हक्काची सावली – भाग ६ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)

 

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. दुपारच्या उन्हाने जमिनीला चटके बसत होते. गावातल्या रस्त्यांवर धुळीचे लोट उडत होते. हवा गरम आणि कोरडी झाली होती. पण त्या उष्णतेपेक्षाही जास्त जळत होतं प्रतीक्षाचं मन. तिच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आता थकवणारी झाली होती.

 

कोर्ट. तारखा. लोकांचे प्रश्न. वहिनीचे टोमणे. पैशांची चिंता. आणि सगळ्यात जास्त—अभिजीतचं बदललेलं रूप. ती आता दिवसेंदिवस आतून रिकामी होत चालली होती.

 

घरी परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत चालली होती. पूजा वहिनीला आता प्रतीक्षाचा राग येऊ लागला होता. एक दिवस स्वयंपाकघरात भांडी घासत घासत ती मुद्दाम मोठ्याने म्हणाली,

 

“काही लोक दुसऱ्यांच्या घरात आयुष्यभर चैन करतात आणि दुसऱ्याचं जगणं कठीण करतात..”

 

” माझ्यासोबत जे झालं त्यात माझा काय दोष आहे…तुम्ही सतत मला का सुनावत असता…मी कधीतरी तुम्हाला काही त्रास दिला आहे का…मग तुम्ही माझा एवढा राग का करता…?” प्रतीक्षा ने अखेर तिला विचारलेच.

 

” नवऱ्याने टाकलेली नणंद नेहमीच नकोशी असते सगळ्यांना. त्यात तुमच्या तर कोर्ट कचेऱ्याच संपत नाहीत. मुकाट्याने दुसरं लग्न करून मोकळं व्हायच्या ऐवजी तुम्ही आमच्यावर आणखी भर टाकताय..” पूजा तीरसटपणे म्हणाली.

 

प्रतीक्षा नेहमीच गप्प ऐकून घ्यायची. पण मन मात्र रडायचं.आज सुद्धा या शब्दांनी तिचं मन जखमी झालं. ती आता सुद्धा पुढे काही न बोलता गप्प झाली.

 

रात्री रोहनने पूजाला समजावण्याचा प्रयत्न केला.

 

“ती माझी बहीण आहे. तिला असं काही बोलत नको जाऊस.”

 

“मग तिचं आयुष्यभर ओझं आपणच वाहायचं का?”पूजा चिडून म्हणाली,

 

रोहन पुढे काही बोलू शकला नाही. त्याला माहित होते की आपण काही बोललो पूजा आणखी बडबड करेन. पण तिने हे एवढ्या मोठ्याने म्हटले होते की बाहेरच्या खोलीत असलेल्या प्रतीक्षाने हे सगळं ऐकलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्या रात्री ती आरशासमोर उभी राहिली. तिला स्वतःचाच चेहरा ओळखू येत नव्हता. कधीकाळी हसणारे डोळे आता खोल गेले होते. केस विस्कटलेले. चेहऱ्यावर सततची चिंता. ती स्वतःशीच कुजबुजली—

 

“ही मी आहे?”

 

तिला आठवलं—एकेकाळी अभिजीत तिला म्हणायचा,

 

“तू हसतेस तेव्हा खूप सुंदर दिसतेस.”

आज ती शेवटचं कधी हसली होती हेही तिला आठवत नव्हतं.

 

तिच्या बाबांनी कोर्टात एक नवीन वकील बघितला होता. ऍडव्होकेट सावंत. एका तारखेला सावंतांनी तिला बाजूला बोलावलं.

 

“आज अभिजीतची बाजू जोरदार तयारीनिशी आलीये.”

हे ऐकून प्रतीक्षाचं मन दडपलं. कोर्टात अभिजीतचा वकील उभा राहिला.

 

“माझ्या क्लायंटवर खोटे आरोप करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांनी संसार करण्याचा चांगला प्रयत्न केला पण त्यांच्या बायकोने त्यांना योग्य ती साथ दिली नाही.”

 

हे ऐकताच प्रतीक्षाला राग आला.

“खोटं आहे हे…का खोटं बोलताय तुम्ही!”

ती ओरडली.

 

जजांनी पुन्हा तिला शांत राहायला सांगितलं. अभिजीत मात्र शांत बसला होता. एकदाही त्याने तिच्याकडे पाहिलं नाही. जणू ती अस्तित्वातच नव्हती. त्याचा वकील पुन्हा प्रतीक्षावरच खोटे आरोप करत होता. प्रतीक्षा हे सगळ ऐकून मनातून पुरती तुटली होती.

 

त्या दिवशी कोर्टाबाहेर अभिजीत सोबत मनाली सुद्धा आली होती. प्रतीक्षाची नजर तिच्यावर पडली. प्रतीक्षाने पहिल्यांदा मनालीला जवळून पाहिलं. ती सुंदर कपड्यांत होती. हातात महागडी पर्स. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणा नव्हता. फक्त अस्वस्थता होती.

 

क्षणभर दोघींची नजरानजर झाली. प्रतीक्षाच्या मनात हजार प्रश्न उठले.

“तिला अभिजीत विवाहित असल्याचं आधीच माहित असेल का?”

“तिने माझा संसार मोडला त्याचं तिला वाईट वाटत असेल का ?”

“की तीही फक्त एका खोट्याची शिकार होती?”

मनाली मात्र लगेच नजर वळवून निघून गेली. परत येताना बस मध्ये आईच्या खांद्यावर डोकं टेकवत ती म्हणाली.

 

“मी खूप थकलेय. मला आता जरा आराम हवाय.”

 

शालिनीताईंचे डोळे भरून आले. त्या दिवशी त्यांची मुलगी खरंच आतून मोडली होती. बस निघत होती. प्रतीक्षा खिडकीत बसली होती. तिने शेवटचं एकदा कोर्टाकडे पाहिलं. तिथे अभिजीत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं समाधान होतं. क्षणभर तिची आणि त्याची नजर भिडली. पूर्वी त्या नजरेत प्रेम असायचं. आज फक्त अंतर होतं. खूप मोठं.

आणि कायमचं.

 

 

इकडे सततच्या ताणामुळे गणपत काकांची तब्येत बिघडू लागली. त्यांना छातीत दुखायला लागलं. डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितलं.

पण आराम करायचा तर घर चालणार कसं? एक दिवस प्रतीक्षाने त्यांना खोकताना पाहिलं. तिचं काळीज तुटलं.

 

 

घरात आता स्पष्टपणे चर्चा सुरू झाली. एक दिवस रोहन तिला म्हणाला,

 

“ताई… किती दिवस चालणार हे? थांबव आता ही केस आणि हे सगळं.”

 

प्रतीक्षा शांत बसली. पूजा लगेच म्हणाली,

 

“लोक काय काय बोलतात माहितीये का? नवऱ्याचा पैसा हवाय म्हणून केस चालवते आहे म्हणतात. नाहीतर आता का नवरा नांदायला नेणार आहे का ?”

 

“पुरे करा तुम्ही. लोकांनी काहीही म्हटलं तरी तिच्या कुटुंबाने तिला समजून घ्यायला हवं ना. ती फक्त न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.”शालिनीबाई चिडून म्हणाल्या.

 

पण रोहनही हतबल झाला होता. एकीकडे नातेवाईक, गावातील लोक, मित्रमंडळी आणि दुसरीकडे त्याची बायको पूजा. दोन्हीकडून त्याला ऐकायला लागायचं. त्यामुळे तो सुद्धा आता कंटाळला होता.

 

“आई, आपण किती दिवस हे सहन करणार?”

 

प्रतीक्षाच्या डोळ्यांत पाणी आलं. तिला पहिल्यांदा जाणवलं—ती खरंच सगळ्यांवर ओझं बनली आहे.

 

 

क्रमशः

हक्काची सावली – भाग ७ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)

Leave a Comment