सदा स्वतःशीच बडबड करायचा. मिळेल ते काम करायचा. मिळेल ते खायचा. कसली तक्रार नाही की कसला त्रास नाही. मध्येच देवाचं नाव घ्यायचा. पाहणाऱ्याला एखाद्या अवलिया सारखा वाटायचा तो. पण तो एक सांसारिक व्यक्ती होता. चारचौघां सारखा त्याचा देखील संसार होता. बायको अन् दोन मुलं.
घरची परिस्थिती फारशी वाईट नव्हती. घरी बऱ्यापैकी जमीन होती. चांगलं घर होतं. खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं. मात्र सदा नेहमीच दुसऱ्यांची पडेल ती कामे करायचा. सदाची बायको स्वभावाने खाष्ट होती. सतत तोऱ्यात राहायची. त्याच्या बायकोला त्याचा भोळा स्वभाव अजिबात रूचायचा नाही.
लग्नानंतर काही वर्षे दोघांचं बरं सुरू होतं मात्र नंतर नंतर दोघांमधील संवाद फक्त हो अन् नाही एवढाच मर्यादित राहिला होता. आणि आता तर सदाची दोन्ही मुले वयात आली होती. दोघांनीही घराची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि सदा जणू आपल्या कर्तव्यातून मुक्त झाला.
आता तो लोकांकडे जे पडेल ते काम करायचा आणि त्यांनी मोबदल्यात जे दिले ते घ्यायचा. कधी कधी स्वतःहून त्यांना भाकरी देखील मागायचा. कधी कधी एखाद्या दुसऱ्या गावात जायचा आणि दोन दोन दिवस परतायचां नाही. त्याच्या ह्या स्वभावामुळे आता नुकतीच मिसरूड आलेल्या त्याच्या मुलांनाही त्याची लाज वाटायची.
बायकोला तर जणू त्याच्याशी फारसे काही घेणेदेणे नव्हतेच. सदा मात्र कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आपल्याच विश्वात रमायचा. आता तर गावातील काही लोक त्याला वेडा देखील म्हणायची.
असेच एकदा सगळीकडे खूप पाऊस आला आणि त्यांच्या गावातील नदीला पूर आला. सगळीकडे फार नुकसान झाले होते. आणि सदा नेमका त्याच वेळी कुठेतरी बाहेरगावी गेलेला होता. गावातील पुर ओसरला. पाऊस देखील थांबला. पण सदा मात्र घरी परतला नाही.
घरच्यांनी सुद्धा त्याची काही जास्त खबरबात घेतली नाही. गावातील लोकांमध्ये कुजबुज सुरु होती. सदा नदीच्या पुरात वाहून गेल्याची. सर्वांना वाटायचं सदा हे जग सोडून निघून गेला. मध्येच कुणीतरी यायचं आणि सांगायचं की त्यांनी सदाला अमुक तमुक गावात पाहिलंय पण कुणी साधी खात्री करून घ्यायला देखील गेलं नाही.
घरच्यांनी काही दिवस त्याची वाट पाहिली. तरीही सदा घरी परतला नाही म्हणून घरच्यांनी त्याच्या फोटोला हार घातला आणि रीतसर तो आता या जगात नसल्याचे जाहीर करून टाकले. सदाच्या बायकोने सुद्धा सौभाग्य अलंकार काढून टाकले आणि विधवेचे रुप धारण केले.सगळ्यांची कामे पूर्ववत सुरू होती. सदा या जगात नसल्याचा कुणालाही फारसा फरक पडला नाही.
तिकडे सदा मात्र अजूनही जिवंत होता. गावातील नदीला पूर आल्यावर तो आश्रयासाठी शेतातील एका मोडक्या घरात आश्रय घेण्यासाठी गेला असता त्या दिवशीच्या पावसाने ती जुनी भिंत कोसळून सदाच्या डोक्याला मार लागला आणि त्या अवस्थेत तो भ्रमिष्ट झाल्यासारखा रस्त्याने चालू लागला.
रस्त्याने लागणाऱ्या गावात जे मिळेल ते मागून खायचा आणि चालत जायचा. असेच एकदा चालता चालता तो एका गाडीला जाऊन धडकला. त्या गाडी चालवण्या र्या व्यक्तीने सदाला दवाखान्यात नेले आणि त्याचा इलाज केला.
सदाला थोडं बरं वाटल्यावर त्या व्यक्तीने सदाला त्याच्या घराचा पत्ता विचारला. मात्र सदाला व्यवस्थित काही आठवत नव्हते आणि सांगताही येत नव्हते. शेवटी त्या व्यक्तीने काही दिवसांसाठी सदाला त्यांच्या घरी घेऊन जाण्याचा विचार केला आणि त्याच्या घरच्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याचे ठरवले.
ती व्यक्ती म्हणजे शहरातील एक तरुण व्यावसायिक किशोर होता. परंतु सद्यस्थितीला त्याचा व्यवसाय डब घाईला आला होता. व्यवसायात एकामागून एक नुकसान होतच होते. त्यामुळे निराश होऊन अगदी आत्महत्येचा विचार करून घरी चालला होता. आणि नेमका त्याचं दिवशी सदा त्यांच्या गाडीला येऊन भिडला आणि काही वेळासाठी का होईना त्यांनी आत्महत्येचा विचार झटकला.
किशोरने सदाला त्याच्या घरी आणले आणि घरातील नोकरांना ते बरे होईपर्यंत त्यांची काळजी घ्यायला सांगितले. ज्या दिवशी तो सदाला घेऊन घरी आला त्याच दिवशी संध्याकाळीच त्यांना बातमी मिळाली की बँकेने त्यांचे लोन मंजूर केले आहे. किशोरला खूप आनंद झाला. हळूहळू त्याला व्यवसायात प्रगती होऊ लागली. इकडे किशोरने सदाच्या घरच्यांचा देखील शोध सुरू केला पण लवकर पत्ता लागत नव्हता.
किशोर मुळातच स्वभावाने चांगला होता. तो आणि त्याची बायको सदाची चांगली काळजी घ्यायचे. त्यांनी कधीही किशोरला वेडा म्हणून हिणवले देखील नाही. किशोरची लहान मुले देखील सदाला आजोबा म्हणायला लागली होती. सदा देखील किशोरच्या घरची लहानसहान कामे आवडीने करायचा. मुलांना खेळवायचा.
हळूहळू किशोरला वाटू लागले की सदाचा पायगुण लागल्यामुळेच त्याचा डब घाईला आलेला व्यवसाय सावरतोय आणि जेव्हा तो आत्महत्येचा विचार करत होता तेव्हा सदामुळेच त्याचा विचार बदलला होता. तेव्हापासून तो प्रत्येक कामात सदाचा आशीर्वाद घ्यायचा. आणि कृतज्ञता म्हणून त्याला व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग सदासाठी ठेवायचा.
त्याने त्याच्या घराशेजारीच सदा साठी एक मोठे घर बांधले. आता सदाच्या अंगावर महागातले कपडे आणि सोन्याचे दागिने असायचे पण आपल्याच विश्वात राहणाऱ्या सदाला यापैकी कशाचेही अप्रूप नव्हते.
किशोरच्या घरी मोठं मोठ्या लोकांचे जाणे येणे वाढले होते. बरीच लोकं त्याच्या घरी व्यावसायिक कामानिमित्त भेट द्यायचे. त्यापैकी एका व्यक्तीने सदाला ओळखले. आणि सदाच्या घरी जाऊन तो अजूनही जिवंत असल्याचे सांगितले.
सुरुवातीला सदाच्या घरच्यांनी त्यांचे ऐकुन ऐकुन घेण्यास टाळाटाळ केली पण जेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की सदाच्या पायगुणामुळे किशोर शेठ नी खूप प्रगती केलीय आणि सदाच्या नावावर बरीच संपत्ती केलीय तेव्हा मात्र सगळ्यांनीच कान टवकारले.
लगेच सदाच्या फोटोवरील हार काढून टाकण्यात आला. बायकोने सुद्धा पुन्हा एकदा सौभाग्य अलंकार धारण केले. आणि घरची सगळीच मंडळी सदाला घ्यायला दूर शहरात असणाऱ्या किशोरच्या घरी पोहचली.
किशोरच्या घरचे ऐश्वर्य पाहून घरातील सर्वांचेच डोळे दिपले. आणि त्यांनी जेव्हा सदाला पाहिले तेव्हा सर्वजण पाहतच राहिले. अंगावर चांगले कपडे, गळ्यात सोन्याच्या दोन चेन, प्रत्येक बोटात अंगठी. आपल्या घरच्यांना पाहून सदाने त्यांना ओळखले.
सदाला खूप आनंद झाला होता. सदाच्या घरच्यांनी सदाला घरी नेण्याबद्दल किशोरला सांगितले. आपले सदानंद काका आता आपल्याला सोडून जातील ह्याचे किशोरला वाईट वाटत होते पण त्यांना त्यांचे कुटुंब परत मिळणार ह्याचा आनंद देखील होता.
एक दिवस किशोरच्या घरचा पाहुणचार घेऊन दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी सदाला घेऊन जाण्याच्या विचारात होती. सदाच्या घरच्यांना वाटलं होतं की किशोरने सदाच्या नावाने जी काही संपत्ती दिली आहे ती आज किशोर आपल्याला घरी जाताना सोबत देईल.
आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जेव्हा दुसऱ्या दिवशी किशोरने सदाच्या नावे काही संपत्ती देऊ केली तेव्हा सदाने त्याच्यापासून काहीही घेण्यास नकार दिला. उलट आपल्या अंगातील सर्व दागिने त्याला परत दिले आणि म्हणाला की त्याला त्याचे कुटुंब परत मिळाले हेच खूप आहे. त्याला किशोर कडून काहीच नको होते.
सदाच्या घरच्यांना मात्र ते फारसे रुचले नाही. त्यांच्या मते सदा संपत्ती नाकारून मूर्खपणा करत होता. त्याचा मुलगा तर म्हणाला की तुम्ही जर ह्यांच्याकडून काहीच घेणार नसणार तर आम्ही तुम्हाला घरी नेणारच नाही. त्यांच्या बोलण्याचे सदाला वाईट वाटले.
तेव्हा सदाने त्याच्या घरच्यांसोबत जायला नकार दिला आणि किशोरला म्हणाला की मला तुझ्या घरी आसरा दे मी पडेल ते काम करायला तयार आहे. सदाच्या घरच्यांचे बोलणे ऐकून किशोरला सुद्धा वाईट वाटले होते. किशोरने सदाला कायमचे त्याच्या घरी ठेवून घेतले.
सदा आजोबा आता नेहमीच आपल्या घरी राहणार म्हणून किशोरच्या मुलांना खूप आनंद झाला. आणि संपत्तीच्या मोहापायी सदाला रिकाम्या हाताने घरी परत न्यायला नकार देणारे सदाच्या घरचे मात्र रिकाम्या हाताने घरी परतले.
समाप्त.
Photo – साभार pixel
आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.