सीमाच्या सासूबाईंची सरलाताईंची चिडचिड अखंड सुरूच होती. काय तर म्हणे आज सीमाने चहात आलं नाही टाकलं. सीमा मात्र सवयीप्रमाणे सासूबाईंचे सगळेच गपगुमान ऐकून घेत होती. आणि आपले काम करत होती. सासूबाईंनी चहा घेतला आणि त्या शेजारच्या विमल काकूंकडे गप्पा मारायला निघून गेल्या. विमल काकू भाज्या निवडत होत्या. त्यांना पाहून सरला ताई म्हणाल्या.
” काय ग…दिवसभर नुसती कामात असतेस…दोन दोन सूना आहेत घरात तरीपण तुझं राबण सुरूच आहे…”
” अगं जोवर काम होतंय तोवर थोडफार काम केलं तर काय बिघडतंय…शिवाय सूनांच्या मागे सगळ्या घराची जबाबदारी आहे…शिवाय त्यांना लहान मुलं सुद्धा आहेत…मग अशा छोट्यामोठ्या कामात मी मदत केली तर त्यांनाच आधार होतो…” विमल काकू म्हणाल्या.
” कसलं ग…उलट आपण काम करायला लागलो की त्या आपल्याला गृहीत धरतात आणि मग आपल्या मनात असो बा नसो सगळी कामे आपल्यालाच करावी लागतात…मी तर माझ्या सुनेला अजिबात लाडावले नाही बघ…माझ्याकडून ना कसल्या अपेक्षा करते ना घरकामात मदत मागते…सगळं काही हातात मिळतं मला…” सरला ताई म्हणाल्या.
” तू खरंच नशीबवान आहेस बघ… नशिबाने इतकी चांगली सून मिळाली आहे तुला…सगळं काही तुला हातात आणून देते…तुला कधीच उलट उत्तर देत नाही…सगळं काही हसून करते…दुखलं खुपल तर स्वतःच्या आईप्रमाणे सेवा करते…अशी सून भाग्याने मिळते…” विमल काकू म्हणाल्या.
” भाग्याने कसली ग…तिचा डोळा माझ्याजवळ असलेल्या सोन्यावर आहे… तिला वाटते की तिने माझी सगळी सेवा केली तर मी तिला माझ्याजवळ असलेलं सोनं देऊन देईल…म्हणून इतकं सगळं करते माझ्यासाठी…नाहीतर हिचा हा चांगुलपणाचा मुखवटा केव्हाचा गळून पडला असता…” सरला ताई म्हणाल्या.
” मला नाही वाटत सीमा फक्त तुझ्या दोन अडीच तोळ्याच्या सोन्यासाठी तुझ्याशी चांगली वागत असेल…आजकाल इतकं कुणीच ऐकून घेत नाही बघ…तिचा स्वभाव मुळातच चांगला आहे…तू सुद्धा तिच्या चांगुलपणाची जाण ठेवून वागत जा तिच्याशी…” विमल काकू म्हणाल्या.
त्यावर मात्र सरलाताई तोंड वाकडं करून विमल काकूंच्या घरून निघून आल्या. त्यांना विमल काकूंचा सल्ला अजिबात आवडला नाही. त्यांच्या मते त्यांच्या कडक वागण्यानेच सीमा अजूनही एका मर्यादेत वागते. नाहीतर तिने आपल्याला एका शब्दानेही विचारले नसते.
सीमा सरला ताईंची सून बनून पाच वर्षांपूर्वी या घरात आली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत सरलाताई तिच्याशी अशाच फटकून वागायच्या. सरलाताईंच्या घरची परिस्थिती बरी होती. सरलाताईंकडे अडीच तोळे सोन्याचे दागिने होते. सुरुवातीला अत्यंत गरीब परिस्थिती तून आलेल्या सरलाताईंना आपल्या दागिन्यांचे फार अप्रूप होते.
आणि त्यांना नेहमीच वाटायचे की सीमाची नजर या दागिन्यांवर आहे. पण सीमा मात्र स्वभावाने खूप शांत आणि प्रेमळ होती. तिच्या तीन वर्षांच्या मुलाला सांभाळून सगळ्या घरातील कामे हसतमुखाने करायची. सरलाताईच फक्त इतक्या वर्षात तिचा चांगुलपणा पाहू शकल्या नव्हत्या
त्या सतत तिच्याबद्दल तक्रारच करायच्या. एकदा तर हद्द झाली. सीमाने चुकून भाजीत तिखट जास्त टाकले. तर सासूबाईंनी गोंधळ घातला. ही जाणूनबुजून माझी तब्येत खराब व्हावी म्हणून असे करते म्हणून सीमाला खूप सुनावले.
त्याचं दिवशी जवळच्याच गावात लग्न करून दिलेली त्यांची मुलगी सुगंधा त्यांच्या घरी आली. आधीच रागात असलेल्या सरलाताईंनी तिच्याजवळ सीमाबद्दल खूप काही वाईट सांगितले. सीमा मुद्दामहून मला कशी त्रास देते. वगैरे वगैरे. मग सुगंधा ने सुद्धा आवेशात येऊन सरलाताईंना स्वतःच्या घरी सोबत यायला सांगितले. सरला ताई सुद्धा बॅग भरून लगेच काही दिवसांसाठी म्हणून मुलीच्या घरी जायला निघाल्या.
सीमाने आणि संजयने त्यांना मनातील राग काढून घरीच थांबा अशी विनंती केली पण सरला ताई आज जरा जास्तच उत्साहात होत्या. मी इथून जाईल तेव्हाच घरच्यांना माझी किंमत कळेल असे त्यांना वाटत होते. मग सीमा आणि संजय सुद्धा जास्त काही बोलू शकले नाहीत.
सरला ताई सुगंधाच्या घरी काही दिवसांसाठी आल्या म्हणून सुगंधा सुद्धा आनंदात होती. सुगंधाला सासू सासरे नव्हते. घरी ती, तिचा नवरा आणि एक दोन वर्षांची मुलगी एवढेच राहायचे. आई काही दिवसांसाठी आली आहे म्हणजे आपल्याला आईचा आधार होईल असे तिला वाटले होते. पण इतके दिवस आपल्या सुनेला राबवून घेतल्यामुळे सरला ताईंना कामांची फारशी सवय राहिलेली नव्हती.
त्यामुळे इथेही त्यांना सगळे काही हातात द्यावे लागायचे. फरक फक्त एवढाच होता की त्यांना आता कोणत्याही गोष्टीला नावे ठेवता येत नसत. हळूहळू सुगंधा सुद्धा त्यांना सगळं काही हातात देऊन कंटाळली. आईचा आधार होण्याऐवजी तिच्या कामात वाढ झाली होती. नंतर ती त्यांना ते बोलून सुद्धा दाखवत असे. त्यांनी काही मागितलं की ती म्हणायची की मी सध्या कामात आहे तू स्वतःच करून घे.
आता मात्र सरला ताईंना स्वतःची कामे स्वतःच करावी लागत असे. हळूहळू त्यांना सीमाची किंमत समजायला लागली. पण त्या ते बोलून दाखवत नव्हत्या. सुगंधाच्या घरी येऊन आता त्यांना आठवडा जास्त झाला होता. आता त्यांना स्वतःच्या घराची ओढ लागली होती. संजय सुद्धा त्यांना घरी परत ये म्हणून फोन करायचा.
त्यांना पण जायचं होतं पण बोलावल्यावर लगेच गेलो तर आपलं मानपान राखल्या जाणार नाही म्हणून त्या आजचे जाणे उद्यावर ढकलत होत्या. पण स्वतःच्या घरी जायच्या आधीच त्यांची तब्येत खराब झाली. त्यांच्या डोळ्यांनी आता त्यांना नीट दिसत नव्हतं. डोळे लाल झाले होते. त्यांना दवाखान्यात दाखवायचे म्हणून सुगंधा त्यांना दवाखान्यात घेऊन गेली.
तेव्हा गावातील डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या आईला डोळ्याचे इन्फेक्शन झाले आहे. आणि त्याच्यावर उपचारासाठी त्यांना शहरातील मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल. लवकर उपचार झाले नाहीत तर इन्फेक्शन वाढून त्यांना कायमचं अंधत्व येण्याची शक्यता आहे. सुगंधा आणि तिच्या नवऱ्याने शहरातील मोठ्या दवाखान्यात उपचारांच्या खर्चाची जबाबदारी आपल्यावरच येईल म्हणून आईला पुन्हा घरी नेऊन सोडायचे ठरवले.
सुगंधा आईला पुन्हा घरी घेऊन आली. आईला पाहून संजय आणि सीमा दोघांनाही आनंद झाला पण सुगंधा ने जेव्हा आईच्या डोळ्यांच्या इन्फेक्शनबद्दल सांगितले तेव्हा त्यांना आईची काळजी वाटली. आईची तब्येत खराब आहे हे पाहून संजयने लगेच त्यांना शहरात मोठ्या दवाखान्यात हलवले.
डॉक्टरांनी सरलाताईंना तपासले आणि सांगितले की त्यांच्या डोळ्यांचे छोटेसे ऑपरेशन करावे लागेल. रक्कम काही खूप जास्त नव्हती पण संजयच्या मानाने जरा जास्तच होती. शिवाय ही वेळ पेरणीची असल्याने जवळचा बराच पैसा शेतीच्या मशागतीसाठी आणि पेरणीसाठी खर्च झालेला होता. जवळच्या पैशात आणखी पैशांची भर हवी होती.
मग अशावेळी सीमा स्वतःहून पुढे आली आणि तिच्या कानातील लग्नात आलेले एका तोळ्याचे कानातले तिने तिच्या सासूबाईंसाठी गहाण ठेवले आणि ऑपरेशन नीट पार पडले.
घरी आल्यावर सासूबाईंना जास्तीत जास्त आराम मिळावा म्हणून सीमा दिवसरात्र झटत होती. त्यांच्या जेवणाच्या वेळा, त्यांचे पथ्यपाणी, त्यांना वेळोवेळी बाथरूमला घेऊन जाणे हे सगळं सीमा निगुतीने निभावत होती.
आणि त्याचाच परिणाम म्हणून सरलाताई लवकरच बऱ्या झाल्या. तेव्हा त्यांना भेटायला सुगंधा आली. मायलेकींची भेट झाल्यावर सुगंधाने सहज म्हणून संजयला विचारले.
” मोठ्या दवाखान्यात खर्च सुद्धा बराच लागला असेल ना दादा… बरं झालं तुझ्याकडे पैसे होते नाहीतर किती गैरसोय झाली असती ना…”
क्रमशः
पारख – भाग २(अंतिम भाग)
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल.