इकडे किसन विचार करून बेजार झाला होता. त्याने जर रावसाहेबांना नकार दिला तर सरिताचा संसार तुटेल आणि तिला कायमचे माहेरी येऊन राहावे लागेल. आणि जर लग्नाला होकार दिला तर दोन्ही बहिणी एकमेकींच्या सवती बनतील.
त्या रात्री किसनला झोप आली नाही. बापाच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून धाकट्या मुलीने अंजुने शेवटी न राहवून त्याला त्याच्या काळजीचे कारण विचारले. तेव्हा किसन ने तिला रामराव जे बोलले ते सर्वकाही सांगितले. हे ऐकुन घरातील सर्वजण काळजीत पडले.
जर मोठ्या बहिणीचा संसार वाचवायचा असेल तर लहान बहिणीचे तिच्याच नवर्यासोबात लग्न लावावे लागेल असा विचार त्यांनी आधी कधीच केला नसेल.
खरंतर अंजुला तिच्या वर्गात शिकणार घनश्याम मनापासून आवडत होता. घनश्यामच्या आणि अंजुच्या वडिलांची चांगली मैत्री सुद्धा होती. पण अंजुने कधीच त्याला आपल्या मनातले सांगितले नाही.
आता अंजूला असे वाटत होते की बरे झाले त्याला काहीच सांगितले नाही. कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलेले असावे. ताईसाठी मला हे करावच लागेल. अंजुने रात्रभर या गोष्टीचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांकडे येऊन म्हणाली.
” बाबा…मी दाजींशी लग्न केल्याने जर ताईचा संसार वाचत असेल तर मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे…”
” अग पण पोरी…इतका मोठा निर्णय घ्यायला तू अजुन खुप लहान आहेस बघ…हे सर्व इतकं सोपं नाही…” किसन म्हणाला.
” बाबा…ताईने आजवर माझ्यावर खूप प्रेम केलंय…आई गेल्यापासून तिने माझा आई बनून सांभाळ केला आहे…मला तिच्यासाठी हे करावच लागेल…माझी मनापासून इच्छा आहे तिच्यासाठी काहीतरी करायची…” अंजु म्हणाली.
अंजुच तिच्या ताईवर असणारं प्रेम पाहून किसनला भरून आलं. शेवटी अंजु जे काही म्हणत होती ते चुकीचं नव्हतंच. कारण केशव एक चांगला मुलगा होता. शिवाय इतक्या चांगल्या घरी तो अंजूच लग्न करूच शकला नसता. त्याच्याघरी अंजु सुखात राहीन आणि सरिताला सुद्धा मुलाबाळांच सुख मिळेल.
नाहीतर सरिताला कायमच माहेरी यावं लागेल आणि अंजुला पुढे कसा नवरा मिळेल याची काही खात्री देता येत नाही. आणि आपण रामराव ना नाही म्हटलं तर अंजु ऐवजी एखाद्या दुसऱ्या मुलीशी ते केशवच लग्न लावून देतीलच की. म्हणून किसन या लग्नाला तयार झाला.
किसन आणि अंजीचा निर्णय जेव्हा सरिता ने ऐकला तेव्हा तिने आधी स्पष्टपणे या गोष्टीसाठी नकार दिला. कारण अंजूचं लग्न एका विवाहित पुरुषाशी लावून देणं तिला पटत नव्हतं. पण तिला माहित होतं की केशव मनाने खूप चांगले आहेत. अंजु त्या घरी सुखात राहील. एकदा का अंजु त्या घरी स्थिरस्थावर झाली की आपण त्या दोघांचा संसार सोडून कायमचं माहेरी यायचं हा विचार करून तिनेसुद्धा या लग्नासाठी होकार दिला.
ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी रामराव परत किसन कडे आले. किसनने त्यांना लग्नासाठी होकार दिला. रामरावांना फार आनंद झाला. ते तडक त्यांच्या घरी परत गेले आणि केशवला त्यांच्या खोलीत बोलावून घेतले.
” केशव…आम्ही तुझे दुसरे लग्न करून द्यायचा निर्णय घेतला आहे…”
अचानकपणे बाबांच्या तोंडून स्वतःच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट ऐकुन केशवला त्याच्या कानांवर विश्वास बसला नाही. पण राम रावांनी पुन्हा तेच म्हटल्यावर केशव म्हणाला…
” बाबा…मला दुसरे लग्न करायचे नाही आहे… मी सरिता सोबत खूप आनंदात आहे…आणि आम्हाला आजन्म मुल नाही झालं तरीही काही हरकत नाही…मी सरीताची साथ कधीच सोडणार नाही…”
” पण सरिताचा तुझ्या दुसऱ्या लग्नाला काहीच विरोध नाही…” रामराव म्हणाले.
” म्हणजे..? सरिता का म्हणून माझ्या दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल…मला काही कळले नाही..” केशव आश्चर्याने म्हणाला.
” म्हणजे आम्ही त्यांना पर्यायच असा सुचवला की सरिता नाही म्हणुच शकत नव्हती..”
” कोणता पर्याय..?”
” आम्ही सरिताच्या लहान बहिणीसोबत तुझं लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता…जेणेकरून सरिता सुद्धा इथेच राहील…”
” आणि सरिता आणि तिच्या घरच्यांनी हा प्रस्ताव मान्य देखील केला तर..”
” हो…आता सरिताने सुद्धा हे मान्य केले आहे…आता तर तुमची दुसऱ्या लग्नाला काही हरकत नाही ना..”
” माझी हरकत आहे…सरिताने हो म्हटले तरीही मी दुसरं लग्न कधीच करणार नाही…ना अंजु सोबत ना कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत…” असे म्हणत केशव रागातच रामरावांच्या खोलीच्या बाहेर पडला. त्याने गाडी काढली आणि सरळ सरीताच्या माहेरच्या दिशेने निघाला.
केशवला पाहताच सरिता धावतच घराबाहेर आली. केशवने तिच्या घरासमोर गाडी उभी केली आणि तो तिच्या घराच्या मागे असलेल्या शेताच्या दिशेने निघून गेला. केशव खूप रागात आहे हे सरिताला समजले होते. सरिता केशव कडे आली आणि म्हणाली…
” काही झालंय का..?”
” तुला माहिती नाही का..?”
” नेमकं कशाबद्दल बोलत आहात तुम्ही..?”
” म्हणजे तुला अजूनही कळलं नाही..”
” ………………………..”
” बरं तुला एक प्रश्न विचारू का..?”
” विचारा..”
” जर माझ्यात काही दोष आता आणि मला मुल होऊ शकलं नसतं तर तू मला सोडून दिलं असतं का..?”
” असं का बोलताय तुम्ही…मी तुमची साथ कधीच सोडली नसती..”
” मग मी तुझी साथ सोडून देईल असे का वाटले तुला..?”
केशवने असे विचारताच सारिताच्या अश्रूंचा बांध फुटला. केशव च्या गळ्यात पडून ती रडायला लागली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती म्हणाली.
” कारण माझी मनापासून इच्छा आहे की तुम्हाला मुलं असावीत…मी तुम्हाला मुलांचं सुख देऊ शकत नाही…पण तुम्हाला देखील अधिकार आहे सुखी राहण्याचा…तुम्ही आजवर मला खूप सुखात ठेवलंत…पण आता मला तुम्हाला सुखात पहायचंय…अंजु खूप चांगली मुलगी आहे…तुम्ही तिच्यासोबत खूप आनंदात राहाल…” सरिता म्हणाली.
” अन् तुला असं वाटतं की तुझ्याशिवाय मी आनंदात, सुखात राहीन…कधीच नाही…तू जशी आहेस तशी माझ्यासाठी परिपूर्ण आहेस…आधी मलाही वाटायचं की आपल्याला मूलबाळ हवं…पण नंतर मी वस्तुस्थितीला स्वीकारलं…मी तुझ्यासोबत खूप आनंदात आहे…” केशव म्हणाला.
” मी तुमचं काहीही ऐकुन घेणार नाही…तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी होकार द्या…”” तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल पण तरीही मी कधीच दुसरं लग्न करणार नाही…माझं तुझ्यावर असलेलं प्रेम कधीच कमी होणार नाही…तुझ्यामुळेच मला खऱ्या प्रेमाची परिभाषा कळली आणि मी प्रेम करायला शिकलो…माझ्या पहिल्या प्रेमाची जागा मी कधीच कुण्या दुसऱ्या व्यक्तीला देणार नाही…मी कधीच दुसरं लग्न करणार नाही हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि काहीही झाले तरी ह्यात बदल होणे नाही…”
असे म्हणून केशव तिथून जाऊ लागला. तेवढ्यात सरिताने त्याचा हात पकडुन त्याला थांबवले. केशवचे तिच्यावरील प्रेम पाहून ती भारावून गेली होती. तिच्याकडे बोलायला शब्दच उरले नव्हते. तिने केशवला घट्ट मिठी मारली. त्याच्या आश्वासक मिठीत तिला अगदी सुरक्षित वाटलं. तिने तिचं मुल न होण्याचं दुःख विसरून केशव साठी आनंदाने जगायचे ठरवले.
केशव आणि सरिता किसनला भेटले. दोघांनीही त्यांना आपला निर्णय सांगितला. किसन आणि अंजुला खूप आनंद झाला. राम रावांना मात्र केशवच्या निर्णयाचा खूप राग आला. त्यांनी केशवशी बोलणे सोडून दिले. मात्र ते जास्त दिवस केशव आणि सरिताशी अबोला ठेवू शकले नाही. शेवटी त्यांनी मोठ्या मनाने केशवचा निर्णय समजून घेतला आणि केशव च्या दुसऱ्या लग्नाचा हट्ट सोडून दिला.
इकडे घनश्यामच्या वडिलांनी आपणहून किसन कडे अंजु आणि घनश्यामच्या लग्नाची गोष्ट काढली. किसनने अगदी आनंदाने ह्या लग्नाला होकार दिला. अंजुच्या तर मनाचेच झाले होते. आणि लवकरच अंजु आणि घनश्याम चे लग्न थाटात पार पडले.
पाहता पाहता चार वर्षे निघून गेली. केशव आणि सरिता एकमेकांसोबत खूप आनंदात होते. आणि एके दिवशी सरिताला ती आई होणार असल्याची बातमी समजली. सरिताला तर हे सर्व एक स्वप्न वाटत होते. केशव तर आनंदाने वेडा व्हायचा बाकी होता. घरात आनंदी आनंद झाला. सरिताने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिच्या येण्याने केशव आणि सारीताच्या आयुष्याला पूर्णत्व लाभले. दोघांच्या आयुष्याला एक नवा बहर आला.
वरील कथा ही साधारण पंचवीस वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटने पासून प्रेरित आहे.
समाप्त.
(सत्यघटनेवर आधारित)
फोटो साभार –
©®आरती लोडम खरबडकर.
Khup chan .bhavsparshi katha. Awadali mala