राधिका ऑफिसमधून घरी आली आणि तिचा लहानगा श्लोक आई आई करत तिला जाऊन बिलगला. राधिकाने सुद्धा त्याला प्रेमाने मिठीत घेतले आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. मायलेकाच हे रोजचंच होतं. श्लोक रोज संध्याकाळी आईची वाट पहायचा आणि आई दिसताच तिला जाऊन मिठी मारायचा आणि आज दिवसभर शाळेत काय घेडके आणि काय नाही ते तिला सांगायचा.
त्यानंतर फ्रेश होऊन लगेच किचन मध्ये कामाला लागणार इतक्यात तिच्या सासुबाई तिच्या समोर चहाचा कप घेऊन आल्या. आणि म्हणाल्या.
” अग आरामात चहा घे…आणि मग कर कामाला सुरुवात… कामे तर रोजचीच आहेत…”
राधिका ने मानेनेच सासूबाईंना हो म्हटले आणि चहाचा कप घेऊन तिथेच स्वयंपाकघरातील खुर्चीवर बसून चहा प्यायला लागली. पण चहाच्या गोडव्या पेक्षा सासूबाईंच्या वागणुकीचा गोडवा तिला जास्त जाणवत होता. हे असे कधीच सासूबाईंनी तिच्यासाठी केले नव्हते.
उलट त्यांच्या मते सुनेने घरातील कामे करावीत. आणि तोंड जास्त चालवू नये. खुर्चीवर बसून आरामात चहा पिणे तर त्यांच्यामते जास्तीचे चोचले आहेत जे सूनांनी करू नयेत. पण आजकाल त्या जर जास्तच नरमाईने वागत होत्या. मागच्या सात वर्षात राधिकाने कधीच सासूबाईंच्या तोंडून प्रेमाने उच्चारलेले तिचे नाव ऐकले नव्हते पण आजकाल त्या बऱ्याच गोड वागत होत्या तिच्याशी.
कधी कधी तिला त्यांच्या गोड वागण्याची भीती सुद्धा वाटायची. तिला वाटायचं की जेव्हा त्या तिच्याशी कठोर पणाने बोलायच्या तेव्हा निदान मनात जे आहे ते स्पष्टपणे तोंडावर बोलायच्या तरी. पण आजकाल त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे ह्याचा अंदाजच तिला येत नव्हता.
तिचा चहा पिऊन झाला आणि इतक्यातच सुजित घरी आला. तो सुद्धा आज चक्क राधिका साठी गजरा घेऊन आला. राधिका साठी हे सगळंच अकल्पनीय होते. लग्न झाले तेव्हापासून आजवर कधीच त्याला बायकोला गजरा द्यायचे सुचले नव्हते. आणि आता काय हे अचानक.
राधिकाला आनंद व्हायच्या ऐवजी नवलच जास्त वाटत होते. सासुबाई आणि नवरा आजकाल तिच्यावर जरा जायचं मेहेरबान होते. तिला त्यांच्या वागण्यात झालेला बदल जाणवत होता पण त्याचं कारण विचारायचं धाडस तिच्यात नव्हतं. त्या दिवशी जेवण झाल्यावर राधिका रूम मध्ये गेली तेव्हा सुजित जागाच होता. तिने त्याला विचारले.
” आज तुम्ही झोपले नाही…?”
” अग…झोपणारच आहे…म्हटलं आज बायकोशी थोड्या गप्पा माराव्यात…”
हे सुद्धा अकल्पनीय होते पण इथेही काहीही न विचारता तिने फक्त होकारार्थी मान डोलावली. आणि सुजित ने स्वतःच बोलणे सुरू केले. थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सुजित राधिका ला म्हणाला.
” मी मागच्या महिन्यात एक फ्लॅट बघितला होता…खूप चांगले लोकेशन आहे… थ्री बीएचके आहे…चांगल्या मोठमोठ्या रूम्स आणि किचन सुद्धा छान आहे… देवघरा साठी सुद्धा खूप चांगली जागा सोडलेली आहे…पण थोडा बजेट जास्त आहे त्याचा…” सुजित म्हणाला.
” कीती आहे बजेट…?” राधिका ने सहज विचारले.
” पन्नास लाखांचा होईल…” सुजित म्हणाला.
” बापरे…खूप जास्त होतील पन्नास लाख आपल्याला…माझ्या कडे पण आतील दोन एक लाख जमा…पण ते ही खूप कमी होतील… लोन घेतलं तरीही ई एम आय खूप जास्त होतील…त्यापेक्षा या दोन बी एच के मध्ये भागतय आपलं…पुढे बघू मुलगा मोठा झाला की..” राधिका म्हणाली.
” माझ्याकडे असतील दहा लाख जमा…काही लोन घेऊ…पण तू जर ठरवले तर तू मला मदत करू शकतेस…” सुजित म्हणाला.
” मी काय मदत करू शकणार…तुम्हाला तर माहिती आहे मी प्रायव्हेट नोकरी करते…घराला तेवढाच हातभार होईल म्हणून…जवळ दागिने आहेत पण त्यातून एवढी मिठी रक्कम उभी होऊ शकणार नाही…” राधिका म्हणाली.
” तुझ्या वडिलांचं शेत धरण प्रकल्पात गेलंय आणि त्यांना त्या मोबदल्यात भरपूर रक्कम मिळणार आहे…जवळपास पस्तीस लाख…बरोबर ना…?” सुजित म्हणाला.
” बरोबर…पण त्याच काय आता…?” राधिका ने विचारले.
” त्या पैशांवर मुलगी म्हणून तुझाही हक्क आहेच ना…तू त्यातील तुझा हिस्सा माग त्यांना…” सुजित म्हणाला.
” असे कसे…मी नाही मागू शकतं त्यांना…आधीच कर्जबाजारी आहेत ते…त्यातील बरीच रक्कम आधीच कर्ज फेडण्यातच जाईल…आणि आजवर माझ्या माहेरचे जुन्या घरात राहत आहेत…आता कुठे त्यांनी घर बांधायला सुरूवात केली आहे…शिवाय त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे…त्यामुळे त्यांना आणखी कुठेतरी शेती घ्यावीच लागेल ना…ते पैसे त्यांनाच कामी येतील…” राधिका म्हणाली.
” ते काही नाही…पैशांच्या बाबतीत एवढे निषाळजी नाही रही शकत आपण…तुला तुझ्या वडिलांना तुझा हिस्सा मागावाच लागेल…” सुजित म्हणाला.
” आणि मी मागितला नाही तर…” राधिका म्हणाली.
” तर तू पण कायमची तुझ्या माहेरी निघून जा…” सुजित म्हणाला.
आता मात्र राधिकाला नवऱ्याच्या आणि सासूच्या चांगल्या वागण्याचे रहस्य कळले होते. त्यांचा दिला तिच्या वडिलांना मिळणाऱ्या पैशांवर होता.
राधिकाचे वडील शेतकरी होते. जवळ पाच एकर शेती होती. त्यांना राधिका आणि तिचा भाऊ दीपक अशी दोन मुले होती. राधिकाच्या वडिलांची परिस्थिती तशी हलाखीचीच होती. ज्या वर्षी पीक चांगलं यायचं त्या वर्षी चांगलं चालायचं आणि ज्या वर्षी पीक नाही व्हायचं त्या वर्षी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायची.
पण एवढ्या सगळ्यात त्यांनी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ दिला नाही. दोन्ही मुलांनी चांगलं शिकावं अशी त्यांची आधीपासूनच इच्छा होती. पण मोठा मुलगा दीपक मात्र अभ्यासात फारसा हुशार नसल्याने त्याने कामापुरते शिक्षण घेतले आणि तो ही वडिलांसोबत शेतीचे काम करायला लागला. राधिका मात्र अभ्यासात तशी चांगली होती त्यामुळे तिने चांगल्या मार्कांनी बारावी पास करून पुढे पदवीला एडमिशन घेतली.
दीपक मात्र वडिलांसोबत शेतात राब राब राबत होता. आणि राधिका ला काही कमी पडू नये ह्याची आधीपासूनच खूप काळजी घेत होता. दोघा बहीण भावांचा एकमेकात खूप जीव होता. पुढे जेव्हा घरात राधिकाच्या लग्नाचा विषय सुरू झाला तेव्हा मात्र दीपकने समंजसपणे तालुक्याला एक साधी पण बऱ्या पगाराची नोकरी शोधली. सुट्टीच्या दिवशी शेतात सुद्धा काम करायचा.
राधिकासाठी सुजितचे स्थळ आले आणि चांगला शहरातील मुलगा आणि चांगली नोकरी पाहून तिच्या वडिलांनी जास्त विचार न करता ह्या स्थळाला होकार सुद्धा दिला. राधिका दिसायला सुंदर होती आणि बऱ्यापैकी शिकलेली सुद्धा होती. सुजितला ती पसंत पडली आणि दोघांचे लग्न ठरले. जोवर राधिकाचे लग्न ठरले तोवर दीपकने बऱ्यापैकी रक्कम जमा सुद्धा केली होती.
राधिकाच्या वडिलांनी त्यांना जमेल तितक्या थाटामाटात मुलीचे लग्न लावले होते. दीपकने सुद्धा त्यांना आर्थिक हातभार लावला. पण लग्नाच्या वेळी त्यांनी लोकांकडून जे उसने घेतले होते ते परत करताना दोनेक वर्षे लागली त्यांना. आणि त्यात शेती सुद्धा कधी पिकायची तर कधी नाही. पण आपली बहीण खुश आहे ह्या विचारानेच दीपक खुश व्हायचा.
राधिकाच्या सासरी मात्र जेव्हा तिच्या माहेरचे यायचे तेव्हा त्यांना कसलाच मान दिला जात नसे. सुजित तर एक दिवसही सुट्टी घ्यायला तयार नसायचा हीचे माहेरचे आले की सासू सुद्धा आपल्या रूम मध्येच राहायची. राधिकाला फार वाईट वाटायचं. राधिकाच्या आई वडिलांना सुद्धा ते कळायचं पण आपल्या मुलीचं चांगलं चाललंय हे बघून मात्र त्यांना खूप आनंद व्हायचा. आपल्या माहेरचे गरीब आहेत म्हणून त्यांना ही वागणूक मिळतेय हे राधिका चांगलीच जाणून होती. पण तरीही तिला काही बोलायला सोय नव्हती.
क्रमशः
रक्षण नात्याचे बंधन प्रेमाचे – भाग २ (अंतिम भाग)
खुपच छान आणि हृदयस्पर्शी