रोहित एका चांगल्या सधन कुटुंबातील मुलगा. आई, वडील, आणि एक लहान भाऊ असे चौकोनी कुटुंब. रोहित एक हुशार होता आणि तितकाच जबाबदार देखील.
रोहित अभ्यासात हुशार होता. पण मितभाषी असल्याने त्याचे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. लहानपणापासून त्याची श्रद्धा ही फक्त एकच मैत्रीण होती. अगदी पहिल्या वर्गापासून दोघे सोबत होते. रोहित आणि श्रद्धा एकमेकांना फार जीव लावत. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.
दिवसेंदिवस दोघांचे प्रेमदेखील वाढत गेले. काही दिवसांनी रोहित पुढील शिक्षणाच्या निमित्ताने दोन वर्षांसाठी दुसऱ्या शहरात गेला. पण ह्या दोघांमध्येही न चुकता पत्रव्यवहार व्हायचा.
रोहित शिक्षण संपवून परत आला तेव्हा श्रद्धाच्या आनंदाला पारावार उरला नाही. रोहितच्या वडिलांचा फर्निचरचा व्यवसाय होता. पण रोहितला मात्र व्यवसायात फारसा रस नसल्याने त्याने नोकरी करायचे ठरवले होते. पण रोहितच्या वडिलांची इच्छा होती की त्याने त्यांना व्यवसायात मदत करावी. पण वडिलांच्या इच्छेप्रमाणे रोहितने त्यांना फर्निचरच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केली.
त्यानंतर रोहितने त्याच्या आणि श्रद्धाच्या प्रेमाबद्दल त्यांच्या घरी सांगितले. आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखविली. आणि यावरून रोहितच्या घरात वादळ निर्माण झाले. रोहितचे आईवडील दोघेही या लग्नाच्या विरोधात उभे राहिले.
रोहितच्या बाबांना समाजाची भीती होती. कारण त्यांना त्यांची सामाजिक प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत होती. मुलाने लव्ह मॅरेज करणे म्हणजे मुलगा हातातून गेला असा सरळ सरळ निष्कर्ष काढला होता त्यांनी. आणि रोहित मोठा मुलगा आहे. त्याने जर स्वतःच्या मनाने लग्न केले तर घरातील इतर मुले देखील त्याच्याच वळणावर जातील आणि मनमानी करतील.
आणि रोहितच्या आईला वाटायचं की रोहित त्याच्या पसंतीची मुलगी घरात सून म्हणून आणेल तर ती सासूचे अजिबात ऐकणार नाही. किंवा उतारवयात सासू सासर्यांच काहीच करणार नाही. स्वतःची मनमानी करेल. आणि मुलगा सुद्धा तिचेच ऐकेल.
म्हणून रोहितच्या आई वडिलांनी त्याला सरळ सरळ नकार दिला. रोहितच्या आईने तर त्याला श्रद्धाशी लग्न केले तर मी जीवाचे काही बरे वाईट करेन ही धमकीच दिली. रोहितने त्याच्या घरच्यांना विनवले. श्रद्धा खूप चांगली मुलगी आहे हे समजावून सांगितले पण घरच्यांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी त्यांचा नकार तसाच कायम ठेवला.
इकडे रोहित आणि श्रद्धा मात्र फार दुःखी झाले. त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. आणि एकमेकांशिवाय जगण्याची तर कल्पनाच केली जात नव्हती. पण घरच्यांच्या विरोधात जाऊन, त्यांची मने दुखवून त्यांना त्यांचा संसार मांडायचा नव्हता.
श्रद्धाने दुःखी मनाने रोहितपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आणि त्याला सांगितले की तुझे आईवडील जे म्हणतील त्यांचं ऐक. कारण त्यांनी तुला जन्म दिलाय. त्यांना दुःखी ठेवून आपण कधीच सुखी होणार नाही. तुझ्याशिवाय जगणे माझ्यासाठी कठीण आहे पण आपल्या नशिबात हेच लिहिलेलं असेल असे मानूनच जगावे लागेल.
श्रद्धा आणि रोहित दुःखी मनाने एकमेकांपासून वेगळे झाले. काही दिवसांनी रोहितच्या कानावर आले की श्रद्धा चे लग्न ठरले आहे. रोहितने स्वतःला कामात झोकून दिले. पण काही केल्या तो श्रद्धाला विसरू शकला नाही.
रोहितच्या वडिलांनी त्याला त्याच्या साठी मुली पाहायला सुरुवात केली. तेव्हा रोहितने त्यांना सांगितले की त्याला लग्नच करायचे नाही. त्याच्या आईवडिलांनी त्याला खूप समजावले पण रोहित मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्याचे लग्न जर श्रद्धा सोबत नाही झाले तर त्याला इतर कुणाशीही लग्न करायचे नव्हते. रोहितच्या आईवडिलांना वाटले की काही दिवसांनी रोहित लग्नाला तयार होईल पण रोहित काही लग्नाला तयार झाला नाही.
दोन वर्षे निघून गेली. रोहित लग्नाला तयार होत नसल्याने नाईलाजाने त्याच्या लहान भावाच्या मोहितच्या लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली.
आईवडिलांनी मोहितसाठी त्यांच्या आवडीची मुलगी निवडली. मीनल तीच नाव. मीनल दिसायला सुंदर होती.
शिवाय चांगल्या श्रीमंत घरातील होती. मोहित आणि मीनलने सुद्धा एकमेकांना पसंत केले आणि घरच्यांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांचे थाटामाटात लग्न लावून दिले.
मीनल सून बनून घरात आली. तिच्या सासू सासऱ्यांनी तिचे खूप कोडकौतुक केले. मीनल आणि मोहितला बाहेर फिरायला पाठवले. लग्नानंतरचे पहिले सहा महिने अगदी आनंदात गेले.
त्यानंतर मात्र मीनलला वेगळे राहण्याचे वेध लागले. तिच्या मते जॉइंट फॅमिली असल्यामुळे त्या दोघांना प्रायव्हसी मिळत नव्हती. शिवाय सासू सासऱ्यांची मर्जी सांभाळणे, घरी आलेल्या पै पाहुण्यांचे करणे या सर्वांचा मीनलला कंटाळा आला होता. म्हणून तिने मोहितकडे वेगळे राहण्याचा तगादा लावला.
शेवटी एके दिवशी मोहितने आईवडिलांना सांगितले की त्याला आणि मीनलला वेगळे राहायचे आहे. आईवडिलांना हे ऐकुन धक्का बसला. आपण कधीच मीनल ला सूनेसारखे वागवले नाही. नेहमी मुलीप्रमाणे वागणूक दिली. तरीही तिने आपल्यापासून वेगळे व्हायचा विचार करावा हे त्यांच्यासाठी अनपेक्षित होते.
त्यांनी मोहित आणि मीनलला समजावून सांगितले. तू तुझ्या मर्जीप्रमाणे काहीही करू शकतेस फक्त हे घर सोडून जाऊ नकोस म्हणून विनवले पण मीनलवर काहीच फरक पडला नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे नाईलाजाने आईबाबांनी त्यांना वेगळे राहायला परवानगी दिली.
मोहित आणि मीनल घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. आता घरात केवळ रोहित आणि त्याचे आईबाबा उरले होते. श्रद्धा पासून दुरावल्या मुळे दुखावलेला रोहित नेहमी कामातच असायचा. त्याने स्वतःबद्दल विचार करणे तर सोडूनच दिले होते. त्याला असे पाहून त्याच्या आईवडिलांना आता त्यांची चूक लक्षात येत होती.
केवळ प्रेमविवाह नको म्हणून त्यांनी श्रद्धा आणि रोहितच्या नात्याला नाकारले. त्यांना वाटले होते की मुलाने त्याच्या पसंतीची मुलगी घरात आणल्यास ती सासू सासऱ्यांचे काहीही ऐकणार नाही. पण त्यांनी स्वतः निवड केलेली मीनलसुद्धा त्यांच्या अपेक्षेवर खरी उतरली नव्हती.
आईबाबांना कळून चुकले होते की त्यांनी रोहितच्या बाबतीत चुकीचे केले. त्यांनी निदान एकदा तरी श्रद्धा च्या बाबतीत विचार करायला हवा होता हा विचार आला. खरं सांगायचं म्हणजे केवळ एक दोन भेटीमध्ये एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कळत नाही. व्यक्तीचा स्वभाव तो स्वभाव असतो. मग लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज ह्याचा काही फरक पडत नाही.
त्यांनी रोहितची माफी मागितली. रोहितने आई वडिलांच्या भावना समजून घेतल्या. पण आता या गोष्टींना काही अर्थ नव्हता. कारण श्रद्धा त्याच्या आयुष्यातून दूर निघून गेलेली होती. रोहित बराचसा सावरला देखील होता. मोहितने त्याचा संसार वेगळा थाटल्याने आता आईवडिलांची जबाबदारी रोहितवर आलेली होती. आणि त्याला त्याच्या आईवडिलांना आनंदात पाहायचे होते. त्यामुळे त्याने स्वतःच्या दुःखाचा जास्त बाऊ न करता आईवडिलांना सुखी ठेवायचा ध्यास घेतला.
असेच दिवस जात होते. एके दिवशी रोहितची आई बाजारातून येत असताना त्यांनी श्रद्धा ला पाहिले. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या सुलभा काकुसोबत श्रद्धा बोलत होती. श्रद्धा निघून गेल्यावर त्यांनी सुलभा काकूंच्या जवळ जाऊन श्रद्धाबद्दल विचारपूस केली तेव्हा त्यांना कळलं की जवळपास वर्षभरापूर्वी तिचा नवरा एका अपघातात मृत्यू पावला होता. त्यामुळे श्रध्दा पुन्हा तिच्या माहेरी आलेली होती.
रोहितच्या आईला श्रद्धा सोबत जे घडले ते ऐकुन फार वाईट वाटले. पण त्यांच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली. त्या घरी आल्या आणि त्यांनी रोहितच्या बाबांना श्रद्धा बद्दल सांगितले. त्या दोघांनीही मनाशी काहीतरी निर्धार केला आणि दुसऱ्या दिवशी रोहितला घेऊन ते दोघेही श्रद्धा च्या घरी गेले.
इतक्या दिवसांनंतर रोहितला अचानक आपल्या घरी आलेले पाहून श्रद्धाला धक्काच बसला. पण त्याच्यासोबत त्याच्या आईवडिलांना पाहून ती लगेच सावरली आणि तिने त्या तिघांनाही बसायला सांगितले. श्रद्धा चे आईवडील आले तेव्हा रोहितने स्वतःची आणि त्याच्या आईवडिलांची ओळख करून दिली.
रोहितच्या बाबांनी सरळ विषयालाच हात घातला. फार आढेवेढे न घेता त्यांनी सरळ श्रद्धा ला रोहितसाठी मागणी घातली. श्रद्धा च्या बाबांसाठी हे सर्व अनपेक्षित होते. ते म्हणाले…
” तुमच्या पासून काय लपवायचे…आमची श्रद्धा विधवा आहे…लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यानंतर आमचे जावई अपघातात गेले…आणि तिला आम्ही माघारी घेऊन आलो…”
” आम्हाला हे सर्व माहिती आहे…तरीही आम्हाला श्रद्धाच आमची सून म्हणून हवीय…” रोहितचे बाबा म्हणाले.
” पण तुमच्या मुलाचे तर हे पहिलेच लग्न आहे…त्याला श्रद्धा पेक्षा चांगली मुलगी मिळेल तरीही…” श्रद्धा च्या वडिलांनी आपल्या मनातील शंका बोलून दाखविली.
” खरं तर हे आम्ही आधीच करायला पाहिजे होते…तेव्हा आमच्याकडून चूक झाली पण आता नाही होणार…” रोहितचे बाबा म्हणाले.
” मी समजलो नाही…” श्रद्धाचे बाबा म्हणाले.
” श्रद्धा आणि रोहितचे एकमेकांवर प्रेम होते…रोहितने जेव्हा तिच्याशी लग्न करायची इच्छा बोलून दाखवली तेव्हा मात्र आम्ही नकार दिला…कारण आमचा प्रेमविवाह करण्याला नकार होता…पण देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते…लग्नाच्या गाठी स्वर्गातच तयार म्हणतात तेच खरे… असो…तेव्हा नाही झाले तर नाही…पण आता यात उशीर नको…” इति रोहितचे बाबा.
” आम्हाला याविषयी काहीही माहिती नव्हते…पण तुम्ही मोठ्या मनाने श्रद्धा चा स्वीकार करायला तयार आहात तर आम्हाला आनंदच होईल…शिवाय आम्हाला सुद्धा तिच्या भविष्याची काळजी आहेच…श्रद्धा चा होकार असेल तर आम्ही तयार आहोत…”
एवढे बोलून श्रद्धा च्या वडिलांनी श्रद्धाकडे पाहिले. श्रद्धा च्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. जे प्रेम परिस्थितीमुळे तिच्यापासून हिरावले होते ते आज असे अनपेक्षितपणे तिच्या आयुष्यात पुन्हा आले होते.
पण या दोन वर्षात तिने खूप काही सोसले होते. त्यामुळे परत एकदा जेव्हा सुख तिच्या आयुष्यात येऊ पाहत होते तेव्हा तिला भीती वाटत होती. ती हा बदल स्वीकारायला तयार नव्हती. तेव्हा तिला तिच्या घरच्यांनी आणि रोहितच्या आईवडिलांनी समजावून सांगितले. शेवटी श्रद्धा तयार झाली.
दोघांच्याही घरच्यांनी एक चांगला मुहूर्त पाहून त्यांचे थाटामाटात लग्न लावून दिले. श्रद्धाच्या येण्याने रोहितच्या आयुष्यात पुन्हा एकदा बहर आला. रोहित आणि श्रद्धाला आनंदात पाहून त्याचे आईवडील देखील आनंदले.
लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गातच तयार होतात असे म्हणतात. रोहित आणि श्रद्धा च्या प्रेमकहाणी मध्ये याचा प्रत्यय देखील आला. ही गोष्ट सत्यघटनेपासून प्रेरित आहे. फक्त पात्रांची नावे बदलली आहेत. आज श्रद्धा आणि रोहितच्या संसाराला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि ते दोघेही आनंदात आहेत.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
Khup chan katha ….