“अक्षयराव, आज फक्त आणि फक्त तुमच्या मुळे आम्हाला सत्य काय ते कळलं. नाहीतर आमची रिद्धी आयुष्यभर या ओझ्या खाली राहिली असती की तिच्या मुळेच त्या मुलाचे वाईट झाले. तुम्ही आज आमच्यावर फार मोठे उपकार केलेत.” रिद्धी चे वडील म्हणाले.
” यात उपकार कसले…जे तर माझं कर्तव्य आहे…कुणाही निर्दोष व्यक्तीला त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायची गरज नाहीच…आणि मुळात शकुन अपशकून या गोष्टी मी मानतच नाही… पण रिद्धि च्या मनातील गैरसमज दूर व्हावा आणि ती पुन्हा आनंदी राहावी म्हणून मी तातडीने परत आलो आणि तुम्हाला ह्या बाबतीत माहिती दिली.” अक्षय म्हणाला.
” तरीही…तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत…देवाने तुम्हाला जणू काही आमच्या रिद्धिचा आयुष्यातील अंधार दूर करायलाच पाठवले होते…”
” देव चांगल्या व्यक्तीसोबत नेहमीच चांगले करतो…कधीकधी वेळ लागतो पण चांगले नक्कीच होते…मी तर केवळ निमित्त ठरलो…” अक्षय म्हणाला.
रिद्धी च्या घरी आज आनंदी आनंद झाला होता. मागच्या वर्षभरापासून ते सर्वजण ज्या तणावाखालून जात होते तो तणाव आज पूर्णपणे निवळला होता. हे सर्व जेव्हा रिद्धिला कळले तेव्हा तिला फार मोठा धक्काच बसला. यावर काय बोलावे हे तिला कळेचना…
इतक्यात अक्षय ने सर्वांचा निरोप घेतला आणि तो परत दुसरी ट्रेन पकडून ड्युटीवर परतला.
असेच काही दिवस गेले…आता रिद्धीसुद्धा सावरत होती. हळूहळू नॉर्मल होत होती. पुढे काही दिवसांनी रिद्धी आणि अक्षय च्या घरच्यांनी त्या दोघांचे लग्न ठरवले.
अक्षय जेव्हा परत सुट्टीमध्ये घरी आला तेव्हा घरच्यांनी त्याचा आणि रीद्धीचा साखरपुडा उरकला…आणि पुढे काही दिवसांनी दोघांचे लग्न सुद्धा झाले.
सिद्धी अक्षयची बायको बनून घरी आली. रिद्धी एक चांगली बायको बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. मामा मामी सुध्दा तिला अगदी आपल्या लेकी प्रमाणे वागवायच्या. पण आधीच्या लग्नाच्या वेळी जे काही घडलं होतं…त्या गोष्टी तिला राहून राहून आठवायच्या. अक्षयला तिची मनस्थिती कळत होती. त्यामुळे त्याने तिला हे सर्व स्वीकारायला वेळ देण्याचे ठरवले. त्याने सुरुवात मैत्रीतून केली.
सिद्धी आणि अक्षयची मैत्री झाली. हळूहळू दोघांच्या मनातील अंतर कमी होऊ लागले. रिद्धी अक्षयला समजून घेत होती. त्याच्या आवडीनिवडी जाणून घेत होती. अक्षय ने कधीही तिच्यावर बायको म्हणून अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला नाही. ना कधी तिच्या बाबतीत कुठलाही धसमुसळेपणा केला नाही. त्याला रिद्धि ला प्रेमाने जिंकायचे होते. मग त्यासाठी कितीही वाट पहायची त्याची तयारी होती.
अक्षयच्या चांगुलपणा ने सिद्धीच्या मनाचा ताबा घेतला होता. दोघेही एकमेकांना समजून घेत होते. पण अक्षयच्या सुट्ट्या आता संपल्या होत्या. त्याला ड्युटीवर जावे लागणार होते. अक्षय ने जायची तयारी केली आणि तो रिद्धी ला लवकर परत येण्याचे वचन देऊन परत गेला. रिद्धी ला त्याला तिच्या मनातील त्याच्या बद्दल असणाऱ्या भावना बोलून दाखवाय च्या होत्या. पण ऐनवेळी ती काहीच बोलू शकली नाही.
अक्षय तिकडे ड्युटीवर असताना रिद्धी मात्र सतत त्याच्याच विचारात असायची. तिला जणू सतत भास व्हायचा की अक्षय तिच्या जवळच आहे. ती आता अक्षयच्या प्रेमात पडली होती. पण अजून तिने अक्षयला तिच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. आता ते रोज फोनवर बोलत होते. दिवसभर काय घडले ते एकमेकांना सांगायचे.
असेच तीन महिने निघून गेले. एके दिवशी अक्षय ने रिद्धीला सांगितले की तो सुट्ट्यांमध्ये घरी येतोय. रिद्धी ला हे ऐकुन खूप आनंद झाला. काहीही झालं तरी यावेळी छान सरप्राइज देऊन अक्षय कडे आपल्या प्रेमाची कबुली द्यायची हे तिने ठरवले होते.
अक्षयने तिला तिथून निघत असल्याचा फोन केला. रिद्धी तयारीला लागली. मामींनी सुद्धा तिला मदत केली. तिने घर छान सजवले. त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले. त्याने तिला गिफ्ट केलेली साडी नेसून ती तयार झाली.
तो कुठपर्यंत पोहचला हे जाणून घेण्यासाठी तिने अक्षय ला फोन केला. पण अक्षयला फोन लागत नव्हता. तिने थोडा वेळ थांबून परत फोन केला मात्र तरीही त्याचा फोन लागलाच नाही. आता मात्र रिद्धी मनातून घाबरली. तिच्या मनात नको ते विचार यायला लागले.
अक्षय संध्याकाळी घरी पोहचणार होता मात्र रात्र झाली तरीही अक्षयचा काही पत्ता नव्हता. काय करावं हे रिद्धी ला कळत नव्हते. मामा मामी तिला समजावून सांगत होते मात्र तरीही तिच्या मनातील भीती काही केल्या कमी होत नव्हती.
ती रात्र तिने जागून काढली. तिला आता फक्त अक्षय ला भेटायची ओढ लागून राहिली होती. कधी एकदा त्याला बघते आणि कधी नको असे तिला झाले होते. ती रात्रभर हॉलमध्ये बसून होती. रात्रभर जगल्याने पहाटे तिचा थोडा डोळा लागला.
इतक्यात दारावरची बेल वाजली. रिद्धी दचकून जागी झाली आणि धावतच दार उघडायला गेली. दर उघडते तर समोर अक्षय उभा होता. तिला पाहून त्याने छान स्माईल केली. रिद्धिने त्याला पाहताच त्याला मिठी मारली. आणि रडायला लागली. तिला रडताना बघून त्याने तिला विचारले.
” हे काय…रडत का आहेस…?”
” तुम्ही…तुम्ही काल रात्री येणार होते ना…” रिद्धी फक्त एवढंच बोलू शकली.
” अग हो…माझी ट्रेन लेट झाली…म्हणून यायला उशीर झाला…”
” मग फोन करून कळवायला ना…आणि तुमचा फोन का लागत नव्हता…मी कालपासून निदान शंभर वेळा फोन केला असेल तुम्हाला…पण तुमचा फोन लागत नव्हता…तुम्हाला अजिबात मला कळवावस वाटलं नाही का…इथे माझ्या जीवाला घोर लागला होता…कुणीतरी आपली वाट पाहत असेल हा विचार सुद्धा नाही आला तुम्हाला….” रिद्धी न थांबता बोलत होती.
” अग जरा थांब तरी…निदान मला बोलायची एक संधी तरी दे…” अक्षय म्हणाला.
” का म्हणून तुम्हाला एक संधी देऊ मी…मागच्या वेळी मलापण तुम्हाला सांगायचं होतं की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते…तुम्ही गेल्यापासून मला एक एक दिवस एका वर्षासारखा भासत होता…तुम्ही कधी परत याल आणि मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगेल असं झालं होतं मला…पण तुम्ही मला बोलण्याची संधीच दिली नाही…मग मी तरी का ऐकुन घ्यायचं तुमचं…तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाही…”
रिद्धी सारखी बडबडत होती. आणि अक्षय तिच्याकडे बघून मंद हसत होता.
रिद्धी च्या आवाजाने मामा आणि मामी देखील जागे झाले. मामी बाहेर यायला लागल्या पण मामांनी मामीला थांबवले. आणि हसत म्हणाले…
” नवरा बायको भांडताहेत. आपण कशाला मध्ये जायचं.”
इकडे रिद्धी आता बोलायची थांबली. अक्षय तिच्याकडे एकसारखा बघून गालातल्या गालात हसत आहे हे तिला कळले. आपण बराच वेळ एकटेच बोलत होतो हे तिच्या लक्षात आले. बराच वेळ झाला तरी अक्षय फक्त हसत होता. काहीच बोलत नव्हता. शेवटी न राहवून तिने विचारलेच.
” असे काय हसताय…मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे…आणि तुम्ही फक्त हसत आहात…काहीतरी बोला आता…”
” तू बोलायची थांबली तर बोलणार ना…”
” बरं बोला..”
” अग माझा फोन हरवला ट्रेनमध्ये…सगळे फोन नंबर सुद्धा गेले फोन मध्ये…मग कसा कळवणार…म्हटलं वेळेवर घरी पोहचेल तर ट्रेन लेट झाली…म्हणून यायला उशीर झाला…” अक्षय म्हणाला.
” सॉरी…मी फार बोलले तुम्हाला…तुमचा फोन हरवला असेल हे माझ्या लक्षातच आले नाही…” मान खाली घालत रिद्धी म्हणाली.
” आधी मलापण वाईट वाटले होते मोबाईल हरवल्याचे…पण आता असं वाटतय की बरं झाला मोबाईल हरवला ते…”
” असं का म्हणून वाटतयं तुम्हाला…” रिद्धी ने विचारले.
” माझा मोबाईल हरवला नसता तर तू इतक्या काळजीत पडली नसती…आणि मग तू आता जी प्रेमाची कबुली दिली माझ्याकडे ती नसती ना मिळाली…” अक्षय तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला.
” मी कधी दिली प्रेमाची कबुली…?” रिद्धी ने त्याच्याकडे न बघता विचारले.
” आत्ताच…जेव्हा तू रागारागाने मला बोलत होतीस तेव्हा…मला आवडली हा तुझी ही पद्धत…तर मग तुम्हाला एक एक दिवस अगदी एका वर्षा सारखा भासत होता राणी सरकार…” अक्षय तिला चिडवत म्हणाला.
” तुम्हीपण ना…” असं म्हणत रिद्धी परत एकदा अक्षय च्या मिठीत शिरली. कधीही त्याच्यापासून वेगळं न होण्यासाठी.
समाप्त.
आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.