निकिताला सिंगापूर मध्ये होणाऱ्या एका कॉन्फरन्स साठी आमंत्रित करण्यात आले होते. तिच्यासाठी ही संधी खूप मोठी होती. मार्केटिंग मध्ये तिने अगदी थोड्याच काळात आपली स्वतःची अशी एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. आणि तिच्या या यशामध्ये तिच्या नवऱ्याचा म्हणजेच मिहिरचा मोठा वाटा होता.
मिहिरने नेहमीच निकिताला साथ दिली. जेव्हा जेव्हा निकिता अपयशाने खचून जायची तेव्हा मिहिर तिला नवी भरारी घेण्याची उमेद द्यायचा. मिहिर आणि निकिताच्या लग्नाला चार वर्ष झाली होती. दोघांचे लव्ह मॅरेज होते.
दोघांमधील प्रेम हे दिवसागणिक वाढतच होते. मिहिर आणि निकिता एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते. आणि त्यामुळेच निकिताला मिहिर पासून दूर महिनाभर दूर राहायचे जरा टेन्शन आले होते. तिचे टेन्शन मिहिरने ओळखले होते.
” हे बघ निकिता…तू काळजी नको करुस…हा एक महिना कसा निघून जाईल तुला कळणार देखील नाही…” मिहिर तिला समजावण्याचा सुरात म्हणाला.
” अरे पण मी आजवर तुला सोडून इतके दिवस कुठे लांब राहिलेली नाहीय ना…त्यामुळे जरा टेन्शन येत आहे…तू एकटा कसं मॅनेज करशील सर्वकाही…तुला तर नीट स्वयंपाक सुद्धा येत नाही…” निकिता काळजीने म्हणाली.
” तुझ्यासाठी ही संधी खूप मोठी आहे…आणि मला तुझा अभिमान आहे…आणि राहिली गोष्ट माझी तर तू नसताना मी शिकेल की स्वयंपाक…आणि जमलाच नाही तर अगदी हाकेच्या अंतरावर माझं सासर आहे…तिथे जाईल जेवायला…” मिहिर म्हणाला.
” हो…आई सुद्धा म्हणत होती की जावईबुवांना घरीच पाठवत जा जेवायला…नाहीतर रोज बाबांच्या हातून डबा पाठवणार म्हणाली…”
” मग चांगलंच आहे की…तू अगदी निश्चिंत होऊन जा…आणि तुझ पूर्ण लक्ष कॉन्फरन्स कडे असू दे…मी इथे अगदी शहाण्या बाळा प्रमाणे राहील…” मिहिर म्हणाला.
” ठीक आहे…पण तू रोज न चुकता मला फोन करायचा…रोज दिवसातून किमान चार फोन तरी यायला हवेत तुझे…” निकिता म्हणाली.
” नक्कीच करणार की राणी सरकार…न करून कसं चालेल…तू आता तयारीला लाग…फक्त दोनच दिवस उरलेत तुला जायला…” मिहिर म्हणाला.
दोन दिवसांनी निकिता सिंगापूरला गेली. तिला तेथील वातावरण खूप आवडले होते. पण तरीही तिला सारखी सारखी मिहिर ची आठवण यायची. मिहिर सुद्धा तिला न चुकता फोन करायचा. दोघेही दिवसभर काय झाले हे एकमेकांना सांगायचे. असेच पंधरा दिवस निघून गेले.
मात्र नंतर मध्येच एके दिवशी मिहिरने निकिताला फोन केलाच नाही. निकिताने दिवसभर मिहिरच्या फोन ची वाट पाहिली पण मिहिर ने तिला फोन केलाच नाही. शेवटी संध्याकाळी तिनेच मिहिरला फोन लावला. रिंग जात होती पण मिहिर काही फोन उचलत नव्हता.
आता मात्र निकिता काळजीत पडली. तिला वाटले माहेरी फोन करावा आणि मिहिर बद्दल विचारावे पण बरीच रात्र असल्याने तिने फोन केला नाही. मात्र त्या रात्री तिला अजिबात झोप लागली नाही.
निकीताला खूप टेन्शन आले होते. मिहिर ठीक असेल ना? असा वारंवार विचार येत होता. तिने सकाळी परत मिहिरचा फोन ट्राय केला. आधी त्याने कॉल उचलला नाही. पण दोन मिनिटांनी त्याने लगेच तिकडून कॉल केला.
” हॅलो…निकिता..”
” हॅलो…मिहिर…कसा आहेस तू… काल मला फोन का नाही केलास…आणि माझे कॉल सुद्धा उचलले नाहीस…तू ठीक आहेस ना…”
” हो ग…मी ठीक आहे… काल संध्याकाळी जरा लवकर झोप लागली होती म्हणून कॉल केला नाही…”
” अरे पण टेन्शन मुळे मला रात्रभर झोप आलेली नाही…डोक्यात कसले कसले विचार येत होते माझ्या…”
” असं काहीच नाही…मी पूर्णपणे ठीक आहे…तू काळजी करू नकोस…तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर…मी इथे सर्वकाही व्यवस्थित सांभाळेल…”
” ठीक आहे…स्वतःची काळजी घे मिहिर…”
” तू सुद्धा काळजी घे…आणि मला आता थोडं काम आहे…मी नंतर बोलतो तुझ्याशी…”
एवढं बोलून मिहिरने फोन ठेवून दिला. निकिता मात्र विचारात पडली. माझ्याशी न बोलता मिहिर कसा झोपला असेल. आणि सकाळी सुद्धा जास्त बोलला नाही. त्याच्या बोलण्यातून वाटत होते की तो काहीतरी लपवत आहे. पण त्याचेही काहीतरी कारण असेलच की. निकिताने ठरवले होते की जोपर्यंत तो स्वतःहून सांगणार नाही तोपर्यंत ती त्याला विचारणार नाही.
त्या दिवशीपासून मिहिरने निकिताला कॉल करणे कमी केले होते. कॉल केला तरीही तो मोकळेपणाने बोलायचा नाही. थोडीफार विचारपूस करून फोन लगेच ठेवून द्यायचा. तिने तिच्या माहेरी सुद्धा फोन करून मिहिर बद्दल विचारपूस केली. ते सुद्धा म्हणाले की इथे सर्व ठीक आहे आणि जावईबापू सुद्धा ठीक आहेत.
पण तरीही निकिताला मात्र टेन्शन आलेलं होतं. मिहिर तिच्यापासून काहीतरी लपवत आहे हे तिला कळत होते. पण त्याला विचारावं कसं हे तिला कळत नव्हते. तिने आडून आडून त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण मिहिरtने स्वतःहून काहीच सांगितले नाही.
इकडे निकिताचे मन मात्र लागत नव्हते. मिहिर आपल्याकडे दुर्लक्ष करतोय ही भावना तिच्या मनामध्ये घर करत होती. अगदी पंधरा दिवसातच तो एवढा बदलला होता. त्याला माझ्याशी बोलावे वाटत नसेल का…? हा प्रश्न निकिता ला सतावू लागला होता.
तिने मनातल्या मनात खूप काही दडवून ठेवले होते. तिला आता वाटत होते की मिहिर ला तीच्यावाचून राहण्याची सवय झाली असेल. त्याचे निकिता वरील प्रेम कमी झाले असेल वगैरे वगैरे.
निकिताची कॉन्फरन्स संपली होती. ती उद्या मायदेशी परत येणार होती. ती ठराविक वेळेच्या एक दिवस आधीच येणार होती. आणि तिने ती एक दिवस आधीच येणार आहे हे मिहिर ला सांगितले नव्हते. तिला मिहिरला सरप्राइज द्यायचे होते.
निकिता भारतात परतली. एअरपोर्ट वरून ती सरळ तिच्या घरी आली. त्या दिवशी रविवार होता. त्यामुळे तिला वाटले की मिहिर घरीच असेल. घरी येऊन बघते तर मिहिर घरी नव्हता. ती पुन्हा विचारत पडली. एव्हाना तिच्या मनात नको ते विचार येत होते. मिहिर आपल्यापासून दूर चाललाय ह्या विचाराने तिचे मान सैरभैर झाले. ती तशीच तिथून निघून जवळच असलेल्या तिच्या माहेरी गेली.
तिला बघून तिच्या घरच्यांना खूप आनंद झाला. ती घरात गेली तेव्हा मात्र तिला मोठा धक्का बसला. मिहिर तिथेच होता. मात्र त्याच्या डोक्याला पट्टी बांधली होती. पाय सुद्धा फ्रॅक्चर झाला होता. निकिता ला पाहून त्याने बेडवरून उठायचा प्रयत्न केला. मात्र तो नीट उठू शकत नव्हता. निकिताने धावतच जाऊन त्याला सांभाळले. त्याला उठण्यात मदत केली.
” काय झाले तुला मिहिर…तुझ्या डोक्याला ही पट्टी का बांधली आहे… आणि पायाला सुद्धा प्लास्टर लागलंय…मला काळजी वाटतेय रे… सांग ना तुला काय झाले ते…” निकिता ने काळजीच्या सुरात मिहीरला विचारले.
” अग काही नाही…एक छोटासा अक्सिडेंट झाला होता…पण आता ठीक आहे…आणि हे पायाच प्लास्टर सुद्धा पंधरा दिवसांनी काढणार आहेत…” मिहिर म्हणाला.
” अरे पण मला का नाही सांगितले…मी सर्व काही सोडून आले असते ना तुझ्याजवळ…इथे तुला माझी गरज होती आणि मी मात्र तुझ्याजवळ नव्हते…” निकिता रडवेली होत म्हणाली.
” आणि मला तेच नको होते.” मिहिर म्हणाला.
” म्हणजे..?”
” अग तू सर्व काही सोडून आली असतीस आणि मला तेच नको होते…तुला तिथे टेन्शन आले असते म्हणून नाही सांगितले… तू ही कॉन्फरन्स पूर्ण करूनच यावे अशी माझी इच्छा होती म्हणून…”
” अरे पण तू इथे एकटा होता ना..”
” मी एकटा नव्हतोच…तुझ्या आईवडिलांनी माझे आईवडील बनून मला आधार दिला…माझी खूप सेवा केली…माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला… खरं म्हणजे मला तुझे आभारच मानायला हवे कारण आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला इतकी चांगली माणसं मिळाली…” मिहिर म्हणाला.
” पण तरीही तू मला सांगायला हवं होतं…पण तू सांगितलं नाहीस अन् आई बाबांनी सुद्धा मला काही सांगितलं नाही…मी तुमच्यावर ही रागावली आहे बाबा” निकिता तिच्या बाबांकडे पाहून म्हणाली.
” मी तुला सांगणार होतो बाळा…पण जावाईबुवा म्हणाले की तुला उगाच टेन्शन येईल…त्यांनीच आम्हाला तुला सांगायला मनाई केली होती…त्यांनी शुद्धीवर आल्यावर सर्वात आधी तुलाच फोन लावला होता…पण अक्सिडेंट बद्दल काही सांगितलं नाही…आणि आम्हाला पण म्हणाले की निकिता आल्यावर सांगू तिला सगळं…तोपर्यंत काहीच सांगू नका…त्यांना त्या परिस्थितीत सुद्धा तुझीच काळजी होती…म्हणून मग आम्हीसुद्धा काहीच सांगितले नाही… खरंतर तुझ भाग्य थोर म्हणून तुला इतका चांगला नवरा मिळाला आहे…जो स्वतःपेक्षा जास्त बायकोचा विचार करतो…” निकीताचे वडील म्हणाले.
“आहेच मी भाग्यवान” निकिता मनातल्या मनात म्हणाली. पण निकिता ला वाईट सुद्धा वाटत होते. कारण नकळतपणे तिने मिहिर वर संशय घेतला होता. पण मिहिर मात्र इकडे आलेल्या संकटाशी एकट्याने तोंड देत होता. फक्त तिच्यासाठी. निकिताला आपल्या नवऱ्याचा अभिमान वाटला. आज तिच्या मनात मिहिर बद्दल असलेला आदर वाढला होता. आणि दुराव्याने प्रेम वाढले होते.
आपल्यासोबत सुद्धा बरेचदा असे होते. कधी कधी आपण एखाद्याच्या वागणुकीचा चुकीचा अर्थ काढतो. पण प्रत्यक्षात खरं काय ते समजल्यावर मात्र आपल्याला आपली चूक कळून येते. पण आपण जर चौफेर विचार करून, त्याच्या इतर बाजू लक्षात घेऊन नंतर त्याबद्दल मत बनवले तर आपल्याला गैरसमज होणार नाहीत…नाही का ?
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
खरचं खुप छान!
बरेचदा आपण सर्व बाजुंनी विचार न करता गैसमज करून घेतो,
खरतर चौफेर विचार करायला हवा ,गैरसमज दूर होतील!!!😊👍👌
मनापासून धन्यवाद 🙏