आवडती अन् नावडती सून – भाग १

घराच्या प्रशस्त अंगणात एका बाजुला गुलमोहोराचे झाड हवेच्या मंद झुळुकीने आपली पाने हलवत होते. त्या झाडाखालील बाकड्यावर यशोदाबाई बसल्या होत्या. गुडघ्यांच्या वेदनांनी त्यांना मागच्या काही महिन्यांत चांगलेच जेरीस आणले होते. त्यामुळे त्यांचा चेहरा नेहमीच एका अथांग चिंतेच्या आणि विरक्तीच्या भावनेने आच्छाडलेला असे.

त्याच वेळी स्वयंपाकघरातून खणखणणारा आवाज येत होता. भांडी घासण्याचा, पाण्याचा आणि घाईघाईने काम उरकण्याचा तो आवाज होता. गीता नेहमीप्रमाणेच संध्याकाळच्या चहाची तयारी करत होती. अंगावर एक साधी साडी, कपाळावर कोरलेला घाम आणि चेहऱ्यावर कोणतीही तक्रार न करता आपले कर्तव्य पार पाडण्याचे व्रत तिने जणू घेतले होते. घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करणे, देवाधर्माच्या रीतीभाती सांभाळणे, सर्वांच्या आवडीचा स्वयंपाक करणे. या सगळ्यांत गीताचा अख्खा दिवस कसा निघून जायचा, हे तिचे तिलाच समजत नसे.

याउलट चित्र घराच्या दुसऱ्या भागात होते. दिवाणखान्यात सोफ्यावर पाय ताणून सुजाता बसली होती. तिच्या अंगावर महागडी साडी होती आणि हातात फोन होता. ती अत्यंत आरामात सोशल मीडियावरील रील्स पाहत होती. नरेश नुकताच ऑफिसवरून आला होता. फ्रेश होऊन ती सुद्धा हॉल मध्ये येऊन बसला आणि सुजाताला म्हणाला.

” सुजाता, जरा चहा घेऊन ये बरं…आज थोडं डोकं दुखतंय…”

सुजाताने फोन बाजूला ठेवला, गोड हसत ती म्हणाली,

” मी आत्ताच गीता वहिनीला माझ्यासाठी चहा ठेवायला सांगणार होते. आता आपल्या दोघांचा सुद्धा चहा ठेवायला सांगते.”

ती किचन मध्ये जाणार इतक्यात काहीतरी आठवून बाहेर अंगणात आली आणि सासूबाईंना म्हणाली.

” आई, तुम्ही चहा घेणार का ? मी माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगणार आहे.”

” हो अगं…मी पण घेईल…” यशोदाबाई म्हणाल्या.

सुजाताचा तो गोड आवाज आणि वागणूक पाहून यशोदाबाईंचे डोळे चमकले. त्यांनी सुजाताकडे कौतुकाने पाहिले आणि मनातल्या मनात विचार केला, ‘किती गुणी सून आहे माझी! किती विचारपूस करते माझी. तोलामोलाच्या घरी सोयरिक केली की अशी गुणाची सून मिळते. नरेशने खूप चांगली सून आणली माझ्यासाठी. नाहीतर ती गीता आहेच दळभद्री. कुठून माझ्या नशिबात अन घरात आली काय माहित.’ असा विचार करून त्यांनी नाक मुरडले.

नरेश आणि सुजाता यांचा प्रेमविवाह होता. नरेश चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर होता. बक्कळ पैसा, गाड्या, आणि सुजाताचे माहेर सुद्धा शहरातील एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी कुटुंब. नरेश आधीपासूनच यशोदाबाईंचा खूप लाडका होता. त्यामुळे यशोदाबाईंच्या मनात नकळत सुजाताबद्दल एक वेगळाच दरारा आणि लाड होता.

याउलट परिस्थिती राजेशची होती. राजेश एका खाजगी कंपनीत साधी अकाउंटंटची नोकरी करत होता. पगार बेताचाच होता. पण मनाचा अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू. गीता आणि राजेशचा संसार साधा आणि सरळ होता. कोणासमोर मोठेपणा मिरवण्याची त्यांची सवय नव्हती. पण यशोदाबाईंच्या मनात लहान मुलगा नरेश आणि त्याची पत्नी सुजाता यांच्याबद्दल जेवढे प्रेम होते, त्याच्या दशांशही प्रेम राजेश आणि गीतासाठी नव्हते. गीताने कितीही रात्रंदिवस कष्ट केले, तरी सासूबाईंच्या दृष्टीने ती फक्त एक ‘घरातील नोकर’ किंवा ‘काम करणारी बाई’ एवढीच होती.

राजेशने एका कोपऱ्यात उभे राहून हे सर्व पाहिले. तो स्वतःशीच हसला. त्याला माहित होते की त्याच्या आईचा हा पक्षपातीपणा गीताचे मन किती आतून तोडत असतो. पण गीता कधीही काही बोलत नसे ना कधी आधी तक्रार सुद्धा करत नसे. ती निमूटपणे सर्व सहन करत असे.

काळाचे चक्र वेगाने फिरत होते. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच, अचानक यशोदाबाईंची प्रकृती बिघडली. त्यांना तीव्र ताप आला आणि सांधेदुखीने त्यांना पूर्णपणे बेडशी खिळवून ठेवले. अंगात त्राण नसल्यामुळे त्या साध्या उठून बसण्याच्याही मनःस्थितीत नव्हत्या.

घरात एकच हलकल्लोळ उडाला. नरेशने ताबडतोब डॉक्टरांना घरी बोलावले. औषधोपचार सुरू झाले, पण वय आणि शरीराची झालेली हेळसांड यामुळे यशोदाबाईंची प्रकृती सुधारायला तयार नव्हती. डॉक्टर म्हणाले, “यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे आणि यांची काळजी घ्यायला कायम कोणीतरी जवळ असायला हवे.”

अशा वेळी घराची खरी कसोटी लागली. सुजाताने सुरुवातीलाच हात वर केले. ती म्हणाली,

” अहो, मला एवढे काम करायची सवय नाही. एखाद्या आजारी माणसाला बघितलं की माझेच हातपाय गळून जातात. आणि तो औषधांचा वास मला सहन होत नाही. मी नाही करू शकणार आईंचा सेवा. मी एवढी कष्टाची कामे कधी केली नाहीत. त्यात संसर्ग व्हायचा धोका आहे.”

“अगं तू कशाला काळजी करतेस. गीता वहिनी आहे ना. ती सांभाळून घेईल सर्व.” नरेशनेही सुजाताची बाजू घेत म्हटले.

यशोदाबाई सुद्धा क्षीण आवाजात म्हणाल्या.

” तू नको करुस काम. गीताला सवय आहे ती सांभाळून घेईल सगळी कामे. तू फक्त माझ्याजवळ येऊन बसत जा थोडा वेळ.”

” हो हो आई…मी बसत जाईल ना.” सुजाता म्हणाली.

यावेळी सुधा कसलीही तक्रार न करता गीता पुढे आली. तिने कोणतीही आढेवेढे घेतले नाहीत. तिने आपल्या लहान मुलाच्या अभ्यासाची आणि घरच्या स्वयंपाकाची नीट रूपरेषा आखली. रोजच्यापेक्षा आणखी लवकर उठायला लागली आणि स्वतःला पूर्णपणे सासूबाईंच्या सेवेसाठी झोकून दिले.

दिवस-रात्र न बघता गीताने यशोदाबाईंची सुश्रूषा केली. आजारपणामुळे यशोदाबाईंचे अंथरूण मळाले होते, औषधांचा वास आल्यामुळे घराची आणि खोलीची अवस्था बिकट झाली होती. अशा वेळी कोणतीही चीड न बाळगता, कोणताही गाजावाजा न करता गीताने स्वतःच्या हाताने ते अंथरूण साफ केले. सासूबाईंच्या अंगावर हात फिरवत, त्यांना वेळच्या वेळी औषध भरवले, त्यांना ताप आलेली असताना त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या.

एका रात्री, मध्यरात्रीनंतर दोन वाजता यशोदाबाईंना फार अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या पोटात कळ उठली होती. त्या ‘गीता… गीता…’ म्हणून कुढत होत्या. गाढ झोपेत असलेली गीता एका आवाजात जागी झाली. ती धावतच सासूबाईंच्या खोलीत आली. तिने लगेच गरम पाण्याची पिशवी आणली, सासूबाईंच्या पाठीला शेक दिला आणि पाठीवरून हात फिरवत म्हणाली,

“आई, घाबरू नका, मी आहे ना इथे. आता बरं वाटेल तुम्हाला.”

त्या अंधाऱ्या खोलीत, मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात, यशोदाबाईंनी गीताच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यांत कसलाही स्वार्थ नव्हता, कोणताही आव नव्हता, तर केवळ एका माउलीची निखळ माया होती. ज्या सुनेला आपण नेहमी तुच्छ लेखले, जिला कधी दोन प्रेमाचे शब्द बोललो नाही, तीच सून आज स्वतःच्या तब्येतीची, आरामाची पर्वा न करता आपली सेवा करत होती हे यशोदाबाई पाहत होत्या.

यशोदाबाईंनी एकदा थरथरणाऱ्या हाताने गीताचा हात आपल्या हातात घेतला आणि कमकुवत आवाजात म्हणाल्या,

“गीता…तुला माझा राग नाही का येत अगं. की कधी तुझ्याशी दोन शब्द प्रेमाने बोलले नाही तरीपण तू काहीही तक्रार न करता माझी सेवा करत आहेसं”

गीताचेही डोळे भरून आले. तिने सासूबाईंचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली,

“आई, असे काय बोलता? तुम्ही माझ्या आईच्या जागी आहात. आजारपणात लेकरांनी आईची सेवा करायची नसते तर कुणी करायची?”

त्या रात्रीनंतर यशोदाबाईंच्या मनात गीताबद्दलचा दृष्टिकोन थोडाफार बदलला. आजारपणाच्या त्या पंधरवड्यात त्यांना गीताच्या चांगल्या मनाची जाणी झाली. त्या आता गीताशी खूप प्रेमाने बोलू लागल्या. गीताला कामात मदत करू लागल्या आणि तिच्याशी गोड संवाद साधू लागल्या.

क्रमशः

पुढील भाग इथे वाचा 👇

आवडती आणि नावडती सून – भाग २ (अंतिम भाग)

Leave a Comment