नचिकेतला सकाळी उठायला जरा उशीरच झाला. आज त्याचा वाढदिवस होता आणि रात्री येणाऱ्या शुभेच्छांच्या मेसेजेस ला रिप्लाय दिल्याने त्याला झोपेतून उठायला उशीर झाला होता. नंदिनी रोजप्रमाणे पहाटेच उठून तिच्या नेहमीच्या कामामध्ये व्यस्त होती.
नचिकेत पटापट फ्रेश होऊन किचन मध्ये आला. आणि नंदिनीला म्हणाला…
” गुड मॉर्निंग…”
” गुड मॉर्निंग…आज काय चक्क सकाळी सकाळी किचन मध्ये येऊन गुड मॉर्निंग…दिवस कुठून उगवला म्हणायचा आज साहेबांचा…” नंदिनी मिश्किल पणे म्हणाली.
” नाही…आज सहजच म्हटलं…काही विशेष नाही…” नचिकेत म्हणाला.
त्याला वाटले होते की नंदिनी ने सकाळी सकाळी त्याच्यासाठी काहीतरी सरप्राइज तयार केले असेल…कारण रात्री सुद्धा नंदिनी त्याला बर्थ डे विश न करता झोपी गेली होती…पण सकाळी सुद्धा नंदिनी ने विश केले नाही म्हणजे तिच्या लक्षात नसेल बहुधा…नाहीतर मागच्या वाढदिवसाला तिने नचिकेतला सर्वात आधी विश केले होते…आणि सकाळीच त्याला सरप्राइज गिफ्ट सुद्धा दिले होते…पण आज नंदिनी विसरली असेल असा विचार करून नचिकेत हिरमुसला.
” तुम्ही बसा…मी लगेच तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते…” नंदिनी म्हणाली.
नचिकेत मानेनेच हो म्हणाला. आणि नाश्त्याच्या टेबलवर जाऊन बसला. मोबाईलवर अनेक मित्र मैत्रिणी बर्थ डे विश करत होते पण नंदिनी आपला वाढदिवस विसरली असल्याने त्याला चुकल्यासारखे होत होते. नाश्ता करून नचिकेत ऑफिस ला जायची तयारी करू लागला. इतक्यात घराची बेल वाजली. नंदिनी दरवाजा उघडला असता बाहेर नचिकेतची बहिणी स्वाती हातात फुलांचा बुके घेऊन उभी होती. दरवाजा उघडताच ती वेगात आत शिरली आणि नचिकेत ला फुलांचा बुके देत म्हणाली.
” हॅपी बर्थडे दादा…”
” थँक यू सो मच स्वाती…तुझ्या लक्षात होतं आज माझा वाढदिवस आहे ते…” नचिकेत नंदिनीला उद्देशून म्हणाला.
” हा काय प्रश्न झाला का दादा…तुझा वाढदिवस कसा विसरणार मी…काय मग वहिनी…आज काय स्पेशल केलंस दादासाठी ” स्वाती म्हणाली.
” काही स्पेशल वगैरे नाही केलंय…सर्व काही रोजच्या प्रमाणेच आहे…” नंदिनी म्हणाली.
” पण का..?” स्वातीने विचारले.
” अग…मागच्या वर्षी मी ह्यांना रात्री बारा वाजता झोपेतून उठवून बर्थडे विश केलं होतं…पण हे माझ्यावर खूप चिडले..त्यांची झोप मोड झाली म्हणून…आणि सकाळी सकाळी ह्यांना सरप्राइज गिफ्ट म्हणून शर्ट गिफ्ट केलं होतं…पण ह्यांना ते शर्ट आवडले नव्हते…तेव्हा हे म्हणाले होते की माझ्यासाठी काहीही खरेदी करताना आधी मला दाखवत जा…म्हणून मग गिफ्ट पण आणले नाही…आणि संध्याकाळी हॉलमध्ये छान सजावट केली होती…ह्यांचा फोटो असलेला केक पण आणला होता…पण हे घरी उशिरा आले होते…मी त्यांना विचारले तर ते म्हणाले की वाढदिवसाला त्यांनी मित्रांसोबत बाहेरच केक कापला…त्यामुळे मग यावर्षी काहीच केले नाही…” नंदिनी म्हणाली.
” म्हणजे तू आज दादाला विश पण केले नाहीस…?” स्वाती म्हणाली.
” अगं… व्हॉट्सऍप वर स्टेटस ठेवलाय की मी..”
एवढे बोलून नंदिनी किचनमध्ये निघून गेली. स्वाती सुद्धा तिच्या सोबत किचन मध्ये निघून गेली.
नंदिनीचे बोलणे ऐकुन नचिकेत ला तिच्या वागण्याचे कारण समजले. यामध्ये तिचे सुद्धा काही चुकले नव्हते. मागच्या वर्षी तिने रात्री बारा वाजता झोपेतून उठवून विश केलं होतं. पण आपण मात्र तिला थँकयू न म्हणता तिच्यावरच झोपमोड केलीस म्हणून ओरडलो होतो हे त्याला आठवले.
तो त्याच्या बेडरूम मध्ये आला आणि त्याने कपाटातून तिने त्याला मागच्या वाढदिवसाला गिफ्ट केलेला शर्ट काढला. तो नंदिनी ला म्हणाला तेवढा वाईट सुद्धा नव्हता तो शर्ट. पण नचिकेत ने तो शर्ट मागच्या एका वर्षात एकदाही घातला नव्हता. त्यामुळे नंदिनीला वाईट वाटणे स्वाभाविक आहे.
रात्रीसुद्धा मित्रांसोबत उशिरा पर्यंत बाहेर पार्टी करत बसला होतो. घरी नंदिनी वाट पाहत असेल असा विचार सुद्धा केला नाही नचिकेतने. आणि उशिरा घरी आल्यावर सुद्धा नंदिनीने केलेल्या वाढदिवसाच्या तयारीला अजिबात महत्त्व न देता खूप थकलो असे म्हणून नचिकेत झोपायला निघून गेला होता. नचिकेतने नंदिनीला साधं थँकयू सुद्धा म्हटले नव्हते.
आपण नंदिनीशी इतके वाईट वागलो ह्याची आज नचिकेतला जाणीव झाली होती. निदान नंदिनीने त्याच्या वाढदिवसाला त्याच्यासाठी खूप काही केले होते पण नंदिनीच्या वाढदिवसाला तर त्याने दिवसभरात नंदिनीला विश सुद्धा केले नव्हते. फक्त व्हॉट्स ऍप वर स्टेटस ठेवला होता.
त्यामुळे नंदिनी जे काही वागत होती ते काही चुकीची नव्हती. नचिकेतला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. नचिकेतने आज ऑफिसला नंदिनी ने गिफ्ट दिलेला शर्ट घालून गेला. आणि ऑफिस मध्ये त्याला खूप जणांनी शर्ट खूप छान आहे असे म्हटले.
संध्याकाळी उशीर न करता नचिकेत घरी गेला. घरात आल्यावर पाहतो तर हॉल खूप छान सजवलेला होता. मध्ये एक भलामोठा केक ठेवला होता. स्वाती आणि नंदिनी ने सर्व तयारी केली होती. इतकी सारी तयारी पाहून नचिकेतला आश्चर्य वाटले. कारण त्याला वाटले होते की आपल्या वागणुकीने दुखावलेली नंदिनी असे काही करणार नाही. इतक्यात स्वाती नचिकेत ला म्हणाली.
” कशी वाटली बर्थ डे पार्टी ची तयारी…”
” खूप छान…” नचिकेत म्हणाला.
” ही सर्व वहिनीची आयडिया आहे बरं का..” एवढे बोलून स्वाती किचन मध्ये निघून गेली.
नंदिनी नचिकेत ला गिफ्ट देत म्हणाली.
” तुम्हाला आजची सजावट आवडली ना…”
” हो…खूपच छान आहे…पण मला वाटलं की तू आज असे काहीच करणार नाही…”
” का नाही करणार…माझ्या लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आज…फिर ये सब तो बनता है ना…” नंदिनी मिश्कीलपणे म्हणाली.
” कारण मागच्या वेळी मी तुझ्याशी नीट वागलो नाही म्हणून…आणि तुझ्या वाढदिवसाला तर मी तुझ्यासाठी असे काहीच स्पेशल केलेलं नव्हतं…” नचिकेत म्हणाला.
” आधी मलाही असच वाटायचं की तुम्ही सुद्धा माझ्यासाठी काहीतरी सरप्राइज प्लॅन करावं…कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जावं…पण मागच्या वाढदिवसा नंतर मला जाणवलं की तुमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे… असं तुम्हाला वाटतं की तुम्ही माझ्यासाठी काहीच विशेष केले नाही…पण माझ्यासाठी तर तुम्ही त्या दिवशी खूप काही विशेष केले होते…”
” असे काय विशेष केले होते मी…” नचिकेत म्हणाला.
” तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिवसभर सुट्टी घेतली होती…त्या दिवशी सकाळच्या चहा पासून ते संध्याकाळच्या जेवणा पर्यंत सर्वकाही तुम्हीच बनवले होते…ते ही सर्व पदार्थ माझ्या आवडीचे बनवले होते…”
” फक्त इतकंच ना..”
” तुमच्यासाठी ही खूप लहान गोष्ट असेल कदाचित…पण मला खूप स्पेशल वाटलं होतं…ह्या लहान सहान गोष्टींमधून नेहमीच तुमचं प्रेम व्यक्त होतं…आणि एवढे प्रेम मला पुरेसे आहे…आणि ही सजावट करणे…तुम्हाला गिफ्ट देणे ही माझी प्रेम व्यक्त करायची पद्धत आहे…तसेच तुमचे माझ्यावर असलेले प्रेम या लहान सहान गोष्टींमधून मला नेहमीच जाणवते…”
” तरीही मला तुला सॉरी म्हणायचे आहे…कारण मी नेहमीच तुला गृहीत धरतो…तू माझ्यासाठी इतके काही करतेस तरीही कधीच तुला थँकयू म्हटले नाही मी…पण कधी कधी मनात असलेलं प्रेम बोलून दाखवणं सुद्धा गरजेचं असतं…भावना वेळच्या वेळी व्यक्त करणं गरजेचं असतं…पण यानंतर पुढे असे काहीच होणार नाही…मी शब्द देतो तुला…” नचिकेत नंदिनीला जवळ घेत म्हणाला.
इतक्यात दारावरची बेल वाजली. नंदिनीने नचिकेतच्या मित्रमैत्रिणीना बोलावले होते. एव्हाना सर्वजण नचिकेतच्या घरी पोहचले होते. सर्वांनी मिळून नचिकेतचा वाढदिवस दणक्यात साजरा केला.
समाप्त.
©® आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.