इकडे रिद्धी च्या घरची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तिच्या घरच्यांना सुद्धा हे सर्व अनपेक्षित होते. रिद्धीच्या काकूंनी मात्र घरी रिद्धीच्या नावाने तळतळाट केला. स्वतःच लग्न तर झालं नाही आणि आता माझ्या रियाच्या लग्नात सुद्धा अडचण आणतेय म्हणून.
रिद्धीच्या काकांना मात्र अक्षयचे म्हणणे पटले होते. त्यांनी विचार केला की रिद्धिसमोर अजुन तिचे पूर्ण आयुष्य पडलेले आहे. जे झालं ते विसरून पुढे जाण्यातच तिचे भले आहे. रिद्धी आणि अक्षयचे लग्न झाले तर चांगलेच आहे.शिवाय अक्षय त्यांना चांगला मुलगा वाटला. त्यांनी रिद्धीच्या वडिलांशी बोलून अक्षय आणि त्याच्या घरच्यांना घरी बैठकीसाठी बोलावून घेतले.
अक्षय आणि त्याचे मामा मामी परत एकदा रिद्धीच्या घरी गेले. घरची मोठी माणसे एकमेकांशी बोलत होती. इतक्यात हाती चहाचा ट्रे घेऊन रिद्धी आली. रिद्धी आज साडीमध्ये खूप छान दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. अक्षयच्या मामी तिच्याशी बोलणार इतक्यात रिद्धी खुर्चीवरून उठली आणि म्हणाली.
” मला माफ करा… खरं तर तुमच्यासमोर मला असं बोलायला नको पण मला हे लग्न करायचं नाही. माझा पायगुण चांगला नाही. माझ्या लग्नाच्या दोन दिवस आधी माझा होणारा नवरा गेला…तुम्ही ह्याला एखादा योगायोग मानू शकता…पण मी हे सर्व नाही विसरू शकत…तुम्ही माझा इतका विचार हा तुमचा चांगुलपणा आहे…पण माझ्यामुळे तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही…त्यामुळे मी हे लग्न करू शकत नाही…मला माफ करा…” बोलता बोलता रिद्धी ला भरून आले. तिच्या डोळ्यात पाणी आले.
रिद्धी असे काहीतरी बोलेल हे सर्वांसाठी अनपेक्षित होतं. आता रिद्धी स्वतःच या लग्नाला तयार नाही म्हटल्यावर घरचे तरी काय करणार.
अक्षयला वाईट वाटले. पण अक्षय आता काही करू शकणार नव्हता. रिद्धी च्या घरच्यांनी अक्षयला शब्द दिला की थोडे दिवस गेले की ते पुन्हा रिद्धी सोबत या विषयावर बोलतील. आणि ती काय म्हणते ते कळवतील. रिद्धि च्या निर्णयासमोर सर्वांचा नाईलाज झाला. अक्षय आणि मामा मामी परत घरी आले.
घरी आल्यावर मात्र अक्षय या विषयावर काहीच बोलला नाही. मामा मामी सुद्धा शांत होते. पण सर्वांच्या मनात रिद्धी चाच विचार येत होता. काहीही झाले तरी त्यांना रिद्धीच्या कधीही लग्न न करण्याचा निर्णय अजिबात पेटलेला नव्हता. पण तिची मनस्थिती देखील ते समजत होते. या मागील वर्षभरात तिने काय काय सहन केले असेल याची जाणीव त्यांना होती. तिला अजून थोडा वेळ दिला पाहिजे हे सुद्धा त्यांना पटले होते.
अक्षय आणि मामा मामी दोन दिवस एकदम नॉर्मल वागत होते. अगदी हसतखेळत. कारण अक्षयला आता परत सीमेवर जायचे होते. त्यामुळे त्याच्यासोबत शक्य तितका वेळ घालवायचा होता. बघता बघता अक्षयच्या परत जाण्याचा दिवस आला. अक्षय ने परत जायची तयारी केली. त्याला जाताना बघून मामीचे डोळे भरून आले पण त्यांनी पदराने त्यांची आसवे टिपली. आणि हसत हसत अक्षयला निरोप दिला.
अक्षय घरून निघाला. तो रेल्वेमध्ये बसलेला होता. आता त्याच्या डोक्यात रिद्धिबद्दल विचार येत होते. तो ते विचार डोक्यातून काढून टाकण्याचा खूप प्रयत्न करायचा. पण तरीही परत सर्व आठवायचे.
इतक्यात पुढील स्टेशन वर ट्रेन मध्ये एक वयस्कर जोडपे त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसले. त्यांच्यासोबत एक लहान मुलगा सुद्धा होता. साधारण पंधरा सोळा वर्षांचा असेल. तो मुलगा थोडा आजारी वाटत होता. अक्षयने एकदा त्यांच्याकडे बघितले पण काही बोलला नाही. आणि परत एकदा विचारांमध्ये हरवला.
मध्ये मध्ये अक्षयची नजर त्या मुलावर जायची. त्याच्या मनात त्या मुलाबद्दल कुतूहल निर्माण झाले. शेवटी न राहवून त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.
” कुठे जात आहात काका ?”
” मी माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन जात आहे. आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांना त्या डॉक्टरांचा गुण आलाय म्हणे…” ते काका म्हणाले.
” काय झालंय तुमच्या मुलाला…” अक्षय ने विचारले.
” मागच्या काही दिवसात तो सतत आजारी असतो…एकाएकी त्याच्या हातापायाला मुंग्या येतात…आणि कधी कधी तर झटके सुद्धा येतात…गावातल्या डॉक्टरांना दाखवले पण काही फारसा फरक नाही पडला…म्हणून या डॉक्टरांना दाखवायला जातो आहे…” काकांनी अक्षयला सविस्तर माहिती दिली.
” तुमचा मुलगा लवकरच बरा होईल काका…काळजी करू नका…”
अक्षय चे बोलणे ऐकुन काकांना बरे वाटले. पुढे अक्षय त्यांच्याशी बराच वेळ बोलत होता. इतक्यात काका म्हणाले.
” आम्ही सकाळपासून घरून निघालोय…मी थोडी झोप घेतो…आमचं स्टेशन आलं की मला उठवशिल का…?”
” हो काका…तुम्ही निवांत झोपा…मी जागाच आहे…” अक्षय म्हणाला.
” हो उठवशील बाबा…नाहीतर आमचं स्टेशन निघून जाईल…आणि कूसापुर हून इतक्या दूर आल्याचा काहीच फायदा होणार नाही…” ते काका हसत म्हणाले.
कुसापुर हे नाव ऐकुन अक्षय विचारत पडला. त्याने हे नाव कुठेतरी ऐकले होते. त्याने खूप आठवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला आठवले…त्याच्या मित्राने सत्याने त्याला सांगितले होते की रिध्दीच लग्न कुसापुरच्या सावकाराच्या मुलासोबत जुळले होते. आता मात्र त्याला राहवले नाही. त्या काकांना त्या सावकाराच्या मुलाबद्दल विचारायची इच्छा झाली. शेवटी त्याने विचारलेच…
” काका…तुमची हरकत नसेल तर एक विचारू का..?”
” विचार ना…माझी काही हरकत नाही…”
” तुमच्या गावातील सावकाराच्या मुलाचं लग्न ठरलं होतं ना…”
” हो…आठवतंय…पण लग्नाच्या आधीच तो मुलगा मरण पावला…”
” नेमक काय झालं होतं त्याला…?” अक्षय ने विचारले.
” तसं नक्की काही माहिती नाही…पण असं म्हणतात की त्याला कॅन्सर झाला होता… तो वाचणार नाही हे त्याच्या घरच्यांना कळून चुकलं होतं तरीपण त्यांनी त्याचे लग्न ठरवले…त्यांना वाटले की कदाचित लग्न झाल्यावर त्याची तब्येत बरी होईल…किंवा तो बिनालग्नाचा मरता कामा नये म्हणून…आणि त्याला एखादे मूल व्हावे हा देखील त्या मागचा हेतू होता…मोठ्या लोकांच्या गोष्टी त्या…त्याच्या बिमारीबद्दल जास्त लोकांना माहिती नव्हते…आणि ज्यांना माहिती होते त्यांची हिम्मत नव्हती मुलीकडच्यांना सांगायची…पण दुर्दैवाने म्हणा किंवा त्या मुलीच्या सुदैवाने म्हणा…पण तो मुलगा लग्न व्हायच्या आधीच मरण पावला…शेवटी आपल्या हाती काहीच नसतं…सर्व काही त्या पांडुरंगाच्या हाती असतं…” काका सांगत होते.
आणि अक्षय ऐकत होता.. नुसताच ऐकत होता…यापुढे काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं.. या जगात असेही लोक असतात याचं त्याला आश्चर्य वाटलं आणि वाईट सुद्धा. त्यांनी रिद्धी च्या घरच्यांना अंधारात ठेवून लग्न ठरवले होते. जर लग्न झालं असतं आणि नंतर त्या मुलाला काही झालं असतं तर त्याचे खापर सुद्धा सिद्धी वर फोडले असते. काहीही झालं तरी फक्त मुलीलाच दोष देणार…ती बिचारी स्वतःला अपशकुनी समजून तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे…पण नाही…यापुढे नाही…तिला हे सर्व कळायला हवं…तिच्या घरच्यांना सुद्धा हे सर्व कळायला हवं…
अक्षय त्याच्या विचारातून बाहेर आला…पुढचं स्टेशन आलं…त्यांनी त्या काकांना झोपेतून जागे केले…आणि त्या काकांसोबत तो सुद्धा तिथेच उतरला…त्याने गावी परत जाणारी ट्रेन पकडली आणि तो तडक मामांच्या घरी गेला…
त्याला परत आलेलं बघून मामा मामींना आश्चर्य वाटले. मग त्याने मामा मामिंना सर्व काही सांगितले. आणि त्यांना घेऊन लगेच रिद्धी च्या घरी गेला. रिद्धी च्या घरच्यांना सुद्धा अक्षय ला इतक्या लवकर परत आलेलं बघून आश्चर्य वाटले. मग अक्षयने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
रिद्धि च्या घरच्यांना हे ऐकुन धक्काच बसला. त्यांनी लगेच लग्नात मध्यस्त असलेल्या व्यक्तीला फोन लावला. पण तो व्यक्ती काही केल्या हे मानायलाच तयार नव्हता की त्या मुलाला आधीपासूनच आजार होता. मग मात्र रिद्धी च्या वडिलांनी त्याला फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसात जाण्याची धमकी दिली. तेव्हा तो सर्व काही बोलता झाला.
त्याने कबूल केले की त्याने रिद्धीच्या घरच्यांना फसवून हे लग्न केले होते. त्यासाठी मुलाकडून त्याला मोठी रक्कम मिळाली होती. हे ऐकुन रिद्धीच्या घरच्यांचे जणू अवसान गळाले. फक्त चांगलं श्रीमंत घर आहे म्हणून आपण नीट चौकशी न करता रिद्धी च लग्न त्यांच्या मुलाशी लावून द्यायला निघालो होतो याचा त्यांना पश्चात्ताप झाला.
(अक्षय आणि रिद्धी चे पुढे काय होईल हे पाहूया पुढील भागात…)
क्रमशः
अपशकुनी?- भाग ४
https://mitawaa.com/%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%aa/