” मी मागच्या वेळी माझ्या गळ्यातून काढून माझ्या कपटातच ठेवली होती बोरमाळ…मला अगदी व्यवस्थित आठवतंय…” शांता काकू रागाने बोलत होत्या.
” अग आई…एकदा नीट बघ…तिथेच असेल…कपाटातून कुठे जाणार…? सुरेश म्हणाला.
” कुठे जाणार…तुझ्या बायकोशिवाय कोण हात लावणार आहे माझ्या कपाटाला…घेतली असेल माझ्या कपाटातून आणि दिली असेल तिच्या माहेरच्या लोकांना…तसेही ते आहेतच मुलखाचे दरिद्री…”
” नाही आई…देवाशप्पथ घेऊन सांगते मी तुमच्या कपाटाला हात सुद्धा लावला नाही…” सरला भीतीने थरथरत म्हणाली.
” तुझ्याशिवाय कोण असणार आहे…घरात तुझ्या माझ्या शिवाय कोण असतं दिवसभर… बऱ्या बोलाने सांग कुठं ठेवली आहेस…नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही…” शांता काकू सूनेवर जोरात ओरडत म्हणाल्या.
” मी खरं सांगतेय आई…मला काहीच माहिती नाही..” सरला रडत म्हणाली.
” आई…सरला असे काही करणार नाही…ती इतके खोटे बोलणार नाही…तू परत बघ ना एकदा कपाटात…” सुरेश आईला म्हणाला.
” म्हणजे तुला काय म्हणायचंय…की मी खोटं बोलतेय…आईच्या बोलण्यावर विश्वास नाही तुला..अन् या काल आलेल्या बायकोवर विश्वास आहे….मी माझं कपाट चांगलच बघितलं पण बोरमाळ सापडली नाही…मी तुला सांगतेय सुरेश…हे सर्व तुझ्या बायकोचं काम आहे..”
शांता काकू काही केल्या सरलाचे ऐकुन घेत नव्हत्या. सरला मात्र रडून रडून सांगत होती की तिने सासूबाईंच्या कपाटाला अजिबात हात लावलेला नाही पण त्या काही ऐकायला तयारच नव्हत्या. सुरेश पण आईच्या पुढे फार काही चालले नाही. शेवटी शांता काकूंनी सरलाला तिच्या माहेरी सोडण्याचे फर्मान काढले.
सरला तिच्या सासूच्या पायात पडली पण तिच्या सासूबाईंनी मात्र त्यांचा निर्णय बदलला नाही. सुरेशला वाटले की काही दिवस सरला ला माहेरी ठेवावे. तोपर्यंत आईचा राग ही शांत होईल. मग तिला परत घेऊन येऊ. हा विचार करून सुरेशने सरलाला माहेरी सोडले.
सरला आणि सुरेशचे मागच्या वर्षीच लग्न झाले होते. सरलाच्या माहेरची परिस्थिती बेताचीच होती. सरला दिसायला सुंदर होती. शिवाय गरीबघरची लेक. त्यामुळे आपण जे सांगू ते मुकाट्याने ऐकणार म्हणून शांता काकूंनी सुरेशसाठी तिला सून करून आणली.
सरला प्रत्येक कामात हुशार होती. साधी, सरळ, प्रेमळ. कधीच कुणालाही उलटुन बोलायची नाही. जे मिळेल त्यामध्ये समाधान मानणारी. आपल्या कुटुंबाला आपलं सर्वस्व मानणारी. पण शांता काकू मात्र कधीच तिचे कौतुक करत नसत. उलट लहान सहान चुकांवरून तिच्या माहेरच्या घरीबीचा उद्धार करत. पण सरला मात्र सर्वकाही निमूटपणे ऐकुन घ्यायची.
कारण तिचे तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होते. सुरेश सुद्धा सरलाला जीवापाड जपायचा. दोघांच्या आयुष्यात एकमेकांच्या येण्याने त्यांचं आयुष्य सुंदर बनवले होते. त्यामुळे शांता काकू सरलाला काहीही बोलल्या तरी सरलाला अजिबात वाईट वाटायचं नाही. कारण तिला तिच्या नवऱ्याची भक्कम साथ होती..
मध्यंतरी शांता काकू खूप जास्त आजारी होत्या. त्या वेळी सरलाने शांता काकूंची खूप सेवा केली. त्यामुळे शांता काकू सरला च्या बाबतीत थोड्या सौम्य झाल्या होत्या. सरला ला वाटलं होतं की आता सर्व काही सुरळीत झालं आहे. पण आज शांता काकूंची सोन्याची दोन तोळ्यांची बोरमाळ हरवली आणि शांता काकूंनी सरलावर त्या माळेची चोरी करण्याचा आरोप केला. आणि सर्व काही होत्याचे नव्हते झाले.
सरलाला माहेरी जाऊन चांगले दोन महिने झाले तरीही शांता काकूंचा राग काही केल्या जात नव्हता. उलट त्या सुरेशच्या दुसऱ्या लग्नाच्या मागे लागल्या. सुरेशने सरला सोबत काडीमोड घ्यायला नकार दिला तेव्हा शांता काकूंनी त्याला जीव द्यायची धमकी दिली.
सुरेशने आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण शांता काकू काहीच ऐकत नव्हत्या. शेवटी त्यांच्या जीव देण्याच्या धमकीला घाबरून सुरेशने दुसऱ्या लग्नाला होकार दिला. सरलाच्या माहेरचे लोक खूप गरीब होते. आधीच ते चोरीच्या आरोपा ने व्यथित होते.
त्यामुळे शांता काकूंनी घटस्फोट मागितल्यावर त्यांनी तडजोडीचे प्रयत्न न करता घटस्फोट द्यायला तयार झाले. शांता काकूंनी तातडीने घटस्फोटाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि सुरेश चे दुसरे लग्न लावून दिले.
इकडे सरला ला सुद्धा दुसऱ्या लग्नासाठी मागण्या येऊ लागल्या होत्या. त्यामध्ये अविनाश चे स्थळ त्यांना उत्तम वाटले. अविनाश सरकारी नोकरीवर होता. त्याला एक लहान मुलगी होती. बायको कसल्याशा आजाराने दगावली होती. सरला च्या माहेरच्यांनी सरला आणि अविनाशचे लग्न लावून दिले. अविनाश चांगला मुलगा होता. त्याच्या सोबत लग्न झाल्यावर सरला काही दिवसातच तिचा भूतकाळ विसरून गेली.
पण इकडे सुरेश मात्र सरलाला विसरू शकला नव्हता. त्याची दुसरी बायको मनीषा खूप कजाग बाई होती. अगदी प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून भांडण उकरून काढायची. हळूहळू मनीषा ने शांता काकूंच्या हातचे सर्व अधिकार काढून घेतले.
शांता काकूंची परिस्थिती आता तितकीशी चांगली राहिली नव्हती. सरलावर त्या सतत हुकुम चालवायच्या. मात्र मनीषाच्या पुढे त्यांचे काहीच चालायचे नाही. आईने जबरदस्ती सरलाला घराबाहेर काढून त्याचे दुसरे लग्न लावून दिल्याने सुरेश सुद्धा त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळे शांता काकू स्वतःच्याच घरात एखाद्या परक्या व्यक्ती सारख्या राहत होत्या.
बोरमाळ चोरीला गेल्याची घटना घडून आठ वर्ष उलटून गेले होते. शांता काकूंच्या घरात दिवाळीची साफसफाई सुरू होती. शांता काकूंच्या खोलीतील लाकडी कपाट आता जुने झाले होते. त्यामुळे त्याला रंग देण्याचे ठरवले. त्यासाठी आधी सुरेश त्या कपाटाची साफसफाई करत होता.
साफसफाई करताना अचानक त्याला कपाटाच्या आतल्या फटीत अडकून बसलेली आईची सोन्याची बोरमाळ दिसली. बोरमाळ दिसताच सुरेश डोक्यावर हात देऊन मटकन खाली बसला. हीच बोरमाळ चोरल्याचा आरोप ठेवून त्याच्या सरलाला घरातून अपमान करून बाहेर काढण्यात आले होते. त्याने ती माळ शांता काकूंना दाखवली.
शांताकाकूंच तर डोकंच काम करत नव्हतं. त्यांच्या हातून किती मोठी चूक झाली आहे हे त्यांना कळून चुकले होते. त्यांनी त्यांच्या गैरसमजातून त्यांच्या मुलाचा सोन्याचा संसार मोडला होता. सुरेशला आयुष्यभराचे दुःख दिले होते.
एका निष्पाप मुलीला चोर म्हणून हिणवले होते. कदाचित त्याचीच फळे म्हणून शांता काकू आज दुःख भोगत होत्या. शांता काकूंना दुःख अनावर झाले होते. त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होत होता. पण आता सर्व गोष्टींसाठी खूप उशीर झाला होता. सर्वांचे आयुष्य मानणारी होते.
त्या दिवशीपासून सूरेशने शांता काकुंशी बोलणे सोडून दिले. सुरेशने सरलाचा निष्पाप चेहरा आठवून अनेक रात्री जागवून काढल्या होत्या. शांता काकू त्यानंतर स्वतःला कधीही माफ करू शकल्या नाहीत. या सर्वांपासून अनभिज्ञ असणारी सरला मात्र अविनाश सोबत एक सुखी आयुष्य जगत होती.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.