प्रितीच्या वडिलांना वाटायचे की प्रीतीने स्वतःहून तिच्या सासरी निघून जावे. कारण विवाहित मुलगी माहेरी राहणे त्यांना पटत नव्हते. लोक काय म्हणतील हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आणि ह्या विचाराने त्यांनी कधीच प्रितीच्या डोक्यावरून मायेचा हात सुद्धा फिरवला नाही.
प्रीतीचा आधार आता फक्त तिची आई होती. तिला माहेरी येऊन सात महिने झाले तरीही पंकज ने तिची साधी चौकशी सुद्धा केली नव्हती. प्रीती आतल्या आत घुसमटत होती. ती सतत फोन कडे बघायची. तिला वाटायचं की पंकज तिला नक्कीच कॉल करेन.
तिला ते दिवस आठवत जेव्हा पंकज तिला प्रेमाची कबुली द्यायचा आणि जन्मभर तिला सोबत देण्याचे वचन द्यायचा. काळजी आणि विचारांनी प्रीतीला भरून यायचं. गुलाबी स्वप्नं पहायच्या वयात ती इतके दुःख सहन करत होती.
इकडे पंकजच्या आईने मात्र पंकज ला शपथा देऊन प्रितीशी बोलायचे नाही असे सक्तीने सुनावले होते. तुझ्या आईचा अपमान केलाय तिच्या घरच्यांनी असे बोलून वारंवार इमोशनल ब्लॅकमेल करायची. आणि तू जर तिला भेटायला गेला तर मी जिवाचं बरं वाईट करेल अशी धमकी सुद्धा द्यायची.
असेच दिवस जात होते. आणि एके दिवशी मध्यरात्री अचानक प्रितीच्या पोटात कळा सुरू झाल्या. घरच्यांनी कसेतरी तिला घेऊन शहरातल्या दवाखान्यात दाखल केले. आणि प्रीतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाला पाहून प्रीती सुखावली. तिच्या सुन्या आयुष्यात जणू वसंत बहरला होता.
तिच्या घरच्यांना सुद्धा आनंद झाला. त्यांनी लगेच प्रितीच्या सासरी फोन करून त्यांना आनंदाची बातमी दिली. त्यांना वाटले की निदान मुलासाठी तरी प्रीतीला घरी घेऊन जातील. पण प्रितीच्या सासूबाईंनी निरोप पाठवला की मुलीसोबत नातवाला सुद्धा तुमच्या घरीच ठेवून घ्या. आता तिच्याशी आणि तिच्या मुलाशी आम्हाला काहीच देणं घेणं नाही. प्रितीच्या सासूबाईं चे बोलणे ऐकुन सर्वांनाच धक्का बसला.
आता प्रितीच्या घरचे तिला सरळ मार्गाने नांदवणार नाही हे प्रितीच्या घरच्यांना कळून चुकले होते. बाळाच्या येण्याने सुखावलेली प्रीती थोड्या वेळा पुरती का होईना तिचे दुःख विसरून गेली होती. पण तिच्या घरच्यांचे चेहरे मात्र सुतकी झाले होते.
प्रीती बाळाला घेऊन तिच्या माहेरी गेली तेव्हा कुणीच तिचे आनंदाने स्वागत केले नाही. तिच्या वडिलांना लोक काय म्हणतील ह्या विचाराने हैराण करून सोडले होते. तर आईला मुलीचा संसार मोडल्याचे दुःख होत होते. वहिनीच्या चेहऱ्यावर त्रागा दिसत होता. तर दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर बेफिकिरी दिसून येत होती. आनंद मात्र कुणालाच झाला नव्हता.
काही लोकांच्या चुकीमुळे उद्भवलेल्या ह्या परिस्थिती मुळे ज्या चिमुकल्या जीवाचा नुकताच जन्म झाला होता त्याची मात्र होरपळ होत होती. प्रितीची वहिनी आता तिचा उघडपणे अपमान करायची. प्रितीच्या बाबांची सुध्दा तिच्या माहेरी राहण्यावरून नाराजी असल्याने वहिनीला कोणी काही बोलत नसे.
प्रितीच्या आईला मात्र लेकीची अवस्था पाहून वाईट वाटायचे. मात्र प्रितीची वहिनी सासूला सुद्धा उलट उत्तर द्यायची. घरात असलेली आईची सत्ता संपुष्टात येऊन आता घरावर वहिनीचा अधिकार आलाय हे कळायला प्रीतीला उशीर नाही लागला. वहिनीचे बाळ प्रितीच्या बाळा पेक्षा फक्त दोन महिन्यांनी मोठे होते. त्याचे सर्वजण कौतुक करायचे मात्र प्रितीच्या बाळाचे कौतुक करायला कुणालाच वेळ नसे.
बाळाला पाहून प्रीतीला फार वाईट वाटायचे. ह्या सर्वात ह्या लेकराचा काय दोष होता. पण तरीही त्याच्या नशिबी असे काही आले होते. प्रीती मात्र बाळाचे खूप लाड करायची. तिने प्रेमाने बाळाचे नाव पार्थ ठेवले. पार्थ आईच्या प्रेमाच्या छायेखाली मोठा होत होता.
जसजसा पार्थ मोठा होत होता प्रितीच्या कष्टात देखील वाढ होत होती. प्रितीच्या भावांनी प्रितीच्या सासरच्या लोकांविरुद्ध कोर्टात केस केली होती. त्यांनी प्रीतीला सोबत घेऊन जावं किंवा तिचा खर्च द्यावा अशी त्यांनी मागणी केली. प्रितीच्या सासरच्यांनी मात्र ह्याला नकार दिला.
कोर्टात तारीख पे तारीख दिली जात होती. आरोप प्रत्यारोप होत होते. कधी पंकज तारखेवर हजार व्हायचा तर कधी गैरहजर राहायचा. दिवसामागून दिवस जात होते पण केसचा काही निकाल लागत नव्हता.
अशातच प्रितीचे वडील एके दिवशी अचानक हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावले. घरचे सर्व दुःखात होते. प्रितीची आई तर अजून ही सावरली नव्हती. वडिलांच्या मागे घराची सर्व जबाबदारी भावांवर येऊन पडली. पण वहिनीने मात्र ह्या सर्व परिस्थितीचा फायदा घेत घरातील सर्व व्यवहार स्वतःच्या हातात घेतला.
आता प्रीतीला कोणतीही गरज भासली तरीही वहिनीच्या समोर हात पसरावे लागायचे. भावाला तर काही सांगायची सोयच नव्हती. तो त्याच्या बायकोच्या शब्दाबाहेर नव्हता. वहिनी प्रितीच्या बाळाच्या लहान सहान गरजांसाठी देखील पैसे देत नसे. तिला तिच्या बाळासाठी वहिनीच्या मुलाच्या वापरलेल्या वस्तू वापराव्या लागत.
वहिनी तिच्या मुलासाठी खायला खाऊ आणायची आणि लहानग्या पार्थ समोर खाऊ घालायची. पार्थ ला देखील ते पाहून खायची ईच्छा व्हायची. मात्र प्रीती त्याच्यासाठी काही आणू शकत नव्हती. पार्थने हट्ट केला की ती कंटाळून त्याला पाठीवर दोन धपाटे ठेवून द्यायची. पार्थला रडताना पाहून तिचा सुद्धा जीव खालीवर व्हायचा. पण तिचा नाईलाज होत होता.
सुरुवातीला प्रितीचे भाऊ तिच्यासोबत कोर्टाच्या सुनावणी साठी जायचे. पण लवकर निकाल लागणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ह्या जबाबदारीपासून हात झटकले. त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर प्रीतीला माहेरी आणले होते पण आता त्यांना ती ओझं वाटत होती.
सुरुवातीला पंकज च्या आठवणीने व्याकुळ होणारी प्रीती आता मात्र सावरली होती. हळूहळू तिच्या मनातील प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती. पंकजला आपली थोडीसुद्धा काळजी नाही हे उशिरा का होईना तिला कळून चुकले होते. आणि एके दिवशी एक असा प्रसंग घडला ज्यामुळे प्रीतीला वास्तविक तेची जाणीव झाली.
पार्थ त्याच्या मामाच्या मुलासोबत खेळत असताना चुकून पार्थचा धक्का लागून वहिनीचा मुलगा धक्का लागून खाली पडला. त्याला फारसे लागले ही नव्हते. पण वहिनीने छोट्याश्या गोष्टीचा बाऊ करत पार्थला एका काठीचे फटके मारले.
प्रीती अंघोळीला गेली होती. पार्थच्या रडण्याचा आवाज ऐकुन ती धावतच त्याच्याकडे आली तेव्हा तिने पाहिले की वहिनी अमानुषपणे पार्थला मारत होती. आणि पार्थ जिवाच्या आकांताने ओरडत होता. ते दोन वर्षाचं लेकरू मार खाताना जिवाच्या आकांताने ओरडत होतं. प्रीतीला पाहून पार्थ धावतच तिला येऊन बिलगला.
आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून प्रीती एखाद्या जनावरा प्रमाणे रडली होती. तरीही वहिनीला पाझर फुटला नाही. कितीतरी वेळ पार्थ आईला बिलगुन रडत होता. पार्थच्या शरीरावर काठीचे वळ उमटले होते. त्याला हळद लावून देताना प्रीती स्वतःचे हुंदके आवरू शकत नव्हती.
प्रितीच्या भावांना झालेला प्रकार समजला तरीही त्यांनी साधी तिची आणि पार्थची विचारपूस देखील केली नाही. आपल्या घरच्यांनी वागणूक पाहून प्रीती हादरली होती. इतक्या लहान वयात तिने माणसांचे खूप रंग पाहिले होते.
आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी आपणच काहीतरी करायला पाहिजे हे तिला आता चांगलेच लक्षात आले होते. तिने ठरवले होते. आता आपल्या गरजांसाठी दादा आणि वहिनीवर अवलंबून राहते नाही. त्यांनी पार्थ सोबत जे केले त्यानंतर तर तिला वहिनीचे तोंड पाहायची देखील इच्छा उरली नव्हती.
क्रमशः
एकाच ह्या जन्मी जणू – भाग ३
©®आरती खरबडकर.
फोटो साभार – गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.
Comments 1