नकुल नंदिनीला घ्यायला तिच्या कॉलेजसमोर आला. त्याने नंदिनीला कॉल करून आपण आल्याचे कळवले. नंदिनी तशीच धावत गेट जवळ गेली. तिने त्याला पाहिले. कधी नव्हे ते आज त्याला पाहून तिच्या काळजात काहीतरी झाले. काय ते तिला कळत नव्हते पण आज त्याला पाहून जे वाटले ते आधी वाटले नव्हते.
फॉर्मल कपड्यात तो अगदीच रुबाबदार दिसत होता. आपण त्याला एकटक पाहतोय हे तिच्या लक्षात आले आणि ती एकदमच वरमली. त्याला मात्र प्रश्न पडला की ही अशी काय बघतेय आपल्याकडे. तेव्हा मग तोच तिला म्हणाला.
” काय झाले… चल ना…”
“हो…” स्वतःच्या डोक्यावर टपली मारत ती त्याच्या गाडीवर येऊन बसली.
गाडी रस्त्याने निघाली. नेमकं काय बोलावं ते आता दोघांनाही कळत नव्हते. पण मघाशी नकुलला जो राग आला होता तो आता कुठल्या कुठे पळून गेला होता. मग तोच तिला म्हणाला.
“काय गं… सकाळी तर यायला तयार नव्हतीस ना माझ्याबरोबर…”
“यायला तयार नव्हते असे नाही… पण मला वाटलं की तुम्हाला आवडणार की नाही… आधीच माझ्यावर रागावलेले असता तुम्ही…” नंदिनी म्हणाली.
“कधी रागावलो जरा कळेल का…?” नकुलने विचारले.
“आज सकाळीच तर रागावला होतात…” नंदिनी म्हणाली.
“ते जरा असेच…” बोलताना नकुलची जरा भंबेरी उडाली होती. मग तोच पुढे म्हणाला.
” ते जाऊ दे… मला सांग आजचा दिवस कसा गेला तुझा कॉलेजमध्ये…?” नकुल ने विचारले.
“बऱ्यापैकी होता… म्हणजे जे कुणी भेटले त्यांनी खूप कौतुक केले… एक दोन मैत्रिणी भेटल्या… नवीन पुस्तकांची खरेदी झाली…” नंदिनी सांगत होती.
“माझा पण आजचा दिवस बरा गेला…” नकुल म्हणाला.
“अच्छा…तो कसा…” नंदिनी ने विचारले.
“सकाळी थोडा राग आला होता मला पण आता छान वाटत आहे…” नकुल म्हणाला.
त्याच्या बोलण्याचा थोडाफार अर्थ कळल्याने नंदिनी स्वतःशीच हसली.
“आज माझी मैत्रीण मला भेटली होती… मला कॉलेजला आलेलं पाहून तिला फार आश्चर्य वाटलं… मला म्हणाली की लग्न झाल्यावर मुलींना कॉलेज मध्ये यायला मिळत नाही सहसा… मग मी पण सांगितलं की आमच्या घरी शिक्षणाला खूप महत्त्व आहे…”
“अच्छा… काय म्हणाली मग मैत्रीण…?” नकुल ने विचारले.
“ती खूपच कौतुक करत होती आत्या आणि मामंजीचे…” नंदिनीने सांगितले.
“आहेच मग माझी आई कौतुकास पात्र… ती खूप ग्रेट आहे…” नकुल म्हणाला.
“हो ना… मला अगदी मुलीप्रमाणे सांभाळते… खूप छान आहे आत्या…अगदी माझ्या आईसारखी… माझं कौतुक करते… चुकलं की सांभाळून घेते… आज सुद्धा आत्यानेच मला समजावून सांगितले की सकाळी मी तुम्हाला असे बोलायला नको होते…” नंदीनीने भाबडेपणाने सगळे सांगून टाकले.
” म्हणजे तुला आईने सांगितले म्हणून तुला कळले की तुझे चुकले होते…” नकुलने विचारले.
“हो… आत्यानेच मला समजावून सांगितले की आता तुम्ही एकमेकांशी व्यवस्थित वागायला हवे… एकाच ठिकाणी जायचे असल्यास सोबत जायला हवे…” नंदिनी म्हणाली.
आता मात्र नकुलचा आनंद एकदमच विरला. त्याला वाटले होते की नंदिनीला त्याच्या सोबत घरी यायचे म्हणून तिने त्याला बोलावले. पण नंदिनीने आईच्या बोलण्यावरून आपल्याला घ्यायला बोलावले हे ऐकून त्याचा पार मूड गेला. तो पुढे काहीच बोलला नाही.
थोड्याच वेळात ते दोघेही घरी पोहचले आणि नकुल आल्या आल्याच त्याच्या रूममध्ये निघून गेला. आज दोघांनाही एकत्र घरी आलेलं पाहून आत्याला सुद्धा बरे वाटले. आत्याने दोघांसाठीही चहा केला आणि नंदिनीला चहा देत म्हणाली.
“हे घे… तुमच्या दोघांचा चहा आहे… तुझ्या रूम मध्ये जा आणि नकुल सोबतच चहा घे…”
नंदिनीने पुन्हा होकारार्थी मान डोलावली आणि चहा घेऊन आपल्या रूममध्ये आली. नकुलला पाहून म्हणाली.
“आत्याने तुमच्यासाठी चहा पाठवलाय…”
“ठेव तिथे…” तिच्याकडे न पाहताच नकुल म्हणाला.
नंदिनीने टेबल वर चहा ठेवला आणि एका खुर्चीवर बसून ती सुद्धा तिचा चहा प्यायला लागली. नकुल सुद्धा काहीच न बोलता चहा पीत होता. मनात मात्र पुन्हा तेच विचार सुरू होते.
नंदिनीला स्वतःहून आपल्याशी बोलावंसं वाटत नसेल का ह्या प्रश्नाचे उत्तर काही केल्या त्याला मिळत नव्हते. आज आपण किती आनंदात होतो की नंदिनीने स्वतःहून बोलावलंय. पण तिने हे सगळं आईच्या सांगण्यावरून केलं. तिला स्वतःला का नाही जाणीव होत की प्रेमाची.
मी तिच्या प्रेमात पडलोय आणि तिला जराही या गोष्टीची जाणीव नसावी कसली परीक्षा आहे माझ्या प्रेमाची. बायको म्हणून तिच्यावर हक्क तर मिळालाय मला. पण मला हा हक्क असा नकोय. मला तिचं प्रेम हवंय. तिने माझा मनापासून स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे.
ती पूर्ण समर्पणाने माझी व्हायला हवी तेव्हाच कुठे माझ्या प्रेमाला अर्थ आहे. असे एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते. या सगळ्यांपासून अनभिज्ञ नंदिनी मात्र आरामात खिडकीतून बाहेर बघत चहा पीत होती.
तिकडे सुजाताच्या आयुष्याची मात्र कसरत सुरू होती. एकीकडे सासरची मंडळी तिच्याकडून एखाद्या मोलकरणी प्रमाणे काम करून घ्यायचे. आणि दुसरीकडे रवी तिला फक्त भोगाची वस्तू समजायचा. हे लोक मोठे फक्त पैशांनी होते. मनाची श्रीमंती ह्यांच्याजवळ कुठेच नव्हती.
आता रवीची तब्येत हळूहळू खराब होत होती. आणि एके दिवशी तो घरातच चालताना चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि सांगितले की सततच्या दारू पिण्याने त्याच्या शरीरातील अवयवांना हळूहळू काम करणे बंद केले आहे.
आता त्याच्या वाचण्याच्या शक्यता अगदी नाहीच्या बरोबर आहेत. पण तरीही महिना दोन महिना तरी जगेल. तरीही रवीच्या घरच्यांनी त्याला चार पाच हॉस्पिटल मध्ये दाखवले. सगळ्यांनी एकच उत्तर दिले की आता काही नाही होऊ शकत. डॉक्टरांनीच हात टेकले म्हटल्यावर मग रवीला घरी आणले.
आता जितके दिवस जगेल तितके दिवस घरीच ठेवू म्हणून मग घरातच त्याच्या खोलीत त्याची व्यवस्था करण्यात आली. आपली शेवटची वेळ येऊन ठेपली आहे हे त्याला सुद्धा कळून चुकले होते. ह्या सगळ्या प्रकारानंतर मात्र सुजाताचा होणार छळ सुद्धा वाढला होता.
आता तर येताजाता त्याच्या आजाराचे खापर तिच्यावर फोडल्या जाऊ लागले. पांढऱ्या पायाची अपशकुनी म्हणून तिला हिणवल्या जाऊ लागले. तिच्या माहेरचे लोक रवीला भेटायला आले तेव्हा त्यांना त्याच्या आजाराची गंभीरता कळून आली.
सुजाताच्या सासरी तिच्या आई वडिलांचा खूप अपमान झाला. त्याचे पहिले लग्न का तुटले आणि आपण एवढे गरीब असूनही ह्यांनी आपल्याशी का सोयरिक केली हे त्यांना कळून चुकले होते. पण आता काही फायदा नव्हता. सुजाताला आहे त्या परिस्थीतीत जगायला सांगून ते लोक त्यांच्या घरी निघून सुद्धा गेले होते.
सुजाता आज खूपच जास्त थकल्यासारखी वाटत होती. आजकाल तिलाही बरं वाटत नव्हतं. तिच्या सासरची मंडळी मात्र रवीच्या आजारपणाचा बदला तिच्याकडून घ्यायच्या नादात स्वतःच्या मुलाबद्दलच्या संवेदना सुद्धा हरवून बसले होते.
जितका वेळ ते सुजाताला त्रास देण्यात आणि कटू बोलण्यात घालवायचे तितका वेळ जात त्यांनी रवीला दिला असता तर थोडेफार का होईना त्यालाही बरे वाटले असते. पण त्यांना काहीच कळत नव्हते. आमच्या मुलाला सुख देईल असे वाटले होते पण हिने मात्र त्याला आजारी करून टाकले हे तिच्या सासुबाई मोठ्या आवाजात त्याला भेटायला आलेल्या एका नातेवाईकाला सांगत होत्या.
सकाळपासून काम करून थकलेली सुजाता आताच जेवायला ताटावर बसलेली होती. तसे तिचीही तब्येत बरी नसल्याने तिलाही जेवण गोड लागत नव्हते. पण पोटात भुकेचा डोंब उसळला होता. इतक्यात तिच्या सासूबाई नाकाला पदर लावत तिथे आल्या आणि तिला म्हणाल्या.
” अगं ए… नुसतं गिळत बसायचं काम करणार आहेस का… जा… त्याने अंथरूण घाण केलंय ते साफ करून ये…”
सुजाता तशीच जेवणाच्या ताटावरून उठली. हात धुतले आणि लगेच त्याचे अंथरून साफ करायला गेली. रवी हतबल होऊन तिच्याकडे पाहत होता. तिला पाहून आज त्याच्या डोळ्यांत कारुण्याचे भाव दाटून येत होते. पण आता त्याच्या हातात काहीच नव्हते. वेळ त्याच्या हातून निसटत चालली होती.
रवीला सगळ्या गोष्टींची जाणीव होत होती. आपल्या आजारात फक्त सुजाता आपल्या सोबत दिवसरात्र असते आणि आपल्या घरचे मात्र आपल्याला तिच्या भरवशावर सोडून आपल्या आजाराचे खापर तिच्यावर फोडत आहेत हे तो पाहत होता.
पण ह्या सगळ्या जाणिवांना आता फार उशीर झाला होता. त्याला त्याच्या दारू पिण्याचा खूप पश्चात्ताप होत होता. सोबतच आपण सुजाताच्या आयुष्यासोबत खेळ केला ह्या गोष्टीने त्याचे मन त्याला खात होते. तिला जितक्या वेळा त्याने मारले होते, छळले होते ते क्षण आठवून त्याला स्वतःचीच किळस यायची.
त्याच्या डोळ्यात हा पश्चात्ताप सुजाताला सुद्धा दिसून यायचा. तशी तिला आता त्याच्याबद्दल कुठलीच तक्रार नव्हती. त्याच्या या अवस्थेत तक्रार तरी कशी करणार होती ती. शेवटी ती सुद्धा एक भारतीय स्त्री होती. कसाही असला तरी रवी तिचा नवरा होता.
तो जगावा, आपले सौभाग्य अबाधित राहावे असे शेवटच्या क्षणापर्यंत तिलाही वाटणारच होते. ती मनोभावे त्याची सेवा करत होती. पण तिच्या सेवेला फळ मिळाले नाही. निदान झाल्यापासून अवघ्या दीड महिन्यात रवी हे जग सोडून गेला. ऐन विशीत सुजाता विधवा झाली.
शालू आत्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा ती सुद्धा हादरली. सुजाताची अवस्था सगळ्यांनाच दिसून येत होती. ती खूप जास्त रडत होती. या जागी नंदिनीची कल्पना करूनच शालू आत्याच्या अंगावर काटा आला. अचानक लहानपणी पासून अंगाखांद्यावर खेळलेली नंदिनी आठवली.
नंदिनी आणि रवीचे लग्न झाले नाही म्हणून आत्याने नकळतपणे का होईना देवाचे आभार मानले. आपण खरंच किती मोठी चूक केली ह्याची जाणीव झाली. शालू आत्याने आपल्या आईला फोन करून त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. आपण खूप मोठी चूक केली हे सुद्धा त्यांनी सांगितले.
रवी आता हे जग सोडून गेलाय हे सुद्धा सांगितले. नंदिनीची आजी सुद्धा हे सगळे ऐकून एकदमच हादरली. आपली मुलगी शालू असे वागू शकते ह्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. शालूताईंनी ही बातमी उषाताईंना सुद्धा सांगितली आणि त्यांची माफी मागितली.
त्यांना आता त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होत होता. इकडे आजीने उषाताईंची माफी मागितली. आपण आयुष्यभर तुला बोल लावत राहिलो पण तू तुझ्या जागी योग्यच होती म्हणून आपल्या आजवर झालेल्या चुकांची कबुली सुद्धा दिली.
क्रमशः
सुजाता आता पुढे काय करेल…? तिच्या सासरचे तिला घरात ठेवून घेतील का…? माहेरचे तिला माघारी न्यायला तयार होतील का…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की ऐका.




