तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग १ (प्रेरणादायी मराठी कथा)

वसुधा म्हणजे तिच्या सासरच्या घराचा आधारस्तंभच होती. कुठलाही कार्यक्रम असो, लग्न असो, बारसं असो, वाढदिवस असो किंवा कुणी आजारी असो. सर्वांच्या तोंडी एकच नाव असायचं. ते म्हणजे वसुधा.

वसुधा देखील कधी नाही म्हणायची नाही. स्वतःच्या संसाराकडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण दुसऱ्यांचं काम राहायला नको, असा तिचा स्वभाव होता.

 

“अगं, सगळ्यांची जबाबदारी तूच का घेतेस?” तिचा नवरा शरद कित्येकदा म्हणायचा.

 

“माझ्यामुळे जर चार लोकांचं काम होत असेल, तर त्यात काय वाईट आहे?” ती त्याला म्हणायची.

 

सगळे तिचं कौतुक करायचे आणि तेवढंच तिच्यासाठी पुरेसं असायचं. पण शरदला तिचा हा स्वभाव आवडायचा नाही. त्याला सतत वाटायचं की हिची स्तुती करून हिचा फायदा करून घेतात सगळे नातेवाईक.

 

यावेळी तिच्या नणंद सुनीताच्या मुलीचा साखरपुडा होता.

 

“वसुधा, चार दिवस आधी ये बरं का. तुझ्याशिवाय काहीच होणार नाही. सानिका पण म्हणतेय की मामी लवकर यायला पाहिजे. सानिकाची लाडाची मामी आहेस ना तू.” नणंदबाई म्हणाल्या.

 

नणंदेने प्रेमाने फोन केला आणि वसुधा खरोखरच साखरपुड्याच्या चार दिवस आधी बॅग भरून निघाली.

 

सकाळी सहापासून रात्री बारा वाजेपर्यंत ती सतत धावत होती.

फुलांची ऑर्डर, पाहुण्यांची व्यवस्था, मेन्यू, रांगोळी, साड्या, दागिने, स्वयंपाकघर. सगळीकडे वसुधाच लक्ष देत होती.

 

लोक म्हणत होते…

“सुनीता, तुला वसुधा सारखी भावजय आहे म्हणून तू खूप नशीबवान आहेस बघ.”

 

सुनीता सुद्धा हसून होकार देत होती. पण त्या हसण्यात कृतज्ञतेपेक्षा स्वतःचा फायदा झाल्याचा आनंद जास्त होता. वसुधा मात्र मनापासून काम करत होती. तिला कल्पनाही नव्हती की पुढच्याच दिवशी एक छोटासा अपघात तिच्या आयुष्याचा आणि नात्यांचा चेहरामोहरा बदलून टाकणार होता.

 

साखरपुड्याच्या आदल्या दिवशी सकाळी वसुधा बाथरूममध्ये गेली. जमिनीवर पाणी साचलं होतं. क्षणात तिचा पाय घसरला. धाडकन ती खाली पडली. तिचा आवाज ऐकून घरातील सगळे धावत आले.

तिला लगेच डॉक्टरांकडे नेलं. सुदैवाने फ्रॅक्चर नव्हतं. पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं.

 

“पूर्ण आराम करा. जास्तवेळ उभं राहायचं नाही.”

 

हे ऐकताच उद्याचा कार्यक्रम कसा पार पडेल, सगळं कसं जमेल ह्याचं वसुधाला टेंशन आलेलं. पण तिच्या तब्येतीपेक्षा जास्त काळजी सुनीताला दुसऱ्याच गोष्टीची वाटत होती.

 

“आता एवढी कामं कोण करणार?”

 

तिने नवऱ्याला कुजबुजत सांगितलं. हिच्या वेंधळेपणाने सगळी कामे खोळंबतील आता. उगाच कामासाठी एखादी बाई सांगावी लागेल. उगाच तिला पैसे द्यावे लागणार.

 

संध्याकाळी ती सगळ्यांसमोर म्हणाली. सुद्धा की वसुधा तू बघून चालायला हवं होतंस. उगाच कामांचा खोळंबा झाला आणि खर्च सुद्धा वाढला.”

वसुधाने ते ऐकलं तेव्हा तिच्या मनाला पहिल्यांदाच जाणीव झाली की तिच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं नणंद बाईला कामं आटोपणं महत्त्वाचं वाटत होतं.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी तर तिला कोणी चहाही विचारला नाही. ती वेदनांनी कण्हत बेडवर पडून होती. बाहेर मात्र कार्यक्रमाच्या तयारीची लगबग सुरू होती. जिला कालपर्यंत सगळे “वसुधा… वसुधा…” म्हणत होते. आज तिच्या खोलीकडे कोणी फिरकलंही नाही.

 

थोड्या वेळाने तिचा नवरा शरद आणि मुलगी शर्वरी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आले तेव्हा शर्वरीने तिला चहा नाश्ता नेऊन दिला. आपल्या आईला अजून चहा नाश्ता विचारला नाही ह्याचा खरंतर शर्वरीला राग आला होता.

क्रमशः

पुढील भाग इथे वाचा 👇

तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग २ (अंतिम भाग) प्रेरणादायी मराठी कथा

Leave a Comment