हक्काची सावली – भाग २ (हृद्यस्पर्शी मराठी कथा)

 

माहेराच्या अंगणातल्या जुन्या चिंचेच्या झाडाखाली प्रतीक्षा शांत बसली होती. संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते. वाऱ्याने झाडांची पानं सळसळत होती. दूर कुठेतरी मंदिराची घंटा वाजत होती.

 

पण तिच्या मनात मात्र फक्त एकच आवाज घुमत होता—

“अभिजीत असे कसे बदलू शकतात…त्यांना माझ्या मनाची घालमेल माहिती नाही का…?” मग ती स्वतःलाच समजायची की “काही दिवस जाऊ दे…मग त्यांनाच राहवणार नाही माझ्याशिवाय…”

तिच्या डोळ्यांत अजूनही आशा होती की अभिजीत तिच्यासोबत राहू शकणार नाहीत.

 

 

पहिले दोन-तीन दिवस शालिनीताई आणि गणपतराव प्रतीक्षाला काहीच विचारत नव्हते. त्यांना समजत होतं की ती मनातून अस्वस्थ आहे.

शालिनीताई रोज तिच्या आवडीचा स्वयंपाक करायच्या. तिला तर नीट भूक सुद्धा लागत नव्हती.

 

“थोडं खाऊन घे पोरी, उपाशी राहिल्याने तब्येत खराब होईल तुझी” असे म्हणत त्या प्रेमाने तिला घास भरवायच्या.

गणपत राव बाहेरून आल्यावर मुद्दाम हसत एखादा प्रसंग सांगायचे.

 

“आज बाजारात काय गंमत झाली माहितीय का?”

 

पण त्यांच्या हसण्यामागची हतबलता प्रतीक्षाला जाणवत होती. रात्री ती झोपायचा प्रयत्न करायची, पण झोप काही यायची नाही. तिच्या डोळ्यांसमोर सतत सासरचं घर यायचं. अभिजीतचं हसू. त्याचा तो स्पर्श.

त्याचा आवाज. त्याच्यासोबत घालवलेले छोटे छोटे क्षण. आणि मग अचानक वनमालाबाईंचा कठोर चेहरा. आणि त्यांचा तो आवाज.

 

“तिला माहेरी सोडून ये.”

 

आणि ती दचकून जागी व्हायची.

 

तीन दिवसांनी अखेर प्रतीक्षाने स्वतःहून अभिजीतला फोन केला. रिंग जात होती. अभिजीत काय बोलेन हा विचार करून प्रतीक्षा चे हृदय धडधडत होते. फोन रिसिव्ह झाला आणि मग समोरून आवाज आला.

 

“हॅलो.”

 

त्याचा आवाज ऐकताच तिच्या डोळ्यांत पाणी आलं.

 

“अभिजीत…”

 

“हं बोल.”

 

“तुम्ही कधी येणार मला घ्यायला?”

 

क्षणभर शांतता.

 

“घरातलं वातावरण अजून ठीक नाही प्रतीक्षा.”

 

“मी आईची माफी मागते पण मला इथून घेऊन जा. मला तुमच्याशिवाय करमत नाही इकडे.”

 

“काही दिवस थांब. मी बघतो काहीतरी.”

 

“तुम्ही सुद्धा रागावले आहात का माझ्यावर?”

 

“नाही.”

 

पण त्या “नाही” मध्ये आधीसारखी ऊब नव्हती. तरीही प्रतीक्षाला समाधान वाटलंकी हे अजूनही माझ्याशी बोलत आहेत. ह्यातच ती समाधानी होती. ती स्वतःलाच समजावत होती की सगळं काही नीट होईल. अभिजीत सगळं काही नीट करतील.

 

त्या दिवसानंतर तिचा एक नवा दिनक्रम सुरू झाला. सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे मोबाईल पाहणं. कदाचित अभिजीतचा मेसेज आला असेल. कदाचित त्याचा फोन आला असेल. पण स्क्रीन रिकामी असायची. तरी ती स्वतःला धीर द्यायची.

 

“ते कामात असतील ” असे स्वतःलाच समजायची.

 

दुपारी ती अंगण झाडत असताना गाडीचा आवाज आला की धावत दारात जायची. पण प्रत्येक वेळी निराशा व्हायची. एक दिवस तर पोस्टमन आला तरी तिचं हृदय धडधडलं.

 

“कदाचित पत्र असेल…”

 

पण पोस्टमन शेजाऱ्यांच्या घरी गेला. ती हळूच परत फिरली. शालिनीताई दूरून हे सगळं पाहत होत्या. त्यांचं काळीज तुटत होतं.

 

गावात सुद्धा हळूहळू चर्चा सुरू झाली. आधी तिचे कौतुक करताना ज्या बायका थकत नसत आता त्या म्हणायच्या.

 

“प्रतीक्षा माहेरी का आलीये?”

 

“भांडण झालं म्हणे.”

 

“मूल होत नाही म्हणे…”

 

लोकांच्या नजरा बदलू लागल्या. प्रतीक्षा बाजारात गेली की काही बायका कुजबुज करायच्या.

 

“बिचारी…”

 

“की तिच्यातच काही दोष असेल?”

 

त्या शब्दांनी तिच्या छातीत काटे टोचल्यासारखं व्हायचं. एक दिवस ती विहिरीवर पाणी भरत होती. दोन बायका मुद्दाम मोठ्याने बोलत होत्या.

 

“आजकालच्या मुलींना करिअर हवं असतं. मग मूल कसं होणार?”.

 

प्रतीक्षाच्या हातातून घागर जवळजवळ सुटली. ती काही न बोलता घरी आली. त्या रात्री ती खूप रडली. तिने आईला विचारले.

“आई… लोक असं का बोलतात गं? आपण दुखी असलो की आपल्या दुःखावर फुंकर घालण्या ऐवजी आपल्या जखमेवर मीठ का चोळतात…”

 

शालिनीताईंनी तिला मिठीत घेतलं आणि म्हणाल्या.

 

“बोलणं हे लोकांचं कामच असतं बाळा. आपण लक्ष नाही द्यायचं..”

 

“मी एवढी वाईट आहे का आई ?” तिने निराशेने विचारले.

 

“नाही गं.” आई तिला धीर देत म्हणाली.

 

“मग देव माझ्यासोबत असं का करतोय?” तिने आईला विचारले.

 

या प्रश्नाचं उत्तर शालिनीताईंकडेही नव्हतं.

 

कधी कधी प्रतीक्षा कपाट उघडून तिच्या लग्नाचा अल्बम बघायची. एका फोटोमध्ये अभिजीत तिच्याकडे हसून पाहत होता. ती त्या फोटोवरून हात फिरवायची.

 

“तुम्ही खरंच किती बदलतात?” असे म्हणायची.

 

तिच्या डोळ्यांत अश्रू यायचे. तिला आठवायचं. पहिली दिवाळी. पहिलं फिरायला जाणं. रात्री छतावर बसून केलेल्या गप्पा. हे सगळं खोटं होतं का? तिला उत्तर सापडत नव्हतं.

 

एक आठवडा गेला. या वेळी अभिजीतने स्वतःहून फोन केला. त्याचा फोन आलेला पाहून प्रतीक्षा आनंदाने उडालीच.

 

“हॅलो!”

 

“हं.”

 

“तू ठीक आहेस?”

 

“हो.”

 

“मी कधी येऊ?”

 

“अजून थोडे दिवस थांब.”

 

“आई अजून रागात आहेत?”

 

“हो.”

 

ती काही क्षण शांत राहिली.

 

“अभिजीत…तुम्हाला माझी आठवण येते का?”

 

समोर काही सेकंद शांतता होती.

 

मग तो म्हणाला,

“मला काम आहे. ठेवतो.”

 

आणि फोन कट झाला.

 

प्रतीक्षा बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली. तिच्या मनात पहिल्यांदा भीती दाटून आली.

 

“हे माझ्यापासून दूर जात आहेत का?”

 

त्या रात्री जोरदार पाऊस पडत होता. वीज चमकत होती. प्रतीक्षा खिडकीत बसून बाहेर पाहत होती. तिला आठवलं—एकदा असाच पाऊस पडत होता. ती सासरी अंगणात कपडे काढायला गेली होती. अचानक पाय घसरला. अभिजीत धावत आला होता.

“अगं सांभाळून!” तो तिला सावरत म्हणाला होता.

 

त्याने दोन्ही हातांनी तिला धरलं होतं. दोघं भिजत उभे होते. तो हसत म्हणाला होता,

 

“तू पडलीस तर माझं काय होईल राणी?”

 

त्या आठवणीने तिचं हृदय आणखी तुटलं. ती रडतच झोपली.

 

एक दिवस शालिनीताईंनी गणपतरावांना हळू आवाजात विचारलं,

 

“किती दिवस राहणार आहे आपली मुलगी अशी?”

 

गणपतराव दीर्घ श्वास घेत म्हणाले,

 

“जावईबुआ येतील तिला घ्यायला.”

 

“तुम्हाला खरंच वाटतं की ते येतील?” शालिनीताईंनी विचारले.

 

” यायला तर हवेत. पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे.” गणपतराव स्वतःशीच विचार करत म्हणाले. कारण त्यांनाही खात्री उरली नव्हती.

 

श्रावण आला. गावात सगळीकडे उत्साह होता. बायका हिरव्या साड्या घालून झिम्मा खेळत होत्या. प्रतीक्षालाही शेजारणींनी बोलावलं.

 

“चल ना.”

 

पण ती गेली नाही. तिच्या हातातल्या हिरव्या बांगड्या तिने कपाटातच ठेवल्या. तिला वाटत होतं—

 

“मी अजून सासरचीच आहे.”

 

ती रोज मंगळसूत्राला हात लावून देवाला प्रार्थना करायची.

 

“देवा माझा संसार वाचव. ह्यांच्या मनातलं माझ्यावरच प्रेम कमी होऊ देऊ नको..”

 

दिवस पुढे जात होते. अभिजीतचे फोन कमी होत गेले. आता तो स्वतःहून फोन करत नव्हता. प्रतीक्षा फोन करायची तर कधी उचलायचा, कधी नाही. उचलला तरी त्याचा आवाज कोरडा असायचा.

 

“मी मिटिंगमध्ये आहे.”

 

“नंतर बोलतो.”

 

“आता वेळ नाही.”

 

ती हताश व्हायची.

 

एक दिवस तिने धीर करून विचारलं,

 

“तुम्हाला माझी गरज नाही का आता?”

 

तो चिडून म्हणाला,

 

“तू सारखे तेच प्रश्न विचारू नकोस.”

 

आणि फोन कट झाला.

त्या आवाजाने प्रतीक्षाच्या हातापायांना कंप सुटला.

 

शालिनीताईंनी एक दिवस तिला डॉक्टरकडे नेलं. तिच्या मनाचे समाधान व्हावे ह्यासाठी. तपासण्या झाल्या. रिपोर्ट्स आले. डॉक्टर शांतपणे म्हणाले,

 

“तुमच्यात काहीच समस्या नाही.”

 

प्रतीक्षाच्या डोळ्यांत आशेची चमक आली.

 

“म्हणजे मी आई होऊ शकते?” तिने डॉक्टरांना विचारले.

 

“नक्कीच.” डॉक्टर म्हणाले.

 

ती आनंदाने घरी आली.

 

“आता सगळं ठीक होईल,” तिने आईला मिठी मारली.

त्या रात्री तिने अभिजीतला फोन केला.

 

“अभिजीत! माझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत!” ती उत्साहाने म्हणाली.

 

“हं.” ते कोरडेपणाने म्हणाला.

 

“म्हणजे—” तिचा उत्साह मावळला.

 

“ठीक आहे. ठेवतो.” आणि त्याने फोन कट केला.

तिचा आनंद क्षणात मावळला.

 

एक दिवस दुपारी गावात एक मोठी कार आली. प्रतीक्षा धावत बाहेर आली. तिला वाटलं—“अभिजीत आले असतील..!”

 

पण कारमधून त्याचा चुलतभाऊ उतरला. तो थोडा अवघडलेला दिसत होता. त्याला पाहून प्रतिक्षाला जरा आश्चर्य वाटले. गणपतराव समोर आले आणि त्याला घरात घेऊन आले.

 

“ नमस्कार सुजितराव…आज असे अचानक..?” गणपत रावांनी विचारलं.

 

तो थोडा वेळ काही बोलला नाही. मग थोड्यावेळाने हळू आवाजात म्हणाला.

 

” तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे…”

 

” सांगा…” गणपतराव साशंक होऊन म्हणाले.

 

दाराच्या आडून ह्यांचे संभाषण ऐकणाऱ्या प्रतिक्षाला सुद्धा आता धडधडायला

लागले होते.

 

” वनमाला काकूंनी अभिजीत चे दुसरे लग्न लावून दिले आहे…अगदी चोरून, लपून…” तो म्हणाला.

 

” काय…?” प्रतिक्षा ने किंकाळीच फोडली.

 

गणपतरावांच्या पायाखालची जमीन सरकली. शालिनीताई सुद्धा या बातमीने हादरल्याच.

क्रमशः

हक्काची सावली – भाग ३ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

 

 

Leave a Comment