आयुष्य म्हणजे दुःखाचाच डोंगर नाही, तर कधीकधी अंधाऱ्या वाटेवरही अचानक एक आशेचा कंदील प्रज्वलित होतो आणि संपूर्ण मार्ग उजळून निघतो. कावेरीच्या आयुष्यातही असाच एक सुवर्णक्षण हळुवारपणे अवतरला.
रणजितच्या आयुष्यात जितके काळे डाग होते, जितकी व्यसनांची गर्दी होती, ती सगळी सरहद ओलांडून जेव्हा त्याला समजले की कावेरी आई होणार आहे, तेव्हा त्याच्यात एक चमत्कारिक बदल घडायला सुरुवात झाली. ज्या माणसाने कधीही कशाचीही पर्वा केली नव्हती, ज्याच्या डोळ्यांत कायम मद्याची नशा आणि बेपर्वा भावसाय असायचा, त्याच रणजितच्या मनात एका नवीन जीवाची चाहूल लागताच एक अनामिक भीती आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.
त्याला सतत काळजी वाटू लागली—
“माझ्यासारख्या व्यसनी माणसाच्या पोटी येणारे मूल कसे असेल? आपण आपल्याच बाळाचे भविष्य अंधारात तर टाकत नाही ना?”
हळूहळू रणजितने दारूच्या बाटल्यांपासून स्वतःला दूर करायला सुरुवात केली. सुरुवातीला हे व्यसन सोडवणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. अंगाची लाही लाही होणे, रात्री झोप न लागणे अशा अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांतून तो गेला. पण कावेरीने अशा बिकट प्रसंगीही एक खऱ्या पत्नीचे कर्तव्य बजावत त्याची साथ सोडली नाही. तिने अतोनात संयम बाळगून, प्रेमाने आणि निग्रहाने रणजितला सांभाळले. त्याच्या पाठीवर प्रेमाचा हात ठेवत ती सतत त्याला धीर देत राहिली.
कावेरीच्या या निस्सीम प्रेमाने आणि समर्पणाने रणजितच्या अंतःकरणाचा ठाव घेतला.
त्याला खऱ्या अर्थाने जाणीव झाली की, ही स्त्री आपल्या आयुष्यासाठी किती मोलाची आहे. आणि अशा प्रकारे, ज्या व्यसनाने त्याच्या आयुष्याची राख केली होती, ते व्यसन रणजितने हळूहळू पूर्णपणे सोडले. त्याच्या चेहऱ्यावर आता एक शांतता आणि कुटुंबाची काळजी दिसू लागली होती. रणजितला असा बदललेला पाहून कावेरीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. तिला वाटले की, आपल्या दीर्घकालीन वेदना आणि यातना कुठेतरी सत्कारणी लागल्या आहेत.
आणि मग तो दिवस उजाडला, ज्याने देशपांडे वाड्यातील आणि रणजितच्या घरातील वातावरणच बदलून टाकले.
घरात एका चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले. गोड, टपोऱ्या डोळ्यांची, फुलासारखी कोमल मुलगी जन्माला आली. तिच्या येण्याने त्या भव्य पण सुनसान वाड्यात जणू चैतन्याचे वारे वाहू लागले. तिचे नाव ठेवण्यात आले— ‘आनंदी’.
आनंदीच्या आगमनाने रणजितचे जगच बदलले. ज्या माणसाने कधी कोणाचा सांभाळ केला नव्हता, तो माणूस आता आपल्या लेकीच्या एका हसण्यावर स्वतःचे सर्वस्व ओवाळून टाकण्यासाठी तयार झाला होता. कामावरून घरी येताना आनंदीसाठी रोज नवीन खेळणी, सुंदर कपडे आणि खाऊ आणणे हा रणजितचा नित्यक्रम बनला होता. संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतताच, “माझी पोर कुठे आहे?” असे विचारत तो थेट आनंदीला उचलून घ्यायचा आणि तासनतास तिच्यासोबत खेळत बसायचा.
आनंदी सुद्धा बाबांच्या पाठीवर घोडा करून बसायची आणि आपल्या बोबड्या बोलांनी संपुर्ण घर डोक्यावर घ्यायची. रणजित तिला कुठे ठेवू आणि कुठे नको, असे झाले होते. तिचे एकही अश्रू त्याच्या डोळ्यात पाहवयाचे नव्हते.
दुसरीकडे, कावेरीच्या आयुष्यातही एक वेगळीच उमेद निर्माण झाली होती. जिथे एकेकाळी केवळ हुंदके आणि अश्रू होते, तिथे आता आनंदीच्या किलबिलाटाने आणि रणजितच्या प्रेमाने हसरे विश्व उभे केले होते. रणजित आता पूर्णपणे बदलला होता. तो एक आदर्श पती आणि एक अत्यंत प्रेमळ पिता बनला होता. तो कावेरीच्या भूतकाळातील प्रत्येक दुःखाची भरपाई करण्याचा अहोरात्र प्रयत्न करत होता.
कधीकाळी माहेरच्या नात्याने नाकारलेली आणि संसारात उपेक्षित राहिलेली कावेरी आज एका खऱ्या अर्थाने राणीसारखी जगत होती. पतीचे प्रेम आणि लेकीचे बोबडे बोल याच्या जोरावर तिने आपल्या आयुष्यातील सारे जुने घाव विसरण्यास सुरुवात केली होती. तिला वाटू लागले होते की, देवाचे आपल्यावर उशिरा का होईना, पण प्रचंड मोठे आशीर्वाद वर्षाव होत आहेत.
पण म्हणतात ना, माणसाच्या सुखाला दृष्ट लागण्यास वेळ लागत नाही. नियतीच्या पटलावर अजून काही मोठी आव्हाने आणि परीक्षा बाकी होत्या. आनंदी जेव्हा अवघ्या साडेतीन वर्षांची झाली, तेव्हा त्यांच्या सुखाच्या संसारात एक अकल्पनीय आणि भयानक दुःखाचे वादळ उठले…
क्रमशः.
पुढील भाग इथे वाचा 👇