त्यानंतर विनयच्या आई वडिलांनी पोलिसांना समजवायचा खूप प्रयत्न केला की विनयचा ह्यात काहीच हात नाही म्हणून. पण तक्रार आहे म्हटल्यावर आणि शीतल अजूनही सापडली नाही म्हणून पोलिसांना विनयची चौकशी करणे भाग होते. पोलीस आले त्यावेळेला विनय घरी नव्हता. त्याला फोन केला तेव्हा कळले की तो एका महत्त्वाच्या कामासाठी थोड्या वेळापूरता ऑफिसला गेलाय.
मग पोलीस तडक त्याच्या ऑफिसला गेले आणि त्याला सगळ्या ऑफिस समोर पोलिसांच्या जीपमध्ये बसवून चौकशी साठी पोलीस स्टेशनला घेऊन आले. शीतलचा फोन अजूनही स्विच ऑफ असल्याने तिचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते. पोलिसांनी विनयची चौकशी सुरु केली. पण विनय वारंवार सांगत होता की शीतल कुठे आहे ते त्याला खरंच माहिती नाही म्हणून.
दोघांमध्ये सगळं आलबेल सुरू असल्याचं त्याचं म्हणणं होतं. संध्याकाळी उशिरा पर्यंत त्याची चौकशी सुरूच होती. मग अचानक पोलिसांना दुसऱ्या शहरातील एका लोकेशनची माहिती मिळाली. पोलीस लगेच त्या लोकेशनच्या दिशेने निघाले. तिथे पोहचल्यावर त्यांनी जे पाहिले त्यावरून पोलिसांना लक्षात आले की हा नेमका प्रकार काय आहे.
शीतल दुसऱ्या शहरात एका मुलाबरोबर पळून आली होती. तिथे त्याच्या मित्राच्या घरी दोघेही राहत होते. पोलिसांनी शीतल आणि त्या मुलाला ताब्यात घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले. आणि मग शीतल च्या घरच्यांना बोलावण्यात आले. विनय तर आधीच पोलीस स्टेशन मध्ये हजर होता. त्याला तर शीतलला दुसऱ्या मुलासोबत बघून खूप मोठा धक्का बसला होता.
प्रमोद राव लगेच पोलीस स्टेशनला हजर झाले. शीतल ला सुखरूप बघून त्यांचा जीव भांड्यात पडला. पण जेव्हा त्यांना शीतल च्या गायब होण्यामागचे सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली मुलगी अशी वागेल अशी त्यांनी कधीच अपेक्षा सुद्धा केली नव्हती. वडिलांना बघून शीतल त्यांच्या समोर उभी राहिली. त्यांना बघून ती म्हणाली.
” बाबा…मी तुम्हाला सगळं सांगते बाबा…”
प्रमोदराव काहीच बोलू शकले नाहीत. पुढे शीतल स्वतःच बोलू लागली.
” हा शेखर आहे बाबा…माझं प्रेम आहे ह्याच्यावर…मला वाटलं होतं की लग्न झाल्यावर मला विनय आवडू लागेल म्हणून मी आधी तुम्हाला काही सांगितले नाही…पण लग्न झाल्यावर मला कळले की मी शेखर शिवाय राहू शकत नाही…म्हणून आम्ही पळून गेलो बाबा…”
शीतल पुढे काही बोलणार इतक्यात प्रमोदरावांनी तिला एक सणसणीत चपराक ठेवून दिली. तिच्या वागण्यामुळे ते खूप दुखावले होते. ह्या असल्या मुलीच्या पायी आपण विनय सारख्या चांगल्या मुलाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली ह्याचा त्यांना अतीव पश्चात्ताप होत होता.
विनयला तर खूप मोठा धक्का बसला होता. इतके दिवस आपण बायकोला आवडत नसू किंवा बायकोचे कोण्या दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असेल अशी कल्पना सुध्दा त्याच्या डोक्यात आली नव्हती. त्याच्यासाठी त्याचा संसार सुखाचा सुरू होता. शीतलच्या अचानक गायब होण्याने तो तिच्या काळजीने व्याकुळ झाला होता पण शीतल मात्र त्याच्या भावनांशी खेळत होती इतके दिवस.
तो शीतल समोर गेला तेव्हा शीतल च्या डोळ्यात अजिबात पश्चात्ताप दिसत नव्हता. तरीही धीर एकवटून विनयने तिला विचारले.
” माझ्याकडून काय चूक झाली होती शीतल…असे का केलेस तू…?”
” तुम्ही मला अजिबात आवडले नव्हते आधीपासून…पण शेखरला नोकरी नव्हती म्हणून माझ्या बाबांनी माझं लग्न त्याच्याशी कधीच लावून दिलं नसतं…मग मी सुद्धा बाबांच्या पसंतीने लग्न करण्याचा विचार केला… लग्नानंतर मला जाणीव झाली की मी शेखर शिवाय नाही राहू शकत…” शीतल काहीही न घडल्याप्रमाणे म्हणाली.
” मग लग्नानंतर पळून जायचं धाडस केलंस ते लग्नाआधी का नाही केले…?” विनय म्हणाला.
” तेव्हा मला वाटले होते की मी राहू शकेन शेखर शिवाय..” शीतल म्हणाली.
विनयला आता कळून चुकले होते की शीतलशी बोलून आणि तिला समजावून काहीच उपयोग नाही. त्यानंतर ते पुढे काहीच बोलू शकले नाही. पोलिसांनी विनयला घरी जायची परवानगी दिली होती. कायदेशीर कार्यवाही आटोपल्यावर शीतल आणि शेखर ला सुद्धा पोलिसांनी घरी जायची परवानगी दिली होती.
शीतल तिच्या वडिलांसोबत घरी आली. शीतलच्या आईला हे कळल्यावर त्या सुद्धा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नव्हत्या. शीतल अशी वागू शकते ह्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांना सुद्धा शीतलच्या वागण्याने खूप धक्का बसला होता. प्रमोदराव तर ह्या घटनेनंतर आठ दिवस झाले तरी घराबाहेर पडत नव्हते. लोकांच्या नजराणा सामोरे जाण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती.
पण शीतलला मात्र एवढं सगळं झालंय त्याचे काहीच वाटत नव्हते. तिला वाटत होते की तिने जे केलंय ते योग्यच केलंय. तिची इच्छा होती की घरच्यांनी तिला समजून घ्यावं आणि तिचं लग्न शेखरसोबत लावून द्यावं. एके दिवशी ती स्वतःहून तिच्या बाबांकडे गेली आणि त्यांना म्हणाली.
” बाबा…मला माहिती आहे की माझी पद्धत चुकीची होती…पण माझं प्रेम आहे शेखरवर…आणि मला त्याच्याच सोबत रहायचंय…”
” तुला लाज नाही वाटत का एवढं सगळं केल्यावर तोंड वर करून मला हे बोलायची…?” प्रमोदराव म्हणाले.
” पण बाबा शेखर खरंच चांगला मुलगा आहे…” शीतल म्हणाली.
” विनयराव काय वाईट होते का..? पण त्यांच्यासोबत सुद्धा तू नीट राहू शकली नाहीस ना…” प्रमोदराव म्हणाले.
” मला तो आवडतच…” शीतल काही बोलायच्या आधीच प्रमोदराव म्हणाले.
” गप्प बस…माझी मुलगी एवढी मूर्ख असेल असा कधीच विचार केला नव्हता मी…मुळात तू विनयरावांच्या लायकीची नव्हतीच…विनय रावांनी घटस्फोटाचे कागद सही करून पाठवले आहेत…त्यावर सही कर आणि मोकळं कर त्यांना…आणि कोण तो शेखर…त्याला बोलाव घरी…शक्य तितक्या लवकर एखाद्या मंदिरात लग्न करा आणि निघून जा तू माझ्या डोळ्यासमोरून…आणि त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीही या घरात पाऊल ठेवायचे नाहीस तू…” प्रमोदराव म्हणाले.
त्यानंतर सुद्धा शीतल ला स्वतःच्या वागण्याचे वाईट वाटत नव्हते. तिला वाटत होते की बाबा काही दिवस तिच्यावर रागावतील आणि काही दिवसांनी तिला माफ करून टाकतील. तिने काहीही विचार न करता घ’टस्फो’टाच्या कागदावर सही केली आणि शेखरला फोन करून घरी बोलावले. शेखर ने सुरुवातीला उद्या येतो परवा येतो म्हणून तिला टाळले. पण तिने खूपच जास्त तगादा लावल्यावर तो तिला म्हणाला.
” हे बघ शीतल…मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही…तुला तुझा नवरा आवडत नव्हता म्हणून मी तुला भेटायचो…गरज तुलाही होती आणि मलाही…तुला पळवून नेताना सुद्धा मला वाटले होते की काही दिवस सोबत राहून आपण आपापल्या मार्गाने निघून जाऊ…तू तुझ्या इतक्या चांगल्या नवऱ्याला सोडून माझ्याकडे येऊ शकतेस तर उद्या मला सोडून सुद्धा कुण्या दुसऱ्याच्या मागे जाणार नाही ह्याची कोण खात्री देणार…आणि घ’टस्फो’टित माझ्या घरचे तुला कधीच स्वीकारणार नाही…ते माझ्या लग्नासाठी मुली पाहत आहेत आणि ह्यानंतर मला कॉल करू नकोस…”
आतापर्यंत काहीच न झाल्यागत वागणारी शीतल शेखरचे बोलणे ऐकुन खाडकन शुद्धीवर आली. शेखरने फक्त आपला वापर केलाय हे तिला कळून चुकले. आपल्या हातून किती मोठी चूक झालीय हे लक्षात आल्यावर फक्त वेडी व्हायची बाकी होती. तिच्या हातातून सगळेच निसटले होते. सासर, माहेर, नवरा ह्या सगळ्यांना सोडून तिने ज्याला आपलेसे केले त्याने हिला सोडताना एका क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही.
मग मात्र शीतलच्या आयुष्याची परवड झाली ती वेगळीच. शीतल ने जे काही केले ते एव्हाना सगळ्या गावात आणि नातेवाईकांना समजले होते. विनयने तिला घ’टस्फो’ट दिला. शेखर ने तिला स्वीकारले नाही. तिच्या आईवडिलांच्या घरी ती राहत होती पण त्यांच्या नजरेतून पार उतरलेली होती. त्यांना तिला घरात ठेवण्यावाचून पर्याय नव्हता. शेवटी प्रमोदरावांनी तिच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरूवात केली. दोन वर्ष शोधल्यावर सुद्धा शीतलचे दुसरे लग्न जमत नव्हते. शेवटी एक दोन मुलांचा विधुर बाप असलेला निशिकांत तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला आणि प्रमोदरावांनी त्यांचे साधेपणाने लग्न लावून दिले. आपण केलेल्या चुकांचे ओझे मनावर घेऊन शितलने तिच्या दुसऱ्या संसाराची सुरुवात केली. प्रमोद रावांनी मात्र त्यानंतर शीतलची कधी फार विचारपूस केली नाही की तिला माहेरपणाला आणले नाही. पहिल्या लग्नात मिळालेल्या कटू अनुभवांमुळे विनयने मात्र अजूनही दुसरे लग्न केले नव्हते.
आयुष्यात घेतलेले निर्णय कधीही विचार करून घ्यायला हवेत. आततायी पणाने घेतलेले निर्णय कधी कधी आपल्यासोबत इतरांचे आयुष्य सुद्धा खराब करू शकतात. तुम्हाला काय वाटतं. शीतलने शेखर बद्दल आधीच घरी सांगायला हवे होते का ? ह्यात चूक नेमकी कुणाची आहे ?
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.