दोघांची मैत्री प्रेमात कधी बदलली आणि त्या प्रेमाचे पर्यावसान अनैतिक नात्यात कधी झाले हे त्यांचे त्यांना देखील कळले नव्हते. सागरच्या बदललेल्या वागणुकी कडे सावी त्याछावर कामाचा ताण असेल म्हणून दुर्लक्ष करायची. पण हळूहळू सावीच्या लक्षात यायला लागले होते. आणि आता सागरला सुद्धा सावी सोबत राहायची इच्छा नव्हती.
त्याला आता श्वेता सोबत लग्न करायचं होतं. दोघांनीही ठरवलं होतं की आता ते एकमेकांशिवाय राहू शकणार नाहीत म्हणून. मग सागरने स्वतःच त्याच्या आणि श्वेताच्या अफेयर बद्दल सावीला सांगितले होते आणि तिच्याकडून घटस्फोट मागितला होता. सुरुवातीला ह्या गोष्टीने हादरलेली सावी नंतर सावरली आणि नंतर तिने ठरवले की आपल्या प्रेमाने सागरला पुन्हा आपल्याजवळ आणावे.
आणि त्या दृष्टीने सावीने अनेक प्रयत्न सुद्धा केले. सावीने याबद्दल तिच्या घरच्यांना अजिबात कळू दिले नाही. आपल्या घरच्यांसमोर आपल्या नवऱ्याची इभ्रत कमी होऊ नये ह्याची तिने पुरेपूर काळजी घेतली होती. पण कालच्या प्रसंगामुळे सावीच्या सगळ्या आशा संपल्या होत्या.
तिने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या म्हटल्याप्रमाणे संध्याकाळ पर्यंत त्या घरातून निघून तिच्या माहेरी गेली सुद्धा. तिला माहेरी असे सगळ्या सामानासहित आलेलं पाहून तिच्या घरच्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला त्याचे कारण विचारले तेव्हा तिने घडलेले सगळे काही त्यांना सांगितले.
सगळे काही सांगताना तिला मध्येच भरून येत होते. अनेकदा हुंदके देत तिने तिच्या मोडलेल्या संसाराची व्यथा घरच्यांना सांगितली. आणि तुम्हाला त्रास होईल म्हणून आजवर लपवून ठेवले हे देखील सांगितले. सागर पुन्हा आपल्याकडे यावा म्हणून केलेले प्रयत्न सुद्धा घरच्यांना सांगितले. आपण संसारात अपयशी ठरल्याचे सांगताना तिला खूप रडायला येत होते.
सावीच्या घरच्यांना हे ऐकून सागरचा खूपच राग आला होता. तिच्या भावाला तर आताच जाऊन सागरला चोप द्यायची इच्छा होत होती. पण घरच्या मोठ्यांनी त्याला समजावले. आता आपल्याला सावीला आधार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी त्याला समजावून सांगितले. सावीची अवस्था खरंच खूप वाईट झाली होती.
तिच्या घरच्या लोकांनी तिला समजून घेतले. तिला आधार दिला. तिचा संसार मोडला ह्यात तिची काहीच चूक नाही हे सगळेच तिला समजावत होते. आपल्या घरच्यांची आपल्याला साथ आहे ह्या विचाराने तिच्या जखमेवर फुंकर घातल्या गेली होती. आपण इतकं ताणून धरल्या पेक्षा त्याच्यापासून आधीच वेगळे व्हायला हवे होते हे तिला कळून चुकले.
इकडे आधीच लग्नासाठी उतावीळ असलेल्या सागरने सावी च्या घरी डिव्होर्स नोटीस पाठवली होती. साविच्या घरच्यांनी सुद्धा त्यांच्या वकिलामार्फत लग्नात दिलेलं स्त्रीधन, एक चारचाकी आणि पाच लाखांची रक्कम परत मागितली होती. लग्नाचा खर्च सुद्धा मागायचा विचार आला होता त्यांच्या मनात.
पण लग्नात इतका जास्त खर्च केला होता की त्याची रक्कम परत करताना सागरच्या नाकी नऊ आले असते. आणि आता सावीच्या घरच्यांना घटस्फोटासाठी जास्त थांबायचे नव्हते. ह्या प्रक्रियेला जितका जास्त वेळ लागेल तितकाच हा गुंता वाढत जाईल हे त्यांना ठावूक होते.
इकडे सागरच्या आईवडिलांना मात्र हे सगळे ऐकून धक्काच बसला होता. आपल्या मुलाचं बाहेर अफेयर सुरू आहे आणि त्याने सावी ला सोडायचे ठरवले आहे हे ऐकून तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. सावी सारख्या तोलामोलाच्या स्थळामुळे गावात त्यांचा मान वाढला होता.
आणि आता जेव्हा गावात हे सगळं कळेल तेव्हा आपली नाचक्की होईल म्हणून मग त्यांनी गावात सावीची प्रतिमा खराब केली. सावीचे लक्षण ठीक नाही म्हणून सागर सावीला घटस्फोट देतोय अशी वावडी त्यांनी उठवली. हे जेव्हा सावी आणि तिच्या घरच्यांच्या कानावर गेले तेव्हा अर्थातच त्यांना खूप राग आला होता.
सावीचा तर विश्र्वासच बसत नव्हता की हे तेच सासरे आहेत ज्यांनी सावीला तू आमच्या मुलीप्रमाणे आहेस आणि आम्ही एखादेवेळी सागरला अंतर देऊ पण तुला अंतर देणार नाही असे म्हटले होते. आणि तिने सुद्धा इतक्या वर्षात त्यांना आई वडिलांसारखा मान दिला होता. आज तिला खऱ्या अर्थाने दुनियादारी कळत होती.
इकडे सागरला त्याच्या आणि सावीच्या लग्नात आलेले दागिने, पैसे आणि कार परत द्यायची होती. खरंतर एवढं परत करायची त्याची इच्छा होत नव्हती. पण मग त्याला श्वेताची आठवण आली. प्रेमात धुंद झालेल्या सागरने निर्धार केला की आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी, तिच्यासोबत आयुष्य काढण्यासाठी आपल्या जवळ असलेलं सगळं गमवायला तो तयार होता.
हे सगळं श्वेताला कळलं तेव्हा तिला जणू धक्काच बसला. तिला वाटले होते की सागर जवळचं सगळं काही त्याचं स्वतःच आहे. पण जेव्हा तिला सत्य कळले की ह्यातलं बरंच काही सावीच्या घरच्यांनी दिले होते तेव्हा मात्र तिचा हा गैरसमज दूर झाला.
तरीही तिने विचार केला की सागरला चांगली नोकरी आहे. चारचाकी काय पून्हाही घेऊ शकेल. सागर आपल्या सोबत असेल तर सगळं काही पुन्हा घेता येईलच. सागर आणि श्वेता आता बिनधास्त सगळीकडे फिरायला लागले होते. दोघांना आता कुणाचीच भीती व बंधन नव्हते. कोर्टाने घटस्फोटासाठी दोन महिन्या नंतरची तारीख दिली होती.
सावीच्या घरच्यांना सुद्धा आता सावीने सगळं काही विसरून नवीन सुरुवात करावी असे वाटत होते. तिच्या घरातील लोक गावी राहत असले तरी त्यांचे विचार बऱ्यापैकी आधुनिक होते. निदान आपल्या घटस्फोट होत असलेल्या मुलीला नवऱ्याने टाकलेली वा हीच्यातच काहीतरी कमी असेल असे म्हणून हिणवणारे तर ते नक्कीच नव्हते.
त्यांनी सावीला समजावले. आणि तिचे लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवावे म्हणून तिला पुढील शिक्षण घ्यायचा सल्ला दिला. सावीला मात्र आता पुन्हा शहरात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा नव्हती. निदान आता तरी तिची मनस्थिती तशी नव्हती. मग तिच्या वडिलांनी गावातल्या शाळेतील मुख्याध्यापक पाटील सरांना तिला काही दिवस शाळेतील मुलांना शिकवू द्या अशी विनंती केली.
मुख्याध्यापकांनी अगदी आनंदाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. तसेही शाळेत शिक्षकांची कमतरता होतीच. कारण त्यांच्या व्यतिरिक्त शाळेत फक्त दोनच शिक्षक होते. हितेश सर आणि साकेत सर. त्यापैकी हितेश सरांच्या वडिलांचे ऑपरेशन झाल्याने आणि हितेश सर त्यांचा एकुलता एक मुलगा असल्या कारणाने त्यांना शाळेतून रजा घेऊन त्यांच्या गावाकडे जावं लागलं होतं.
आणि म्हणूनच शाळेचा भार पाटील सर आणि साकेत सर ह्यांच्यावरच होता. अशात सावी जर स्वतःहून मुलांना शिकवायला आली तर त्यांना आनंदच होता. शिवाय सावी शिक्षणात खूप हुशार आहे हे त्यांनी आधी अनेकदा गावातील लोकांकडून ऐकले होते.
सावी मुलांना शाळेत शिकवायला जाऊ लागली. सुरुवातीला तिच्या मनात भीती होती. कारण इतकी वर्षे तिचा शिकण्या – शिकवण्याशी फारसा संबंध आलेला नव्हता. पण पहिल्याच दिवशी तिच्या मनातील ही भीती दूर झाली. शाळेतील मुलांची पटसंख्या तशी कमीच होती. शिवाय पाटील सर आणि साकेत सर सावीला हवी ती मदत करायला तयार असायचे.
सावीचा दिवस आता आनंदात जाऊ लागला. मुलांच्या सोबत असताना ती सुद्धा लहान मुलांसारखीच वागायची. आनंदी, स्वच्छंदी. अभ्यासक्रम समजून घेण्यात साकेत सरांची खूप मदत व्हायची तिला. मुलांमुळे खूप कमी वेळातच ती तिचं दुःख विसरली होती. मुलांना सुद्धा ह्या नवीन मॅडम खूपच आवडायला लागल्या होत्या. पाटील सर तिच्या वडिलांकडे जाऊन तिची खूप स्तुती करायचे.
तिच्या घरच्यांना आपल्या मुलीमध्ये आलेला हा सकारात्मक बदल खूप आवडला होता. अशातच घटस्फोटाची तारीख येऊन ठेपली आणि त्या दिवशी सगळेच कोर्टात हजर झाले. पण वेळ जवळ आली तरीही सागर काही वेळेवर येऊ शकला नाही. आणि त्या दिवशी होणारा घटस्फोट लांबणीवर पडला. सगळ्यांना आता सागरचा राग येत होता. कारण घटस्फोटासाठी सगळ्यात जास्त उतावीळ असणारा सागर ऐन घटस्फोटाच्या दिवशी हजर नव्हता.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार
फोटो – साभार गूगल.
गोष्ट एका लग्नाची – भाग ७ (अंतिम भाग)
Next part