होळीचा सण होता. आजुबाजूच्या घरातून छान पुरणपोळीचा सुगंध येत होता. रमाच्या घरी मात्र आज किराणा म्हणून फक्त थोडेसे तांदुळच होते. तिने त्याचाच भात लावला. सणाच्या दिवशी लोकांकडे उसने मागायला जाणे तिला बरे वाटले नाही. तिचा नवरा आजसुद्धा दारू पिऊन घरात झोपला होता. तिची मुले मात्र शेजारच्या मुलांमध्ये खेळायला गेलेली होती. तिची मोठी मुलगी लक्षी पाच वर्षांची होती आणि तीन वर्षांचा एक मुलगा होता.
रमा शेतात मजुरीला जायची. कधी काम मिळत असे तर कधी नाही. तिचा नवरा सुद्धा मजुरी करायचा पण सर्व पैसे दारुमध्ये उडवायचा. संसाराला त्याचा आधार असूनही नसल्यासारखा. पण रमा मात्र मुलांकडे पाहून दिवस काढत होती. कधीतरी हे दिवस सुद्धा बदलतील अशी तिला आशा होती.
इतक्यात रमाची दोन्ही मुले बाहेरून घरात परत आली. रमाने त्यांना हातपाय धुवायला सांगितले आणि जेवायला वाढून दिले. ताटात भात बघून तिची मुलगी तिला म्हणाली.
” आई मला भात नको…मला पुरणाची पोळी पाहिजे..”
” आपण परत कधीतरी करू ना पुरणपोळी…आज तू भात खा…” रमा तिला समजावत म्हणाली.
” नाही…मला आताच पाहिजे पुरणाची पोळी…आज सर्वांच्या घरी पुरणपोळी आहे…मलापण पाहिजे…” ती म्हणाली.
” तुला सांगते ना नंतर करू म्हणून…तो भात खाऊन घे मुकाट्याने…” रमा म्हणाली.
” मी नाही खाणार…मला पुरणपोळी पाहिजे…” असे म्हणत ती रडायला लागली.
आता मात्र रमा चिडली. तिने लक्षी च्या पाठीत एक धपाटा घातला. तशी लक्षी चूप बसली आणि मुकाट्याने भात खाऊ लागली.
रमाला मात्र खूप वाईट वाटले. आज सर्वांच्या घरी पुरणपोळी केली होती पण तिच्या मुलांना मात्र नुसता भात खाऊन समाधान मानावं लागणार होतं. उद्यापासून तिला परत मजुरीला जायचं होतं…मग मजुरीचे पैसे मिळाले की ती सगळं सामान आणून लक्षीला पुरणपोळी करून देणार होती. आज मात्र तिचा नाईलाज होता. कारण आज घरी फक्त तांदूळ होते.
लक्षीने कसाबसा भात खाऊन संपवला आणि तिच्या भावासोबत खेळायला लागली. पण आज पुरणपोळी न मिळाल्यामुळे लक्षी खूप नाराज होती. तिचा भाऊ लहान असल्यामुळे त्याला काही समजत नव्हतं. पण लक्षीच्या सर्व मैत्रिणींच्या घरी आज पुरणपोळी केली होती हे तिला माहिती होते. त्यामुळे तिला वारंवार पुरणपोळी खायची इच्छा होत होती.
रमाला लक्षीची इच्छा कळत होती. आणि त्यामध्ये काही चुकीचं नव्हतं. पण दारिद्र्य काही तिची पाठ सोडत नव्हते. शेवटी रमा ने देवाला हात जोडले.
” काय रे देवा…किती परीक्षा पाहणार आहेस माझी…काही केल्या माझ्या माझ्या दुखांना अंत नाही बघ…माझ्या मुलीला साधी पुरणपोळी सुद्धा देऊ शकत नाही मी…तिला रडताना बघून खूप त्रास होतो रे मला…”
इतक्यात तिच्या दाराबाहेर उभी राहून तिची पुतणी तिला आवाज देत होती. रमाने दार उघडले.
” काकू ते आईने गाईला नैवेद्य पाठवला आहे.”
” ठीक आहे…दे इकडे…” असे म्हणत रमाने नैवेद्याचे ताट घेतले. तिची पुतणी निघून गेली.
रमा आत आली आणि तिने ते नैवेद्याचे ताट गाईच्या पुढ्यात ठेवले. गाय मात्र त्या नैवेद्याला तोंड लावत नव्हती. रमाला नवल वाटले. तिने परत ते ताट गाईच्या तोंडासमोर धरले. पण तरीही गाय नैवेद्याला तोंड लावत नव्हती.
इतक्यात तिचे लक्ष त्या ताटाकडे गेले. त्यामध्ये पुरणपोळी होती. तरीही गाय खात नव्हती. इतक्यात लक्षी तिथे आली आणि पुरणपोळी पाहून खुश झाली.
” आई मला पुरणपोळी दे..” लक्षीने असे म्हणताच रमा चिंतेत पडली. गाईच्या नैवेद्याला लक्षीला कसं देणार. उगाच पाप चढेल. पण गाय मात्र ती पोळी खात नव्हती आणि लक्षी सारखी सारखी पुरणपोळी मागत होती. शेवटी रमाने गाईची माफी मागितली आणि त्या नैवेद्याच्या पुरणपोळीेतील अर्धी पोळी लक्षीला दिली आणि अर्धी गाईच्या समोर ठेवली.
लक्षीने आनंदाने ती अर्धी पुरणाची पोळी खाल्ली. तिच्या चेहऱ्यावर खूप समाधान होते. ती पोळी खाऊन आनंदाने खेळायला निघून गेली. आणि ती गेल्यावर गाईने तिच्या पुढ्यात ठेवलेली अर्धी पुरणाची पोळी खाल्ली.
जणू त्या गाईला सुद्धा कळलं होतं की घरातल्या मुलांना पुरणपोळी मिळाली नाहीय. म्हणून ती सुद्धा पुरणपोळीला तोंड लावत नव्हती. आणि लक्षीने पोळी खाल्ल्यानंतरच गाईने पोळीला तोंड लावले. मुक्या जनावरांना देखील भावना असतात हे तिने आज अनुभवले होते.
रमाच्या डोळ्यात अश्रू आले. देवसुद्धा कोणत्या रूपात येऊन मदत करून जाईल सांगता येत नाही. तिने मनोमन देवाचे आभार मानले. तिचा देवावरचा विश्वास आज दृढ झाला होता.
© आरती निलेश खरबडकर.