दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेले होते तेव्हा सहज म्हणून मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला गेले. मैत्रीण सुद्धा दिवाळी निमित्ताने माहेरी आलेली होती. मला पाहून तिला खूप आनंद झाला. आम्ही खूप गप्पा केल्या. तेव्हा कळले की तिच्या लहान बहिणीचे लग्न ठरले आहे. तिचे अभिनंदन करावे म्हणून मी तिच्याजवळ बोलायला गेले.
” अभिनंदन मनीषा…तुझ लग्न जुळल हे ऐकुन खूप आनंद झाला.”
मनीषा लाजली. ती माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे तिला लाजताना पाहून मला गंमत वाटली.
” काय करतो मुलगा..? आणि कुठे राहतो..?”
” शहरात दुकान आहे आणि घरी शेतीसुद्धा आहे…”
” छान…तुला आवडलाय ना मुलगा…”
मी हे विचारताच ती परत लाजली. इतक्यात मागून तिची आई आली आणि म्हणाली.
” अग तिला स्थळं तर खूप आली होती. यापेक्षा बरीच चांगली होती. पण मनीषा म्हणाली मला हेच स्थळ पसंत आहे म्हणून…मग म्हटलं तिला पसंत आहे तर काय हरकत आहे…”
” हो का..पण असं काय विशेष आहे या मुलामध्ये ?…जे मनिषाला आवडलं…” मी सहजच विचारले.
” अग ताई…ह्या मुलाला आई नाही…मागच्या वर्षी कसल्यातरी आजाराने वारली ती…म्हणजे मला सासूची कटकट नाही…म्हणून म्हटलं थोडफार कमी जास्त असलं तरी चालेल पण हाच मुलगा ठीक आहे..” मनीषा सहजपणे सांगत होती.
मला मात्र हे ऐकुन धक्काच बसला. मुलाला आई नाही म्हणून होकार दिला हे काही मला पटलं नाही. बिचाऱ्या त्या मुलाला जगात सर्वात मोठे दुःख त्याच्या आईच्या जाण्या
चे झाले असेल. आणि हिने त्यामध्ये पण संधी शोधली. हिला सुद्धा आई आहे. उद्या हीच्या भावाच्या बायकोने पण असाच विचार केला तर हिला चालेल का..?
मला वाटलं तिची चांगली कानउघडणी करावी. पण मी स्वतःला सावरले आणि तिला म्हटले.
” अग पण…सासू नाही यात काय चांगले आहे…उलट तुला एकटे एकटे वाटेल…सासूचा तर आधारच होईल तुला…”
” सासूचा काही आधार वगैरे नसतो ग ताई…आता प्रियाताईची सासुच बघ ना…सारखी तिच्या मागे लागलेली असते…हे असच कर आणि हे तसच कर…प्रत्येक कामामध्ये नाक खुपसत असते…भाजी अशीच करायची…पोळ्यांचा आकार असाच हवा…माहेर जास्त दिवस राहायचं नाही…आणि काय काय…मला नको ही कटकट…सासू म्हणजे डोक्याला ताप…आणि देवाच्या कृपेने मुलाला आई नाही…म्हणजे माझ्या मागे सासूचे टेन्शन नसणार…” मनीषा हसत म्हणाली.
आता मात्र मला खूप राग आला. मी मैत्रिणीला निरोप दिला आणि घरी जायला निघाले. इतक्यात तिची आई म्हणाली…
” अग शुभांगी…काय म्हणतेय तुझ शिक्षण…किती वर्ष चालणार आणखी…आमची प्रिया तुझ्याच वयाची आहे पण तिच्या लग्नाला दोन वर्ष झालेत…आणि आता तर मनिषाचे सुद्धा लग्न ठरले…शिकल्याने नोकरी लागतेच असं नाही…म्हणून लवकर लग्न उरकून टाक…वय व्हायच्या आधी…”
” मी फक्त मान डोलावली आणि तिथून निघाले. खरंतर मला त्यांचा खूप राग आला होता. काकूंना सुद्धा एक मुलगा होता. त्या सुद्धा कधीतरी कोणाच्या सासू होणार हे माहिती असूनही त्या मनिषाला काही समजावून सांगत नव्हत्या. आणि उलट माझ्या लग्नाची काळजी करत होत्या. प्रिया बारावी मध्ये नापास झाली म्हणून तिचे लग्न ह्यांनी लवकर उरकले. पण माझ्या घरच्यांना माझ्या लग्नाची काही घाई नव्हती. माझे पुढे शहरात जाऊन शिक्षण घेणे म्हणजे प्रिया च्या आईला मूर्खपणाच वाटायचा. कारण करायचे तर शेवटी लग्नच आहे मग काय करणार जास्त शिकून असा त्यांचा समज होता.
मी घरी आले. तेव्हा माझ्या मनात मनिषाचा विचार सुरूच होता. पण मी त्या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आणि दिवाळीची सुट्टी संपल्यावर मी परत शहरात आले.
मनिषा चा विषय आता मी पूर्णपणे विसरले होते. पुढे मनिषाचे लग्न झाले आणि ती सासरी गेली. मला मात्र तीच्या लग्नात जायला काही जमले नाही.
पुढे दोन वर्षांनी पुन्हा एकदा प्रियाच्या घरी जाण्याचा योग आला. मनीषा सुद्धा घरी आलेली होती. प्रिया आणि मनीषा ह्या दोघीही जवळपास एका महिन्याच्या फरकाने बाळंत झाल्या होत्या. मी त्यांना भेटायला गेले तेव्हा दोघींनाही फार आनंद झाला. प्रिया एकदम खुश दिसत होती पण मनीषा मात्र थोडी नाराज दिसत होती. मी त्यांच्याशी बोलत होते इतक्यात प्रियाची आई तिथे आली आणि सांगू लागली.
” बरं झालं तू आज आलीस…प्रिया आणि मनीषा दोघींचीही भेट झाली…मनीषा परवा तिच्या सासरी जात आहे…तुझी भेट घ्यायची राहून गेली असती…”
” पण काकू.. मनिषाच बाळ अजुन फक्त दोन महिन्यांच आहे…इतक्या लवकर कशी परत जाणार ती…तिला कसे जमेल सर्व…” मी म्हणाले.
” ते तर आहेच…पण तिचाही नाईलाज आहे…तिच्या घरी तिचा सासरा अन् नवऱ्याच तिलाच करावं लागत…आधीही आठव्या महिन्या पर्यंत तिने सर्वकाही कामे केलीत घरची…सासू नसल्यामुळे तिला फारस माहेरी सुद्धा राहायला मिळत नाही ग…आली की लगेच तिच्या नवऱ्याचा फोन येतो…स्वयंपाकाची सोय होत नाही म्हणून…लग्न झाल्यापासून दोन दिवसांच्या वर माहेरी राहिलीच नाही ती…पण प्रियाच बरं आहे हो…तिची सासू तिच्यामागे सर्वकाही सांभाळते…प्रियाला छान आराम मिळतो…तिच्या सासूबाई तिला काय हवं काय नको ते विचारतात…म्हणाल्या की तुला जितके दिवस माहेरी आराम करायचा असेल तू कर…खरंच प्रियाने नशीब काढलं आमच्या…”
तेवढ्यात मनीषा म्हणाली…
” हो ना ग ताई…मला माहेरी यायलाच मिळत नाही…आणि घरची सगळी जबाबदारी माझ्या एकटीवर येऊन पडलीय…त्यामध्ये पाहुणे आले की मग तर विचारूच नको…अगदी तारेवरची कसरत करावी लागते…”
” अग पण तुलाही हेच हवे होते ना…घरी सासू नसावी…घराचा सगळा डोलारा तू एकटीने सांभाळावा..सासूची कटकट नसावी…राजा राणीचा संसार असावा…मग आता तर सर्वकाही तुझ्या मनासारखे झाले ना..” मी कुत्सितपणे म्हणाले.
” नाही ग ताई…खरंच माझे चुकले…मी असा विचार करायला नको होता…प्रत्येक सासू काही वाईट नसते…उलट सासू असेल तर तिचा आपल्याला आधारच असतो…आज मला सासू असती तर तिनेसुद्धा आनंदाने माझ्या मुलाला वागवलं असतं…माझ्या मुलाला हक्काची आजी असती… प्रियाताईची सासू तिला प्रत्येक कामात टोकत असते पण त्यामुळेच आज प्रियाताई प्रत्येक कामामध्ये सुगरण झालीय…शिवाय ती जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तिच्या सासूने तिचे सगळेच लाड पुरवले…खूप काळजी घेतली तिची…मला मात्र सर्वकाही एकटीनेच करावं लागलं…” हे बोलता बोलता मनिषाच्या डोळ्यात पाणी आले.
“आज जर तुझी सासू असती तर तुला खूप आधार झाला असता…आज तू एका मुलाची आई झाली आहेस…उद्या सासू होशील…जर तुझ्या सुनेने सुद्धा मला सासू नको असे म्हटले तर तुला काय वाटेल…प्रत्येक सासू वाईट असते असे नाही…बरेचदा ते आपल्या स्वभावावर पण अवलंबून असते…पण आपण सासूच्या बाबतीत सतत गैरसमज करून घेत असतो…” मी म्हणाले.
” हो ना ग ताई…तू बरोबर बोलत आहेस…मी आधी फार चुकीचा विचार करायचे…पण आता मला कळत आहे…” मनीषा म्हणाली.
मनिषाला तिची चूक कळली होती. आणि सोबत सासूचे महत्त्व सुद्धा.
आपलं सुद्धा असच असतं. आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला किंमत नसते. आणि जे नाही त्याच्यासाठी मात्र आपण झुरतो. प्रियाला माया लावणारी तिची सासू आहे पण तिला त्यांचे सतत तिला प्रत्येक कामामध्ये सल्ला देणे आवडत नाही. पण त्यामागे त्यांचा हेतू मात्र प्रियाला प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने जमावे हाच असतो. ज्याचा त्याचा स्वभाव असतो. कोणी प्रेमाने समजावून सांगते तर कोणी कठोरपणे. पण त्यामागचा त्यांचा हेतू काय हेदेखील लक्षात घ्यायला हवे. काही सासवा वाईट असतीलही…पण त्यासाठी प्रत्येक सासूला वाईट समजणे हे मला फार चुकीचे वाटते.
©आरती निलेश खरबडकर.
(अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.)
Nice Thinking Vahini👌👌👌👍💯% Right👍
Thanks 😊
खूप छान आहे कथा. अणि खरच आहे.