उंबरठ्यापलीकडचे सुख

 

सुधाला एका मोठ्या घरातले स्थळ आले तेव्हा तिच्या माहेरी सगळेच आनंदाने हरखले होते. दिनकरच्या घरचे लोक म्हणजे मोठं प्रस्थ होतं. गावी त्यांचे मोठे वाड्यासारखे घर होते. दिनकरला आणखी 3 भाऊ होते. दिनकर पेक्षा मोठा एक भाऊ आणि दोन भाऊ अजून लहान होते.

 

 

सुधा कासखेडी सारख्या एका छोट्याशा गावात राहणारी एक साधी, कष्टाळू आणि स्वाभिमानी मुलगी होती. तिच्या डोळ्यांत मोठी स्वप्नं नव्हती, पण छोट्या छोट्या आनंदांनी भरलेलं आयुष्य तिला हवं होतं. आई-वडिलांनी तिला खूप संस्कार दिले होते. ‘घर सांभाळणं म्हणजे फक्त चूल-मूल नाही, तर नात्यांना जपणं असतं,’ हे तिच्या आईने तिला लहानपणापासून शिकवलं होतं.

 

सुधाचं लग्न दिनकरशी ठरलं तेव्हा तिच्या आई-वडिलांना समाधान वाटलं. दिनकर शांत स्वभावाचा, कष्टाळू आणि सरळमार्गी मुलगा होता. त्यांचं घर मोठं होतं. चार भाऊ, मोठा वाडा, भरपूर शेती… बाहेरून पाहिलं तर सगळं सुखी आणि संपन्न वाटायचं. पण प्रत्येक मोठ्या वाड्याच्या भिंतीमागे काही न सांगितलेले हुंदके लपलेले असतात. तसे इथे सुद्धा अशा काही गोष्टी घडत होत्या ज्यांची सुधाला अजून कल्पना सुद्धा नव्हती.

 

लग्नाच्या दिवशी सुधा लाल साडीत खूप सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यांत नव्या संसाराची स्वप्नं होती. दिनकर आणि सुधाचे लग्न तिच्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त थाटामाटात लावून दिले होते. डोळ्यांत अनेक स्वप्न घेऊन ती दिनकरच्या घरी आली. मोठ्या दारातून आत येताना तिने उंबरठ्याला नमस्कार केला.

 

घरात मोठे दिर रामभाऊ आणि त्यांची बायको कमला यांचंच राज्य होतं. कमला अंगाने जाडजूड, बोलण्यात करारी आणि नजरेत नेहमी संशय असलेली बाई होती. घरात सगळे तिला ‘वहिनी’ म्हणत असले तरी तिच्यासमोर कोणी जास्त बोलत नसे. वहिनीसोबत हसून बोलणे तर दूरच पण तिच्यासमोर बोलण्याची सुद्धा तिच्या दीरांची हिंमत होत नसे.

 

पहिल्याच दिवशी सुधाला जाणवलं की घरात काहीतरी वेगळं आहे.

 

रात्री जेवताना रामभाऊ वरच्या जागेवर बसले होते. बाकी तिन्ही भाऊ खाली शांतपणे जेवत होते. कमला सगळ्यांना वाढत होती, पण तिच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं, तर हुकूमशाही होती.

 

“दिनकर, उद्या सकाळी पाच वाजता उठायचं आहे. ऊसाच्या फडात पाणी सोडायचं आहे,” रामभाऊ कठोर आवाजात म्हणाले.

 

“हो दादा,” दिनकर लगेच म्हणाला.

 

सुधाला आश्चर्य वाटलं. इतकी मोठी शेती, चार भाऊ… पण नुकत्याच लग्न झालेल्या भावाला लगेच कामाला सुद्धा लावले त्यांनी.

 

दुसऱ्या दिवशी पहाटे ती उठली तेव्हा दिनकर आणि त्याचे दोन्ही लहान भाऊ आधीच तयार झाले होते. त्यांनी चहा घेतला आणि शेतीकडे निघाले.

 

कमला मात्र निवांत बसून केस विंचरत होती.

 

“सुधा, आधी सगळी भांडी घास. मग झाडलोट कर. नंतर जनावरांना चारा टाक,” ती गोड बोलत म्हणाली.

 

सुधा काही न बोलता शांतपणे कामाला लागली.

 

दिवसभर काम करून संध्याकाळी दिनकर परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. रोज हेच घडत होतं. दिनकर आणि त्याचे दोन्ही भाऊ शेतीत राब राब राबत. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेतातच असायचे. मोठे दीर रामभाऊ मात्र सतत काही कामासाठी शहरात जायचे नाहीतर घरी आराम करायचे. मोठी जाऊ कमला सुद्धा सुधाला सकाळपासून कामाला जुंपायची. आता तर सुधा दिनकर सोबत कधीमधी शेतातील कामे करायला सुद्धा जायची.

 

लग्नानंतर पहिल्या सणाला सुधाला माहेरी जायचे होते. तेव्हा तिने दिनकरला थोडे पैसे मागितले. तेव्हा दिनकर म्हणाला.

 

” अगं पैसे वहिनीला माग ना…सगळा हिशोब वहिनीकडेच असतो आपल्या घरचा..”

 

“ वहिनीला कशाला मागायचे. मी तुमची जबाबदारी आहे तर पैसे सुद्धा तुम्हालाच मागेल ना…” सुधाने आश्चर्याने विचारले

 

दिनकर थोडा शांत झाला.

 

“दादा सगळा हिशोब ठेवतात.”

 

“मग तुम्हाला पैसे हवे असल्यास ?”

 

“गरज पडली की ते देतात.” दिनकर म्हणाला.

 

सुधा थोडावेळ गप्प राहिली.

 

” तुम्हाला ह्यात काही चुकीचं वाटत नाही का..?” ती म्हणाली.

 

” अगं आधीपासूनच अस आहे…मग आता का चुकीच वाटेल…” असे म्हणत दिनकर झोपी गेला सुद्धा.

 

सुधाच्या मनात पहिल्यांदा अस्वस्थतेची रेष उमटली.

 

 

दुसऱ्या दिवशी सकाळी ती कमलाजवळ गेली.

 

“वहिनी… मला थोडे पैसे पाहिजे होते…”

 

कमलाने वरखाली पाहिलं.

 

“आत्ता कशाला? घरातच तर असतेस तू…तुला काय काम पडलय पैशाचं”

 

“ सणाला माहेरी जायचं आहे तर हातात काही पैसे असावेत म्हणून…”

 

“उगाच खर्च वाढवू नकोस…माहेरी पैसे द्यायची पद्धत नाही आपल्यात…”

 

सुधा काहीही न बोलता मागे फिरली.

 

त्या रात्री तिला रडू आवरता येत नव्हते. तिचा स्वाभिमान आज चूर चूर झाला होता.

 

दिनकरने विचारलं,

 

“काय झालं?”

 

“काही नाही…” ती म्हणाली.

 

पण तिच्या डोळ्यांतलं दुःख लपलं नाही.

 

“तुला काही हवं होतं का?”

 

ती हळू आवाजात म्हणाली,

 

“मला तुमच्याकडे मागताना वाईट वाटत नाही… पण प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी वहिनीपुढे हात पसरावा लागतो, हे सहन होत नाही.”

 

दिनकर शांत झाला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. कारण तो स्वतः अनेक वर्षं तेच सहन करत होता.

 

 

सुधा आता घरातली सगळी कामं करायची. पहाटे उठून पाणी भरायचं, चूल पेटवायची, स्वयंपाक करायचा, भांडी घासायची… आणि मग दिनकरसोबत शेतात जायचं.

 

उन्हात काम करताना तिचे हात काळवंडले. एकदा ऊस कापताना तिच्या हाताला खोल जखम झाली. रक्त वाहत होतं. दिनकर घाबरला.

 

“चल घरी जाऊ.”

 

पण रामभाऊ म्हणाले,

 

“इतक्याशा जखमेवर काम थांबवतात का?”

 

सुधाने अपमानाने आपले दात ओठात चावले आणि पुन्हा कामाला लागली. घरी परतल्यावर कमला आरामात झोपाळ्यावर बसून चहा पीत होती.

 

“इतका वेळ कसा लागला तुला घरी यायला? घरची कामं पण पडून असतात” ती चिडून म्हणाली.

 

सुधाने काही उत्तर दिलं नाही.

 

त्या रात्री दिनकर तिच्या जखमेवर हळूवार मलम लावत होता.

 

सुधा अचानक म्हणाली,

 

“तुम्ही एवढं सहन कसं करता?”

 

दिनकर कसातरी हसला… पण ते हसू वेदनांनी भरलेलं होतं.

 

“लहानपणापासून सवय झाली.”

 

सुधाच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण दिनकरला काहीही म्हणून काही उपयोग नव्हता. तो स्वतःच कितीतरी सहन करत होता. तिला त्या माणसाची कीव आली जो स्वतःच्या घरात मजुरासारखा जगत होता.

 

 

काही महिन्यांनी सुधाला दिवस गेले. तिच्या चेहऱ्यावर हलकं समाधान दिसू लागलं. दिनकर सुद्धा खूप खुश झाला.

 

“आपलं बाळ येणार…” तो आनंदाने म्हणाला.

 

पण घरात तो आनंद फार काळ टिकला नाही. सुधाला आंबट-गोड खावंसं वाटायचं. एकदा तिने कमलाला विचारलं,

 

“वहिनी… थोडी चिंच आहे का?”

 

कमला लगेच म्हणाली,

 

“सगळं संपवशील तू. दिवस गेले म्हणजे रोज वेगवेगळे हट्ट करायलाच हवे असे नाही. जरा आवर घाल जिभेला!”

 

यावर सुधा मन मारून गप्प बसली.

 

तिला नंतर कळलं की कमला कपाटात खाऊच्या वस्तू लपवून ठेवते.

एका दिवशी तिने कपाट उघडताना पाहिलं—त्यात तूप, साखर, सुका मेवा, बिस्किटं सगळं भरलेलं होतं. हे सगळ तिच्या नवऱ्या आणि मुलासाठी तिने राखून ठेवलं होतं. हे पाहून सुधाच्या डोळ्यांत पाणी आलं.

 

ती स्वतःसाठी काही मागत नव्हती… पण तिच्या पोटात वाढणाऱ्या लेकरासाठी तरी थोडं प्रेम मिळेल, अशी अपेक्षा होती. नऊ महिने तिने खूप कष्टात काढले. आणि शेवटी तिला मुलगा झाला. तिला खूप आनंद झाला. दिनकरच्या डोळ्यांत सुद्धा आनंदाश्रू आले होते.

 

“माझा बाळ…” तो लेकराला छातीशी धरून म्हणाला.

 

पण कमलाच्या चेहऱ्यावर फार काही आनंद नव्हता. आता काही दिवस सुधा घरचे काम करू शकणार नाही ह्याचे तिला वाईट वाटत होते. सुधा पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. काही दिवस माहेरी राहून पुन्हा आपल्या सासरी परतली. तिथे पुन्हा मुलाच्या गरजेच्या वस्तूसाठी वाहिनीपुढे हात पसरावे लागायचे. मुलासाठी डायपर हवे हे सांगितल्यावर हे शिल्लकचे चोचले आहेत आणि ह्यासाठी पैसे खर्च करायचे नाही हे मोठ्या कठोरपणे सांगितले होते कमला ने..

 

एके दिवशी सुधा म्हणाली,

 

“वहिनी, बाळाला अंगावरचे दूध जरा कमी पडत आहे…बाळासाठी थोडं दूध बाजूला ठेवत जा…”

 

कमला चिडली.

 

“दररोज दूध, साखर… एवढं परवडत नाही.”

 

सुधाला धक्का बसला.

 

घरात तीन गायी होत्या.

 

तरी तिच्या लेकराला दूध मिळत नव्हतं. त्या रात्री तिने उपाशीपोटी मुलाला मिठीत घेऊन खूप रडली. दिनकरला सुद्धा हे कळल्यावर स्वतःचा तिरस्कार वाटत होता. दिनकर बाहेर अंगणात बसला होता. त्याच्या डोळ्यांतही अश्रू होते.

 

“मी बाप असून माझ्या मुलासाठी दूध आणू शकत नाही…” तो स्वतःलाच दोष देत होता.

 

एके दिवशी दुपारी सुधा स्वयंपाक करत होती. बाळ सतत रडत होतं. म्हणून सुधाने एका कपात थोडं दूध घेऊन त्याला प्यायला दिले.

 

तेवढ्यात कमला आली.

 

“कोणी सांगितलं दूध बाळासाठी वापरायला?”

 

“बाळ खूप रडत होतं…” सुधा म्हणाली.

 

“तुझं लेकरू म्हणजे घरावर ओझं आहे का? उगाच खर्च!” कमला रागाने म्हणाली.

 

सुधाचा संयम तुटला.

 

“वहिनी, एवढंसं बाळ आहे…त्याच्याबद्दल कसं बोलताय तुम्ही ?”

 

कमला जोरात ओरडली,

 

“तुम्ही दोघं नवरा बायको फुकटखाऊ आहात! कमावता येत नाही आणि सगळच आयतं पाहिजे काय?”

 

ते शब्द सुधाच्या काळजाला घाव घालून गेले. संध्याकाळी दिनकर घरी आला तेव्हा तिने सगळं सांगितलं. पहिल्यांदाच दिनकरच्या डोळ्यांत राग दिसला. तो सरळ रामभाऊंसमोर गेला.

 

“दादा, आम्हाला वेगळं राहायचं आहे..”

 

घरात शांतता पसरली.

 

रामभाऊ ओरडले,

 

“माझ्यासमोर वेगळं व्हायची भाषा करतोस…तुझ्यात एवढी हिंमत आली कुठून?”

 

“माझ्या बायकोच्या केलेल्या अपमानातून. आणि मुलाच्या नभागवता येणाऱ्या गरजांमधून एवढी हिंमत आली दादा…” दिनकर ठाम आवाजात म्हणाला,

 

सुधा त्या क्षणी त्याच्याकडे पाहतच राहिली.

 

तिला पहिल्यांदा वाटलं—हा माणूस नवरा म्हणून खंबीर नसला तरी एक बाप म्हणून खंबीर आहे. त्या रात्री त्यांनी काही कपडे, थोडं भांडीकुंडी आणि मुलाला घेऊन घर सोडलं. पावसाची रात्र होती.

 

सुधा मागे वळून वाड्याकडे पाहत होती.

 

तिच्या डोळ्यांत अश्रू होते… पण मनात एक वेगळं हलकंपणही होतं.

 

गावाच्या टोकाला त्यांचे एक जुने धान्याचे कोठार होते. कोठार जुने असले तरी मजबूत होते. तिथेच त्यांनी एक खोली साफ करून वापरायला घेतली. त्या कोठाराच्या छपरातून पाणी गळायचं. भिंती सुद्धा आताशा पावसामुळे जरा ओलसर वाटत होत्या. पण त्या छोट्याशा घरात दोघांनाही एक वेगळंच समाधान वाटत होतं. पहिल्याच दिवशी सुधाने खोली स्वच्छ करून एका कोपऱ्यात स्वयंपाकासाठी जागा केली. मातीच्या चुलीवर भाकरी भाजली. दोघेही जेवायला बसले तेव्हा दिनकर तिला म्हणाला.

 

” माझ्यामुळे तुझ्या अन् आपल्या बाळाच्या आयुष्याची फरफट होत आहे. मला खूप वाईट वाटत आहे तुझ्यासाठी…”

 

“अहो वाईट वाटायचं काय आहे त्यात…उलट मला तर तुमचा अभिमान वाटत आहे…आज पहिल्यांदा असं वाटतंय आपण आपलं खातोय. कुणाच्याजीवावर नाही.” ती दिनकरला म्हणाली,

 

तिचे समजुतीचे बोलणे ऐकून दिनकर समाधानाने हसला.

 

दुसऱ्या दिवसापासून तो दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जाऊ लागला. घरच्या शेतीत विनामूल्य राबत होता. पण दुसऱ्यांच्या शेतात राबल्यावर आता दिवसाला पैसे हातात मिळत होते. संध्याकाळी तो थकून यायचा, पण चेहऱ्यावर समाधान असायचं.

 

“आज दोनशे रुपये मिळाले,” तो आनंदाने म्हणायचा.

 

सुधा पैशांकडे अभिमानाने पाहायची. कारण त्या पैशांत त्यांचा घाम आणि स्वाभिमान मिसळलेला होता. ती खूप काटकसरीने चालत होती. रिकाम्या वेळेत सुधाने कपडे शिवायला सुरुवात केली. तिला लहानपणापासून शिवणकाम येत होतं. गावातल्या बायका तिच्याकडे ब्लाऊज, परकर शिवायला येऊ लागल्या. पहिल्यांदा तिने दहा रुपये कमावले तेव्हा तिचे डोळे भरून आले.

 

“हे बघा…” ती नोट दिनकरच्या हातात ठेवत म्हणाली.

 

दिनकर भावूक झाला.

 

“आपण दोघं सोबत असलो तर नक्कीच परिस्थिती बदलू शकतो. मिळून काहीतरी करू शकतो,” तो म्हणाला.

 

 

आता त्यांच्या घरात थोडीफार भरभराट दिसू लागली. एका दिवशी दिनकर बाजारातून मुलासाठी छोटा चेंडू घेऊन आला. मुलगा आनंदाने हसू लागला. ते हसू पाहून सुधाच्या डोळ्यांत पाणी आलं.

 

“पूर्वी आपण इतक्या छोट्या गोष्टींसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून होतो…” ती म्हणाली.

 

“आता आपण कधीच कोणापुढे हात पसरणार नाही.”दिनकर तिच्या शेजारी बसत म्हणाला.

 

हळूहळू त्यांनी थोडे पैसे साठवायला सुरुवात केली. सुधा प्रत्येक रुपया जपून ठेवायची. तिने जुन्या डब्यात पैसे साठवले होते. रात्री दोघं बसून हिशोब करायचे.

 

“आपण अजून किती जमा केले?” दिनकर विचारायचा.

 

“तीन हजार सातशे.”

 

“आणखी जमले की काहीतरी मोठं करू.”

 

सुधाच्या मनात विश्वास निर्माण होऊ लागला.

 

एकदा दिनकर गावातल्या एका माणसासोबत मालवाहतूक करायला गेला. दिवसभर टेम्पोमध्ये फिरताना त्याच्या मनात विचार आला.

 

‘हे काम आपणही करू शकतो.’

 

रात्री त्याने सुधाला सांगितलं.

 

“आपण टेम्पो घेतला तर?”

 

सुधा थोडी घाबरली.

 

“पैसे?” तिने विचारले.

 

“थोडे आपले… थोडं कर्ज.” तो म्हणाला.

 

सुधा काही वेळ विचारात पडली.

 

मग ती म्हणाली,

 

“आपण आयुष्यभर भीतीत जगलो. आता थोडं धाडस करून बघूया. कदाचित हे दिवस सुद्धा बदलतील.”

 

दिनकरने गावच्या पतसंस्थेतून कर्ज घेतलं. आणि एक जुना टेम्पो विकत घेतला. त्या दिवशी त्यांनी टेम्पोला फुलांचा हार घातला. सुधाने नारळ फोडला. दिनकर स्टेअरिंगवर हात ठेवून भावूक झाला.

 

“मला विश्वास बसत नाही आहे की हा आपला टेम्पो आहे आणि आपण एक नवीन सुरुवात करतोय…” तो सुधाला म्हणाला.

 

त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. स्वप्न आणि भीती दोन्ही त्यांच्या डोळ्यांत होती.

 

 

दिनकर पहाटे चार वाजता उठून टेम्पो घेऊन निघायचा. कधी भाजी, कधी धान्य, कधी बांधकामाचं सामान वाहून न्यायचा.दिवसभर राबून रात्री उशिरा घरी यायचा. सुधा त्याची वाट पाहत बसायची.

 

“जेवलात का?”

 

“आज वेळ नाही मिळाला जेवायला.” तो उत्तर द्यायचा.

 

त्याच्या कष्टाची तिला जाणीव होती. ती लगेच त्याच्यासाठी भाकरी गरम करायची. त्याच्या हातांवर फोड आले होते. एकदा ती त्याचे हात दाबत म्हणाली,

 

“ अहो इतकं कष्ट करू नका. स्वतःची काळजी घेत जा जरा. वेळेवर जेवण करत जा. थोडा आराम सुद्धा गरजेचा आहे ना.”

 

 

“आजच्या कष्टातच उद्याचं सुख आहे सुधा.” दिनकर हसत म्हणाला.

 

काही महिन्यांतच त्यांचं कर्ज कमी होऊ लागलं. लोक आता दिनकरचं कौतुक करू लागले. “दिनकर खूप प्रामाणिक माणूस आहे,” गावातले म्हणायचे. सुधाच्या शिवणकामालाही चांगली मागणी येऊ लागली. कमला आणि रामभाऊ मात्र त्यांची प्रगती पाहून मनातून जळत होते. त्यांना वाटले होते की सुधा आणि दिनकर पुन्हा नाक घासत त्यांच्याकडे येतील. पण त्यांनी स्वतःचं नवीन जग निर्माण केलं ह्याचे कमला खूप वाईट वाटत होते. इकडे सुधा मात्र स्वतःच्या संसारात सुखी होती. तिने शिवणयंत्र विकत घेतलं. त्या दिवशी ती लहान मुलीसारखी आनंदी झाली.

 

“पहिल्यांदा स्वतःच्या कमाईतून काहीतरी घेतल्याचं समाधान होत आहे” ती म्हणाली.

 

दोन वर्षांत त्यांनी पहिलं कर्ज फेडलं. त्या दिवशी दिनकर पतसंस्थेतून बाहेर आला तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू होते.

 

“आज आपण कुणाचे देणेकर नाही,” तो म्हणाला.

 

सुधाने देवापुढे दिवा लावला.

 

“देवा, हे सुख टिकू दे. आमच्या कष्टाला फळ दे.”

 

काही दिवसांनी दिनकरने दुसरा टेम्पो घेतला. आता त्याच्याकडे दोन चालक कामाला होते. घरात पैसे येऊ लागले. मुलगा शाळेत जाऊ लागला. पहिल्या दिवशी शाळेचा गणवेश घालून तो उभा राहिला तेव्हा सुधा रडू लागली.

 

“का रडतेस?” दिनकरने विचारलं.

 

ती हसत म्हणाली,

 

“माझ्या लेकराला चांगलं शिकवता येतंय… एवढंच पुरेसं आहे.”

 

चार वर्षांत त्यांची परिस्थिती पूर्ण बदलली. गावात त्यांनी मोठा प्लॉट घेतला. नवीन घर बांधायला सुरुवात झाली. सुधा रोज बांधकाम पाहायला जायची.

 

“इथे देवघर… इथे मुलाची खोली…” ती उत्साहाने सांगायची.

 

दिनकर तिच्याकडे पाहून समाधानाने हसायचा.

 

इकडे दिनकर च्या दोन लहान भावांची लग्न सुद्धा झाली होती. सुधा आणि दिनकर सुद्धा त्यांच्या लग्नात मागच सगळ विसरून सहभागी झाले होते. लहान दीरांनी मात्र कमला वहिनीची वागणूक पाहून लग्न झाल्यावर लगेच शेती आणि घरात स्वतःचा वेगळा हिस्सा मागितला आणि वेगळे झाले.

 

दिनकरच्या घरची वास्तुशांती केली त्या दिवशी गावभर जेवण दिलं. कमला आणि रामभाऊंना स्वतः निमंत्रण देऊन आले पण ते काही आले नाही. तिचे दोन लहान दीर मात्र स्वतःच्या बायकांसोबत आले होते. त्यांना पाहून सुधाला आनंद झाला होता. सुधाने उंबरठ्यावर सुंदर रांगोळी काढली. नव्या घरात पहिलं पाऊल ठेवताना ती प्रचंड भावूक झाली. तिला त्या रात्रीची आठवण झाली जेव्हा ती पावसात जुन्या वाड्यातून बाहेर पडली होती. आज तिचं स्वतःचं घर होतं. त्यांच्या स्वाभिमानातून बनलेलं घर.

 

एक दिवस कमला त्यांच्या घरी आली. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा रुबाब नव्हता. रामभाऊंची शेती आता तोट्यात गेली होती. घरात भांडणं वाढली होती. कमला मोठ्या हॉलमध्ये बसली होती. तिने आजूबाजूला पाहिलं. सुंदर फर्निचर, स्वच्छ घर, आनंदी वातावरण. सुधा तिला चहा घेऊन आली. कमलाचे डोळे खाली गेले.

 

“तू खूप मोठी झालीस बघ…” ती हळू आवाजात म्हणाली.

 

सुधा शांतपणे हसली.

 

“मोठं घर बांधलं… पण मी अजूनही तुमच्यापेक्षालहानच आहे वहिनी…वयाने सुद्धा आणि मानाने सुद्धा”

 

 

“मी तुमच्याशी खूप चुकीचं वागले.” हे बोलताना कमलाच्या डोळ्यांत पाणी आलं.

 

क्षणभर शांतता पसरली. सुधाने तिच्या हातावर हात ठेवला.

 

“जे झाले ते बरेच झाले वहिनी, त्या दिवसांनी आम्हाला जगायला शिकवलं. त्यामुळेच आम्ही एवढ काही करू शकलो आयुष्यात..”

 

हे ऐकून कमला रडू लागली. तिला आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या वागण्याची लाज वाटत होती.

 

त्या रात्री सुधा अंगणात बसली होती. आकाशात चांदणं पसरलं होतं. दिनकर तिच्या शेजारी येऊन बसला.

 

“काय विचार करतेस?”

 

“आपल्या जुन्या दिवसांचा.” ती म्हणाली.

 

“वाईट दिवस विसर आता सुधा.” दिनकर म्हणाला.

 

” नाही ते दिवस विसरून कसे चालेल… तेच दिवस आपल्याला घडवू

न गेले. नाही का ?”

 

दिनकर तिच्याकडे पाहत राहिला.

 

“तू नसतीस तर मी कधीच उभा राहिलो नसतो.”

 

सुधा हळूच म्हणाली,

 

“आणि तुम्ही नसता तर मला स्वाभिमानाचं आयुष्य मिळालं नसतं.”

 

दोघेही शांतपणे चांदणं पाहत बसले.

 

त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष होता… पण त्या संघर्षातून जन्माला आलेलं सुख खूप खरं होतं.

 

समाप्त.

 

©® आरती निलेश खरबडकर.

ही कथा तुम्ही इथे ऑडिओ स्वरूपात सुद्धा ऐकू शकता. 👇

 

Leave a Comment