लग्नानंतर महिन्याभरात शीतल माहेरी आली तेव्हा काहीशी उदास वाटत होती. आईने तिला काळजीने विचारले तेव्हा तिने काहीही नाही म्हणून आईला टाळले. आईने पण मग जास्त विचारले नाही. पण प्रमोदरावांना मात्र ही गोष्ट खटकत होती. शेवटी वडील ते. आपली मुलगी सुखात आहे की नाही ह्याची काळजी त्यांना होतीच.
त्यांनीच आडून आडून शीतलच्या आईला विचारले की शीतलच्या सासरी सगळं नीट सुरू आहे ना. शीतलला कसला त्रास नाही ना. तेव्हा रजनीताईंनी त्यांना आश्वस्त केले की असे काहीच नाही. लग्नानंतर सासरी रुळायला वेळ तर लागणारच. मग प्रमोद रावांनी जरा निःश्वास टाकला.
त्यानंतर दिवाळसणाला शीतल माहेरी आली तेव्हा पण ती उदासच वाटत होती. दोन दिवस राहून सासरी गेली पण पूर्वीप्रमाणे घडाघडा बोलणं नाही की मला हेच हवंय तेच हवंय म्हणून कुठला हट्ट नाही. तिचा नवरा विनय तिला घ्यायला आला तेव्हा तो पण मोकळेपणाने काहीच बोलला नाही. तसा विनयचा स्वभावच मूळचा अबोल होता. पण लेक आणि जावई दोघेही काही जास्त बोलत नव्हते ही गोष्ट प्रमोदरावांना सलत होतीच.
शीतलने गावात दहावी पर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर कलाशाखेचे पदवी पर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या गावी घेतले. त्यानंतर प्रमोदरावांनी तिच्या लग्नासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली. त्यानंतर विनयचे स्थळ पहिलेच सांगून आले. विनय पुण्यात एका चांगल्या कंपनीत कार्यरत होता. गावी सुद्धा शेतजमीन होती. दिसायला सावळा असला तरी व्यक्तिमत्व भारदस्त होतं. काहीसा अबोल होता पण समजूतदार सुद्धा वाटला होता प्रमोद रावांना. मुळातच सुंदर असलेल्या शीतलला विनयच्या घरच्यांनी आणि विनयने सुद्धा लगेच पसंत केले होते.
दोन्हीकडच्यांची पसंती झाली आणि लवकरच दोघांचा साखरपुडा पार पडला. मग महिन्याभरात मोठ्या थाटामाटात दोघांचे लग्न पार पडले. विनयच्या घरच्यांनी लग्नात काहीच मागणी केली नव्हती. तुम्हाला तुमच्या मुलीला जे द्यायचे असेल ते द्या. आम्हाला काही नको असे त्यांनी आधीच सांगितले होते. तरीपण शीतलच्या वडिलांनी त्यांना जमेल त्यापेक्षा सुद्धा जास्तच दिले होते शीतलला तिच्या लग्नात.
प्रमोदरावांना राहून राहून वाटायचे की लेकीच्या सासरच्यांना आपण दिलेले कमी तर वाटत नसेल ना. शीतलला सासरी कोणी काही बोलून तर दाखवत नसेल ना. त्यांनी मनातली शंका त्यांच्या पत्नीला बोलून दाखवली. तेव्हा रजनी ताईंनी त्यांची समजूत काढली की लग्न झाल्यावर नवीन घरात रुळायला जरा वेळ लागतोच मुलींना. त्यांनी समजूत काढल्यावर प्रमोदरावांच जरा समाधान झालं.
पण एके दिवशी अचानक रात्री उशिरा प्रमोद रावांना विनयचा फोन आला. एरव्ही कधी फोन न करणाऱ्या जावयाचा एवढ्या रात्री फोन आलेला म्हटल्यावर प्रमोद रावांना जरा काळजीच वाटली. त्याचं काळजी ने त्यांनी फोन उचलला. तेव्हा समोरून विनय त्यांना म्हणाला.
” बाबा…शीतलचा फोन लागत नाहीये, ती आज तिथेच राहणार आहे का ? जरा बोलणं करून द्याल का तिच्याशी ?”
” शीतल…ती इथे आलीच नाही…” प्रमोद राव आश्चर्याने म्हणाले.
” पण बाबा…सकाळी तुमच्या कडे जातेय असे सांगूनच बाहेर पडली होती…” विनय काळजीने म्हणाला.
” नाही…इथे नाहीय ती…” प्रमोद राव म्हणाले.
परंतु त्यांना आता मोठा धक्का बसला होता. विनय सुद्धा आता काळजीत पडला होता. माहेरी जातो सांगून घरून निघून गेलेली शीतल कुठे आहे ते कुणालाही माहीत नव्हते. आणि तिचा फोन सुद्धा बंद येत होता. त्यामुळे तिच्या सासर माहेरचे लोक जरा घाबरलेच होते.
प्रमोद रावांनी त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना फोन करून शीतल त्यांच्याकडे आली आहे का ते विचारले. शीतलच्या लहान भावाने तिच्या गावातल्या सगळ्या मैत्रिणीकडे चौकशी केली, विनय सुद्धा ती जात असलेल्या सगळ्या जागेवर जाऊन आला पण शीतलचा काही पत्ता लागत नव्हता.
ह्या सगळ्यात अर्धी रात्र निघून गेली होती. सगळेच काळजीत पडले होते. प्रमोद रावांना तर काहीच कळत नव्हते. एव्हाना त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना हे कळले सुद्धा होते. त्यामुळे सगळ्यांचे फोन सुरूच होते. विनय आणि त्याच्या घरचे सुद्धा घाबरले होते.
शेवटी पहाट होताच शीतलचे वडील, तिचा भाऊ आणि तिचे मामा विनयच्या घरी पोहचले. मग त्यांनी जास्त वेळ न दवडता जवळचे पोलीस स्टेशन गाठले. शीतल कालपासून गायब झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्यापासून शीतल विषयी काही प्राथमिक माहिती घेतली पण त्यासोबतच विनयची जरा उलटतपासणी सुद्धा केली.
त्यानंतर मात्र प्रमोद रावांना सुद्धा विनयवर संशय यायला लागला. लग्न झाल्यापासून शीतल नाराज दिसत होती. आता त्यांना मनात कुठेतरी वाटत होते की शीतल गायब होण्यात विनयचा हात असू शकतो. तक्रार देऊन झाल्यावर जेव्हा सर्वजण विनय च्या घरी गेले तेव्हा प्रमोद राव विनयला म्हणाले.
” विनय राव…मला खरं खरं सांगा की माझी मुलगी कुठे आहे…तुम्ही तिच्यासोबत काय केलंय…?”
प्रमोद रावांनी असे म्हणताच सगळे जण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. विनयला तर कळतच नव्हते की शीतल चे वडील त्याला असे का विचारत आहेत ते. तो त्यांना म्हणाला.
” तुम्ही काय बोलताय बाबा… मी कशाला काही करेन शीतल सोबत…माझी बायको आहे ती…”
” तुमच्याशी लग्न झाल्यापासून माझी पोर कधीच खुश दिसत नव्हती. तुम्ही तिला त्रास देत असणार हे आधीच लक्षात आले होते माझ्या. पण सगळं काही आपोआप ठीक होईल असा विचार करून मी तिला काही विचारले नाही. पण आता माझी खात्री पटली आहे की तुम्हीच तिच्यासोबत काहीतरी केले आहे. ”
” अहो काय बोलताय तुम्ही शीतल चे बाबा. विनय ने कधी एका शब्दाने सुद्धा दुखावले नाही हो शीतल ला. इथे ती आनंदात होती. लग्न झालं तेव्हापासून आम्ही आमच्या मुलीसारखं वागवलय तिला.” विनयची आई म्हणाली.
” मग गेली कुठे माझी शीतल. तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला कुठे जाऊ दिलं असतं का. तुमची मुलगी गायब असताना तुम्हाला धीर धरवला असता का ?”
” येईल आपली शीतल परत. तुम्ही काळजी नका करू. आपण पोलिसात तक्रार दिलीय ना.” शीतल ची आई म्हणाली.
शीतलच्या भावाने आणि मामाने प्रमोदरावांची तात्पुरती समजूत घातली आणि ते त्यांना घेऊन घरी परत आले. पण शीतलच्या वडिलांना वाटत होते की शीतलला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिला असेल म्हणूनच ती कुठेतरी निघून गेली आहे.
शीतलच्या वडिलांना असे वाटत असल्याने आता तिच्या घरच्या इतर लोकांच्या मनात सुद्धा संशय निर्माण झाला. आणि मग सगळ्यांच्या सल्ल्याने शीतलचे वडील दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशन मध्ये गेले आणि त्यांनी विनयच्या विरोधात मुलीला गायब केल्याची तक्रार नोंदवली. सोबतच मुलीला माहेराहून जास्त हुंडा न मिळाल्यामुळे छळ करत असतील अशी शंका सुद्धा बोलून दाखवली.
प्रमोदरावांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाची चक्रे विनयच्या दिशेने फिरवली. आणि विनयला चौकशीला आणायचे म्हणून पोलिसांची गाडी थेट त्याच्या घराच्या दिशेने निघाली. घरी पोलिसांना आलेले पाहून विनयचे आई आणि बाबा दोघेही जरा धास्तावले. मग पोलीस त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांना कळले की ते विनयला चौकशीसाठी सोबत घेऊन जायला आलेत.
क्रमशः