका दिला. ज्यावर विश्वास ठेवला त्या वकिलानेही विकलं. ती बराच वेळ तिथेच बसून राहिली.
लोक येत होते, जात होते.
बसच्या खिडकीतून बाहेर पाहत प्रतीक्षा रडत होती. गाव, झाडं, रस्ते मागे सरकत होते. पण तिचं आयुष्य मात्र एका ठिकाणी अडकून पडलं होतं. घरी आल्यावर शालिनीबाईंनी विचारलं,
“काय झालं?”
प्रतीक्षा आईच्या गळ्यात पडून रडू लागली.
“आई… सगळे विकले गेलेत.”
आता घरातही वातावरण बदलत होतं. पूजा वहिनी सतत टोमणे मारायची.
“किती पैसे घालवणार या केसमध्ये?”
“घर चालवायचं की कोर्ट?”
रोहन मध्ये पडायचा.
“पूजा, शांत बस.”
पण त्याच्याही चेहऱ्यावर ताण दिसू लागला होता. प्रतीक्षाला अपराधी वाटू लागलं. वहिनी दिवसरात्र म्हणायची की भावाच्या हिस्याच्या पैशांनी कोर्ट केस लढवताय. भावाला कफल्लक करून सोडणार
आहात का. म्हणूनच तुमचा संसार टिकला नाही. असे काही न काही टोमणे दिवसभर सुरू असायचे.
क्रमशः