” तू…आता तू काय करत आहेस इथे ?” वनमालाबाई तिला म्हणाल्या.
” काय करत आहेस म्हणजे काय ? हे माझं सुद्धा घर आहे. आणि ही इथे काय करत आहे ?” मनाली ने प्रतीक्षा ला पाहून उलट प्रश्न केला.
” तिला मी घेऊन आली आहे इथे. आणि तू कोणत्या तोंडाने या घराला आपलं घर म्हणत आहेस. ज्यावेळी या घराला तुझी गरज होती तेव्हा तू सोडून गेलीस. आणि आता या घराला आपलं म्हणत आहेस ?” वनमालाबाई म्हणाल्या.
” हो. कारण अभिजीतची बायको होते मी. त्यांच्या प्रॉपर्टी वर माझा अधिकार आहे. त्यांच्यानंतर हे सगळं फक्त माझं आहे.” मनाली म्हणाली.
” प्रॉपर्टी चा विषय आला तेव्हा तुला आठवले की तू अभिजीत ची बायको होतीस. पण जेव्हा त्याला तुझी गरज होती तेव्हा तर सोडून गेली होतीस ना.” वनमालाबाई म्हणाल्या.
” मग एका पंगू माणसासोबत आयुष्य घालवायचं होतं का मी ?” मनाली म्हणाली.
” मग त्याच पंगू माणसाच्या प्रॉपर्टी वर अधिकार सांगायला का आली आहेस ?” वनमालाबाईंनी विचारले.
” हो…कारण त्यांनी स्वतःच हिला सोडून मला स्वीकारले होते. मग आता ही इथे काय करत आहे.” मनाली म्हणाली.
पुढे प्रतीक्षाकडे पाहून ती म्हणाली.
” अगं ए. सगळं काही माझ्या नावावर करून इथून निघून जा.” मनाली म्हणाली.
” तुझ्या नावावर का करू मी ?” प्रतीक्षा ने शांतपणे विचारले.
” कारण मी त्यांची बायको होते.” मनाली चिडून म्हणाली.
” बेकायदेशीर बायको होतीस. बेकायदेशीर लग्न झालं होतं तुमचं. आमचा घटस्फोट झालेला नसताना सुद्धा तू ह्यांच्याशी लग्न केलंस. त्यामुळे तुला त्यांच्या प्रॉपर्टी मधलं काहीच मागायचा अधिकार नाही आहे हे स्पष्टच आहे ना.” प्रतीक्षा पुन्हा शांतपणे म्हणाली.
” अशी कशी बाई आहेस तू. स्वतः एक स्त्री असूनपण दुसऱ्या स्त्रीचा अधिकार हिरावून घेणार आहेस का ?. मी माझा अधिकार सोडणार नाही. मी ही प्रॉपर्टी घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.” मनाली म्हणाली.
” तू बेकायदेशीर बायको असून सुद्धा आणि त्यांच्या वाईट काळात त्यांची साथ सोडूनसुद्धा त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये अधिकार घ्यायला आली आहेस. मग जेव्हा मी कायदेशीर बायको होते, स्वतःच्या घरात जागा मिळवण्यासाठी धडपडत होते, त्यांच्या घराचे दार ठोठावत होते, तेव्हा का नाही तुझ्यातली बाई जागी झाली.” प्रतिक्षा ने तिला विचारले.
” मी कोर्टात जाईल. तुला स्वस्थ बसून देणार नाही.” असे म्हणत मनाली पाय आपटत बाहेर निघून गेली.
तिला वाटले होते की प्रतीक्षा तिला घाबरून सगळं काही सोडून निघून जाईल. पण प्रतीक्षा तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त धीट निघाली. निदान प्रॉपर्टी साठी का होईना आपण शेवटच्या काळात अभिजीत सोबत राहायला हवे होते असे तिला वाटून गेले.
मनाली गेल्यावर वनमालाबाई प्रतीक्षा म्हणाल्या.
” तुला प्रश्न पडत असेल ना की तुझ्यावर एवढे प्रेम करणारा अभिजीत तुला सोडून दुसऱ्या लग्नाला तयार कसा झाला ?”
” हो आई. प्रश्न तर पडायचा. बरेचदा पडायचा. अजूनही पडतोच.” प्रतीक्षा म्हणाली.
” मी त्याला ते करायला भाग पाडलं अगं. मी त्याला म्हणाले की तू जर प्रतीक्षा ला सोडून दुसरं लग्न केलं नाहीस तर मी माझ्या जिवाचं काही बरंवाईट करेल. सुरुवातीला नाही नाही म्हणाला होता तो. पण माझ्या हट्टापुढे शेवटी झुकलाच. मग हळूहळू तुझं प्रेम पण विसरला. मी जर जास्त हट्ट केला नसता तर तो सुद्धा कदाचित एवढं टोकाचं वागला नसता.” वनमालाबाई म्हणाल्या.
हे ऐकून प्रतीक्षाला खूप वाईट वाटले. पण आता ह्या सगळ्याचा काहीच अर्थ उरला नव्हता. जे काही वाईट व्हायचे होते ते होऊन गेले होते. अभिजीत सुद्धा या जगात नव्हता. वनमालाबाईंना खरोखर त्यांच्या वागण्याचा पश्चात्ताप होत होता. म्हणून मग प्रतिक्षाने सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ केले. ती वनमालाबाईंना म्हणाली.
” आपण झालं गेलं विसरून जाऊ. पुन्हा त्या जुन्या जखमा कशाला उकरून काढायच्या. आपण पुन्हा नव्याने जगायला शिकू. एकमेकींची सोबत करू. माझ्या मनात तुमच्याबद्दल अजिबात राग नाही आहे.” प्रतीक्षा म्हणाली.
वनमालाबाईंचे डोळे भरून आले. जिला आपण एवढा त्रास दिला ती सगळं विसरून आपल्याला आधार देत आहे ह्याचे कौतुक सुद्धा वाटले. एवढ्या लहान वयात तिच्यात एवढा समजूतदारपणा आहे हे पाहून त्यांना समाधान सुद्धा वाटले.
इकडे प्रतिक्षाच्या गावात आता एकच चर्चा होती. देशमुखांची सगळी संपत्ती प्रतीक्षाच्या नावावर झाली. लोकांना आश्चर्य वाटत होतं. जिला एकेकाळी घराबाहेर काढलं. आज तीच त्या घराची मालकीण झाली होती. काही लोक म्हणत होते की देव उशिरा न्याय देतो… पण देतो नक्कीच. लोक आता तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. दयेने नाही
तर आदराने.
तिचे आईवडील तिला पुन्हा जगताना पाहून समाधानी होते. तिची वहिनी पूजा मात्र आता पश्चात्ताप करत होती. इकडे गावातील चांगल घर सोडून शहरात एका भाड्याच्या खोलीत राहत होती. रोहनच्या पगारात फक्त राहणं आणि खाणं व्हायचं. हौसमौज अशी काही होत नव्हती. तिला वाटले होते की शहरात राहायला खूप मज्जा येईल पण तिचा भ्रमनिरास झाला होता. शिवाय ज्या नणंदेचा आजवर राग राग करत होती ती नणंद सुद्धा अचानक श्रीमंत झाली होती. पण तिला जी वाईट वागणूक दिली त्यामुळे तिला काही मदत मागायची हिची हिंमत होत नव्हती.
इकडे प्रतीक्षा आता पुन्हा जगायला शिकत होती. स्वतःच्या अस्तित्वासह.
ती अभिजितच्या ऑफिसची कामे सुद्धा शिकून घेत होती. सोबतच त्याच्याकडे जी शेती होती त्याचा हिशोब सुद्धा पाहू लागली होती. वनमालाबाईंना सुद्धा स्वतःच्या आईप्रमाणे सांभाळत होती. तिच्यात आता कमालीचा आत्मविश्वास आला होता.
एक दिवस ती अभिजीतच्या फोटोसमोर उभी होती. बराच वेळ शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांत ना राग होता…
ना प्रेम. फक्त एक खोल शांतता होती. ती हळू आवाजात म्हणाली,
“तुम्ही मला खूप सोडलं. पण कुठे ना कुठे मी आज पुन्हा उभी आहे त्याला सुद्धा कुठे ना कुठे तुम्हीच कारणीभूत आहात ”
असे म्हणून तिने फोटोसमोर दिवा लावला आणि शांतपणे मागे वळली.
पहाट झाली होती. आकाशात नवीन सूर्य उगवत होता. प्रतीक्षा अंगणात उभी होती. अधिरा तिचा हात धरून तिच्या शेजारी उभी होती. दोघी सूर्योदयाकडे पाहत होत्या. जीवनाने प्रतीक्षाकडून खूप काही हिरावून घेतलं होतं.
पण त्याच जीवनाने तिला एक नवीन अर्थही दिला होता. पुन्हा उभे राहण्याचा. माफ करण्याचा. आणि पुन्हा प्रेम करण्याचा. वेदना अजूनही होत्या. आठवणी अजूनही होत्या. पण आता त्या जखमा तिची कमजोरी नव्हत्या. त्या तिची ताकद बनल्या होत्या. आणि त्या नवीन पहाटेसोबत…
प्रतीक्षाच्या आयुष्याची खरी सुरुवात झाली होती.
समाप्त.
ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. कथेचा शेवट काही वेगळा असू शकला असता का ते सुद्धा सुचवा. धन्यवाद 😊
अतिशय सुंदर 👌👌👌