वनिताला आज जरा कामावर यायला उशीरच झाला होता पण रविवार असल्याने मी जरा निवांत होते. मी आरामात चहा पित बालकनी मधून खाली बघत होती. तितक्यात वनिता मला तिच्या नवऱ्याच्या गाडीवर येताना दिसली. सोसायटीच्या गेटच्या बाहेर त्याने तिला उतरवून दिले. आणि ती त्याच्याकडे न बघता मुकाटपणे आत निघून आली.
आमच्या घराच्या समोर येऊन तिने दारावरची बेल वाजवली. मी दार उघडले आणि ती आत आली. एरव्ही आल्या आल्या एका गोड स्माईल ने कामांची सुरुवात करणारी वनिता आज मात्र गप्प गप्प होती. अगदी स्वतःच्याच विचारात हरवून गेल्या सारखी.
” काय ग वनिता…काही झालंय का…तू जरा उदास दिसते आहेस…” मी विचारले.
” काही नाही ताई…सहजच आपलं…” ती खोटेच हसत म्हणाली.
त्यानंतर ती काही बोलली नाही म्हणून मग मी पण जात काही विचारले नाही तिला. तिने कामाला सुरुवात केली. मी आपली तिथेच सोफ्यावर बसून मोबाईल चाळत होते. थोड्या वेळाने मला आठवलं की दुधाच्या भांड्यावर आपण बहुधा झाकण ठेवलेलं नाही. म्हणून मग मी घाईतच किचन मध्ये आले. वनिता तिथेच सिंकमध्ये भांडी घासत होती. मी आले हे बहुधा तिला कळलं नव्हतं म्हणून मघाशी तिने हो साडीचा पदर अंगभर लपेटून घेतला होता तो कमरेत खोचून घेतला होता. मी तिला पाठमोरी पाहिलं तेव्हा तिच्या पाठीवर वळ उमटले होते. हाताला सुद्धा मार बसलेला वाटत होता.
” काय ग वनिता…हे तुझ्या पाठीवर वळ कसले आहेत.. आणि हाताला सुद्धा मार लागलेला आहे…” मी तिला विचारले.
माझ्या प्रश्नाने गोंधळून गेलेल्या वानिताने पुन्हा तिच्या साडीचा खोचलेला पदर काढून अंगभर लपेटून घेतला. काय बोलावं हे बहुधा तिला कळत नव्हतं.
” ते… काल…मी जरा… चालता चालता पाय घसरून पडले आणि थोडं लागलं…” ती चाचरत म्हणाली.
” हे पडण्याचे नाही तर मारण्याचे व्रण आहेत…एवढं मलाही कळतं…आता सांग काय झालंय…तुझ्या नवऱ्याने मारलंय ना तुला…” मी म्हणाले.
” ते काल जरा ते रागात होते म्हणून…” ती माझ्यापासुन नजर चोरत म्हणाली.
” का सहन करतेस ग तू…इतका मारतो नवरा तर सोडून द्यायचं ना…नाहीतरी कमवत तर काहीच नाही…सगळं घर तुझ्याच भरवशावर चालतं…आणि तुझं वय तरी काय आहे ग सध्या…अजूनही नव्याने आयुष्य सुरू करू शकतेस तू…” मी रागातच म्हणाले.
माझं बोलणं ऐकून ती गप्प बसली. मी सुद्धा रागात बरंच काही बोलून गेले हे लक्षात आल्यावर गप्प बसले. तशी पाहता मी तिच्या नवऱ्याला फारशी ओळखत सुद्धा नव्हते. पण तिच्या अंगावर असे व्रण दिसले की मला फार राग यायचा तिचा. मग मी तिच्यासमोर रागात त्याला काही नाही बोलून टाकायचे. ती मात्र चुपचाप सगळं काही ऐकून घ्यायची.
वनिता मागच्या दोन वर्षांपासून आमच्याकडे कामाला यायची. दिसायला सुंदर, गोरापान रंग, लांब केस, चाफेकळी नाक आणि रेखीव बांधा. साधारण पंचवीस वर्षांची असेल. तिच्या वागण्या बोलण्यातून ती चांगल्या घरातील मुलगी आहे हे कळायचे. तिची भाषा सुद्धा चांगली शुद्ध होती.
पण तिचा नवरा विकास पहिला की प्रश्न पडायचा की हिने ह्याच्याशी का लग्न केलं असेल. दिसायला तसा थोडा ठीक होता पण वागणूक मात्र एखाद्या गुंडा सारखी होती. हिच्या चांगल्या दिसण्या मुळे तो सतत हिच्यावर संशय घ्यायचा. चुकून कोणी पुरुष हिच्याशी बोलताना दिसला की तिथेच तिला मारायला सुरुवात करायचा. मग आपल्याला लोकं बघताहेत ह्याच त्याला अजिबात भान उरत नसे.
ती सांगायची की दोघांच्या लग्नाला सहा वर्ष झालेत. लग्न झाल्यावर आधीचे दोन तीन महिने तो तिच्याशी चांगला वागला होता. त्या नंतर जे भोग तिच्या वाट्याला आले ते ती आजवर भोगत आहे. विकास काहीच काम करायचा नाही. वनिता आठ दहा घरची धुणीभांडी करायची त्यात घर चालायचं. वरून त्याला दारू प्यायला सुद्धा पैसे हवे असायचे.
एखाद्या दिवशी रागात असला की हिलाच मारायचा. सुरुवातीला कधीकधी च मारायचा नंतर मात्र आला राग की हात उचलला असच चालायचं. तिच्या घरी तिची सासू पण होती. पण तो हिला मारायला लागला की ती गप्प बसून मजा पहायची. सासू तर वनिताचा खूप राग करायची. आधीच तिच्या जीवाला जराही सुख नव्हतं आणि त्यात लग्नाला इतकी वर्षे झाली तरी तिला अजून मुल झालेलं नव्हतं. म्हणून मग नवरा आणि सासू दोघेही राग करायचे.
बाजूच्याच सोसायटीत माझी एक मैत्रीण राहते. आधी ही तिच्या घरी कामाला जायची. तिनेच मला कामासाठी वनिताचे नाव सुचवले होते. वनिता काम खूप छान करायची. पण तिचा नवरा मात्र अधून मधून काहीतरी नवीन खुसपट काढून तिच्याशी भांडायचा आणि तिला मारायचा. तिने माझ्यापासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या गोऱ्या अंगावर मारण्याचे व्रण उठून दिसायचेच. मी तिला सांगायचे की सहन करू नकोस. सोडून दे ह्याला आणि जा तुझ्या माहेरी. निदान नवऱ्याच्या त्रासापासून तरी वाचशील. पण ती मात्र काहीच बोलायची नाही.
हे असच सगळं सुरू होतं. मी समजवायचा प्रयत्न करायचे आणि ती गप्प बसून राहायची. मग मी सुद्धा काही बोलायचे नाही. आजही तसच झालं. मी सांगितले आणि ती गप्प बसली. दुसऱ्या दिवशी माझं ऑफिस असल्याने माझ्या डोक्यातून सुद्धा हा विषय निघून गेला. त्यानंतर चार पाच दिवसांनी पुन्हा तेच घडलं.
आजही तिच्या हातावर मारल्याचे व्रण होते. आज मात्र मी गप्प बसले नाही. मी म्हणाले…
” अगं…अशीच गप्प बसून सहन करत राहशील तर एखाद्या दिवशी हकनाक जीवाने जावं लागेल ग…कशाला सहन करतेस…तुला हवं तर मी तुझ्यासाठी एखाद्या हॉस्टेल मध्ये राहायची व्यवस्था करते…दुसरं काम शोधायला सुद्धा मदत करेन…पण तुझ्या अंगावर हे व्रण मला पाहवत नाहीये ग…” मी काकुळतीने म्हणाले.
तेव्हा ती म्हणाली…
” ताई…माझ्या वाटेला हे जे भोग आलेत ना त्याला मीच कारणीभूत आहे…माझ्या पापांची शिक्षा म्हणून मला हे सगळं सहन करावं लागतं आहे…माझेच कर्म वाईट म्हणून चाललंय हे सगळं…”
” अगं काय बोलतेस तू वनिता…मी इतक्या दिवसांपासून ओळखते तुला…तू काही वाईट करू शकतेस ह्यावर माझा विश्वास बसत नाही…” मी आश्चर्याने म्हणाले.
” पण हेच खरं आहे…मी माझ्या पूर्वायुष्यात खूप वाईट वागले आहे…माझ्या घरच्यांशी…माझ्या आईवडिलांशी…” बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं.
” काय झालंय…काही सांगशील का… असं काय वाईट वागली आहेस तू…” मी विचारले.
” माझं पण चांगलं घर होतं…प्रेम करणारे आईवडील होते…मला माया लावणारा भाऊ होता…मी आधीपासून अभ्यासात हुशार होते…माझ्या बाबांना माझ्या हुषारीचे खूप कौतुक होते…त्यांची इच्छा होती की मी खूप शिकावं…म्हणून त्यांनी मला दहावी झाल्यावर शहरात शिकायला पाठवले…मी पण मन लावून शिकत होते…
पण मग हा माझा नवरा आला माझ्या आयुष्यात…तो कॉलेज च्या बाहेर उनाडक्या करायचा…सतत माझ्या मागेपुढे करायचा…त्याचा तो रुबाब खूप आवडला होता मला…मी त्याच्या प्रेमात पडले…आणि अभ्यासात दुर्लक्ष झालं…पण मला मात्र त्याच्याशिवाय काहीच सुचत नव्हतं…मग दहावीला नव्वद टक्के मिळवणारी मी बारावीला फक्त साठ टक्के घेऊन पास झाले…
मग त्या दिवशी घरी मला सगळे खूप बोलले…अभ्यास का नाही केला म्हणून ओरडले…मग की कसलाही विचार न करता त्याच्या बरोबर पळून आले…ह्याच्या घरी आल्यावर कळलं की हा जितका दाखवतो तितकं नाहीय ह्यांच्याकडे…एका दाटीवाटी च्या वस्तीत एक लहानस घर आहे…मी वेगळ्या जातीची असल्याने ह्याच्या आईने माझा पहिल्या दिवसापासूनच राग केला…
मग मी विचार केला की गरीब आहे म्हणून काय झालं…निदान ह्याच आपल्यावर प्रेम तरी आहे…म्हणून मग कशीबशी राहिले ह्याच्या सोबत…पण दोन चार महिन्यात ह्याने सुद्धा ह्याचे रंग दाखवायला सुरुवात केली…आणि मला कळून चुकलं की आपण शुद्ध फसलोय…मला वाटले की एकदा परत माहेरी जावं… आईबाबांची हात जोडून माफी मागावी…
पण तेवढ्यातच समजलं की बाबा हार्टअटॅक ने हे जग सोडून निघून गेलेत…बाबांच्या अशा जाण्याला मीच कारणीभूत आहे हे मला माहिती होतं…बाबांच्या जाण्याने परतीचे सगळे रस्ते बंद झाले…आणि मला ह्याच्या बरोबर राहण्या वाचून दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही…त्याचा सगळा अत्याचार की माझ्या कर्माची फळं म्हणून सहन करते…” ती म्हणाली.
” अगं पण आयुष्यात तुझ्या हातून एक चूक झाली म्हणून संपूर्ण आयुष्य तू शिक्षा भोगणार आहेस का..?” मी विचारले.
” एकच चूक आली तरी चूक खूप मोठी आहे…माझ्यामुळे अनेक आयुष्य बदलली…माझ्या चुकीचे परिणाम माझ्या कुटुंबाला सुद्धा भोगावे लागले…..मी स्वतःच्या आई वडिलांना खूप दुःख दिले म्हणून आज माझ्या वाट्याला हे दुःख आलंय…म्हणून मला वाटतं की मी ह्याच लायकीची आहे…हेच माझ्या चुकांचे प्रायश्चित्त आहे…” ती निश्चयाने म्हणाली आणि तिथून निघून गेली.
मी मात्र विचारच करत होते…खरंच काही चुकांचे परिणाम इतके भयानक होतात का…सगळ्यांनाच चुका केल्यावर माफी मागायची संधी मिळत नाही का…आणि चूक केली म्हणून तिने रोज इतकं सहन करावं का…
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.