” नाही. मी ताईकडे जाणार नाही. कारण मी ठरवलंय की मी बस ने माझ्या गावी जाईल. तुम्ही माझ्या मनाचा विचार केला नाही मग मी तरी तुमच्या शब्दाचा विचार का करू ? तुमच्या साठी मी एवढं केलं पण तुम्ही माझ्या भावनांची कदर केली नाही. मला न सांगता, माझ्याशी खोटं बोलून सगळ परस्पर ठरवलं तुम्ही. आपल्या घरी काही कार्यक्रम असता आणि मधुताईला तिच्या सासरच्यांनी पाठवले नसते काही कामानिमित्ताने तर त्यांना आणि तुम्हाला कसे वाटले असते. तुमचा खूप आदर करायचे मी. माझ्यासोबत तुम्ही असे वागाल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.” प्रिया म्हणाली.
आता मात्र परागळा त्याची चूक लक्षात आली. तो खजील झाला. प्रियाला म्हणाला.
” एवढा सगळा मी विचारच केला नव्हता प्रिया. ताई म्हणाली की तिला तुझ्या मदतीची गरज आहे म्हणून मी मुद्दामहून तिकीट केले नाही. पण आता माझ्या लक्षात आले की मी खूप मोठी चूक करून बसलोय. मी विश्वासघात केला तुझा. जाणूनबुजून असा वागलो मी. मला वाटले तू करून करून काय करणार आहेस. माझं ऐकण्यावाचून तुझ्याकडे पर्याय नाही. पण खरंच माझ्या लक्षात नाही आले की असे करून मी तुझ्या नजरेत असलेला आदर आणि प्रेम गमावतोय. मला याची जाणीव झाली आहे आणि मला असे वागण्याबद्दल स्वतःची लाज वाटत आहे. मला माफ कर.”
” इतक्या लवकर मी तुम्हाला माफ करेन असे मला वाटत नाही. आणि मला सध्या या विषयावर बोलायचं सुद्धा नाही आहे. मला सध्या माझ्या गावी जायला निघायचं आहे.” प्रिया तुटकपणे म्हणाली.
” थांब. एकटी जाऊ नकोस. मी पण येतो सोबत. आपण कार ने जाऊयात. मी मित्राशी बोलून त्याची कार मागवतो लगेच.” पराग म्हणाला.
” का ? तुम्ही तर मित्रांसोबत बाहेर जायचा बेत केलाय न?” प्रिया उपहासाने म्हणाली.
” मला कळली आहे माझी चूक आणि मी तुझ्यासोबत येणार आहे तुझ्या चुलतभावाच्या साखरपुड्याला. मला फक्त एक तास दे. मी तयारी करतो लगेच.” पराग म्हणाला.
त्यावर प्रिया काहीच बोलली नाही पण पराग लगेच तयार सुद्धा झाला जायला. मित्राची कार मागवून दोघेही तिच्या माहेरी जायला निघाले. थोड्याच वेळात परागच्या फोनवर मधुताई चा फोन आला. त्याने फोन उचलल्यावर मधुताई समोरून म्हणाली.
” काय रे पराग, प्रिया अजून आली नाही. मी फोन केला तर उचलत सुद्धा नाही आहे. उशीर होईल अशाने.”
” आम्ही साखरपुड्यासाठी गावी जात आहोत ताई. ती नाही येऊ शकणार.” पराग म्हणाला
” अरे असं कसं…मी म्हणाले होते ना प्रियाची गरज माझ्या घरी जास्त आहे. आता हे सगळं मी एकटी कशी करणार ?” मधुताई त्राग्याने म्हणाली.
” एका दिवसासाठी दुसऱ्या कुणाची तरी हेल्प घे ताई. आणि पुढच्या वेळेपासून पाहुण्यांना बोलावणे आधी एकदा प्रियाला विचारत जा की ती येऊ शकते की नाही.”
एवढं बोलून पराग ने फोन ठेवून दिला. प्रियाने त्याच्याकडे बघितलं पण काहीच बोलली नाही.
गावी पोहचायला जवळपास रात्र झाली होती. प्रिया पूर्ण प्रवासात पराग सोबत काहीच बोलली नव्हती. परागला आता जाणीव झाली होती की त्याने असे वागून काय गमावले आहे.
पराग संपूर्ण साखरपुड्याच्या कार्यक्रमात सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होता. लहान मोठ्यांपासून सगळ्यांशी प्रेमाने बोलत होता. साखरपुडा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच निघून संध्याकाळपर्यंत दोघेही गावी आले. एव्हाना प्रियाला राग थोडाफार विरघळला होता. पण तिचं दुखावलेलं मन अजूनही परागला पूर्णपणे माफ करायला तयार नव्हतं.
काही दिवसांनी प्रियाने परागशी असलेला अबोला संपवला. पण प्रिया आता पूर्वीप्रमाणे मनमोकळेपणाने सगळ्यांशी बोलत नव्हती. आता तिला कोणी गृहीत सुद्धा धरत नव्हते. तिला सुद्धा भावना आहेत आणि ती नकार सिद्ध देऊ शकते हे आता सगळ्यांना कळून चुकले होते.
समाप्त.
©® आरती निलेश खरबडकर.