त्या दिवशी पाऊस सुरू होता. तिने तिची स्कूटी ऑफिसच्या बाहेर उभी केली आणि ती ऑफिसमध्ये जाणार इतक्यात समोरून आलेल्या भरधाव बाईकने तिच्या कपड्यांवर रस्त्यावरचा चिखल उडवला.
तिच्या कपड्यांवर चिखल उडाला हे पाहून तो बाईक वरचा तरुण तिथेच थांबला आणि गाडी उभी करून तिला सॉरी म्हणायला गेला. ती आधीच खूप रागात होती. एकतर पावसामुळे ऑफिसला यायला उशीर झालेला आणि ह्याने आपले कपडे सुद्धा खराब केले. आज सगळा राग बहुधा ह्याच्यावरच उतरणार होता.
तो तिच्यासमोर आला आणि तिला सॉरी म्हणाला. ती खाली मान घालून तिच्या ड्रेस वरचा चिखल साफ करत होती. तो समोर आलेला पाहून तिने रागातच त्याच्याकडे पाहिले. पण त्याला पाहताच तिचा राग एका क्षणातच दूर झाला. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली.
” मयंक…तू…?”
” मानसी… तू इथे कशी…?” मयंक सुद्धा तिला पाहून आश्चर्य चकित झाला होता.
” अरे हे माझं ऑफिस आहे…मागच्याच महिन्यात जॉबला लागलीय इथे…” मानसी म्हणाली.
” अरे वा…माझं ऑफिस पण इथे समोरच आहे…आज थोडा उशीर झालेला म्हणून बाईक थोडी वेगाने चालवत होतो…आणि तुझ्या अंगावर चिखल उडवून बसलो…खरंच सॉरी मानसी…” मयंक म्हणाला..
” जाऊदे…जास्त नाही उडालाय…मी करेन साफ…तू वाईट वाटून नको घेऊस…” मानसी म्हणाली.
” बाय द वे…तू चिखल उडालेल्या कपड्यांवर सुद्धा छान दिसत आहेस…”
मयंकने असे म्हटल्यावर मानसी स्वतःशीच लाजली. पण लगेच तिच्या लक्षात आलं की ऑफिसला उशीर होतोय म्हणून तिने घाईघाईनेच त्याला निरोप दिला आणि ऑफिस मध्ये निघून गेली.
मानसी आणि मयंक दहावीपर्यंत सोबतच शिकायचे. दोघांचीही चांगली मैत्री होती. पुढे ती शिक्षणाच्या निमित्ताने तिच्या मामाच्या गावी गेली आणि हळूहळू तिच्याशी असलेला त्याचा संपर्क तुटत गेला.
दोघेही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले होते. दहावीनंतर ह्याने सायन्सला एडमिशन घेतली तर तिने आर्ट्स निवडले. दोघेही आपापल्या क्षेत्रात चांगले काम करत होते. मनापासून अभ्यास करायचे. शिक्षण पूर्ण झाले आणि दोघांनाही जॉब मिळाला. आणि त्या दिवशी दोघांचीही अचानकपणे भेट झाली होती.
दोघांचेही ऑफिस जवळ असल्याने दोघांची आता नियमितपणे भेट होऊ लागली होती. दोघांनीही नंबर सुद्धा एक्सचेंज केले. दोघांच्याही मैत्रीने हळूहळू नवीन वळण घेतले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
दोघांचेही बाहेर फिरायला जाणे, एकत्र वेळ घालवणे सुरूच होते. दोघांनाही प्रेमात पडून आता सहा महिने उलटून गेले होते. एके दिवशी मानसीने मयंक जवळ त्यांच्या लग्नाचा विषय काढला. त्यावर मयंक म्हणाला…
” अगं इतकी घाई कशाला करायची…आपलं अजुन वय तरी काय आहे…पुढचं पुढे बघू ना…आणि आता आपल्या दोघांनाही आपल्या करीअर कडे लक्ष द्यायचं आहे…”
” हो…पण भविष्याचा विचार सुद्धा आतापासून करायला काही हरकत नाही…” मानसी म्हणाली.
” ते बघू ना पुढे…आता कशाला जास्त विचार करतेस… जस्ट चिल यार…” एवढे बोलून मयंकने विषय बदलला. इतक्यात लग्नाचा विचार करणे म्हणजे जरा घाईच होईल म्हणून मानसीने सुद्धा जास्त विषय ताणला नाही.
दिवसामागून दिवस जात होते. मानसी आणि मयंक दोघेही एकमेकांच्या सोबत खुश होते. ऑफिस नंतर बाहेर भेटणं वगैरे सुरूच होतं. दोघांच्या बद्दल त्यांच्या घरच्यांना सुद्धा थोडीफार कल्पना आलेली होती. मानसीने मयंकची मित्र म्हणून तिच्या आईबाबांशी अनौपचारिक भेट सुद्धा घडवून आणली होती. तिच्या आईवडिलांना देखील मुलगा चांगला वाटला.
मयंकने सुद्धा तिची ओळख घरच्यांशी करून दिली. पण ऑफिस मधली मैत्रीण म्हणून. त्याला वाटलं आपल्या नात्याबद्दल घरच्यांना कळलं तर सगळेच लग्न करा म्हणून मागे लागतील. मयंक इतर बाबतीत खूप चांगला आणि समजुतदार होता पण लग्नाचा विषय काढला की तो लगेच विषय टाळायचा. सुरुवातीला ही गोष्ट सहज म्हणून सोडून देणारी मानसी आताशा त्याच्यावर चीडायला लागली होती.
पण मयंक लग्न करायच्या मनस्थितीत नव्हता.त्याला मानसी सोबत लग्न करायचं नव्हतं असं नाही. त्याचं मानसीवर मनापासून प्रेम होतं पण लग्नाच्या बाबतीत त्याला थोडी भीती वाटायची. आणि त्याला कारण म्हणजे त्याच्या दादा आणि वहिनींमध्ये होणारी भांडणे.
भांडणे तर त्याच्या आई वडिलांची सुद्धा व्हायची पण त्याला त्याच काही जास्त वाटलं नव्हतं. पण त्याच्या वहिनी आणि दादामध्ये मात्र अनेकदा भांडणे व्हायची. एखाद्या बाबतीत दोघांची मते वेगवेगळी असली की लगेच दोघांमध्ये भांडणाची सुरुवात व्हायची. मग दोघांमध्ये दोन तीन दिवस तरी अबोला राहायचा.
त्याच्या दादा आणि वहिनीचे सुद्धा लव्ह मॅरेज. दोघांनीही चार वर्षं एकमेकांना डेट केल्यावर लग्न केले. पण तरीही त्यांच्यामध्ये होणारी भांडणे पाहून मयंकच्या मनात लग्नाबद्दल भीती निर्माण झाली होती. आणि त्यामध्ये भर म्हणून त्याचे विवाहित मित्र सुद्धा लग्न झाल्यावर बायको त्यांना कशी छळते ह्याचे रसभरीत वर्णन करून सांगायचे. त्याला वाटायचं की त्याचं आणि मानसीच लग्न झाल्यावर त्यांच्यात सुद्धा अशीच भांडण होतील. म्हणून तो लग्नाचा विषय आला की टाळायचा.
पण मानसीला मात्र आता लग्न करून सेटल व्हायचं होतं. दोघांना भेटून आता दोन वर्षे होत आली होती. दोघेही आपापल्या नोकरीत बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले होते. शेवटी तिने पुन्हा त्याच्याकडे लग्नाचा विषय काढलाच.
” आणखी किती दिवस थांबणार मयंक…सांग ना आपण लग्न कधी करायचे…मला माझे पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे…” मानसी म्हणाली.
” इतक्यात काय घाई आहे…पुढे पाहुयात ना…” मयंक नेहमीप्रमाणे विषय टाळत म्हणाला.
” घाई कसली यात…आपल्याला भेटून दोन वर्ष झालीत…आपण एकमेकांना चांगलेच ओळखतो…घरच्यांचा पण काही विरोध होईल असे वाटत नाही…लग्नाचा विषय काढला की तू नेहमीच टाळतोस… तुझं खरच माझ्यावर प्रेम आहे का…तुला खरंच माझ्याशी लग्न करायचे आहे की नाही ते सांग एकदाचे…” मानसी चिडूनच म्हणाली.
” हे बघ मानसी…माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे…आणि मलासुद्धा आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे…पण त्यासाठी लग्नच का…आपण आता जसं एकमेकांना भेटतोय, बोलतोय तसचं यापुढेही एकमेकांसोबत राहू…लग्न झाल्यावर नाती खूप बदलतात…मग नवरा बायकोतील प्रेम संपते आणि नुसते वाद होतात…” मयंक म्हणाला.
” काहीही काय मयंक… असं काहीच नसतं…तू काहीतरी भलताच समज करून घेतला आहेस तुझा…” मानसी म्हणाली.
मग मयंक ने त्याच्या मनात आजवर असलेलं सारं तिच्यासमोर बोलून दाखवले. तो लहान असताना त्याच्या आईवडिलांची होणारी भांडणे आणि आता दादा आणि वहिनीची भांडणे आणि त्याच्या मित्रांचे त्यांच्या बायकांशी होणारे वाद ही सगळी उदाहरणे तिच्यासमोर ठेवली आणि म्हणून त्याची लग्न करण्याची इच्छाच नाही आहे हे सुद्धा सांगितले.
त्याचे लग्न न करण्यासाठीचे कारण ऐकुन मानसीला अधिकच राग आला. ती म्हणाली…
” तू फक्त अशाच नवरा बायकोची उदाहरणे पाहिलीत ज्याचं एकमेकांशी जास्त पटत नाही…पण अशीही कित्येक उदाहरणे आहेत ज्यांच एकमेकांवर मनापासून प्रेम आहे…”. मानसी म्हणाली.
” आज आपल्याला काही वाटणार नाही पण उद्या……”
” थांब मयंक…” त्याला मध्येच थांबवत मानसी म्हणाली. ” आपल्या भविष्याचा विचार तू आधीच करून ठेवला आहेस…लग्न झाल्यावर नवरा बायकोचं पटणार नाही हे सुद्धा तू ठरवून मोकळा झालास…आणि माझ्या मनाचा विचार न करता आयुष्यभर मी तुझ्यासाठी लग्न न करता तसच राहावं हे तूच मझ्यावतीने ठरवून टाकलंस…प्रत्येक बाबतीत फक्त स्वतःचा विचार करतोयस तू…लग्नाबद्दल माझी सुद्धा काही स्वप्ने आहेत…माझ्या आई वडिलांना माझा संसार बघायचा आहे आणि शिवाय समाजाची काही बंधने आहेत जी मला सुद्धा मान्य आहेत…तुला जर माझ्याशी लग्न करायचे नसेल तर मग मला नाही वाटत की आपल्या या नात्याला काही अर्थ आहे…तू एकीकडे प्रेम आहेस असेही म्हणतोस आणि दुसरीकडे आपल्या नात्यावर तुला विश्वास देखील दिसत नाहीय…म्हणून मला वाटतं आपण इथेच थांबायला हवं…” मानसी निश्चयाने म्हणाली.
क्रमशः