इतक्यात एके दिवशी मामांनी त्याच्याकडे विषय काढला.
” मग अक्षय…आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस..?
” आता पुढे काय…नोकरी तर लागलीच आहे…देशाची सेवा करायचीय…तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवायचे आहे.” अक्षय म्हणाला.
” ते तर तू करशिलच…पण त्यासोबत लग्नसुद्धा करावेच लागेल ना..?” मामा सरळ मुद्द्यावर आला.
” इतक्यात मला लग्न वगैरे करायचं नाही आहे…पुढे कधीतरी पाहू…” अक्षय तो विषय टाळत म्हणाला.
” तुला कुणीतरी आवडत असेल तर तसं तू आधीच सांगून टाक…आम्हाला काही हरकत नाही…तू जिच्याशी म्हणशील तिच्याशी आम्ही तुझं लग्न लावून देऊ…शेवटी तुला ज्या मुलीसोबत आयुष्य घालवायचं आहे ती जर तुझी पसंती असेल तर चांगलंच आहे की..” मामा म्हणाले.
” हो ना…आम्हाला चालेल..” मामींनी दुजोरा दिलाi.
” मला माहिती आहे की तुम्हाला चालेल…पण असं काहीच नाही…मला जर कुणी मुलगी आवडली असती तर मी सर्वात आधी तुम्हाला येऊन सांगितलं असतं…” अक्षय म्हणाला.
” तसं असेल तर मग आम्हाला तुझ्यासाठी मुलगी पसंत करू दे ना…म्हणजे आम्ही तुला काही मुली दाखवू…तुला जी आवडेल तिच्याशी तुझं लग्न लावून देऊ…एकदा का तुझं लग्न झालं म्हणजे आम्ही मोकळे…मग आम्हाला तुझी इतकी काळजी राहणार नाही…आम्ही असताना तुझे दोनाचे चार हात झालेले पाहायचे आहेत…आमचं काय आम्ही आज आहोत उद्या नाही.” मामा म्हणाले.
“असं काहीही बोलू नका मामा…तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत ते…तुम्हा दोघांशिवाय मला आहे तरी कोण…तुम्हाला जे बरे वाटेल ते करा…मी तुमच्या शब्दाबाहेर नाही…”
” ठीक आहे मग…आपल्या गावातच दोन मुली आहेत…कालच रमेश काकांनी तुझ्यासाठी दोन स्थळ सुचवलेत…आपण एकदा त्यांना पाहून घेऊ…” मामा म्हणाले.
” अच्छा म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीतच आहात तर..” अक्षय हसून म्हणाला.
” हो मग…लग्न म्हटल्यावर तयारी तर हवीच…” मामी हसत म्हणाल्या.
आणि लगेच दोन दिवसांनी मामा मामी अक्षयला घेऊन त्यांच्या गावी गेलेत. आज मुलीला पाहण्याचा कार्यक्रम होता. मुलीच्या घरचे पाहुण्यांची वाटच पाहत होते. पाहुणे घरी पोहचताच त्यांची गडबड सुरू झाली.
पाहुण्यांना हातपाय धुवायला सोय म्हणून बाहेरच्या अंगणातच पाण्याची बादली आणि पाट ठेवला होता. सर्वांनी हातपाय धुतले आणि ते हॉल मध्ये जाऊन बसले. हॉलमध्ये गेल्यावर चहापाणी झाले.
मुलीच्या घरातील ज्येष्ठ मंडळी आणि मामा मामी आपापसात चर्चा करत होते. अक्षय मात्र चुपचाप एका कोपऱ्यात बघत बसला होता. असं मुलगी पाहायला तो पहिल्यांदाच आला होता. त्याला थोडं अवघडल्यासारखं होत होतं.
अक्षय हॉलमध्ये इकडे तिकडे बघत होता. इतक्यात त्याचे लक्ष भिंतीवरील फोटोंकडे गेले. तिथे त्यांच्या कुटुंबाचे फोटो लावलेले होते. फोटो बघताना एका चेहऱ्यावर अक्षयची नजर थांबली. त्याने ती चेहरा कुठेतरी पाहिला होता.
पण कुठे पाहिला असेल ? तो विचार करत होता आणि अचानक त्याला आठवले. ही तर रिद्धी. त्यादिवशी लग्नात पाहिलं होतं तिला. म्हणजे हे रिद्धीच घर आहे. परत त्याच्या डोक्यात रिद्धीचे विचार यायला लागले. बिचारी सोबत खरंच खूप वाईट घडलं होतं. आणि इतक्या कमी वयात तिच्यावर समाजाने अपशकुनी असल्याचा ठपका लावला होता. काय परिणाम झाला असेल तिच्या मनावर या सर्वांचा.
” बेटा, आता कुठे पोस्टिंग आहे तुझी ?” एका वयस्कर व्यक्तीने त्याला हा प्रश्न विचारला. बहुतेक मुलीचे मोठे बाबा असावेत. त्यांच्या या प्रश्नाने तो रिद्धीच्या विचारातून बाहेर आला.
” सध्या काश्मीर ला पोस्टिंग आहे.” अक्षय ने उत्तर दिले.
” किती दिवसांची सुट्टी आहे ?”
” आठ दिवसांची सुट्टी घेतली होती. आज चार दिवस झालेत.” अक्षय ने माहिती दिली.
इतक्यात त्यांनी ‘ मुलीला पाठवा ‘ अशी सूचना केली. आणि थोड्याच वेळात एक साधारण वीस वर्षांची मुलगी आतमध्ये आली. त्या वयस्कर व्यक्तीने तिला जवळच असलेल्या एका खुर्चीत बसायची सूचना केली. त्यानुसार ती मुलगी तिथे जाऊन बसली.
मुलगी दिसायला छान होती. साधारण उंचीची. सडपातळ बांधा. मोठे डोळे. थोडीफार रिद्धी सारखीच दिसायला होती. ती खाली मान घालून खुर्चीत बसलेली होती. मामा मामी तिला प्रश्न विचारत होते.
मुलीचं नाव रिया होतं. बारावी पर्यंत शिकलेली होती. तिला स्वयंपाकाची आवड होती.रिया रीद्धीच्या काकांची मुलगी होती. ते सर्व कुटुंब एकत्रितपणे एकाच घरात राहायचे. रिद्धी कुठेच आसपास दिसत नव्हती. मामी तिला प्रश्न विचारत होती आणि अक्षय नुसताच बसलेला होता. ज्येष्ठ मंडळींची बोलणी आता जवळपास पूर्ण झाली होती.
अक्षय मात्र रिद्धी च्या विचारत हरवला होता. आता तिथून निघण्याची वेळ झाली होती. मुलगी पसंत आहे की नाही हे ते घरी जाऊन कळवणार होते.
इतक्यात अक्षय अचानकपणे उठला आणि त्या वयस्कर गृहस्थाकडे गेला. आणि म्हणाला.
” रिया खूप छान मुलगी आहे. तिला कोणीही अगदी पहिल्याच नजरेत पसंत करेन. पण तुमची हरकत नसेल तर मला रिद्धी शी लग्न करायचंय. मी त्यादिवशी तिला लग्नात पाहिलं होतं. इथे आलो तेव्हा मला माहिती नव्हतं की हे रिद्धीचं घर आहे पण नंतर मी जेव्हा या भिंतीवरील फोटो बघितले तेव्हाच मला कळलं. मला माहिती आहे की रियाला पाहायला आल्यावर रिद्धी साठी मागणी घालने बरोबर नाही. पण मला जे वाटलं ते मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय. माझ्या मनात रिद्धी असताना मी तिच्या बहिणीसोबत लग्न करणे चुकीचे आहे.”
अक्षय जे बोलला ते सर्वांसाठी अनपेक्षित होतं. मामा मामींना तर क्षणभर तो काय बोलत होता ते कळलंच नाही. रिद्धी च्या घरच्यांना सुद्धा ह्याची अपेक्षा नव्हती. त्यावेळी काय बोलायचं हे कुणालाच सुचलं नाही.
” पण तुम्हाला रिद्धीबद्दल काही माहिती नाही..”
” मला सर्व माहिती आहे.” त्यांना मध्येच थांबवत अक्षय म्हणाला.
आता मात्र यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना कळत नव्हते. किंबहुना या प्रश्नासाठी ते तयार नव्हतेच. तरीही त्यांच्यातील वयस्कर व्यक्तीने मध्यस्थी करत म्हटले.
” माफ करा…पण आम्ही यावर विचार करून तुम्हाला कळवू.”
” ठीक आहे…” मामा म्हणाले.
आणि ते तिघेही तिथून निघून घरी आले. घरी आल्यावर सर्वप्रथम मामा मामींनी अक्षयची चांगलीच कानउघडणी केली.
” ही काय बोलायची पद्धत झाली का मोठ्यांच्या मध्ये..”
मामा म्हणाले.
” सॉरी मामा…पण मला तेव्हा काही सुचलं नाही…माझ्या मनात जे आलं ते मी बोललो…खरंच सॉरी…पण मला रिद्धी खरंच आवडली होती…आणि तिथे गेल्यावर अचानकपणे समजले की ते रिद्धी च घर आहे…” अक्षय म्हणाला.
” अरे पण बोलण्याची एक पद्धत असते. आधी आम्हाला सांगायचं. आणि रिद्धी च्या आधीच्या लग्नाच्या वेळी काय झालं ते तुला नाही माहिती.” मामी म्हणाल्या.
” मला माहिती आहे मामा…पण यात तिची काय चूक…त्या मुलाची तब्येत खराब झाली म्हणून तो वारला…म्हणून काय रिद्धीने संपूर्ण आयुष्य तसचं काढायचं…तिचं वय तरी काय ?” अक्षय काकुळतीने बोलत होता.
” ते ठीक आहे रे…पण आम्ही तुझ्या बाबतीत एवढी मोठी जोखीम नाही घेऊ शकत…खरंच तिचा पायगुण तसा असेल तर…मला तर कल्पनाच नाही करवत…” मामी म्हणाल्या.
” मामी…तुम्हीपण हे पायगुण वगैरे मानता का… असं काहीच नसतं…मी लहान असताना माझे आई बाबा सुद्धा माझ्या वाढदिवशी अपघातात मरण पावले होते…तेव्हा माझ्या काका काकूंनी मला अपशकुनी म्हणून हिणवले होते तेव्हा तुम्हीच माझ्या बाजूने उभे होतात…आणि आता तुम्हीच असं म्हणताय…” अक्षय म्हणाला.
” बरोबर बोलत आहेस तू…आमचं खरंच चुकलं…आम्ही तिच्या बाबतीत असं बोलायला नको होते…पण तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली म्हणून तू सरळ लग्नाचा निर्णय घेतला हे मला बरोबर वाटत नाही…शेवटी लग्न म्हणजे काही खेळ नाही…तिथे एकमेकांबद्दल प्रेम आणि आवड असणे गरजेचे आहे.” मामा म्हणाले.
” मला मान्य आहे…पण आपण आज रियाला पाहायला गेलो होतो… तिलासुद्धा फक्त पाहूनच पसंत करायचे होते…बाकी मी तिला जास्त ओळखत नाहीच…तिच्याशी लग्नाचा निर्णय सुद्धा मला दहा मिनिटांच्या भेटीतच घ्यावा लागला असता… तिथेसुद्धा कुठे प्रेम होते…आणि रिद्धीला मी आधीच पाहिले होते…आणि ती मला पसंत देखील पडली होती…तिला पाहताक्षणी मला असे वाटले जणू काही ती माझ्यासाठीच बनलेली आहे…तिच्याबद्दल ते सर्व मला नंतर कळले…आणि त्याने मला काही फरक पडत नाही…” अक्षय म्हणाला
” ठीक आहे…तुझे म्हणणे मला सुद्धा पटत आहे…मी उद्याच त्यांना कॉल करून पुढचं काय ते ठरवतो.
अक्षय आणि रिद्धी चे लग्न होणार का..? रिद्धीचा निर्णय काय असेल…? हे पाहूया पुढील भागात…
क्रमशः
अपशकुनी ? भाग -३