हक्काची सावली – भाग ८ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

 

देशमुखांचा मोठा बंगला आता ओसाड वाटू लागला होता. एकेकाळी गाड्यांचा आवाज, पाहुण्यांची वर्दळ, हशा आणि अभिमानाने भरलेलं ते घर आता शांततेने भरून गेलं होतं. त्या शांततेत फक्त तीन आवाज राहिले होते.व्हीलचेअरची चरचर. वनमालाबाईंचा दमलेला श्वास.

आणि घरकामाला असलेल्या बायकांचा आवाज.

 

अपघातानंतर अभिजीत पूर्ण बदलला होता. पूर्वी आरशासमोर तासन्तास स्वतःकडे पाहणारा तो आता आरशापासून दूर राहू लागला. त्याला स्वतःचीच लाज वाटायची. एक दिवस त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावर एक तरुण जोडपं हातात हात घालून चाललं होतं. क्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर प्रतीक्षाचा चेहरा आला. तीही कधी त्याच्यासोबत अशीच चालायची. त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायची.

 

आणि त्याने? तिचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले.

 

वनमालाबाई आता सतत आजारी राहू लागल्या. रात्रभर त्यांना झोप यायची नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर सतत एकच दृश्य यायचं. दाराबाहेर पावसात रडणारी प्रतीक्षा.

 

“आई… दार उघडा…” त्या कानांवर हात ठेवून बसायच्या.

 

“देवा… आम्ही खूप मोठं पाप केलं. एक निष्पाप जीवाला खूप जास्त वेदना दिल्या.” त्यांच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता.

 

एक दिवस रात्री अभिजीत बराच वेळ जागाच होता. बाहेर पाऊस पडत होता. त्याला अचानक ती रात्र आठवली. प्रतीक्षा दाराबाहेर रडत होती. आणि तो मात्र शांत उभा होता. त्याने डोळे मिटले. त्याच्या छातीत असह्य वेदना उठली.

 

इकडे वनमालाबाईंनी शेवटचा प्रयत्न म्हणून मनालीला फोन केला.

 

“बाळा… एकदा तरी ये.”

 

समोरून थंड आवाज आला,

 

“माझा त्या घराशी काही संबंध नाही. यापुढे मला फोन करू नका.”

” अगं तुझा नवरा चांगल्या मनस्थितीत नाही ग..” त्या म्हणाल्या.

 

“तुम्ही सांभाळा ना. मी येणार नाही.” मनाली म्हणाली.

आणि फोन कट झाला.

 

वनमालाबाई बराच वेळ मोबाईलकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आज त्यांना प्रतीक्षेची किंमत समजत होती.

 

अभिजीतची मनस्थिती मात्र आता ठीक नव्हती.अभिजीत आता सतत घाबरून राहायचा. रात्री त्याला झोपेतून दचकून जाग यायची.

 

दुसरीकडे प्रतीक्षा आता गावातल्या मुलांमध्ये रमू लागली होती. ती शाळेत मुलांना गोष्टी सांगायची. कधी त्यांच्यासोबत चित्र काढायची. मुलं तिला खूप आवडू लागली होती. एक छोटी मुलगी रोज तिच्या गळ्यात पडायची. “ताई, तू माझ्या आईसारखी आहेस.” हे ऐकून प्रतीक्षाच्या डोळ्यांत नकळत पाणी यायचं कारण तिच्या आयुष्यात “आई” हा शब्द अपूर्ण राहिला होता.

 

एक दिवस दुपारी अचानक गावात कुणीतरी तिला सांगितलं की अभिजीतला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. प्रतीक्षाच्या हातातली वही खाली पडली. तिचं हृदय जोरात धडधडलं.

 

त्या रात्री ती खूप अस्वस्थ झाली. तिला स्वतःचं मन समजत नव्हतं.

ज्याने तिला इतकं दुखावलं. त्याच्यासाठी ती आज पुन्हा रडत होती. त्याच्यासोबतच्या चांगल्या आठवणी तिला राहून राहून पुन्हा आठवत होत्या.

 

इकडे देशमुखांचा बंगला पूर्ण शांत झाला. वनमालाबाईंच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. ते दृश्य पाहून सगळ्यांचंच काळीज तुटत होतं.

 

अभिजीत गेल्यानंतर वनमालाबाई पूर्ण खचल्या. त्यांनी खाणंपिणं कमी केलं. सतत आजारी राहू लागल्या. रात्री त्या मुलाच्या खोलीत जाऊन बसायच्या. सतत म्हणायच्या की तुझ्या ऐवजी देवाने मला का नाही नेले.

 

 

दोन तीन दिवसात पूजाची आई अचानक पूजाला भेटायला आली. आल्यावर प्रतीक्षाची चौकशी केली. सोबतच प्रतीक्षाचे दुसरे लग्न लावून द्या म्हणून सल्ला सुद्धा दिला. पूजा ने आईला डोळ्यांनी इशारा करून तिच्या खोलीत बोलावले. खोलीत बोलावून ती आईला म्हणाली.

 

” आई…सरळ सरळ सांग ना त्यांना रघु दादाच्या स्थळाबद्दल.”

 

” अगं आधी त्यांच्या मनात काय आहे ते कळायला नको का..” आई म्हणाली.

 

” त्यांच्या मनात काहीही असू दे. पण मला आता ही माझ्या घरात नकोय. मला भार झाला आहे तिचा खूप.”

 

” अगं पण दुसरं एखादं स्थळ असतं तर वेगळी गोष्ट असती. रघुची गोष्ट वेगळी आहे. आधीच काही काम करत नाही. त्यात त्याच्या पहिल्या बायकोने ह्याला कंटाळून जीव दिला आणि दुसरीला मारायचा आरोप ह्याच्यावर आहे. जामिनावर बाहेर आहे तो. कोणीही त्याला मुलगी द्यायच्या आधी शंभरदा विचार करेल ना.”

 

” अगं हे सगळं सांगू नको ना त्यांना. त्यांना फक्त सांग की असा मुलगा आहे आणि पहिली बायको आजारपणात मेली म्हणावं. साधेपणाने लग्न उरकून टाकू. म्हणजे ही ब्याद जाईल माझ्या घरातून.” पूजा म्हणाली.

 

” बरं…म्हणते त्यांना…” आई म्हणाली.

 

मग पूजाच्या आईने प्रतिक्षाच्या आईला रघुबद्दल फक्त चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या दोन्ही लग्नाबद्दलच सत्य लपवून फक्त एक लग्नाबद्दल सांगितले आणि बायको आजारपणाने गेली असे सांगितले. खरंतर इतक्या लवकर त्यांना प्रतीक्षा साठी स्थळं बघायचे नव्हते. त्यांना प्रतीक्षाला जरा वेळ द्यायचा होता. पण पूजाने आणि तिच्या आईने निदान एकदा मुलाला पहायचा कार्यक्रम तरी करा म्हणून तगादा लावल्यावर प्रतीक्षाच्या आईच्या तोंडून हो निघाले.

 

ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप झाला. पण आता बोलून गेलो म्हटल्यावर एकदा पहायला काही हरकत नाही म्हणून त्यांनी प्रतीक्षा आणि तिच्या बाबांना एकदा याबद्दल विचारायला काही हरकत नाही असा विचार केला. मग लगेच पुढच्या आठवड्यातील एक दिवस पूजाच्या आईने कळवून टाकला.

 

मग शालिनी ताईंनी जेव्हा याबद्दल प्रतीक्षा आणि तिच्या बाबांना सांगितले तेव्हा त्यांनी आधी तर नकार दिला पण पूजाच्या आईने स्थळ सुचवले म्हटल्यावर जर आठवताना मुलाला भेटायला नकार दिला तर त्यांच्यासोबत पूजाला पण वाईट वाटेल म्हणून फक्त मुलगी पहायच्या कार्यक्रमासाठी ते तयार झाले.

 

प्रतीक्षाला याबद्दल विचारायची मात्र त्यांची हिंमत होत नव्हती. प्रतीक्षा याला तयार होणार नाही हे त्यांना माहित होते. म्हणून मग त्यांनी प्रतीक्षाला वेळेवर सांगू म्हणजे ती ऐन वेळेला नकार देऊ शकणार नाही असे ठरवले. शिवाय लग्नाला ते सुद्धा तयार नव्हते. स्थळ फक्त पाहून घ्यायचं ठरलं होतं.

 

ठरलेल्या दिवशी पूजाची आई रघु आणि त्याच्या आईला घेऊन प्रतीक्षाच्या घरी आली. रघु हा पूजाचा मावसभाऊ होता. प्रतीक्षा शाळेतून नुकतीच घरी आली होती. थकून घरी आल्यावरही तिचा चेहरा प्रफुल्लित वाटत होता. तिचा गोरा रंग, रेखीव बांधा, दाट आणि लांब केस, टपोरे डोळे, हे सगळं रघु बघतच राहिला. तिला पाहून रघु पुरता घायाळ झाला होता. दोन लग्नानंतर आपल्याला एवढी चांगली मुलगी तिसरी बायको म्हणून मिळेल ह्याचा त्याने कधी विचार सुद्धा केला नव्हता.

 

तिला पाहून पूजाची मावशी म्हणजेच रघुची आई समोर आली आणि म्हणाली.

 

” ही आहे का तुमची मुलगी. बरी आहे नाकी डोळी. नशिबवान आहे की माझ्या रघुसारखा मुलगा मिळेल तिला.”

 

हे काय बोलत आहेत हे तिला कळत नव्हते. मग आई तिला लगेच आतल्या खोलीत घेऊन गेली आणि तिला सगळं सांगितलं. तिला आईचा खूप राग आला होता अशी वागल्याबद्दल. पण पूजा वहिनीच्या माहेरचे माणसं होती म्हणून आत्ताच काही बोलायचं नाही अस तिने ठरवले होते. तिने वडिलांशी बोलायचा विचार केला पण नेमका त्याच वेळेला त्यांना एक फोन आला म्हणून ते बोलायला जरा बाजूला गेले.

 

दुसरीकडे पूजाची आई, मावशी, रघु हे आपापसांत काहीतरी बोलले आणि मग पूजाची आई म्हणाली.

 

“चला मुलाला मुलगी पसंत आहे. आता साधेपणाने लग्नाचा कार्यक्रम उरकून टाकू. आम्हाला तर आज लग्न केलं तरी चालेल. पण तुम्हाला काही तयारी करायची असेल तर 2-4 दिवसानंतरचा एखादा मुहूर्त पाहून लग्न उरकून टाकू.”

 

हे ऐकून प्रतीक्षा सह तिच्या घरचे सगळेच हैराण झाले. प्रतीक्षाला तर कळतच नव्हतं की हे नेमकं काय सुरू आहे ते. सगळे एकमेकांकडे पाहायला लागले.

 

” लग्न…लग्नाचा विषय इतक्यात कसा काय. आपण फक्त पहायचा कार्यक्रम ठेवलाय आज.” शालिनीताई आश्चर्याने म्हणाल्या.

 

” मग झाला की बघण्याचा कार्यक्रम. मुलाला मुलगी पसंत सुद्धा आहे. मग पुढची पायरी लग्नच आहे ना. अन् हे काय पहिलं लग्न आहे का ह्यांचं की लई थाटामाटात लागायचं. 2-4 लोकं मिळून डोक्यावर अक्षता टाकल्या की झालं.” पूजाची आई म्हणाली.

 

” अहो पण आम्हाला मुलगा पसंत पडायला हवा. मुलीने होकार द्यायला हवा.” शालिनी ताई म्हणाल्या.

 

” मुलगा पसंत पडायला हवा म्हणजे काय. अहो आमच्या रघु सारखा मुलगा मिळेल का तुमच्या मुलीला. एकतर नवऱ्याने टाकली त्यातच तिची कूस उजवेल का नाही ह्याची खात्री नाही. कोण करणार आहे अशा मुलीला. पूजाची नणंद आहे म्हणून आम्ही निदान तिला स्वीकारायला तयार तरी आहोत.” रघुची आई रागाने म्हणाली.

 

” नाहीतर काय. एखादा राजकुमार शोधणार आहात का आता ह्यांच्यासाठी?” पूजा कुत्सितपणे म्हणाली.

 

” राजकुमार शोधत नसलो तरी एखाद्या गुन्हेगाराशी तिचे लग्न लावून देऊ एवढे सुद्धा वाईट आईवडील नाही आहोत आम्ही ?” गणपतराव मागून येत म्हणाले.

 

” गुन्हेगार ? कोण गुन्हेगार ?” रघुची आई जरा चाचरत म्हणाली.

 

” तुमचा मुलगा. त्याचे दोन लग्न झालेत आणि एका बायकोने ह्याला कंटाळून जीव दिला आणि दुसरी सुद्धा ह्याच्यामुळेच मेली असा आरोप आहे ह्याच्यावर. जामिनावर बाहेर आहे ना हा तुमचा मुलगा ?” गणपतराव रागाने म्हणाले.

 

आता मात्र रघु, त्याची आई, पूजा अन् तिची आई ह्या सगळ्यांनी मान खाली घातली. मग रघुची आई गणपतरावांना म्हणाली.

 

” काहीही काय बोलताय. खोटे आरोप केलेत त्याच्यावर. आणि गुन्हेगार म्हणायला गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. केस सुरूच आहे अजून. आणि माझा रघु निर्दोष आहे.” रघुची आई म्हणाली.

 

” तुम्ही पूजाच्या माहेरचे आहात म्हणून मी तुम्हाला फार काही न बोलता निघून जायला सांगत आहे. तुम्ही आता येऊ शकता.” गणपतराव म्हणाले.

 

” तुम्ही माझ्या माहेरच्यांशी असे बोलू शकत नाही. अन् प्रतीक्षा ताईंना रघु दादा सारखा मुलगा मिळू शकत नाही. तो ह्यांच्याशी लग्न करून उपकारच करत आहे. नाहीतर अशा वांझोट्या बाईसोबत कोण लग्न करणार आहे.” पूजा म्हणाली.

 

” तोंड सांभाळून बोल सुनबाई.” शालिनी ताई कडाडल्या.

 

” नाही. एकतर ह्या घरात ही राहील किंवा मी राहील. मला ही बाई माझ्या घरात नाही पाहिजे. तुम्ही

एकतर हिचा लवकरात लवकर काही बंदोबस्त करा नाहीतर मी निघून जाते आताच माझ्या घरी.” पूजा म्हणाली.

 

क्रमशः

हक्काची सावली – भाग ९ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

Leave a Comment