” किती निर्लज्ज बायका असतात ना…आधी माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद केलं आणि आता पुन्हा बोहल्यावर चढणार आहे मेली…” शारदाताई बडबडत होत्या. त्यांना असे बोलताना पाहून नितीन ने त्यांना विचारले.
” काय झाले आई…कसला त्रागा करत आहेस…आणि कोण चढतय पुन्हा बोहल्यावर..?”
” तुझी बायको मीनाक्षी… तिचं दुसरं लग्न ठरलंय…” आईने त्राग्यानेच उत्तर दिले.
” काय…?” नितीन जवळपास ओरडलाच. त्याला ते ऐकणं सुद्धा असह्य झालं होतं. तो मटकन खाली बसला. अगदी शून्यात पाहत. अन् झर्रकन त्याच्या समोर त्याचा भूतकाळ समोर आला.
मीनाक्षी त्याच्या सोबतच हायस्कूलला जायची. तो दहावीत होता तेव्हा ती आठवीत होती. दोघेही एकाच गावात राहायचे. एकदा त्याच्यामुळे चुकून सरांच्या बाईकला धक्का लागला आणि ती पडली. मीनाक्षी त्यावेळेला तिथेच उभी होती. त्यानंतर थोड्या वेळाने सरांनी गाडी पडलेली पहिली आणि ते प्रचंड चिडले. त्यांनी सगळ्यांना विचारले की हे कोणी केले. त्यांना घाबरून नितीन काहीच सांगू शकला नव्हता. पण इतर मुलांनी सांगितले की मीनाक्षी तिकडे उभी दिसली होती.
सरांनी मीनाक्षीला विचारले पण तिने सरांना त्याचे नाव सांगितले नाही. सरांनी मीनाक्षीला दोन तास वर्गाच्या बाहेर उभ राहण्याची शिक्षा केली पण तरीही तिने त्यांना नितीनचे नाव सांगितले नाही. मग नितीन स्वतःहून पुढे आला आणि त्याने परिणामांची चिंता न करता सरांना खरे सांगितलेच. मग सरांनी मीनाक्षीची शिक्षा माफ करून नितीनला दोन तास वर्गाच्या बाहेर उभे केले. पण त्या प्रसंगा नंतर नितीनला मीनाक्षी आवडायला लागली होती. तो मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करायला लागला होता.
इकडे गावात दहावी पर्यंत आणि मग तालुक्याला बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर मीनाक्षीचे वडील तिला पुढे शिकवायच्या फंदात पडले नाही. नितीन मात्र पदवीधर झाला आणि लगेच तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या नोकरीवर लागला सुद्धा. इकडे मीनाक्षीच्या वडिलांनी तिच्यासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली होती. मीनाक्षी दिसायला खूपच सुंदर होती. गोरापान रंग, सुबक बांधा, लांब असलेले कुरळे केस, त्यावर तिचे टपोरे डोळे, बोलणे सुद्धा लाघवी. त्यामुळे तिच्या लग्नासाठी चांगली स्थळे आपणहून यायला होती.
नितीनने वेळ न दवडता स्वतःच्या घरी आपल्याला मीनाक्षी आवडत असल्याचे सांगून टाकले. सोबतच तिला मागणी घालायची इच्छा पण बोलून दाखवली. नितीनचे वडील तर तयार झाले पण नितीनची आई मात्र लवकर तयार झाली नाही. एकतर मीनाक्षीच्या घरची परिस्थिती ह्यांच्या मानाने फारशी चांगली नव्हती. त्यातच एकाच गावातील मुलगी सून म्हणून त्यांना नको होती. पण नितीनच्या हट्टापायी थोडे आढेवेढे घेतल्यानंतर त्या सुद्धा तयार झाल्या.
नितीनच्या वडिलांनी मीनाक्षीच्या वडिलांकडे लग्नाचा विषय काढला तेव्हा चांगले स्थळ म्हणून त्यांनी सुद्धा लगेच त्यांचा होकार दिला. आणि लवकरच थाटामाटात नितीन आणि मीनाक्षीचे लग्न पार पडले. नितीन खूप खुश होता. त्याचे मीनाक्षी वर खूप प्रेम होते. मीनाक्षी सुद्धा एवढे प्रेम मिळाल्याने भरून पावली होती.
दोघांचा संसार अगदी आनंदाने सुरू झाला होता. सुरुवातीला शारदाताईं मीनाक्षी सोबत जरा अंतर ठेवून वागायच्या. पण मीनाक्षीने त्यांना तक्रारीला कुठली जागाच ठेवली नाही. मग हळूहळू त्यांना सुद्धा मीनाक्षी मनापासून आवडायला लागली. सगळं काही सुरळीत चाललं होतं. नितीन नोकरीच्या निमित्ताने रोज सकाळी तालुक्याच्या गावी जायचा अन् संध्याकाळी परत यायचा.
त्यांच्या आयुष्यात वादळ आले ते शिल्पाच्या रूपाने. मीनाक्षीचा दिर धीरज एके दिवशी अचानकच शिल्पासोबत लग्न करून घरी आला. घरच्यांना खूपच मोठा धक्का बसला. त्याने जर शिल्पा सोबत प्रेमविवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली असती तर घरच्यांनी काही फार विरोध केला नसता त्याला. पण मग हे अचानक लग्न करण्याची नेमकी काय गरज पडली त्याला हे त्यांना कळतच नव्हते.
धीरजने सगळ्यांना सांगितले की शिल्पाच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले होते आणि परवाच साखरपुडा सुद्धा करणार होते. शिल्पा म्हणाली की तुझ्याशी लग्न झाले नाही तर मी जिवाचं काही बरंवाईट करेन. म्हणून मग काहीच न सुचून त्यांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केले आणि तो सरळ तिला घेऊन घरी आला.
घरचे नाराज तर होतेच. पण आता जे झालंय त्याला स्वीकारण्या खेरीज काही पर्याय सुद्धा उरला नव्हता. मग सगळ्यांनी मोठ्या मनाने त्यांच्या लग्नाला स्वीकृती दिली आणि रीतसर शिल्पाचा गृहप्रवेश केला. शिल्पाला घरात सगळ्यांनी सामावून घेतले. शिल्पा सुद्धा खूप खुश होती. धीरज आणि तिचा संसार अगदी मजेत सुरू होता. मीनाक्षी तर शिल्पा मध्ये आपली लहान बहीण बघायची. त्यामुळे तिच्या घरात येण्याने मीनाक्षी सुद्धा खूप खुश होती.
शिल्पा आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लहानपणापासून अगदी लाडाकोडात वाढलेली. तिच्या सगळ्याच मागण्या तिच्या आईवडिलांनी पूर्ण केल्या होत्या. लग्न करताना त्यांनी त्यांच्याच तोलामोलाचा मुलगा पाहून तिचे लग्न ठरवले होते. धीरजचे स्थळ त्यांच्या तोलामोलाचे नव्हते शिवाय तो गावात राहायचा. शिल्पाच्या आईवडिलांना वाटत होते की शिल्पा सध्या प्रेमात आहे म्हणून धीरजशी लग्न करण्याचा हट्ट करतेय पण पुढे ह्याचं लग्न टिकणे अवघड आहे. म्हणून त्यांचा या लग्नाला स्पष्ट विरोध होता. पण शिल्पा आणि धीरज ने पळून जाऊन मंदिरात लग्न केल्यामुळे शिल्पाचे आईवडील तिच्यावर खुप रागावले होते. पण शेवटी काहीही झाले तरी शिल्पा त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि म्हणून नाईलाजाने का होईना त्यांनीसुद्धा हे लग्न स्वीकारले होते.
लग्न झाल्यावर सुरुवातीला शिल्पा खूप खुश होती. सासरचे लोक तिला खूप जपायचे. मीनाक्षी तर तिला एका कामाला सुद्धा हात लावू देत नव्हती. धीरज सुद्धा तिच्या हौसमौज पूर्ण करत होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण लवकरच शिल्पाला वाटायला लागले की या घरात जितके कौतुक मीनाक्षीचे होते तितके तिचे होत नाही.
क्रमशः