कामे उरकून विशाखा नुकतीच आराम करायला रूममध्ये जाणार इतक्यात वृषभने हॉल मधून तिला आवाज दिला.
” विशाखा…विशाखा…अग बाहेर ये…हे बघ कोण आलंय…?”
ती तशीच उठून बाहेर आली. अंगात कणकण होत होती. चालताना थकल्यासारखे होत होते. तिने आज सकाळीच कोरोनाची लस घेतली होते. त्यानंतर घरात बरीच कामे पुरली. तिच्या सासुबाई नेहमी प्रमाणे त्यांच्या भजनी मंडळात गेल्या होत्या. तशी जाण्याच्या आधी ती बरीच कामे आवरून गेली होती.
पण तरीही आल्यावर बरीच कामे पुरली तिला. आता दुपारचे चार वाजत आले होते. आताच तिचा सहा वर्षांचा मुलगा विवान सुद्धा खेळल्याने थकून झोपी गेला होता. हिला वाटले थोडा वेळ आराम करावा. पण बाहेर कोणीतरी आलेलं होतं बहुतेक. म्हणून वृषभ तिला आवाज देत होता.
तिला बाहेर यायला उशीर झाला म्हणून वृषभ स्वतःच तिला घ्यायला बेडरूम पर्यंत आला.
” अगं मी केव्हाचा आवाज देतोय तुला…काय करत होतीस…?” वृषभ ने विचारले.
” अरे थोडं बर नाहीय मला…म्हणून थोडा आराम करावा म्हटलं…” विशाखा म्हणाली.
” ही काय वेळ आहे का झोपण्याची…आता संध्याकाळ होईल… थोडं सहन करता नाही येत नाही का तुला…आईला संध्याकाळच्या वेळी झोपलेलं चालत नाही माहिती आहे ना…?..चल आता…बाहेर अजय आणि वहिनी आल्या आहेत…” वृषभ म्हणाला.
वृषभ चे बोलणे विशाखा च्या मनाला लागले. कारण ती विनाकारण दुपारी कधी झोपत नाही. तिला बरं नसेल तेव्हाच ती दुपारी आराम करते. इतक्या वर्षात वृषभ ला तिची एवढी साधी गोष्टही माहीत नसावे ह्याचे तिला वाईट वाटले. आणि तिला सहन करायला सांगणारा तो जेव्हा लस घेऊन आला होता तेव्हा अंगात कणकण आहे म्हणून दोन दिवस नुसता झोपून राहिला होता हे तो सोयीस्करपणे विसरला होता.
वृषभचे बोलणे ऐकुन दुखावलेली विशाखा निमूटपणे त्याच्या मागे हॉल मध्ये आली. घरी वृषभचा बालमित्र अजय आणि त्याची बायको आले होते. त्यांना पाहून विशाखाने काशीतरी एक स्माईल दिली आणि त्यांना बसायला सांगितले.
” तुम्ही बसा गप्पा मारत…मी तुमच्यासाठी लगेच चहा आणि काहीतरी खायला घेऊन येते…” विशाखा म्हणाली.
” काहीतरी हलकं फुलकं खायला करशील…आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी पण करशील…” वृषभ म्हणाला.
” हो…” विशाखा नाराजी न दाखवता म्हणाली. आणि किचन मध्ये निघून गेली. तिच्या पाठोपाठ अजयची बायको अवनी सुद्धा किचन मध्ये आली. आणि ह्या दोघींच्या किचन मध्ये गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता अवनी विशाखाला म्हणाली.
” आमचा ना आज बाहेर फिरायला जायचा प्लान होता पण वृषभ भाऊजीचा ह्यांना फोन आला आणि त्यांनी खूप आग्रह केला यांना आज जेवायला घरी येण्याचा. म्हणून मग फिरायला जाण्याचा बेत रद्द करून आज तुम्हाला भेटायला आलो…”
” अग चांगलं आहे ना…त्यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली…” विशाखा हसून म्हणाली. पण मनातून तिला खूप वाईट वाटलं. वृषभला माहिती होतं की ती आज लस घेणार आहे. तिला आरामाची गरज असेल. पण माझा जराही विचार न करता किंवा मला कसलीही पूर्वकल्पना न देता त्याने घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले. एरव्ही ती कशालाच नाही म्हणत नाही पण निदान जेव्हा तिची तब्येत बरी नाही तेव्हा तरी त्याने तिला समजून घ्यावं एवढी अपेक्षा सुद्धा ती त्याच्याकडून करू शकत नाही का ?…
आपल्याच विचारात हरवलेली विशाखा अवनीच्या आवाजाने भानावर आली आणि पुन्हा स्वयंपाकाला लागली. तिला अजूनही बरं वाटतं नव्हतं. पण कामाच्या नादात थोडावेळ तिने तब्येतीला लक्ष दिलेच नाही.
वृषभचे हे नेहमीचेच होते. तो नेहमीच विषाखाला गृहितच धरायचा. तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता घरी पाहुण्यांना जेवायला बोलावणे तर तिच्या सवयीचे झाले होते. आणि वृषभने तिला गृहीत धरण्यामागे कुठे ना कुठे ती स्वतः सुद्धा जबाबदार होती.
लग्न झाल्यावर चांगली बायको आणि सून बनताना ती स्वतःलाच हरवून बसली होती. तिने या घरात आल्यावर लगेच घरातील सर्व कामे स्वतःच्या अंगावर घेतली होती. सासूबाईंनी तर किचनचा सर्व कारभार विशाखाच्या हाती दिला आणि त्या निर्धास्त झाल्या.
स्वयंपाकात सुगरण असलेल्या विशाखाने सर्वांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन सर्वांना हवं नको ते सर्व बघितलं. वृषभच्या टिफीन मधल्या भाज्यांची पूर्ण ऑफिस मध्ये स्तुती व्हायची. म्हणून वृषभ आता रोज शिल्लक भाजी घेऊन जायचा. कधी कधी मित्रांना विशाखाच्या हातचे जे वायला घरी बोलवायचं.
विशाखा सगळं काही आनंदाने करायची. वृषभ तर अगदी पाण्याचा ग्लास सुद्धा आता स्वतः घेत नसायचा. कोणत्याही कामाला त्याला विशाखा हवी असायची. वृषभचे कोणतेच काम आपल्याशिवाय पूर्ण होत नाही हे विशाखाला आधी आवडायचे. पण विवानचा जन्म झाल्यावर तिला हे सगळे जड जाऊ लागले.
विवान झाल्यावर तिला हे सर्व करायला जास्त वेळ मिळायचा नाही. पण वृषभला तर आता ह्या सर्वांची सवय झाली होती. त्यामुळे ती सर्व करण्यात दमून जाई. पण वृषभला ह्या गोष्टीची जराही जाणीव होत नव्हती. त्याला वाटायचं आधी तर हिला सगळच जमायचं तर आता का नाही.
त्यातच सासुबाई दिवसभर त्यांच्या भजनी मंडळात व्यस्त राहायच्या. आणि सासरे बुवांना शुगर असल्याने त्यांच्या जेवणाच्या वेळा पाळाव्या लागायच्या. हे सर्व तर विशाखा कोणतीही तक्रार न करता करायची पण दर दोन चार दिवसांनी वृषभ त्याच्या मित्रमैत्रिणींना आग्रह करून जेवायला बोलवायचा. आणि त्याची कल्पना सुद्धा विशाखाला द्यायचा नाही.
सगळे मित्र मैत्रिणी विशाखाच्या हातच्या जेवणाची स्तुती करायच्या मात्र वृषभ म्हणायचा की ‘त्यात काय विशेष. घरी राहून हीच कामे असतात तिला. मग स्वयंपाक तर चांगला येणारच ना..” आताशा तिला या सर्वांची चीड यायला लागली लागली होती. प्रत्येक वेळी हा काय आपल्याला गृहीत धरतो म्हणून तिला कधी कधी राग यायचा पण ती काहीच बोलायची नाही.
उलट एखादे वेळी ती कामे उरकून निवांत बसलेली असली की तिला जाणूनबुजून कामे सांगायचा. त्याला सतत वाटायचं की आपली बायको कधीच थकत नाही किंवा घरकाम करणाऱ्या बायका कधीच थकत नाहीत. आजही त्याने तसेच केले होते. विशाखा ने वक्सिन घेतलंय हे माहिती असूनही त्याने आग्रह करून अजयला घरी जेवायला बोलावलं होतं.
विशाखा ने सर्व स्वयंपाक साग्रसंगीत केला. विवान सुद्धा उठला होता. त्याला खायला घातलं आणि सासरेबुवांना सुद्धा ताट वाढून दिलं. तोपर्यंत सासुबाई घरी आल्या होत्या. मग विशाखा ने सगळा स्वयंपाक अवनीच्या मदतीने डायनिंग टेबलवर आणून ठेवला आणि सगळेजण एकत्र जेवायला बसले. वाढलेली ताट पाहून वृषभ विशाखाला म्हणाला..
” विशाखा.. जेवणासोबत मसाला पापड पण कर ना…”
आता कुठे पहिला घास घ्यायला बसलेली विशाखा तो घास तसाच ठेवून पापड आणायला गेली. अंगात कणकण वाढतच होती. त्यानंतर कसेबसे तिने जेवण आटोपले. सगळी आवराआवर केली. काही वेळ गप्पा मारून अजय आणि अवनी निघून गेले. ते गेल्यानंतर हिने सिंक भरून भांडी घासली. तोपर्यंत तिच्या अंगात ताप भरली होती.
क्रमशः
भाग दोन इथे वाचा
वेळीच नाही म्हणायला शीक – भाग 2 (अंतिम भाग)