मोहन मुंबईमध्ये नोकरी करायचा. त्याचे कुटुंब गावी राहायचे. कुटुंबामध्ये आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी, त्यांची मुलं, एक लग्न झालेली बहीण होते.
गावी त्यांची थोडीशी शेती होती. पण शेतीमधून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. म्हणून मोहन सुरुवातीला एका दुकानामध्ये काम करायचा. पण सोबतच शिक्षण सुद्धा सुरू होते. सरकारी नोकरी साठी प्रयत्न केला आणि लवकरच त्याला चांगली नोकरी मिळाली. आणि त्याच्या घरच्यांचे दिवसच पालटले.
मोहन दर महिन्याला गावी पैसे पाठवायचा. पुढे त्याने नोकरीवर कर्ज काढून गावी छान प्रशस्त घर बांधले. वडिलांच्या नावाने शेती घेतली. आता त्याच्या घरची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली सुधारली होती. गावात त्याच्या घरच्यांना आता चांगलाच मान मिळत होता.
पुढे मोहन चे लग्नाचे वय निघून जात असल्यामुळे त्याच्या घरच्यांनी एक चांगली मुलगी बघून त्याचे लग्न लावून दिले. मोहन बायकोला घेऊन मुंबईला आला. मात्र तो पूर्वीप्रमाणेच त्याची कुटुंबा प्रती असणारी जबाबदारी
निभावायचा.
त्याची बायको सुद्धा खूप चांगल्या स्वभावाची होती. तिने कधीही मोहनला त्याच्या घरी पैसे पाठवण्यावरून चकार शब्दही काढला नाही. शारदा आणि मोहन यांचा संसार सुखाचा सुरू होता. दोघांच्याही गरजा मर्यादीत होत्या. ते दोघेही खूप काटकसरीने जगायचे. त्यांनी स्वतःसाठी म्हणून आजवर काहीच केले नव्हते.
मोहन त्याच्या पगारातील मोठा वाटा गावी आईबाबांकडे पाठवायचा. आणि बहिणीला सुद्धा हवं नको ते विचारायचा. एकंदरीत सर्व काही छान चाललेले होते. पण अचानक एके दिवशी मोहनला गावाहून फोन आला की त्याच्या वडिलांची तब्येत बरी नाही.
मोहन शारदाला घेऊन तातडीने घरी गेला. मोहन ची त्याच्या वडिलांशी भेट झाली आणि दोन दिवसांनी त्याच्या वडिलांनी प्राण सोडले. मोहन ने त्याचे सर्व विधी पार पाडले आणि काही दिवस गावी राहून तो परत मुंबईला निघून गेला.
सुट्ट्यांमध्ये गावी जाणे येणे सुरूच असायचे. मोहन आणि शारदाच्या लग्नाला आता तीन वर्ष पूर्ण झाली होती. पण अजूनही त्यांना गोड बातमी मिळालेली नव्हती. शारदाने अनेक देवांना नवस केला. व्रतवैकल्ये केली. सोबत डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा सुरूच होती. मोहन शारदाला धीर द्यायचा. देव नक्कीच आपले ऐकेल आणि लवकरच आपण दोघेही आईबाबा होऊ असं म्हणून तिची समजूत काढायचा. ते दोघेही याच आशेवर दिवस काढत होते.
एके दिवशी अचानक मोहनला त्याच्या भावाचा फोन आला आणि त्याला सांगितले की त्याची आई खूप बिमार आहे. मोहन सर्व कामे सोडून तडक गावी गेला. गावी गेल्यावर त्याला कळलं की त्याच्या आईला कॅन्सर आहे आणि तो सुद्धा शेवटच्या स्टेजला जाऊन पोहचला आहे.
मोहन ने त्याच्या आईला अनेक डॉक्टरांना दाखवले पण काहीच होऊ शकले नाही. अवघ्या महिन्याभरातच त्याची आई देवाघरी गेली. मोहनला फार दुःख झाले. त्याने आईचे सर्व विधी उरकले. आणि काही दिवसांसाठी तो शारदा सोबत गावीच थांबला.
इतक्यात एके दिवशी त्याला कळले की त्याने त्याच्या वडिलांच्या नावे जे शेत विकत घेतले होते तिथून हायवे जाणार आहे म्हणून. त्या शेतीला आता फार मोठी किंमत मिळणार होती. काही दिवसांनी त्यांचे शेत सरकारजमा झाले आणि त्याला त्यासाठी ऐंशी लाख रुपये मिळाले.
जमीन वडिलांच्या नावाने असल्याने त्याने ती रक्कम अर्धी त्याच्या भावाला द्यायची ठरवली होती. त्याने ती पूर्ण ऐंशी लाखांची रक्कम त्याच्या भावाच्या खात्यामध्ये जमा केली. आणि म्हणाला की मला याची सध्या काही गरज नाही. आम्ही दोघेच नवरा बायको असतो मुंबईला. आणि शिवाय मला पगार सुद्धा मिळतो. म्हणून तू हे पैसे तुझ्याकडेच ठेव. मला गरज असली की की तुझ्याकडून मागून घेईल. मोहनच्या भावाने त्याला होकार दिला. आणि मोहन शारदाला घेऊन परत मुंबईला निघून आला.
त्याला मुंबईला येऊन दोन महिने झाले असतील तेवढ्यात मुंबईत कोरोना येऊन ठेपला. आणि सगळीकडे लॉकडाऊन जाहीर झाले. मोहन आणि शारदा सुद्धा घरातच अडकले. मोहनचे ऑफिस सुद्धा बंद होते. मोहन घरून थोडेफार काम करायचा. काम तसे जास्त नव्हते आणि पगारसुद्धा मिळत होता. एकंदरीत सर्वकाही बरं चाललं होतं. मोहन आणि शारदा हवी ती काळजी घ्यायचे. बाहेर सुद्धा अत्यावश्यक कामानिमित्त जायचे.
लॉक डाऊन होऊन आता दोन महिने पूर्ण झाले होते. एके दिवशी अचानक मोहनला त्याची तब्येत खराब झाल्यासारखे वाटू लागले. त्याने घरघुती औषध घेतले पण बरं वाटलं नाही. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्याला कोरोना असेल का या भीतीने त्याने स्वतःला एका रूम मध्ये शारदा पासून वेगळे करून घेतले.
त्याने कोरोना टेस्ट केली असता ती पॉजीटीव्ह निघाली. आणि तो लगेच कोरोना वर इलाज करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल झाला. सुदैवाने शारदा मात्र नेगेटिव निघाली.
मोहन इलाजासाठी त्याच्या घरापासून जवळच एका खाजगी दवाखान्या मध्ये भरती झाला होता. मोहन उपचार घेत होता आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा देखील होत होती. काही दिवसांनी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. आता आणखी एक चाचणी होणार होती. आणि ती निगेटिव्ह आली की मोहनला सुट्टी होणार होती. मात्र त्याआधी मोहनला दवाखान्याचे बिल भरावे लागणार होते. शारदा मधून मधून मोहन ला भेटायला हॉस्पिटल ला जायची. हॉस्पिटल वाल्यांनी शारदाला बिल दिले. त्यामध्ये बिलाची रक्कम दीड लाख इतकी होती.
इतके बिल पाहून शारदाला धक्काच बसला. तिने याबाबतीत मोहनला काहीच सांगितले नाही. त्याला दवाखान्यातून घरी यायला अजुन वेळ होता. शारदा जवळ इतके पैसे नव्हते. तिच्याजवळ सर्व मिळून जेमतेम चाळीस हजार रुपयेच होते. म्हणून तिने मोहनला सांगायचे ठरवले. मोहनजवळ सुद्धा काहीच पैसे शिल्लक नव्हते. कारण गावाहून येऊन फक्त दोन महिनेच झाले होते. आणि त्याच्याकडे होती तेवढी बचत तो नेहमी घरी पाठवायचा. म्हणून त्याने गावाकडे असलेल्या त्याच्या मोठ्या भावाला पैसे मागायचे ठरवले. नाहीतरी शेतीचे मिळालेले सर्व पैसे त्याच्या भावाकडेच होते.
शारदाने मोहनच्या भावाला फोन केला. मोहनला कोरोना झाल्याचे सांगितले आणि दवाखान्यात बिलासाठी काही पैसे कमी पडत असल्यामुळे थोडे पैसे पाठवायला सांगितले. यावर त्याचा भाऊ जे काही म्हणाला ते ऐकुन तिला धक्काच बसला. त्याचा भाऊ म्हणाला.
” मोहन मागच्या सहा सात वर्षांपासून नोकरी करतोय. त्याच्याकडे दीड लाख सुद्धा नसतील का..? मला माहिती आहे तुमच्या डोळ्यात ते शेतीचे पैसे सलत आहेत. तुम्हाला काय गरज आहे इतक्या पैशांची. तुम्हाला तर मुलबाळ सुद्धा नाही. आणि पैशांची इतकीच गरज असेल तर तुमच्याकडे दागिने आहेतच की तुमच्या लग्नातले. मला माहिती आहे मोहनला पैसे नकोत म्हणून. म्हणूनच त्याने सर्व पैसे माझ्याच अकाऊंट ला ठेवलेत.” आणि एवढे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला.
शारदाला त्यांच्या वागण्याचा खूप राग आला. आजवर मोहनने घरच्यांसाठी सर्व काही केलं. स्वतःसाठी त्यांनी कधीच काही केलं नाही आणि आज जेव्हा मोहनला गरज आहे तेव्हा आम्हाला मदत करायला ते तयार नाहीत. शारदाला वाईट वाटले पण तिचा नाईलाज होता.
म्हणून तिने एका सोनाराकडे तिचे दागिने गहाण म्हणून ठेवले आणि बिलाचे पैसे चुकते केले. तिने मोहनला याबाबतीत काहीच सांगितले नाही. पण दीड लाख इतकी मोठी रक्कम कुठून आली हे मोहनला जाणून घ्यायचे होते. शेवटी शारदाने त्याला सर्व सत्य सांगितले.
हे ऐकुन मोहनला सुद्धा खूप वाईट वाटले. त्याने तडक त्याच्या मोठ्या भावाला फोन केला आणि याबद्दल विचारले. तेव्हा त्याचा भाऊ उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मोहन ने लगेच त्याच्या हिश्शाचे पैसे भावाकडे मागून घेतले. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली पण मोहनने त्याला कायद्याची भीती दाखवली तेव्हा त्याने मोहन च्या हिश्शाचे पैसे त्याला परत दिले. मोहनने ते पैसे स्वतःच्या अकाऊंट ला टाकले. कारण त्याला कळून चुकले होते. अडचणीच्या काळात कोणीच मदतीला नाही येत.
©आरती निलेश खरबडकर.