सुरेखाताईंच्या अशा बोलण्यामुळे जयेश आणि श्वेता दोघेही गप्प झाले. श्वेताने हळूहळू बोलणे कमी केले आणि ती फक्त कर्तव्यापुरती वागू लागली.
लग्नानंतर दीड वर्षाने श्वेता गरोदर राहिली. ही बातमी ऐकून घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलणे स्वाभाविक होते, पण सुरेखाताईंच्या चेहऱ्यावर काहीच आनंद दिसला नाही. त्यांनी ना तिचे कौतुक केले, ना तिची विचारपूस केली ना तिला काही खावेसे वाटते का ह्याची चौकशी केली. आपल्या वहिनीच्या गर्भारपणात आपल्या आईला तिची खूप जास्त काळजी घेताना पाहिलेल्या श्वेताला तिच्या सासूबाईंच्या वागण्याचे आश्चर्य वाटले पण मग तिने त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले.
गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात श्वेताची तब्येत अचानक खूप खालावली. तिला त्रास होऊ लागला. जयेशने तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की, गर्भाशयाची स्थिती नाजूक आहे आणि श्वेताला पूर्णपणे बेडरेस्टची (विश्रांतीची) गरज आहे.
हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये जयेश काळजीत उभा असताना सुरेखाताई त्याच्याजवळ आल्या आणि रुक्ष आवाजात म्हणाल्या, “जयेश, हिची अशी अवस्था असेल तर माझ्याच्याने हिची सेवा-चाकरी होणार नाही. माझी आता ती वय आणि ताकद राहिलेली नाही. हिला तू तिच्या माहेरी सोडून दे, तिची आईच करेल तिचं काय ते.”
आईचे हे शब्द ऐकून जयेशला वाईट वाटले. आई इतरांशी कितीही तुटक वागत असली तरी माझ्या आणि माझ्या बाळाच्या बाबतीत आई हळवी असेल असेच त्याला वाटले होते.
“आई, या नाजूक दिवसांमध्ये तिला तुझ्या आधाराची गरज आहे आणि तू तिला माहेरी पाठवून द्यायला सांगतेयस? मी कुठल्या तोंडाने तिच्या माहेरच्यांना सांगू की माझी आई तिची काळजी घ्यायला तयार नाही म्हणून. काय वाटेल त्यांना. आणि श्वेताला काय वाटेल.” जयेश हताशपणे म्हणाला.
” माझ्या आईच्याने तिची काळजी घेणे नाही होणार एवढंच सांगायचं आहे तुला. बाकी ते बघतील.” सुरेखाताई सहजपणे म्हणाला.
आईचे बोलणे ऐकून जयेश दुःखी झाला पण पुढे काहीच बोलला नाही. जयेशने श्वेताला माहेरी न पाठवता घरी आणले. त्याने घरकामासाठी आणि श्वेताच्या काळजीसाठी एका कामवाल्या मावशीची सोय केली.
पण सुरेखाताईंनी तिथेही त्रास देणे सोडले नाही. त्या त्या बाईच्या पाठीमागे उभ्या राहून टोचून बोलायच्या, “हे असं का धुतलंस?”, “इथे हात कशाला लावलास?”, “माझ्या स्वयंपाकघरात जास्त ढवळाढवळ करायची नाही!”
सुरेखाताईंच्या या वागण्यामुळे कामवाल्या मावशी त्रासून निघून गेल्या. श्वेता पलंगावर पडून हे सर्व बघत होती आणि मनातल्या मनात घुटमळत होती. या सततच्या मानसिक ताणतणावाचा तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आणि एके दिवशी दुर्दैव ओढवले. अतिताप आणि मानसिक ताणामुळे श्वेताचे बाळ पोटातच दगावले.
हॉस्पिटलमध्ये श्वेता ढसाढसा रडत होती. जयेश सुन्न झाला होता. आपलं पहिलं बाळ गमावल्याचं दुःख दोघांच्याही सहनशक्तीपलीकडचे होते. अशा अत्यंत दुःखाच्या क्षणी सुरेखाताई तिथे आल्या, पण त्यांच्या तोंडातून सहानुभूतीचा एक शब्दही निघाला नाही.
उलट त्या श्वेताकडे बघून म्हणाल्या, “मी आधीच सांगत होते, नीट काळजी घे. नक्की तूच काहीतरी घाईगडबडीत चूक केली असशील, म्हणून गर्भपात झाला!”
हे शब्द ऐकून श्वेताचा उरलासुरला धीर सुटला आणि जयेशच्या संयमाचा बांध फुटला. जयेशने डोळ्यांतील अश्रू पुसले, आईकडे पाहिले आणि अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाला,
“आई, आजपर्यंत मी तुझा स्वभाव म्हणून गप्प बसलो. पण आज तू एका दुःखी आईच्या मनाचा सुद्धा विचार नाही केलास. आमचं बाळ तुझंही कोणीतरी लागत होतं ना. तुला वाईट वाटत नसेल तर निदान आमच्या मनाचा तरी विचार कर. आता आम्ही तुझ्यासोबत राहू शकत नाही. आम्ही हे घर सोडून भाड्याच्या घरात राहायला जात आहोत.”
सुरेखाताईंच्या अहंकाराने त्यांना तेव्हाही नमून दिले नाही. त्यांना वाटले, ‘भाड्याने राहणे आणि स्वतःचा संसार चालवणे इतके सोपे नसते. महिना-दोन महिन्यांत अद्दल घडली की दोघेही पाय धरून परत येतील माझ्याकडे.’
त्यामुळे त्यांनी जयेशला अडवले नाही. जयेश आणि श्वेता घर सोडून निघून गेले.
दिवस गेले, महिने गेले आणि वर्षेही सरली. पण जयेश आणि श्वेता परत आले नाहीत. सुरेखाताईंच्या अहंकाराने त्यांनाही कधी “परत या” म्हणून म्हणू दिले नाही.
जयेश आणि श्वेता सोबत राहत नसले तरी कर्तव्य म्हणून अधूनमधून त्यांची चौकशी करायला येत. सणावाराला जयेश आणि श्वेता यायचे. पण ते केवळ एक औपचारिक कर्तव्य म्हणून. पाऊण-एक तास बसून, सुरेखाताईंच्या हातात काही पैसे ठेवून, त्यांची औषधे आणून देऊन ते शांतपणे निघून जायचे. ना त्यांच्या बोलण्यात जुना आपुलकीचा ओलावा असायचा, ना काही गप्पा.
कधीकधी त्या फोनमध्ये स्टेटस बघायच्या. जयेश आणि श्वेता आता हळूहळू इतर नातेवाईकांमध्ये सुद्धा मिसळायला लागले होते. लहान जाऊ सुमन, दोन्ही नणंदा आणि जयेश-श्वेता हे सगळे एकत्र कौटुंबिक कार्यक्रमात हसताना, एकत्र जेवताना दिसायचे. जयेश आणि श्वेता नातेवाईकांमध्ये मनापासून मिसळत होते. सगळे जण त्यांना प्रेम देत होते. फक्त सुरेखाताई त्या चित्रातून बाहेर फेकल्या गेल्या होत्या.
आज वृषालीने जेव्हा त्यांना विचारले, “आजकालची मुलं किती वाईट असतात ना?”, तेव्हा सुरेखाताईंना आतून अपराधीपणाची तीव्र जाणीव झाली.
त्या स्वतःशीच पुटपुटल्या, “मुलं वाईट नाहीत… मीच कधी कोणाला माझं मानलं नाही. मी कोणाच्या गरजेला उपयोगी पडले नाही, कोणाला कधी प्रेमाने जवळ केलं नाही, कोणाच्या सुखात हसले नाही. मग आज मी कोणाकडून प्रेमाची अपेक्षा कशी करू?”
त्यांना कळून चुकले होते की, त्यांनी आयुष्यभर लावलेल्या अलिप्ततेच्या आणि अहंकाराच्या रोपट्याला आज एकांताचेच फळ आले होते. हा पश्चात्ताप आता खूप उशिरा आला होता, आणि तो बदलणे आता त्यांच्या हातात नव्हते.
सुरेखाताईंनी आवंढा गिल्ला, तुळशीच्या दिव्याची वात थोडी मोठी केली, आणि आपल्या शांत, रिकाम्या घरात एकाकीपणाच्या सावलीत पुन्हा एकदा शांतपणे पाऊल ठेवले.
समाप्त.
©® आरती निलेश खरबडकर.