शिल्पाला वाटायचे की मीचांगल्या श्रीमंत घरातून आले आहे त्यामुळे माझे कौतुक सगळ्यांना जास्त असायला हवे. माझ्या मताला घरात जास्त किंमत असावी. मीनाक्षीला घरात जेवढा मान मिळतो तेवढा आपल्याला मिळत नाही असे तिला वाटायला लागले होते. घरात सगळेच मीनाक्षीच्या हातच्या स्वयंपाकाची, तिच्या स्वभावाची सगळे स्तुती करायचे ते शिल्पाला हल्ली खटकायला लागले होते.
विशेषकरून धीरज जेव्हा प्रत्येक कामासाठी वहिनीला हाक द्यायचा तेव्हा शिल्पाची चिडचिड व्हायची. मग हळूहळू ती मीनाक्षी सोबत तुटक वागायला लागली. मीनाक्षीच्या ते लक्षात यायला लागले होते. पण शिल्पाचा स्वभाव अल्लड आहे हे ती जाणून होती. म्हणून मीनाक्षीने प्रेमाने तिला तिच्या वागण्याचे कारण विचारले. पण शिल्पाने तिला मनातले काहीच सांगितले नाही. तिचा त्रागा मात्र सुरूच होता.
अशातच लवकरच मीनाक्षी आणि नितीनला गोड बातमी मिळाली. मीनाक्षीला दिवस गेले होते. या बातमीने नितीन सोबत सगळेच खूप आनंदी होते. त्या दिवशी पासून घरातील सगळेच मीनाक्षीला खूप जपायला लागले होते. सासूबाई मीनाक्षीच्या आवडीचे पदार्थ स्वतः बनवून तिला खायला घालू लागल्या होत्या. नितीन तिची खूप काळजी घ्यायचा. धीरज सुद्धा घरी येताना बाहेरून वहिनीसाठी खायचे पदार्थ घेऊन यायला लागला होता. यामुळे शिल्पा आणखीनच बावरली होती.
एके दिवशी नितीन अन त्याचे बाबा शेतीच्या कामानिमित्ताने शेजारच्या गावी गेले होते. धीरज सुद्धा बाहेर गेला होता. शिल्पा अन् सासूबाई आपापल्या खोलीत आराम करत होत्या. मीनाक्षीला झोप येत नव्हती म्हणून तिने कपाट आवरायला घेतले होते. पण उभ्या उभ्या तिला चक्कर आली आणि ती लगेच जमिनीवर कोसळली सुद्धा.
नेमके त्याच वेळेला धीरज घरात आला होता. धाडकन पडल्याचा आवाज आल्याने धीरज ने खोलीत डोकावून पाहिले तर मीनाक्षी खाली पडली होती. तो धावतच आत गेला आणि मीनाक्षीला आधार देऊन उठवले. तोवर मीनाक्षी सुद्धा शुद्धीवर आली होती. धीरजचा आवाज ऐकून शिल्पा सुद्धा तिच्या खोलीतून निघून मिनाक्षीच्या खोलीत आली. धीरज वहिनीला आधार देऊन उठवत होता. धीरज आणि मीनाक्षीला बघून शिल्पा जोरात ओरडली.
” काय आहे हे धीरज…इथे काय करतोयस तू…आणि वहिनी तुम्हाला लाज नाही का वाटत…माझ्या नवऱ्याला नादी लावायला…म्हणूनच तर म्हटलं की नुसतं वहिनी वहिनी का करतो…”
” काय बोलतेस शिल्पा…अगं वहिनी पडल्या होत्या…मी तर त्यांना सावरायला आलो होतो…” धीरज काकुळतीला येऊन म्हणाला.
” हो का…बरोबर तुझ्या मिठीत पडल्या असतील…दिसायला तर खूपच गरीब दिसतात ह्या…पण अंगात काय काय गुण आहेत ह्यांच्या…” शिल्पा आरडाओरड करत बोलत होती.
ह्यांचा आवाज ऐकून शिल्पाच्या सासूबाई सुध्दा तिथे आल्या. शिल्पाचे आरोप ऐकून त्या हादरल्याच. मीनाक्षी हे सगळे ऐकून अर्धमेली झाली होती. हे सगळं काय घडतंय हे तिला कळतच नव्हतं. शिल्पा अशी का बोलत आहे ह्याचा अंदाजच येत नव्हता. धीरज सुद्धा शिल्पा समोर हात जोडत अस काही बोलू नकोस म्हणून विणवत होता.
पण शिल्पा काही केल्या गप्प बसायला तयार नव्हती. तिने आधी घडलेल्या साध्या प्रसंगांना सुद्धा रंगवून अशाप्रकारे सांगीतले की ऐकणाऱ्याला सुद्धा तिच्या बोलण्यात तथ्य वाटले असते. शिल्पाच्या मनात एवढं सगळं चालू असेल ह्याची तिळमात्र कल्पना नसलेल्या मीनाक्षीला मात्र हे ऐकून मोठा धक्का बसला. काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. धीरज तर पार अर्धमेला झाला होता.
थोड्या वेळात नितीन परत आला आणि त्याला हा सगळा प्रकार कळला. त्याच्यासाठी सुद्धा हा मोठा धक्काच होता. शिल्पा मोठमोठ्याने ओरडुन आपलं म्हणणं सगळ्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. मीनाक्षी नुसती रडत होती तर धीरज ह्या सगळ्याने पार शरमिंदा झाला होता. आपल्या मोठ्या भावाच्या बायको सोबत आपले अशाप्रकारे नाव जोडणे आणि ते ही आपल्या बायको कडून…हे त्याला असह्य झाले होते.
सासूबाईंनी शिल्पाला तात्पुरते समजावून सांगितले. खूप जास्त आकांडतांडव केल्यावरच शिल्पाचे समाधान झाले. एवढ्या दिवस मनात साठवून ठेवलेला राग तिने अशाप्रकारे बाहेर काढला होता. नितीन मनातून पार गोंधळला होता. झाल्या प्रकारानंतर त्याने मीनाक्षीला कोणतेही प्रश्न केले नाही. आपल्या नवऱ्याचा आपल्यावर विश्वास आहे असे वाटून मीनाक्षी जरा सावरली होती.
पण सगळ्यात जास्त मोठा धक्का धीरजला बसला होता. वहिनीचा खूप आदर करायचा तो. पण आज त्या वहिनी सोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्याच्या स्वतःच्या बायकोने लावला होता. ते ही तिला माहिती होते की धीरजचे फक्त आपल्यावर प्रेम आहे म्हणून. सगळ्या जगाशी भांडून जिच्याशी लग्न केले होते तिनेच आपल्यावर हा असा आरोप करावा ही गोष्ट धीरजच्या जिव्हारी लागली होती. आणि ह्या सगळ्यानंतर घरच्यांच्या समोर जायची त्याची हिम्मत होत नव्हती.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुणी उठायच्या आधी तो घरातून निघून गेला. घरच्यांना सकाळी कळले तेव्हा आधी त्यांना वाटले की तो कुठेतरी बाहेर गेला असेल. थोड्या वेळात परत येईल. पण तो रात्रीपर्यंत घरी आला नाही तेव्हा मात्र सगळेच काळजीत पडले. त्याच्या कामाच्या ठिकाणी, त्याच्या मित्रांकडे चौकशी केली पण काहीच कळले नाही. ऑफिसला सुद्धा तो आज गेला नव्हता.
घरच्यांच्या जीवाला घोर लागला. शिल्पा मात्र ह्या सगळ्यांचा आरोप मीनाक्षीवर लावून मोकळी झाली. शिल्पाने पुन्हा आकांडतांडव केला आणि धीरज नाही म्हणून ती पण बॅग भरून तिच्या घरी निघून गेली. आता मात्र मीनाक्षीच्या सासूबाई ह्या सगळ्या साठी मीनाक्षीला कारणीभूत मानू लागल्या होत्या. खोटी गोष्ट ओरडुन ओरडुन सांगितली की ती सुद्धा ऐकणाऱ्याला खरी वाटू लागते. शिल्पाच्या बोलण्याचा सुद्धा हाच परिणाम सासूबाईंच्या मनावर झाला.
त्यांनी लगेच मीनाक्षीच्या वडिलांना बोलावणं धाडलं आणि त्यांना बोलावून घेतले. सुरुवातीला तर मीनाक्षीच्या वडिलांना काहीच कळत नव्हतं की मीनाक्षी च्या सासूबाईंनी एवढ्या तातडीने कशाला बोलावलं असेल. पण ते जेव्हा मीनाक्षीच्या सासरी गेले तेव्हा मीनाक्षीच्या सासूबाईंनी त्यांचा खूप अपमान केला. मीनाक्षीच्या वडिलांना हे ऐकून मेल्याहून मेल्या सारखे झाले.
सासूबाई सुद्धा शिल्पाचीच भाषा बोलत आहेत हे पाहून मीनाक्षी आतून हादरलीच. आपल्यामुळे आपल्या वडिलांचा इतका अपमान होतोय हे पाहून मीनाक्षी आणखीनच बिथरली. एवढ्यात नितीन बाहेरून आला. मीनाक्षीला वाटले की नितीन सासूबाईंना हे सर्व करण्यापासून थांबवेन. पण नितीन काहीच बोलला नाही. त्याला वाटले की आधीच धीरज काहीही न सांगता घरातून निघून गेलाय. शिल्पा सुद्धा माहेरी निघून गेली होती. त्यामुळे आई इतकी रागावली आहे. म्हणून त्याने आईला अडवले नाही. नितीन काहीच बोलत नाही हे पाहून मीनाक्षी दुखावली. अशातच सासूबाई मीनाक्षीच्या वडिलांना म्हणाली की,
” घेऊन जा तुमच्या मुलीला…आमच्या अख्ख्या घराला देशोधडीला लावले हिने…माझा मुलगा घर सोडून निघून गेलाय…सून पण रुसून गेली…हेच संस्कार केलेत का तुम्ही तिच्यावर… असले गुण उधळलेत हिने…ही मला आता माझ्या घरात नकोय…” सासूबाई रागाने म्हणाल्या.
त्यानंतर मीनाक्षीच्या वडिलांनी काहीही स्पष्टीकरण न देता मीनाक्षीला आपल्या घरी घेऊन जाणे पसंत केले. त्यांना माहिती होते की शारदाताई आता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत म्हणून. मीनाक्षीने आशेने नितीनकडे पाहिले पण नितीनने मान खाली घातली. नितीनच्या नजर चोरण्याने मीनाक्षीला जे समजायचं ते ती समजून गेली. मग काहीही न बोलता मीनाक्षी तिच्या वडिलांसोबत निघून गेली.
झाल्या प्रकाराने मीनाक्षीचे वडील खचून गेले होते. ते आयुष्यभर अख्ख्या गवसमोर सन्मानाने जगले होते आणि आता आयुष्याच्या शेवटी ही अशी बदनामी झाली होती. गावभर ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. कालपर्यंत जे लोक मीनाक्षीच्या सोज्वळपणाचे कौतुक करायचे ते सुद्धा आता तिच्या मागून तिलाच दूषण देऊ लागले होते. धीरजचा एव्हाना पत्ता लागला नव्हता.
मीनाक्षी तर अतिविचाराने पार कोलमडून गेली. तिला अजूनही आशा होती की नितीन तिच्या जवळ येईल. तिला सन्मानाने पुन्हा घरी घेऊन जाईल. पण नितीन आलाच नाही. किंबहुना आता नितीनच्या मनात सुद्धा संशयाने घर केलं होतं.
वाईट दिवस आले की ते आपल्यासोबत अनेक वाईट घटना घेऊन येतात. एके दिवशी अचानक मीनाक्षीची तब्येत बिघडली. तिला तालुक्याला दवाखान्यात दाखवल्यानंतर कळले की तिच्या पोटातलं बाळ दगावले. आता मात्र मिनाक्षीच्या दुःखाने परिसीमा गाठली होती. मीनाक्षीला आता फक्त वेड लागायचे बाकी होते.
एवढे सगळे झाल्या नंतरही नितीन तिला भेटायला आला नव्हता. त्यामुळे मीनाक्षीच्या घरच्यांना जे समजायचे होते ते कळून चुकले होते. मीनाक्षीच्या सासरचे आता मीनाक्षीला घरी घेऊन जाणार नाहीत हे त्यांना स्पष्टच कळले होते. मिनाक्षीच्या वडिलांनी मनात कसलासा निर्धार केला आणि गावातल्या काही ज्येष्ठ लोकांना घेऊन नितीनच्या घरी बोलणी करायला गेले.
पण नितीनच्या आईवडिलांकडून मीनाक्षीला परत नेण्याची तयारी दिसत नव्हती. उलट ते तिचा आणखीनच राग करायला लागले होते. मग मीनाक्षीच्या वडिलांनी स्वतःहूनच मीनाक्षी आणि नितीनच्या घ’टस्फो’टाची मागणी केली. घ’टस्फो’ट ऐकताच नितीनला धक्का बसला. तो त्यावेळी काही बोलला नाही मात्र त्याने ह्या गोष्टीला विरोध देखील केला नाही. मग मीनाक्षीच्या वडिलांनी स्वतःहूनच घ’टस्फो’टाचे पेपर्स बनवून घेतले.
मीनाक्षी आधी तर घ’टस्फो’टाच्या पेपर्स वर सह्या करायला तयार नव्हती. पण तिच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले की आता तिची त्या घरात परत जायची काहीच शक्यता उरली नाही. नितीन सुद्धा तिला परत न्यायला तयार झाला नाही. मग मीनाक्षी ला सुद्धा कळून चुकले की नितीन चा तिच्यावर असलेला विश्वास आता डगमगला आहे. त्याचा विश्र्वासच नाही म्हटल्यावर नवरा बायकोच्या नात्याला काही अर्थच उरला नाही. मग मीनाक्षीने पेपर्स वर सह्या केल्या. नितीनने सुद्धा सह्या करायला फारसे आढेवेढे घेतले नाहीत.
दोघांचं घ’टस्फो’ट जरी झालेला असला तरी गावात मीनाक्षीची खूप जास्त बदनामी झाली होती. कुणी मागून बोलायचे तर कुणी अगदी तोंडावर सुद्धा बोलून दाखवायचे. पण अजूनही काही लोकांना मीनाक्षी चारीत्र्याबद्दल खात्री होती. अशातच गावातल्या एका जाणकार माणसाने मीनाक्षी साठी प्रीतमचे स्थळ सुचवले. प्रीतम त्यांच्या बहिणीचा मुलगा. प्रायव्हेट कंपनीत पण चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. नोकरीनिमित्ताने बेंगलोरला राहायचा. प्रीतम चे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते आणि आई मागच्या वर्षी छोट्याशा आजाराचे कारण होऊन देवाघरी गेली होती. प्रीतम आधुनिक विचारांचा मुलगा होता आणि त्याला मीनाक्षी घटस्फोटित असल्याचा काहीही फरक पडणार नाही हे प्रीतमचे मामा जाणून होते. मीनाक्षी त्यांच्या नजरेसमोर लहानाची मोठी झाली होती आणि मीनाक्षीबद्दल जे काही बोललं जातंय ते खरं नसल्याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी प्रीतमसाठी मीनाक्षीला मागणी घातली होती.
आधीच्या लग्नाचा कटू अनुभव गाठीशी असल्याने मीनाक्षीने दुसरं लग्न करायला नकार दिला. पण मीनाक्षीच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले की तिच्या दुसऱ्या लग्नाने कदाचित तिची आता सुरू असलेली बदनामी कमी होईल. तिच्या लहान बहिणीच्या लग्नामध्ये सुद्धा काही अडचणी येणार नाहीत. आपल्या वडिलांना हल्ली समाजात लोकांसमोर मान वर करून बोलायची हिम्मत होत नाही हे मीनाक्षी जाणून होती. मग नाईलाजाने का होईना मीनाक्षी सुद्धा या लग्नाला तयार झाली.
आणि तीच लग्न ठरलंय ही बातमी तिच्या सासूच्या कानावर गेली. तीच बातमी त्यांनी नितीन ला सांगितल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आता त्याला मीनाक्ष ला गमावल्याची जाणीव होत होती. पण आता खूप उशीर झाला होता. धीरजचा अजूनही पत्ता लागला नव्हता. अशातच त्याने मीनाक्षीच्या बाजूने काही केले असते तर त्याच्या आईवडिलांना धक्का बसला असता. म्हणून तो काहीच करू शकला नाही.
मीनाक्षी आणि प्रीतमचे लग्न एकदम साधेपणाने गावातल्याच एका मंदिरात पार पडले. गावातली मीनाक्षी लग्न करून प्रीतम सोबत बंगलोर सारख्या मोठ्या शहरात राहायला गेली.
इकडे शिल्पा ला आता धीरज शिवाय करमेनासे झाले. आता तिला धीरज ची आठवण यायला लागली होती. मग शिल्पा च्या वडिलांनी धीरज चा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा काही दिवसांनी कळले की धीरज त्याच्या एका मित्रासोबत लोणावळा पासून थोड्या अंतरावर असणाऱ्या एका गेस्ट हाऊसवर राहतो आहे.
शिल्पाचे वडील तिथे पोहचले तेव्हा धीरज ने त्यांच्याशी बोलायची तयारी सुद्धा दाखवली नाही. त्यांनी धीरजला समजावून सांगितले पण धीरज पुन्हा घरी परतायला तयार झाला नाही. शेवटी शिल्पाच्या वडिलांनी धीरजचा ठावठिकाणा त्याच्या आई वडिलांना सांगितला आणि धीरजची आई त्याच्या वडिलांसोबत आणि नितीन सोबत लगेच धीरजला भेटायला गेली.
धीरजला आईने घरी परत यायच्या खूप विनवण्या केल्या पण दुखावलेला धीरज घरी जायला तयार होत नव्हता. शेवटी धिरजची आई त्याला म्हणाली की तू घरी येणार नसला तर की सुद्धा घरी जाणार नाही. मलासुद्धा इथेच काहीतरी काम बघ. मी सुद्धा इथेच राहील. शेवटी आईचा आपल्या शिवाय घरी जायला तयार नाही हे पाहून नाईलाजास्तव धीरज घरी जायला तयार झाला.
नितीन मात्र धीरज सोबत मोकळा बोलत नव्हता. कुठे ना कुठे त्याच्या मनात शिल्पाच्या बोलण्यामुळे संशय निर्माण झाला होता. म्हणूनच मीनाक्षी सोबतचे नाते वाचवण्याचा त्याने जास्त प्रयत्न केला नव्हता. एवढ्या वर्षाच्या प्रेमावर संशय वरचढ झाला होता. धीरज सुद्धा घरी आला तरी कोणाशी जास्त बोलत नव्हता.
धीरज घरी आल्याची बातमी कळताच शिल्पा धावतच घरी आली. त्याला पाहून तिने त्याला मिठीच मारली. एवढ्या महिन्यांच्या दुराव्यानंतर तिला तिची चूक कळली होती. आधी काही दिवस आपण जे केलं ते चांगलंच झालं आणि बरी मीनाक्षी वहिनींची खोड मोडली हा विचार करून तिला बरं वाटलं होतं. तिला वाटले होते की धीरज तिच्या मागे मागे तिच्या माहेरी येईल. तिची समजूत काढेल आणि पुन्हा तिला आपल्या घरी घेऊन जाईल.
पण धीरज असा काहीही न सांगता निघून गेल्याने तिचा धीर सुध्दा सुटत चालला होता. तिला वाटत होते की तिने धीरजला जवळपास कायमचेच गमावले. पण धीरज मिळालाय अन् तो घरी परतलाय हे जेव्हा तिला कळले तेव्हा तिच्या जीवात जीव आला होता. म्हणून वेळ न दवडता ती तशीच त्याच्याकडे धावत आली होती. शिल्पाला पाहून सासूबाईंना बरे वाटले पण नितीनला मात्र आश्चर्य वाटले. इतकं सगळं झाल्यावरही शिल्पा परत काही आली ते त्याला कळत नव्हतं. तिला अचानक आलेलं पाहून आणि मिठीत शिरलेलं पाहून धीरजने दोन्ही हातानी तिला बाजूला सारले. ते पाहून शिल्पा त्याला म्हणाली.
” एवढ्या दिवसांचा अबोला पुरला नाही का तुम्हाला धीरज…असे का वागताय माझ्याशी…मी इतकी दिवस तुमचा दुरावा कसा सहन केलाय ते माझं मला माहित…आता तुम्ही परत आलाय तर आता माझ्यापासून कधीच दूर जाऊ नका…” असे म्हणत पुन्हा त्याच्या जवळ यायला लागली तेव्हा धीरज ने पुन्हा तिला स्वतःपासून दूर सारले.
” जवळ येऊ नकोस माझ्या…दूर राहा…मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही…”
” असे काय करताय…लग्नाची बायको आहे की तुमची…सगळ्या जगाशी भांडून लग्न केलंय आपण…तुम्ही सगळं विसरलात का…आपलं प्रेम, आपलं लग्न…किती खुश होतो आपण एकमेकांसोबत…” शिल्पा म्हणाली.
” अच्छा…म्हणून तू माझ्यावर ते आरोप केले होतेस का ?…तेव्हा कुठे गेले होते तुझे प्रेम…?” धीरज ने रागाने विचारले.
” अहो रागावू नका ना…मला त्या शिल्पा वहिनी आवडायच्या नाहीतच आधीपासून… नुसतं प्रत्येक बाबतीत पुढे पुढे करायच्या…सगळ्यांना त्यांचंच कौतुक…मला ते अजिबात आवडायचं नाही…आणि त्या दिवशी त्या पडल्यावर तुम्ही सावरायला गेले आणि माझ्या डोक्यात तिडीक गेली…मला वाटले की त्यांना अशी काही बोलली तर त्या तुमच्यापासून दूर राहतील आणि घरच्यांच्या नजरेतून सुद्धा पडतील…म्हणून मी ते आरोप केलेत…पण आता मला माझी चूक कळली आहे…मी तुमच्यासोबत अशी वागायला नको पाहिजे होते…” शिल्पाचे बोलणे ऐकून सासूबाई आणि नितीन दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. नितीनला तर वाटले की हे ऐकून वेड लागेल. तरीपण स्वतःला सावरत त्याने शिल्पाला विचारले.
” म्हणजे…तू जे सांगत होतीस की तू ह्या दोघांना अनेकदा सोबत पाहिलेस ते काय होतं…?”
” मला खूप राग यायचा मीनाक्षी ताईंचा…सगळ्यांना त्यांचंच कोडकौतुक होतं…म्हणून मग रागाच्या भरात मी मला सुचेल तसे काहीबाही बोलत राहिले… खरंतर मी कधीच ह्यांना काही चुकीचं वागताना कधीच बघितलं नव्हतं…” शिल्पा बेफिकिरीने म्हणाली.
इतक्यात तिच्या सासूबाई समोर आल्या आणि शिल्पाच्या कानाखाली एक जोरात लगावली.
” मूर्ख मुली…तुझ्यामुळे होत्याच नव्हतं होऊन बसलं आमच्या घराचं…वाटोळं झालं तुझ्यामुळे…आणि तू म्हणतेस की तू रागाच्या भरात बोलली होतीस…”
” मी काहीही बोलेन…पण तुम्हाला एवढा आयुष्यभराचा अनुभव होता तरीपण तुम्ही ओळखू शकल्या का त्यांना…अन् भाऊजींच तर प्रेम होतं ना लहानपणी पासून…मग मी नुसतं सांगितल्याने प्रेम संपलं का त्यांचं…मुळात चूक माझी नाहीच…चूक तुमचीच आहे…आणि आता खापर माझ्या डोक्यावर फोडत आहात…” शिल्पा रागाने चवताळून म्हणाली.
” पण हे सगळं तू आधी सुद्धा सांगू शकली असतीस ना…तुला तर इथे काय घडतंय ते माहिती होतं ना…कमीत कमी त्या दोघांच्या घ’टस्फो’टाआधी तरी सांगायचं होतंस ना…” शारदाताईंनी विचारले.
” मला काय माहिती होतं की माझ्या सांगण्यावरून तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढणार आणि घ’टस्फो’ट सुद्धा देणार…मला तर फक्त त्यांचे या घरातील महत्त्व कमी करायचे होते…” शिल्पा पुन्हा बेफिकिरीने म्हणाली.
” अगं पण तुझ्या आरोपांमुळे होत्याच नव्हतं होऊन बसलं… मिनाक्षी वर तुझा राग होता ते समजू शकतो पण स्वतःच्या नवऱ्यावर कोणता राग काढलास तू…त्याची काय अवस्था करून ठेवलीस…बघ जरा त्याच्याकडे…” शारदा ताईंनी विचारले.
” मी आहे ना… त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर…सगळं काही विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करू आम्ही…” शिल्पा म्हणाली. मग धीरजकडे पाहून त्याला हळूच म्हणाली. ” आपण सगळं काही विसरून नव्याने सुरुवात करू…पण आता आपण इथे नाही राहायचं…आपण माझ्या माहेरी राहायला जाऊयात… तसंही तुम्ही बघितलं असेलच की इथे तुमच्यावर विश्वास नाही ठेवला कुणी…मग आपण काय करायचंय इथे राहून…” शिल्पा सहजपणे म्हणाली.
” गप्प बस…मला तुझं तोंडही पहायची इच्छा नाही…माझ्या चारित्र्यवान वहिनीला तू कलंकित करून या घरातून निघून जायला भाग पाडले…घरच्यांशी धादांत खोटी बोललीस…माझ्या भावाच्या अन् वहिनीच्या संसाराची राख रांगोळी केलीस तू…त्यांच्या पोटातल्या बाळाचा या जगात येण्याआधीच बळी घेतला तुझ्या या वागण्याने…तुला माझ्या आयुष्यात आता अजिबात जागा नाही…आतापर्यंत मी तुझं ऐकून घेतलं कारण तू स्वतःहून तुझ्या चुकांची कबुली देत होतीस.. ते ही अगदी निर्लज्जपणे…आता सगळ्यांना सगळं कळलय…त्यामुळे तू जाऊ शकतेस…” धीरज म्हणाला.
त्यानंतर शिल्पाने धीरजला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण धीरजचा निर्धार पक्का होता. त्यामुळे नाईलाजाने शिल्पाला तिथून निघून जावे लागले. या सगळ्यात नितीनला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. नशिबाने त्याला मीनाक्षी बायको म्हणून मिळाली होती पण खोट्या आरोपावर विश्वास ठेवून त्याने त्याच्या आयुष्यात आलेल्या खऱ्या प्रेमाला कायमचे दूर लोटले होते आणि आता त्याची शिक्षा तो आयुष्यभर भोगणार होता.
सासूबाईंना सुद्धा त्यांच्या अविवेकी वागण्याचा खूप पश्चात्ताप झाला होता. जे थोडंसं बिघडलं होतं ते त्यांनी सावरायला हवं होतं. पण त्यांनी अविवेकी वागून परिस्थिती आणखीन बिघडवली होती. त्यांच्या विचार न करता मीनाक्षीला आरोपी ठरवण्यामुळे त्यांच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त झाला होता. पण आता पश्चात्ताप करण्यावाचून त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते.
पुढे शिल्पा आणि धीरजचा घ’टस्फो’ट झाला. त्यानंतर त्यांच्या आईने नितीन आणि धीरजच्या दुसऱ्या लग्नाचा खूप प्रयत्न केला पण पश्चात्तापाने पोळून निघालेल्या नितीनने त्यानंतर कधीच दुसरे लग्न केले नाही. धीरजने मात्र दोन वर्षांनी दुसरे लग्न केले. इतका चांगला नवरा मिळाल्यानंतरही आपल्या आततायीपणामुळे त्याला गमावल्यानंतर शिल्पाच्या दुःखाला सुद्धा सीमा राहिली नव्हती.
मीनाक्षी मात्र आपल्या दुसऱ्या लग्नानंतर खऱ्या अर्थाने सुखी झाली होती. प्रीतमने तिला खूप प्रेम दिले. तिच्या जुन्या जखमा भरून निघाल्या. दोन वर्षांनी तिला एक मुलगा झाला आणि त्यांचं त्रिकोणी कुटुंब खऱ्या अर्थाने पुर्ण झालं. तिच्यावरचं आरोप खोटे आहेत हे एव्हाना संपूर्ण गावाला सुद्धा कळले होते. पण मीनाक्षी मात्र नंतर कधी गावी आलीच नाही. कारण तिथे तिच्या आयुष्यातल्या चांगल्यापेक्षा वाईट आठवणी जास्त होत्या. नितीन मात्र अजूनही गावात येणाऱ्या प्रत्येक गाडीकडे आशेने बघतो. जणू एखाद्या गाडीतून मीनाक्षी उतरेल आणि
तिला बघायला मिळेल. बोलून नाही पण निदान नजरेने तरी तिची माफी मागेल ह्या संधीच्या शोधात…
समाप्त.