संध्या खिडकीपाशी उभी राहून श्रावणाच्या संततधार सरींकडे एकटक पाहत होती. आभाळातून कोसळणाऱ्या पाण्याचे थेंब खिडकीच्या काचेवर आदळून खाली ओघळत होते, अगदी तिच्या डोळ्यांच्या कडांतून वाहणाऱ्या अश्रूंसारखेच. आज श्रावण पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधन.
संपूर्ण घरात सणाची लगबग सुरू होती. स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा आणि साजूक तुपाचा दरवळणारा सुवास संपूर्ण घरात भरून राहिला होता. पण संध्याच्या मनाला मात्र एका अनामिक दुःखाने, एका रिकामेपणाने घेरले होते. तिच्या हातातील चांदीच्या छोट्या ताटात एक रेशमी राखी, थोडे अक्षता, कुंकू आणि एक सुवासिक उदबत्ती ठेवली होती. पण ज्याच्या मनगटावर ती राखी बांधायची होती, तो आकाश अजून आला नव्हता.
संध्या आणि आकाश… एकाच वृक्षाच्या दोन फांद्या, ज्या एका महावादळात एकमेकांना घट्ट बिलगून जगल्या होत्या. संध्याला आठवत होते ते जुने दिवस, जेव्हा ती जेमतेम दहावीत होती. घरात हसतेखेळते वातावरण होते. वडील एका खासगी कंपनीत कारकून म्हणून काम करायचे. पगार बेताचाच होता, पण घरात समाधानाची कमतरता नव्हती.
अचानक आईला कसलासा दुर्धर आजार झाला आणि पाहता पाहता काही महिन्यांत आई हे जग सोडून गेली. त्या दिवशी दहावीत असणाऱ्या संध्येच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले होते. आईच्या चितेचा भडका उडाला, तेव्हा सातवीत शिकणारा आकाश संध्याच्या पदराला घट्ट धरून हमसून हमसून रडत होता.
त्या दिवशी संध्याने आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसले आणि स्वतःला समजावले की आता रडून चालणार नाही. तिने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी घराची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सकाळी उठून वडिलांचा डबा तयार करणे, आकाशला शाळेसाठी तयार करणे, कपडे-भांडी करणे आणि मग स्वतः शाळेत जाणे, हा तिचा नित्यक्रम बनला होता.
पण या प्रवासात आकाश कधीही मागे राहिला नाही. वयाने लहान असला तरी तो अत्यंत समंजस होता. ताई दमली आहे हे पाहताच तो स्वतःहून केर काढायचा, भाजी आणायला बाजारात पळायचा, आणि कपड्यांच्या घड्या घालायला संध्येच्या बाजूला येऊन बसायचा.
संध्या त्याला नेहमी म्हणायची, “आकाश, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे रे. घरची कामं करायला मी समर्थ आहे.” पण आकाश संध्येचे डोळे पुसत म्हणायचा, “ताई, आई गेली तेव्हा तिने मला सांगितले होते की आता संध्या हीच तुझी आई आहे. मग आईला मदत नाही करायची तर कोणाला करायची?”
दोघा भावंडांचे हे अथांग प्रेम पाहून वडिलांचे डोळे पाणावायचे. ते नेहमी म्हणायचे, “माझी दोन्ही मुलं हीच माझी आयुष्यातील मिळकत आहे. आता मला कोणतीच चिंता नाही.”
वर्षे सरली. संध्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आकाशही इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला पोहोचला. तो अतिशय हुशार आणि मेहनती होता. दरम्यान, वडिलांनी संध्येसाठी एक चांगले स्थळ शोधले. सुशांत नावाचा मुलगा, चांगल्या घरातला आणि शहरात नोकरीला असणारा. संध्येचे लग्न थाटामाटात पार पडले.
लग्नाच्या दिवशी संध्येला सासरी पाठवताना वडिलांपेक्षा आकाश जास्त रडला होता. तो बहिणीच्या गळ्यात पडून लहान मुलासारखा हुंदके देत होता, संध्याने त्याला घट्ट मिठी मारली होती आणि वचन दिले होते, “मी कुठेही गेले तरी तुला कधीच अंतर देणार नाही म्हणून. आपण रोज फोनवर बोलू, रोज एकमेकांची खुशाली विचारू.”
लग्नानंतर सुरुवातीला संध्या सासरी रमत गेली. सुशांत समजूतदार होता, पण सासू प्रभावतीबाई आणि नणंद मयुरी जरा कडक आणि व्यवहारी स्वभावाच्या होत्या. माहेरून फार काही न आणल्यामुळे त्यांच्या मनात कुठेतरी संध्येबद्दल एक सूक्ष्म नाराजी होतीच, जी त्या अधूनमधून बोलण्यातून दाखवून द्यायच्या.
तरीही संध्याने आपल्या गोड स्वभावाने त्या घराला आपलेसे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. संध्येचा आणि आकाशचा दिनक्रम ठरलेला असायचा; संध्याकाळी बरोबर आठ वाजता आकाशचा फोन यायचा. दिवसभरात काय घडले, काय अभ्यास झाला, यावर दोघांची अर्धा तास गप्पांची मैफल रंगायची.
पण नियतीला त्यांचे हे शांत चाललेले आयुष्य पाहवले नाही. एक दिवस आकाशचा थरथरत्या आवाजात फोन आला. “ताई… बाबांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. आम्ही त्यांना तातडीने दवाखान्यात आणले आहे.”
संध्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती तातडीने सासरच्यांची परवानगी काढून माहेरी धावली. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि एक भयानक सत्य समोर आले. बाबांना कर्करोग झाला होता, आणि तोही तिसऱ्या टप्प्यात पोहोचला होता. त्या क्षणापासून दोघा भावंडांचे आयुष्य एका क्रूर वळणावर येऊन उभे राहिले.
उपचारांचा खर्च लाखांच्या घरात होता. आकाशने आपल्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा सोडून दिल्या. तो रात्रंदिवस बाबांच्या उशाशी बसून असायचा. त्यांची औषधे, स्पंजिंग, सलाईन बदलणे, त्यांना खाऊ घालणे. आकाशने स्वतःचे भान हरपून बाबांची सेवा केली. बाबांकडे जी काही थोडीफार रक्कम होती ती उपचारासाठी खर्च होत होती. संध्यानेही आपल्या बाजूने सर्व प्रयत्न केले. तिच्याकडे जी काही थोडीफार रक्कम होती, ती तिने बाबांच्या उपचारासाठी दिली.
पण पैशांची चणचण दिवसेंदिवस वाढत होती. एका मोठ्या शस्त्रक्रियेसाठी आणि महागड्या औषधांसाठी अचानक पन्नास हजार रुपयांची तातडीची गरज भासली. सासरच्या लोकांकडे मागण्याची तिची हिंमत नव्हती, कारण आधीच त्यांनी संध्येच्या वारंवार माहेरी जाण्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्या दिवशी संध्येने आपल्या कानातील सोन्याची कानातले काढले.
ते कानातले तिचे एकमेव सोन्याचे दागिने होते, जे तिच्या आईने तिच्यासाठी खास जपून ठेवले होते आणि लग्नात दिले होते. संध्याने डोळ्यांत अश्रू आणून ते कानातले एका सराफाकडे विकले आणि आलेले सगळे पैसे आकाशच्या हातात टेकवले.
“ताई, हे नको ग… हे आईचे दागिने आहेत,” आकाश संकोच करत म्हणाला.
“आकाश, दागिन्यांपेक्षा बाबांचा श्वास महत्त्वाचा आहे रे. बाबा बरे झाले तर आपण असे हजारो दागिने करू.” संध्या त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
परंतु, विधात्याचा निर्णय वेगळाच होता. आकाशची अहोरात्र सेवा आणि संध्येचे सर्वस्व पणाला लावणे या कशाचाही उपयोग झाला नाही. एका काळरात्री बाबांनी दोघांच्या हातांवर आपले थरथरणारे हात ठेवले आणि जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी संध्येचे माहेर एका क्षणात पोरके झाले. वडिलांच्या जाण्याने आकाश पूर्णपणे खचून गेला. घरात आता फक्त शांतता आणि शून्यता उरली होती.
बाबांच्या निधनानंतरचे काही महिने फार विचित्र गेले. संध्याला सासरी परतावे लागले. पण तिचा जीव सतत माहेरी आकाशमध्ये अडकलेला असायचा. वडिलांच्या निधनाला सहा महिने उलटून गेले होते, पण या सहा महिन्यांत आकाश खूप बदलल्यासारखा वाटत होता. तो पूर्वीसारखा रोज फोन करत नव्हता.
संध्या ने स्वतःहून फोन लावला तरी तो, “ताई, मी जरा कामात आहे, नंतर बोलतो,” किंवा “मी बरा आहे, तू काळजी नको करू,” एवढेच दोन-तीन शब्दांत बोलून फोन कट करायचा. संध्येला वाटू लागले, आकाश आपल्यापासून दुरावत चालला आहे का? बाबा गेल्यानंतर तो आपल्यावर नाराज आहे का? की एकटेपणाने त्याला कठोर बनवले आहे? या विचारांनी संध्येचे मन पोखरून काढले होते.
क्रमशः