सकाळीच दूधवाला दूध देऊन गेला. दूध देताना त्याचा स्पर्श माझ्या घराच्या गेटला झाला. मी लगेच आतमध्ये जाऊन सैनिटायझर घेऊन आले आणि पूर्ण गेट ला सैनिटायझर लावले. मला पाहून माझी शेजारीण गालातल्या गालात हसली आणि म्हणाली…
” काय ग शुभांगी ?…किती भितेस ?…अजुन आपल्या शहरात कोरोना आला नाहीय.”
” हो तरीपण आपण हवी ती खबरदारी घ्यायलाच हवी.” मी हसत हसत बोलले. आणि आत निघून आ
मनातल्या मनात मी विचार केला…खरंच मी जरा जास्तच भितेय का..?
लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा माझ्या नवऱ्याला सुद्धा सुट्टी मिळाली. महिनाभर ते घरीच होते. आठ दिवसांमध्ये एकदा ते बाहेर जाऊन गरजेचे सर्व सामान घेऊन येत. मग ते सामान स्वच्छ धुवून, थोडा वेळ बाहेर ठेवायचो. आणि नंतर घरात एका कोपऱ्यात ठेवून द्यायचो. निदान दोन चार दिवस तरी त्याला हात देखील लावत नव्हतो. आणि नंतर ते वापरात घ्यायचो. दूधवाला सुद्धा दूध घरपोच आणून द्यायचा त्यामुळे फारसं काही वाटलं नाही. सर्वजण घरातल्या घरात असल्यामुळे आणि बाहेरच कुणीच घरात येत नसल्यामुळे वरच्यावर स्वच्छता करावी लागत नसे.
पण दीड महिन्यानंतर माझ्या नवऱ्याची ऑफिस पुन्हा एकदा सुरू झाले. एव्हाना शहरात बोटावर मोजण्याइतके कोरोना पेशंट आढळले होते. कामाच्या ठिकाणी देखील ते सर्व खबरदारी घेत होते. तरीही मनात भीती होतीच. जर चुकून आपल्याला देखील कोरोनाची लागण झाली तर….म्हणून प्रत्येक बाबतीत थोडी जास्त काळजी घ्यायला लागले.
बाहेरून भाजीपाला किंवा फळे आणल्यास ते आधी पूर्णपणे स्वच्छ करणे. नवरा ऑफिस मधून घरी आला की बाहेरच त्यांच्यासाठी पाण्याची बादली, साबण, सैनिटायझर तयार ठेवणे. गेट सुद्धा साबणाने स्वच्छ धुवून घेणे. कपडे स्वच्छ धुवून उन्हात वाळू घालणे. आणि मग पूर्ण अंगण धुवून टाकणे. इत्यादी सोपस्कार पार पाडायचे. शक्यतो बाहेरून कमीत कमी सामान आणणे. आणि मागच्या दोन महिन्यांपासून मी आणि माझा एक वर्षाचा मुलगा मल्हार तर गेट च्या बाहेर देखील पडलो नव्हतो. माझ्या शेजारच्या मैत्रिणी एकमेकींशी बोलायला बाहेर पडत. मी मात्र कधी त्या मोहात पडले नाही. त्या मला बाहेरून चिडवत म्हणत…”काय शुभांगी…किती भीतेस ?”…मी फक्त गालातल्या गालात हसायचे.
मग मलाच माझा विचार पडला. खरंच खूप जास्त भिते का मी या कोरोनाला. आणि माझ्या कानावर माझ्या लहानग्या मल्हार चा आवाज आला. तो त्याच्या बोबड्या बोलीत मला हाक मारत होता. आणि मला उत्तर मिळाले.
हो…मला भीती वाटते या कोरोनाची. पण मला मरायची भीती नाही वाटत. पण काळजी वाटते ती माझ्या मुलाची. मला काही झाले तर माझ्या मुलाचे काय होईल या विचाराने माझा थरकाप उडतो. मला त्याला एक सुंदर भविष्य द्यायचे आहे. त्याच्यावर खूप प्रेम करायचे आहे. माझ्या नवऱ्याला आयुष्यभराची साथ द्यायची आहे. माझ्यापासून दूर असलेल्या माझ्या माहेरी माझी आई माझी वाट पाहतेय. तिच्याकडून खूप खूप लाड पुरवून घ्यायचे आहेत. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे आहे. आणि हा कोण कुठून आलेला कोरोना माझ्या जगण्याच्या इच्छाशक्तीला हरवू शकत नाही.
मी माझ्या घरावर आलेल्या प्रत्येक संकटाशी दोन हात करेन. मग हा कोरोना काय चीज आहे. मी त्याला माझ्या घरात अजिबात प्रवेश करू देणार नाही.
आणि इतक्यात घराचे गेट वाजल्याचा आवाज आला. माझा नवरा ऑफिसमधून घरी आला होता. मी पुन्हा हाती सैनिटायझर घेतले. आणि सज्ज झाले कोरोनाशी लढायला…
appreciate
thank you