आणि दुसऱ्या अपेक्षा तरी काय करायला पाहिजे होत्या सागरने. त्याच्या या प्रेमाचा पाया सुद्धा कुणालातरी फसवूनच रचला गेला होता. त्याने एका क्षणिक मोहाला बळी पडून, पुढचा मागचा काहीही विचार न करता आपल्या लग्नाच्या बायकोला सोडून दिले होते.
ज्या बायकोने ह्याचे बाहेरचे प्रकरण घरी समजल्यावर देखील ह्याचा तिरस्कार न करता ह्याला प्रेमाने पुन्हा परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते तिलाच त्याने आयुष्यात अर्ध्या वाटेवर सोडून दिले होते. आता मात्र त्याला आपल्या निर्णयावर पश्चात्ताप होत होता. आपण श्वेताच्या नादी लागून फसले गेलो आहोत हे त्याच्या ध्यानी आले.
आता मात्र त्याला काहीच सुचत नव्हते. अशात त्याला त्याचे आईवडिल आठवले. त्याने तडक त्याच्या घरी फोन लावला आणि घडलेला सगळा प्रकार त्याच्या आईवडिलांना सांगितला. आई वडिलांनी सुद्धा ह्यावर तोडगा काढावा म्हणून स्वतःचा सगळा राग विसरून ह्याला गावी बोलवून घेतले.
गावी पोहचल्यावर सगळ्यांनी बसून यावर चर्चा केली. आणि सगळेच या निष्कर्षाप्रत पोहचले की अजूनही दोघांचा घटस्फोट झाला नसल्याने सागरने सावीला पुन्हा एकदा नांदायला घरी घेऊन यावे. कारण ह्या सगळ्यांनी कितीही नाकारले असेल तरी तिच्यासारखी चांगली मुलगी पुन्हा मिळणार नाही हेच खरे होते.
शिवाय जर हा घटस्फोट थांबला तर समाजात बदनामी सुद्धा टळणार होती आणि सावीला लग्नात आलेलं स्त्रीधन आणि आणखी इतर वस्तू व पैसा द्यायची गरज उरणार नव्हती.
पण सागरचे आईवडिल आता सावीच्या घरी कोणत्या तोंडाने जातील ह्याचा त्यांना प्रश्न पडला. कारण अवघ्या पंचक्रोशीत त्यांनी सावीचे चारित्र्य खराब असल्याची बतावणी केली होती. अर्थातच ह्यावर अनेकांनी विश्वास ठेवला नाही. पण ह्याची खबर सावी आणि तिच्या घरच्यांना लागलीय हे सुद्धा त्यांना ठावूक होते.
म्हणूनच सागरचे आईवडिल त्यांच्या घरी जाऊ शकत नव्हते. कारण अशाने गोष्ट आणखीनच बिघडण्याची शक्यता होती. शेवटी सागरनेच ह्या सगळ्यावर तोडगा काढला. तो आई बाबांना म्हणाला.
” आई बाबा…तुम्ही अजिबात काळजी करू नका…आपण सावीच्या घरी जायचेच नाही…मी ऐकलं आहे की सावी सध्या गावातल्या शाळेतच शिकवायला जाते…मी तिला जाण्या येण्याच्या रस्त्यातच गाठतो…नाहीतर मग शाळेत सुद्धा जाईल…
मी सावीला पुन्हा एकदा सोबत यायला सांगितल्यावर सावी मला मना करूच शकणार नाही…कारण इकडे यायच्या आधी सावी रोज मला भिक मागायची की श्वेताला विसरून पुन्हा एकदा संसाराला सुरुवात करा…अन् आज जेव्हा मी तिला सांगेल की मी श्वेताला सोडून पुन्हा एकदा तिच्याकडे यायला तयार आहे तेव्हा ती एका पायावर तयार होईल…
आणि माझ्यासाठी स्वतःच्या आई बाबांसोबत भांडेल सुद्धा…मग जर त्यांची मुलगीच पुन्हा जायचं म्हणेल तेव्हा तिच्या घरच्यांचा सुद्धा नाईलाज होईल…आणि मगच तुम्ही जा त्यांच्या घरी…पूर्ण मानाने…तुम्ही मुलाचे वडील असल्याचा अभिमान घेऊन…”
त्याच्या या उपायावर त्याच्या वडिलांना त्याचा अभिमान वाटला. सागर आता सगळं काही ठीक करेल अशी आशा त्यांना वाटली. आता सगळं काही सागरच्या हातात होते. तो किती प्रभावीपणे स्वतःचा मुद्दा ठेवून सावीची समजूत काढू शकतो ह्यावर त्याचे भवितव्य अवलंबून होते.
दोन दिवसांनी सागरच्या प्लास्टर सुटणार होते आणि त्यानंतर तो सावीला भेटायला जाणार होता. कोर्टाची तारीख यायला अजून आठवडा बाकी होता. त्याआधी सगळं काही बाहेरच्या बाहेर मिटवावे म्हणून त्याचे प्रयत्न सुरू होते.
त्या दिवशी सावी नेहमीप्रमाणे शाळेत आली तेव्हा श्रुती सुद्धा साकेत सरांच्या सोबत आली होती. दोघींनाही एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. श्रुती तिच्या बोबड्या बोलीत सावी सोबत गप्पा मारत होती. इतक्यात एक आई तिच्या मुलीला शाळेत सोडवायला आली. त्या दोघी मायलेकींना सोबत पाहून श्रुतीच्या बालमनाला प्रश्न पडला की सगळ्यांना आई असते. आपल्याला का नाही. तिने बालसुलभ वृत्तीने सावी ला म्हटले.
” मी तुला आई म्हणू का…?”
श्रुतीचे बोलणे ऐकुन सावीला आश्चर्य वाटले. ती काही बोलणार इतक्यात साकेत सर तिथे आले आणि श्रुतीला ओरडत म्हणाले.
” असं म्हणायचं नसतं बाळा…त्या मॅडम आहेत ना तर त्यांना मॅडमच म्हणायचं…?” त्यानंतर सावीकडे पाहत म्हणाले.” सॉरी मॅडम…तुम्हाला हिच्या बोलण्याच वाईट वाटत असेल तर…लहान आहे ना…एवढं नाही कळत तिला…”
त्यावर श्रुती उदास चेहरा घेऊन गप्प बसली. तिला पाहून सावी म्हणाली.
” काही होत नाही…तिला वाटत असेल तिने मला आई म्हणावं तर मला आवडेलच…” सावी म्हणाली.
” खरंच आवडेल तुम्हाला…?” साकेत सरांनी आश्चर्याने आणि आनंदाने विचारले.
त्यावर सावी काही उत्तर देईल त्या आधीच शाळेचा एक विद्यार्थी तिथे आला आणि सावीला म्हणाला.
” मॅडम…तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहे बाहेर…तुम्हाला बोलावलंय…”
त्यावर सावी ने शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर बघीतले असता तिला बाहेर सागर दिसला. सागर दिसताच तिच्या काळजात धस्स झालं. हा इथे कशाला आला असेल ह्या विचाराने ती क्षणभर जागीच थांबली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. तिचे ते बदलले भाव साकेत सरांनी अचूक टिपले आणि तिला म्हणाले.
” सावी मॅडम…काही प्रोब्लेम आहे का…मी काही मदत करू शकतो का…?”
त्यावर तिने मानेनेच नाही म्हटले. तिला खरंतर त्याला भेटायला जायचो अजिबात इच्छा नव्हती. पण त्याला टाळून सुद्धा प्रॉब्लेम सुटणार नव्हता. शेवटी अनिच्छेनेच का होईना सावी त्याला भेटायला म्हणून शाळेच्या बाहेर पडली. सावी बाहेर आल्याचे पाहून त्याने तिला जरा आडोशाला येऊन बोलू असे सांगितले. शाळेच्या गेटच्या बाहेर यावेळेला थांबून बोलणे तिलाही बरे वाटले नाही.
कारण ही शाळेच्या सुरू होण्याची वेळ होती. मुलं अजूनही शाळेत येत होते. अशात सगळ्यांना आपलं बोलणं ऐकू जावं असे तिला वाटत नव्हते म्हणून मग ते दोघेही जरा बाजूला जावून बोलू लागले. पण ते जिथे होते तिथून ते साकेत सरांना दिसत होते. फक्त बोलणं ऐकायला येत नव्हतं. पण सावी मॅडम चा उतरलेला चेहरा पाहून साकेत सरांना त्यांच्यावर दुरून लक्ष ठेवणे गरजेचे वाटल्याने ते तिथेच थांबले.
इकडे सावीने सागरला पाहून विचारले.
” तुम्ही इथे काय करताय…आणि मला का बोलावलं बाहेर…”
” का…मला पाहून तुला आनंद नाही का झाला…?” सागरने बळेच हसत विचारले.
” म्हणजे…अजूनही तुम्हाला असे वाटते का की तुम्हाला पाहून मला आनंद होईल…” सावी म्हणाली.
” मला पाहून जरी आनंद नाही झाला तरीही मी जी बातमी तुला सांगेन ती ऐकुन तुला खूप आनंद होईल…” सागर म्हणाला.
” काय बोलताय तुम्ही…अशी कोणती बातमी आहे जी ऐकून मला आनंद होईल…?” सावी ने विचारले.
” मी श्वेताला सोडून दिलंय…आता ती पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही…” सागर म्हणाला.
” काय…जिच्यासाठी इतका अट्टाहास केला होता…जिच्यासाठी आपलं लग्न मोडले…जी तुम्हाला जगात सगळ्यात जास्त प्रिय होती तिला तुम्ही सोडून दिले…पण का…?” सावीने विचारले.
” कारण तिने माझी फसवणूक केली होती…तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं…माझ्या चांगल्या लाइफस्टाइल वर आणि पैशांवर प्रेम होतं…” सागर ने विचारले.
” अच्छा…पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय…” सावी ने विचारले.
” का म्हणजे काय…तुला कळत नाहीये का…श्वेता आपल्या आयुष्यात नाही आहे म्हणजे आता आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो…आपल्याला घटस्फोट घ्यायची काही गरज उरणार नाही…” सागर म्हणाला.
” तुम्ही काय बोलताय हे लक्षात येतंय का तुमच्या…?” सावी ने रागाने विचारले.
” हो…आणि तुलापण हेच हवं होतं ना…तूच मला म्हणायची ना की तुला एक संधी हवीय पुन्हा संसार करायची…” सागर म्हणाला.
” पण आता मला तुमच्याशी एकही शब्द बोलायची इच्छा नाही…आणि तुमच्यासोबत पुन्हा संसार करायची तर की कल्पना सुद्धा नाही करू शकत…तुम्ही माझ्या मनातून पुरते उतरला आहात…त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि मी माझ्या मार्गाने जाते…” सावी म्हणाली.
” हे काय बोलतेयस तू…तुला कळतंय तरी का…अगं तूच तीन चार महिन्यांपूर्वी माझ्यासमोर हात जोडून भीक मागायची ना मला सोडु नका म्हणून…” सागर चिडत म्हणाला.
” हो…हे मीच म्हणायचे…पण जेव्हा तुम्हाला मी रडून रडून भीक मागायचे तेव्हा तुम्हाला एकही दिवस माझी दया आली नाही…काय म्हणायचे तुम्ही तेव्हा आठवतंय का…माझ्यासोबत संसार करण्यापेक्षा देवाने तुम्हाला मरण दिलेलं बरं म्हणून…” सावी म्हणाली.
” पण आज मी स्वतःहून आलोय ना तुझ्यासमोर…तुला पुन्हा सोबत चल म्हणतोय…आणि आता तू नखरे दाखवत आहेस…चार पाच महिन्यांपूर्वी तर माझ्यासमोर आवाज वर करून बोलायची हिम्मत नव्हती तुझी…आणि आता मला नाही म्हणत आहेस का…?” सागर दातओठ खात म्हणाला.
बोलण्याची सुरुवात हसून आणि प्रेमाने करणारा सागर आता त्याच्या खऱ्या रूपात आला होता. तो सावी वर खूप जास्त चिडला होता. नेहमी त्याच्या मागे मागे हात जोडत येणारी सावी आज त्याला स्वतःहून नाकारत होती. त्याने त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला होता.
सागर आता काय करेल…? सावी पुन्हा एकदा त्याच्या बोलण्यात येईल का…? साकेत आणि सावीच्या मनातल्या भावनांना मनातच ठेवावे लागेल का…? हे सगळे पाहूया पुढील भागात…
क्रमशः
गोष्ट एका लग्नाची – भाग ७ (अंतिम भाग)
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल.
खुपच छान. सावीने तीच्या मनात अशलेले बोलून दाखवणे गरजेचे आहे.