हक्काची सावली – भाग ४ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)

 

पहाटेची वेळ होती. गाव अजून अर्धवट झोपेत होतं. कुठेतरी मंदिरात काकडआरती सुरू झाली होती. धुक्याच्या हलक्या पडद्यातून सूर्य हळूहळू वर येत होता. पण प्रतीक्षाच्या आयुष्यातला सूर्य मात्र खूप आधी मावळला होता. ती अंगणात शांत बसली होती. हातात चहाचा कप होता, पण चहा थंड झाला होता. तिचं लक्ष मात्र दूर कुठेतरी हरवलं होतं.

शालिनीताई तिच्याकडे पाहत होत्या.

 

मुलगी दिवसेंदिवस बदलत चालली होती. पूर्वी हसणारी, खळखळून बोलणारी प्रतीक्षा आता गप्प झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचं तारुण्य जणू काही महिन्यांतच हरवलं होतं. पण त्या शांत चेहऱ्याच्या आत एक आग धगधगत होती. अन्यायाची. विश्वासघाताची. आणि स्वतःचा हक्क परत मिळवण्याची.

 

त्या दिवशी गणपतराव आणि प्रतीक्षा शहरात गेले. जिल्हा न्यायालय. मोठी इमारत. लोकांची गर्दी. काळे कोट घातलेले वकील. लोकांच्या चेहऱ्यावर चिंता, राग, भीती, आशा — सगळं एकत्र दिसत होतं.

प्रतीक्षा त्या इमारतीकडे बघत राहिली.

 

तिला कधी वाटलं नव्हतं की आयुष्यात तिला इथे यावं लागेल. तेही तिच्या प्राणप्रिय नवऱ्या विरोधात. गणपतरावांनी हळू आवाजात तिला विचारलं,

 

“घाबरलीस पोरी?…अजूनही वेळ आहे बघ…विसरून जा ही कोर्ट कचेरी… अगं आपल्या सारख्याच काम नाही ते..”

 

बाबांचे बोलणे ऐकून प्रतीक्षा त्यांना म्हणाली.

 

“हो बाबा. मला भीती वाटत आहे या सगळ्याची. पण आता मागे फिरायचं नाही. आता काही केलं नाही तर मला आयुष्यभर पश्चात्ताप होईल की मी स्वतःच्याआयुष्याशी खेळणाऱ्याला तसेच सोडले.” ती निर्धाराने म्हणाली.

 

तिचे बोलणे ऐकून तिचे बाबा काही बोलले नाहीत. तिथेबएका ओळखीच्या माणसाने त्यांना एका वकिलाकडे नेलं. अ‍ॅडव्होकेट देशपांडे. वयाने साधारण पन्नाशीचे वाटत होते. गंभीर चेहरा, डोळ्यांत अनुभव. प्रतीक्षा ला पाहूनच त्यांना सगळ्या परिस्थितीची जाणीव झाली. त्यांनी तिची पूर्ण गोष्ट शांतपणे ऐकून घेतली. मग ते तिला म्हणाले.

 

“तुझ्याकडे लग्नाचे पुरावे आहेत?”

 

“हो… फोटो आहेत. कार्ड आहे.” प्रतीक्षा म्हणाली.

 

“दुसऱ्या लग्नाचे पुरावे?” त्यांनी विचारले.

 

प्रतीक्षा शांत झाली. तिला कळले की त्याचे पुरावे सुद्धा असायला हवेत.

 

“मी फक्त त्याच्या घरात तिला पहिले. त्याशिवाय त्यांच्या एका भावाने मला त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले म्हणजे तो सुद्धा पुरावा ग्राह्य धरल्या जाईल ना. या व्यतिरिक्त दुसरा पुरावा नाही माझ्याकडे..”

 

देशपांडे विचारात पडले. मग म्हणाले.

 

“केस कठीण आहे. नुसतं कुणीतरी सांगितले म्हणून कोर्ट विश्वास ठेवणार नाही. आपल्याला पुरावे हवेत.” ते म्हणाले.

 

गणपतराव बेचैन झाले.

“म्हणजे आम्हाला न्याय मिळणार नाही का?”

 

“मी तसं म्हटलं नाही.” ते पुढे झुकत म्हणाले.

 

“पण समोरचं कुटुंब श्रीमंत आहे. प्रभावशाली आहे. लढाई मोठी असेल. तुम्हाला मनाची तयारी करावी लागेल. बराच वेळ सुद्धा लागू शकतो…”

 

त्यावर प्रतीक्षा ने होकार दर्शवला.

 

काही दिवसांनी अभिजीतच्या घरी कोर्टाची नोटीस पोहोचली. वनमालाबाई संतापाने थरथरत होत्या.

 

“ही मेली कोर्टात गेली? तिची एवढी हिंमत? स्वतः वांझोटि असून पण उलट आपल्यावरच केस करत आहे. स्वतः कुठेतरी जाऊन मारण्या ऐवजी आपल्यावर आरोप करत आहे.”

 

अभिजीत शांत बसला होता. पण त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा चिडचिड होती. त्याला वाटलं होतं की प्रतीक्षा त्याच्यासमोर हातपाय जोडेल, रडेल, पडेल, दुसऱ्या बायकोसोबत मी सुद्धा गपगुमान तुमच्या घरच्या एका कोपऱ्यात पडून राहील अशी भीक मागेल. पण ती तिच्या अधिकारासाठी कोर्टात जाईल ही अपेक्षा त्याने केली नव्हती.

 

“मी आधीच सांगितलं होतं… ती गप्प बसणार नाही…पण ती असे काहीतरी करेल असे नव्हते वाटले.”

 

“तिची एवढी हिंमत झाली कशी पण?” वनमालाबाई रागाने ओरडल्या.

“गरीब घरची असून आमच्यावर केस करते?”

 

“मी सांभाळतो हे सगळं. तू काळजी नको करुस..” अभिजीतने कपाळावर आठ्या आणत म्हटले.

 

पण त्याच्या आवाजातही अस्वस्थता होती. कारण त्याला माहित होतं. प्रतीक्षा अजूनही त्याची कायदेशीर पत्नी होती.

 

कोर्टातली पहिली तारीख होती. प्रतीक्षा साध्या साडीमध्ये कोर्टात उभी होती. तिच्या हातात फाईल होती. हात थरथरत होते. ती सतत दाराकडे पाहत होती. कदाचित अभिजीत येईल. कदाचित तिच्याकडे पाहील. कदाचित त्याला पश्चात्ताप झाला असेल. त्याच्या डोळ्यात तिला गमावल्याचे दुख दिसेल असे तिला वाटत होते.

 

पण तो आला नाही. त्याच्या वकिलांनी काहीतरी किरकोळ कारण सांगितले आणि जजांनी पुढची तारीख दिली. प्रतीक्षाच्या डोळ्यांत निराशा उतरली. बाहेर येताना ती वकिलांना म्हणाली,

 

“ते तारखेवर का नाही आले?” देशपांडे शांतपणे म्हणाले,

 

“ लोक जाणूनबुजून केस लांबवतात.” वकिलांनी सांगितले.

 

हे असे डावपेच सुद्धा असतात हे प्रतीक्षासाठी नवीन होते. लोक कायद्याला एवढे भीत नाहीत ह्याचे तिला आश्चर्य वाटले.

 

इकडे गावात आता नवी चर्चा सुरू झाली.

 

“प्रतीक्षा कोर्टात गेली म्हणे.”

 

“बाईने नवऱ्यावर केस टाकावी का?”

 

“आता काय होईल तिचं…किती वर्षे चालेल केस काय माहीत?”

 

काही जणींना तिची दया वाटत होती. तर काहींना तिच्या आयुष्याची झालेली फरफट पाहताना मजा येत होती. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात तसेच. प्रतीक्षा बाजारात गेली की लोक तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे.

 

एक दिवस शेजारच्या काकूंनी थेट विचारलं,

 

“काय मिळणार तुला कोर्टात जाऊन?”

 

“माझा हक्क.” प्रतीक्षा शांतपणे म्हणाली,

 

“पुरुष परत येत नाहीत गं कोर्टाने. ना तुटलेले संसार पुन्हा जुळवता येतात. तू हे सगळं सोडून दे. त्याला जाऊदे त्याच्या रस्त्याने आणि तू सुद्धा दुसरं लग्न कर.” काकू म्हणाल्या.

 

त्या शब्दांनी तिचं मन पुन्हा जखमी झालं. पहिल्या लग्नाच्या जखमा अजूनही ताज्या असताना दुसऱ्या लग्नाबद्दल लोक कसे बोलू शकतात. लग्न करणं एवढं महत्त्वाचं आहे का आयुष्यात. जर मनापासून प्रेम केल्यावर इतकं दुःख मिळत असेल तर कशाला पुन्हा ते प्रेमात पडणं आणि लग्न करणं. आणि एवढा मोठा अन्याय सहज सहजी कसा विसरू शकतो कुणी. त्या रात्री ती बराच वेळ रडत बसली. तिला रडताना तिच्या आईने पाहिले तेव्हा आई तिच्याजवळ गेली. आईला पाहून ती म्हणाली.

 

“आई… मी चुकीचं करतेय का आई?”

 

“नाही.” शालिनीबाई तिच्या शेजारी बसत म्हणाल्या.

 

“पण सगळे मला दोष देतात.” प्रतीक्षा ने विचारले.

 

“कारण समाजाला नेहमी बाईच चुकीची वाटते. पुरुषाने दुसरे लग्न केले तरीही समाज हे बघतो की बाईला तिचा संसार सांभाळता आला नसेल. त्यांना पुरुषांचा दोष दिसत नाही. मुळात त्यांना तो पाहायचा नसतो. पुरुष तर बाईला समजून घेणं कठीणच आहे पण बायका सुद्धा बाईलाच दोष देतात ”

 

प्रतीक्षा आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडत राहिली.

“मला अजूनही तो आठवतो आई…मला त्याच्या सोबत घालवलेले क्षण आठवतात. सतत असं वाटतं की तो असे का वागला माझ्यासोबत…” ती म्हणाली.

हे ऐकून शालिनीबाईंच्या डोळ्यांतही पाणी आलं. कारण त्या जाणत होत्या. प्रेम इतक्या सहज विसरता येत नाही. अन्याय विसरणे तर त्याहूनही कठीण. त्या बराच वेळ काहीही न बोलता तिच्या केसांवरून हात फिरवत राहिल्या.

 

दुसऱ्या तारखेला अभिजीत कोर्टात आला. त्याला पाहून प्रतीक्षाचं हृदय जोरात धडधडू लागलं. कितीतरी दिवसांनी ती त्याला पाहत होती.

तो नेहमीसारखाच नीटनेटका दिसत होता. जणू काहीच घडलं नव्हतं.

क्षणभर त्याची नजर तिच्यावर पडली. पण लगेच त्याने नजर फिरवली.

 

त्या एका क्षणाने प्रतीक्षाच्या डोळ्यांत अश्रू आले. तिला आठवलं की

कधी हा माणूस तिच्या डोळ्यांत प्रेमाने पाहायचा. आज तो तिला ओळख सुद्धा दाखवत नव्हता.

 

कोर्टात अभिजीतचा वकील उभा राहिला आणि एकदम सहज म्हणाला की माझ्या क्लायंटने दुसरं लग्न केलेलं नाही. एवढं धाधांत खोटं ऐकून प्रतीक्षाला धक्काच बसला..

 

अभिजीतचा वकील पुढे म्हणाला, “जिचा उल्लेख केला जातोय ती फक्त ह्यांची दूरची नातेवाईक आहे आणि काही कारणास्तव ह्यांच्या घरी राहत आहे.”

प्रतीक्षाला रागाने आणि वेदनेने थरथरायला झालं. तिला आठवलं.

ती खिडकीत उभी असलेली मुलगी. गळ्यातलं मंगळसूत्र. त्या घरातला तिचा हक्क. सगळं तिच्या डोळ्यांसमोर होतं. पण तिच्याकडे सबळ पुरावा नव्हता. वकील तिला शांत राहायला सांगत होते

 

कोर्ट संपल्यावर प्रतीक्षा बाहेर उभी होती. अभिजीत तिच्या जवळून जात होता. तिने हिम्मत करून आवाज दिला.

 

“अभिजीत…”

 

तो थांबला.

काही क्षण दोघे शांत उभे राहिले.

प्रतीक्षाच्या डोळ्यांत पाणी होतं.

“तुम्ही खरंच दुसरं लग्न केलं नाही का? कोर्टात खोटंकशाला बोललात”

 

तो तिच्याकडे न बघताच म्हणाला,

“मग तू सिद्ध कर की मी दुसर लग्न केलं म्हणून.”

 

“मी अजूनही तुमची बायको आहे…माझ्याशी एवढं खोटं बोलताना काहीच वाटत नाही का तुम्हाला ? ” प्रतीक्षा रागाने म्हणाली.

 

हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड उमटली.

“हे नाटक बंद कर. माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे कोर्टकचेऱ्या करायला. मुकाट्याने घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर आणि संपव हे सगळे. लाख दोन लाख घे हवं तर”

 

“नाटक?”प्रतीक्षा थरथरली.

 

“तू जितकं लवकर हे संपवशील तितकं बरं राहील तुझ्यासाठी सुद्धा.”

 

“माझं आयुष्य बरबाद केलं तुम्ही आणि मलाच उलट सांगताय…”

 

हे ऐकून क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटले. पण लगेच तो कठोर झाला.

 

“मी जातोय. मला तुझी बडबड ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही.”

 

एवढे बोलून तो निघून गेला. प्रतीक्षा त्याच्याकडे पाहत राहिली. तिला खूप हतबल झाल्यासारखे वाटत होते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

 

केस पुढे जात होती. पण त्यासाठी पैसे लागत होते. गणपत काका जास्त काम करू लागले. शालिनीबाईंचे हात सतत कामाने दुखायचे.

एक दिवस प्रतीक्षाने पाहिलं. आईने तिच्या लग्नातली सोन्याची बांगडी विकायला काढली होती. त्या केससाठी स्वतःचे दागिने विकत होत्या. त्या रात्री ती खूप रडली. माझ्यामुळे सगळे त्रास भोगतायत असे तिला वाटून गेले.

 

दिवस जात होते. एकीकडे ती न्यायासाठी लढत होती. दुसरीकडे तिच्या मनात अजूनही अभिजीतच्या आठवणी होत्या. कधी ती स्वतःवरच रागवायची. ज्याने इतकं दुखावलं त्याच्यावर अजून प्रेम का वाटतं म्हणून.

पण प्रेम तर्क ऐकत नाही. ते जखमी होतं. तुटतं. पण सहज संपत नाही.

 

एक दिवस कोर्टातून परतताना तिने अचानक अभिजीतला पाहिलं. तो एका लहान दुकानासमोर उभा होता. त्याच्या शेजारी तीच मुलगी होती. त्याची दुसरी बायको—मनाली.

 

ती हसत काहीतरी बोलत होती. अभिजीत तिच्याकडे पाहून हलकंसं हसला. ते दृश्य

पाहून प्रतीक्षाच्या छातीत कळ उठली. कारण ते हसू कधीकाळी फक्त तिच्यासाठी असायचं. तिच्या काळजावर अजून किती घाव होणार होते हे तिलासुद्धा माहीत नव्हते.

क्रमशः

हक्काची सावली – भाग ५ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

 

Leave a Comment