भूतकाळाची सावली

पुण्याची सकाळ नेहमीच एका वेगळ्या उत्साहात आणि धुक्यात झाकलेली असायची. डेक्कन जिमखाना परिसरातील एका आलिशान कॅफेबाहेर कुणालच्या गाडीची ब्रेक लागली. स्टीयरिंगवर त्याचे हात घट्ट पकडले होते. काळ्या रंगाचा डिझायनर शर्ट आणि नीटनेटके केस असलेला कुणाल आज एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडला होता—लग्नासाठी मुलगी पाहणे.

त्याच्या बाजूला त्याची आई, शकुताई बसल्या होत्या. चेहऱ्यावर आईचा असलेला तो गोड आणि काळजीयुक्त आनंद कुणालच्या चेहऱ्यावर मात्र दिसत नव्हता. त्याच्या मनात एक अजीबच अनामिक अस्वस्थता होती. गेल्या काही दिवसांपासून त्याला सगळं कसं अनपेक्षित वाटत होतं.

“कुणाल, चल ना बेटा. किती वेळ बसणार गाडीत? ती लोकं आत वाट बघत असतील,” शकुताईंनी हसत हसत गाडीचा दरवाजा उघडला.

कुणालने दीर्घ श्वास घेतला आणि गाडीबाहेर पाऊल ठेवले. कॅफेच्या आत पाऊल ठेवताच एसीची थंड हवा आणि कॉफीचा दरवळणारा सुवास त्यांच्या स्वागताला धावला. एका कॉर्नरच्या टेबलवर श्रुती आणि तिचे आई-वडील बसले होते. श्रुतीला पाहताच कुणालला ती खूप आवडली होती.

तिचा गव्हाळ रंग, लांब अन् थोडे कुरळे असलेले केस, कपाळावर छोटीशी टिकली, तिच्या टपोऱ्या डोळ्यात तिची अस्वस्थता अन् कुतूहल एकाच वेळी दिसून येत होतं.

तिच्या पांढऱ्या रंगाच्या वन-पीस ड्रेसवर पडणारा कॅफेचा पिवळसर प्रकाश, तिच्या कानातील साधे सोन्याचे झुमके आणि कपाळावर रेंगाळणारी केसांची एक बट. सर्वकाही परिपूर्ण होतं. कुणालला देखील तिला पाहिल्यावर वाटले की हीच आपली आयुष्याची जोडीदार असावी.

थोडेफार औपचारिक बोलणे झाल्यावर शकुताईंनी श्रुतीसोबत बोलायला सुरुवात केली. श्रुतीने सुद्धा त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत जरा अवघडून पण नीट उत्तरे दिली. कुणाल सुद्धा तिच्या आईवडिलांशी बोलत होता. बोलताना अधून मधून तिला चोरून बघत होता. तिला 2-4 वेळा पाहिल्यावर मात्र त्याला तिला आधी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटू लागले होते. आता जेव्हा जेव्हा तिला बघतभोटा तेव्हा तेव्हा तिला कुठेतरी पाहिल्याची जाणीव अधिक तीव्र होत होती.

तिला पाहिलंय… कुठे तरी पाहिलंय! नक्की कुठे?

त्याचे डोळे बारीक झाले. मेंदूचा एखादा सुप्त कोपरा जुन्या फाईल्स उलथून टाकू लागला. हा चेहेरा अनोळखी नव्हता. हा तोच चेहरा होता, जो त्याने काही महिन्यांपूर्वी एका रात्री उशिरा रस्त्यावर किंवा कदाचित… नाही, कुठेतरी फोटोत पाहिला होता का? किंवा प्रत्यक्ष?

शकुताई श्रुती आणि तिच्या घरच्यांशी बोलत होती. कुणाल पण त्याला विचारलेल्या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर देत होता. पण कुणालचे लक्ष त्या बोलण्यात अजिबात नव्हते. त्याचे डोळे सतत श्रुतीच्या चेहऱ्याचा प्रत्येक कोपरा शोधत होते. जेव्हा जेव्हा श्रुती हसायची, किंवा मान खाली घालून कॉफीचा घोट घ्यायची, तेव्हा तो तिच्याकडे पाहत आठवायचा प्रयत्न करत होता की हा चेहरा आधी कुठे पाहिलाय.

ती भेट साधारण एक तास चालली. सर्वकाही छान संपले. श्रुती आणि तिचे पालक निघून गेले. पण कुणालच्या मनातील काहूर शांत झाले नव्हते.

घरी परतताच शकुताईंनी सोफ्यावर बसत उत्साहाने विचारले,

“काय रे कुणाल? कशी वाटली तुला श्रुती? मुलगी अगदी सुसंस्कृत, देखणी आणि सुशिक्षित आहे. मला तर ती पहिल्याच नजरेत आवडली. तू काय म्हणतोस?”

कुणालने आपले कोटचे बटण काढले, सोफ्यावर फेकले आणि अत्यंत कोरड्या आवाजात म्हणाला,

“आई, मला ती मुलगी अजिबात आवडली नाही.”

हे ऐकून शकुताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात मावळला

“काय? आवडली नाही? पण का? काय कमी आहे तिच्यात?”

“तिचे कॅरेक्टर चांगले नाही, आई!” कुणालचे शब्द बर्फासारखे थंड आणि धारदार होते.

शकुताईंना बसल्या जागीच जणू शॉक बसला. त्यांनी डोळे मोठे करून कुणालकडे पाहिले.

“कुणाल! काय बोलतोयस तू? भान आहे का तुझ्या बोलण्याचं? त्या मुलीला तू आज पहिल्यांदाच पाहिलंयस, आणि असं बिनबुडाचं बोलतोयस? कुणाच्या मुलीबद्दल असं काही विनाकारण बोलू नये राजा. ”

“आई, मी विचार करूनच बोलतोय,” कुणालचा आवाज कठोर झाला.

“आतापर्यंत मला तिला आधी कुठे पाहिले ते आठवत नव्हते, पण कॅफेमध्ये बसल्यावर माझ्या लक्षात आलं की… श्रुतीचे लग्न याआधी माझ्याच एका मित्राच्या ओळहीतल्या एका मुलाशी ठरलेलं होतं. साखरपुडाही झाला होता!”

शकुताई स्तब्ध झाल्या.

“साखरपुडा? मग?”

“दोन ते तीन महिने ते दोघं सतत फोनवर बोलायचे. रात्रीचे तासन्तास गप्पा मारायचे. एकदोन वेळा खरेदीसाठी बाहेर सुद्धा भेटले होते. एकमेकांसोबत सेल्फी घ्यायचे. मग काहीतरी कारणास्तव ते लग्न ऐनवेळी तुटलं. आता विचार कर आई, ज्या मुलीने फोनवर का होईना इतके महिने दुसऱ्या एका पुरुषासोबत रोमान्स केला असेल, त्याच्या प्रेमात पडली असेल, फिरली असेल. त्या मुलीला मी माझी बायको म्हणून कसा स्वीकारू?”

कुणालच्या चेहऱ्यावर एक संताप आणि पुरुषी अहंकार स्पष्ट दिसत होता.

“त्यांनी एकमेकांसोबत प्रेमाच्या शपथा घेतल्या असतील, भविष्याची स्वप्ने रंगवली असतील, एकमेकांना नवरा-बायको म्हणून मनोमन स्वीकारलं असेल! मग अशा दुसऱ्याच्या पुरुषाला काही काळ का होईना जोडीदार म्हणून बघितलेली मुलगी मी माझ्या आयुष्यात कशी आणू?”

शकुताई कुणालचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाल्या. शकुताई आपल्या एकुलत्या एक मुलाकडे पाहत राहिल्या. हा तोच कुणाल होता का, ज्याला वडील गेल्यावर एकटीने सांभाळ करत त्यांनी आधुनिक विचारांचा, उच्चशिक्षीत आणि समजूतदार बनवले होते? एका क्षणात शकुताईंच्या अंगावर संतापाची लाट पसरली.

शकुताईंनी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्या स्वतःला थांबवू शकल्या नाहीत. त्या कुणालच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही स्पष्ट दिसत होती

“कुणाल…” शकुताईंचा आवाज थरथरला, पण त्यात कमालीची ताकद होती. “तू कधीपासून असा विचार करायला लागलास? बायको म्हणजे एखादी वस्तू आहे का रे? माणूस आणि वस्तू यातला फरक कळतोय न तुला. आणि तिला दुसऱ्यासोबत फिरली, फोन वर बोलली अस म्हणून हिणवणाऱ्या तुला आजवर कितीतरी मैत्रिणी होऊन गेल्यात. तरीही तू तिच्याबद्दल असे बोलत आहेस.”

“आई, तू नाही समजणार! हे माझ्या तत्त्वांचा प्रश्न आहे,” कुणाल म्हणाला.

“मी मुलगा आहे. मी हजार जणींसोबत फिरलो तरी माझा पुरुषार्थ कमी होत नाही. पण मुलगी तशी चालत नाही! तिचं चारित्र्य एकदा डागाळलं की संपलं!”

हे ऐकताच शकुताईंनी कुणालच्या कानाखाली एक चपराक ठेवून दिली.

एक तीव्र आणि जोरदार आवाज त्या प्रशस्त हॉलमध्ये दुमदुमला.

शकुताईंचा उजवा हात कुणालच्या गालावर बसला होता. कुणालचे डोळे विस्फारले. त्याने गालावर हात ठेवला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच आईने त्याच्यावर हात उचलला होता.

“आई…” तो आवाजात किंचित कंप घेऊन म्हणाला.

“तोंड बंद ठेव तुझं!” शकुताईंचे डोळे ओले झाले होते, पण त्यातून निखारे झसरत होते.

कुणाल काहीच बोलू शकला नाही. तो फक्त आईकडे बघत राहिला.

“जर या जागी तुझी बहीण नेहा असती… आणि तिचं लग्न मोडलं असतं, आणि कुणीतरी येऊन तिला असं म्हटलं असतं की ‘हिचे आधी अफेअर होते, ही वाईट आहे’… तर तू असाच विचार केला असतास का रे?” शकुताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण त्यांचा स्वर अजूनही कडक होता.

“अरे, श्रुतीचे लग्न का मोडलेलं तुला माहीत आहे का? त्या मुलाच्या घरच्यांनी हुंड्यात मर्सिडीज गाडी मागितली होती आणि श्रुतीच्या वडिलांनी ती देण्यास नकार दिला म्हणून त्या भिकाऱ्यांनी लग्न मोडलं! त्या बिचाऱ्या मुलीचा काय दोष होता त्यात?”

शकुताईंचे हे शब्द कुणालच्या छातीत एखाद्या भााल्यासारखे रुतले. त्याचे डोळे मोठे झाले. त्याला आठवले की मित्राने बोलता बोलता काहीतरी संदर्भ दिला होता, पण त्याने कधी त्याकडे गांभीर्याने पाहिलेच नव्हते.

“श्रुतीने कोणावरही जबरदस्ती केली नव्हती. साखरपुडा झाल्यावर बोलणं, भेटणं हे आजच्या काळात साहजिक आहे. तिने कुणाचा विश्वासघात केला नव्हता. तिच्या घरच्यांनी सुद्धा मला लग्न मोडण्याचे स्पष्ट सांगितले होते. मी तुला ते सांगितले नाही कारण मला एवढे महत्वाचे वाटले नव्हते. पण तुला आज न उद्या सांगायचा विचार मी केला होताच. पण तुझा हा सडका आणि संकुचित विचार बघून मला तुझी लाज वाटतेय, कुणाल,” शकुताई मागे फिरल्या आणि आपल्या खोलीकडे निघून गेल्या.

हॉलमध्ये नीरव शांतता पसरली होती. आईने आजवर कुणालला इतक्या खड्या शब्दात सुनावले नव्हते. हात तर कधीच उचलला नव्हता. आईचे शब्द ऐकून कुणालला स्वतःच्या वागण्या, बोलण्याचा पश्चात्ताप झाला होता.

रात्रीचे दोन वाजले होते. घरातील सर्व लाईट्स बंद होते. पण कुणालच्या खोलीत मात्र अंधार नव्हता. बेडवर बसून तो सतत मोबाईलच्या स्क्रीनवर काहीतरी शोधत होता.

त्याने श्रुतीचे सोशल मीडिया प्रोफाइल उघडले होते. तिचे जुने फोटो, तिचे हसरे चेहरे, तिने आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन… सर्वकाही तो एकामागून एक पाहत होता. त्याला अचानक स्वतःचीच चीड येऊ लागली. आपण किती मूर्खपणाचा विचार केला होता? एका मुलीला तिच्या भूतकाळावरून जज करणं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, आणि स्वतःच्या चूकांकडे दुर्लक्ष करणं—हा कोणता न्याय होता?

त्याला त्याची चूक पूर्णपणे समजली होती.

“मला श्रुतीची माफी मागितली पाहिजे,” त्याने स्वतःशीच पुटपुटले. “उद्या सकाळीच मी तिच्याकडे जाईन आणि सर्व काही नीट करेन.

दुसऱ्या दिवशी सकाळची सूर्यकिरणे पडण्यापूर्वीच कुणाल तयार झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर रात्रीच्या जागरणाचे काळे वर्तुळ होते, पण डोळ्यात एक ठाम निश्चय होता.

तो थेट शकुताईंच्या खोलीत गेला. शकुताई देवपूजा करत होत्या. कुणाल त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला. आईने पूजा संपवून मागे वळून पाहिले, तेव्हा कुणाल आईला म्हणाला.

“आई, मला माफ कर,” कुणाल म्हणाला.

“काल मी जे बोललो, तो माझा अहंकार होता, माझा मूर्खपणा होता. तू मला बरोबर शिक्षा दिली आहेस. मला माझी चूक पूर्णपणे समजली आहे. मी श्रुतीसोबत लग्न करायला तयार आहे. उलट, तिच्यासारखी समजूतदार आणि उत्तम मुलगी मला मिळणार नाही.”

शकुताईंनी कुणालच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकेसे समाधान होते, पण त्यासोबतच एक गूढ शांतताही होती.

“तू उशीर केलास, कुणाल,” शकुताईंचा आवाज अत्यंत मऊ पण थंड होता.

कुणालने वर पाहिले. “म्हणजे? काय म्हणतेयस आई?”

“काल रात्रीच मी श्रुतीच्या वडिलांना फोन केला होता,” शकुताईंनी डोळ्यांत बघितले.

“मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, आमच्याकडून हे लग्न होऊ शकत नाही.”

कुणालच्या हृदयाचे ठोके चुकले.

“काय? तू असं कसं करू शकतेस आई? मी तर आता तयार आहे ना!”

“तू तयार आहेस म्हणून काय झालं?” शकुताईंच्या सुरात एक कठोर वास्तव होते.

“मुलगी उत्तम आहे, तिचे संस्कार चांगले आहेत, तिचे कुटुंबही खूप छान आहे… पण माझा मुलगा तिच्यासाठी अजिबात योग्य नाही, हे मला काल रात्रीच पटलं होतं. जी मुलगी स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभी राहू शकते, जिला स्वतःची किंमत माहीत आहे, जिचे वडील त्या मुलाला जे मागेल ते द्यायला तयार असताना सुद्धा तिने आपला स्वाभिमान जपत स्वतः त्या मुलाला लग्नाला नकार दिला. त्या मुलीच्या आयुष्यात तुझ्यासारखा संकुचित विचारांचा माणूस आला तर ती आयुष्यभर दुःखी राहील. आज न उद्या पुन्हा तुला ही शंका सतावेल की ती नात्यात किती पुढे गेली होती. त्या नात्याची सावली तुझ्या मनात शंका कुशंका उत्पन्न करेल आणि पुढे तुमच्या नात्याचे भविष्य त्यामुळे खराब होईल. म्हणूनच, मी स्वतःहून ह्या नात्याला नकार दिला.”

कुणाल खजिल झाला. आपण जो विचार केला तो खरंच किती वाईट होता अन् ती आपल्या लायक नाही असा विचार करताना आपण स्वतः तिच्या लायक आहोत की नाही ह्याचा त्याने अजिबात विचारच केला नव्हता. आईचे बोलणे ऐकून आता त्याला ह्याची जाणीव झाली होती. पण आता ह्याला बराच उशीर झाला होता. शिवाय आई सुद्धा त्याच्या अशा बोलण्याने दुखावली गेली होती.

आज त्याला समजले होते की, बरेचदा आयुष्य खूप सुंदर संधी देतं, पण नको तिथे पुरुषी अहंकार डोक्यात शिरला की ती संधी माती होऊन हातातून निसटून जाते.

शकुताई खिडकीकडे पाहत उभ्या राहिल्या, बाहेर ऊन पडू लागले होते, त्यांनी मनोमन प्रार्थना केली कुणालच्या मनातील हा अंधार दूर होऊन तिथे सुद्धा योग्य विचारांचा उजेड होऊ देत.

समाप्त.

आरती निलेश खरबडकर.

Leave a Comment