तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग २ (अंतिम भाग) प्रेरणादायी मराठी कथा

वसुधाने शर्वरी समोर हसून बोलत होती पण मन मात्र कुठेतरी तुटत होतं. कशीबशी मुलीच्या आधाराने ती साखरपुड्याच्या हॉलमध्ये पोहोचली. एका कोपऱ्यातील खुर्चीवर बसली. एकामागून एक पाहुणे येत होते. सुनीता प्रत्येकाची ओळख करून देत होती. पण वसुधाकडे तिने एकदाही बोट दाखवलं नाही.

 

ज्या स्त्रीने चार दिवस घर उभं केलं. तिची ओळख करून देण्याइतकंही महत्त्व तिला राहिलं नव्हतं. काही वेळाने दोन बायका विचारत होत्या.

 

“ही कोण?”

 

सुनीता सहज म्हणाली…

“माझी वहिनी आहे. सानिकाची मामी.”

 

” अच्छा, ही आहे का सानिकाची मामी. मी ऐकले आहे यांच्याबद्दल. तुमच्या घरातल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये छान व्यवस्था करतात ह्या सगळ्यांचीच.” त्या म्हणाल्या.

 

” कुठे काय हो. आणि आजकाल जरा पैसे दिले की काम करणारे मिळतातच. त्यात काय एवढं.” सुनीता म्हणाली.

 

वसुधाच्या डोळ्यांत पाणी आलं. आज तिला समजलं होतं. आपल्यावर प्रेम नव्हतं. आपल्या कामावर प्रेम होतं. कार्यक्रम संपताच सुनीताने भावाला सांगितलं.

 

“शरद, वसुधाला घरी घेऊन जा. इथे तिला आराम मिळणार नाही.”

 

8 दिवसांसाठी बोलावलेल्या वसुधाला चार दिवसात परत न्यायला का सांगत आहेत हे शरदला सुद्धा कळले होते. त्याला वाईट वाटत होते पण तो मोठ्या बहिणीला काही म्हणून सुद्धा शकत नव्हता.

 

कार्यक्रम संपल्यावर तो वसुधा घरी घेऊन गेला. आठ दहा दिवसात वसुधा जरा बरं वाटायला लागलं. तोवर सुनीताने तिला फोन सुद्धा केला नव्हता. शर्वरीने तिची शाळा सांभाळून आणि शरद ने त्याचे ऑफिस सांभाळून घरची जबाबदारी सांभाळली होती. आजवर आपण इतक्या सगळ्यांसाठी राबलो पण आपल्याला गरज असताना कुणी साधं विचारत सुद्धा नाही आहे ह्या जाणिवेने वसुधा अस्वस्थ साडी होती. पंधरा वीस दिवसात वसुधा अगदी पूर्वीप्रमाणे बरी झाली.

 

ती बरी झाल्याच्या ऐकल्यावर एक दिवस पुन्हा नणंद सुनीताचा फोन आला.

 

“वसुधा, लग्नाची तारीख ठरली आहे. यावेळी आठ दिवस आधी येशील बरं.”

 

“हो बघते.” वसुधा म्हणाली.

 

पण ती आठ दिवस आधी न जाता लग्नाच्या फक्त एक दिवस आधी पोहोचली.

नणंदबाई थोडी नाराज होती. तिला म्हणाली.

” काय ग वसुधा…तुला आठ दिवस आधी यायला सांगितलं होतं ना…माझी कितीतरी कामं बाकी होती..”

 

” कामांचं काय आहे ताई. जरा पैसे दिले की मिळतातच काम करणारे.” वसुधा म्हणाली.

 

आता मात्र नणंदाबाईच्या थोडे लक्षात आले की मागच्या वेळचे बोलणे हिच्या अजूनही लक्षात आहे म्हणून. मग विषय मोडत सुनीता म्हणाली.

 

” ते जाऊदे. आता आली आहेस तर स्वयंपाकघर सांभाळ.”

 

“ताई… माझ्याच्याने नाही होणार. मला हल्ली जरा थकायला होतं. आणि कामात सुद्धा जरा वेंधळी आहे मी” वसुधा शांतपणे म्हणाली.

 

क्षणभर सुनीता गप्प झाली. तिला साखरपुड्याच्या दिवशीचे स्वतःचे शब्द आठवले. तिने विषय बदलला.

दुसऱ्या दिवशी लग्न होते. तेव्हा सकाळीच सुनीता वसुधा जवळ आली आणि म्हणाली.

 

“चल वसुधा, लवकर आटप, आणि आलेल्या बायकांना छान तयार करून दे. मी सगळ्यांना सांगितले आहे की पार्लर ला नका जाऊ. वसुधा या कामात तरबेज आहे म्हणून.”

 

“मी स्वतःच पार्लरला जातेय ताई. आज माझा मूड नाही आहे स्वतः तयार व्हायचा आणि बाकीच्यांना तयार करण्याचा.”

असे म्हणत सुनीताच्या उत्तराची वाट न पाहता वसुधा पार्लर ला तयार व्हायला गेली सुद्धा. सुनीता नुसती तिच्याकडे बघत उभी राहिली.

 

त्यानंतर लग्नात वसुधा खूप सुंदर दिसत होती. हा पहिलाच कार्यक्रम होता ज्यात ती कामात व्यस्त न राहता छान तयार होऊन बाकीच्या बायकांशी छान बोलत कार्यक्रम एन्जॉय करत होती. तिला पाहून आज सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. सुनीताला सुद्धा कळले होते की आपण दिलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे वसुधा अशी वागत आहे.

 

त्या दिवशी लग्न संपल्यानंतर सुनीता शांतपणे वसुधाजवळ आली.

तिच्या डोळ्यांत अश्रू होते.

 

“वसुधा… मला माफ कर.”

 

वसुधा काही बोलली नाही.

 

सुनीता पुढे म्हणाली…

“तू पडल्यावर मला तुझ्या वेदनांची काळजी नव्हती. मला फक्त कामाचं टेन्शन होतं. तू आयुष्यभर आमच्यासाठी राबली, पण मी तुझी किंमत फक्त कामापुरतीच केली.”

 

“ताई… मला दुखापत कमरेला झाली होती. पण त्या वेदनेपेक्षा पण जास्त वेदना माझ्या मनाला झाली होती.” म्हणाली.

 

सुनीताचे अश्रू वाहू लागले.

 

“मी तुला वेंधळी म्हटलं. पाहुण्यांसमोर ओळख करून दिली नाही. वेळेवर चहाही दिला नाही. आज त्या प्रत्येक गोष्टीची लाज वाटते.”

 

“चूक प्रत्येकाकडून होते. पण ती मान्य करणारे फार कमी असतात. निदान तुम्हाला तुमची चूक लक्षात आली आणि तुम्ही माफी मागितली तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.” वसुधाने नणंदेचा हात हातात घेत म्हटले.

 

तिने असे म्हटल्यावर सुनीताच्या मनावरचा भार जरा कमी झाला. त्या दिवसानंतर सुनीताने कधीही वसुधाकडून अपेक्षेपोटी काम करून घेतलं नाही.आणि वसुधानेही एक महत्त्वाचा धडा शिकला. दुसऱ्यांसाठी जगणं चांगलं. पण स्वतःची किंमत विसरून नाही.

 

समाप्त.

ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच काही हृदयस्पर्शी कथा इथे वाचा 👇

अहंकार

वेळीच नाही म्हणायला शीक – भाग १

स्वीकार – भाग २ (अंतिम भाग)

 

आरती निलेश खरबडकर.

Leave a Comment