संध्याकाळची वेळ झाली होती. रमाकाकू आतुरतेने नेहाची वाट बघत होत्या. त्यांची सून राधिका सकाळपासूनच त्यांची धावपळ बघत होती. शेवटी गाडीचा हॉर्न ऐकू आला तसा त्यांनी घाईनेच दरवाजा उघडला. आणि नेहा येताच तिला कडकडून मिठी मारली. कारण नेहा मागच्या एका वर्षांपासून माहेरी आलेली नव्हती.
नेहाच्या नवऱ्याने मुंबईमध्ये नवीन बिझनेस सुरू केला होता आणि नेहासुद्धा अधून मधून त्याला मदत करायची. त्यामुळे नेहाला इकडे येणे फारसे जमत नसे. तसे एप्रिल मध्ये येण्याचे ठरले होते पण लॉकडाऊन लागला आणि तिला माहेरी येण्याचा बेत रद्द करावा लागला.
फोनवर नेहमीच बोलणे व्हायचे पण आज इतक्या दिवसांनंतर नेहा माहेरी येत असल्याने रमाकाकूंना फार आनंद झाला होता. अगदी काय करू नि काय नको असे झाले होते. रमा काकूंनी आज सर्व पदार्थ नेहाच्या आवडीचे बनवले होते.
नेहा आईजवळ बसून मजेत गप्पा मारत होती. दोघी मायलेकीना एकमेकींसाठी भरपूर वेळ मिळावा म्हणून राधिकाने संपूर्ण किचनची जबाबदारी एकटीने घेतली होती. रधिकाचा नवरा प्रतीक सुद्धा तिला किचनमध्ये मदत करायला आला. दोघांनी मिळून सर्व कामे अगदी चुटकीसरशी संपवली आणि दोघेही नेहा आणि रमाकाकु सोबत गप्पा मारायला आले.
रात्रीचे जेवण झाल्यावर सर्वांच्या बराच वेळ गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे सर्वांना झोपायला उशीर झाला. त्यामुळे साहजिकच सर्वांना उठायला उशीर झाला होता. आज रविवार असल्यामुळे प्रतीक घरीच होता. राधिकाने नेहाला आवडतात म्हणून नाष्ट्यामध्ये खास आलूचे पराठे बनवले होते.
प्रतीकने डायनिंग टेबलवर स्वतः सर्वांना पराठे सर्व्ह केले. नाश्ता झाल्यावर प्रतीकने स्वतःची प्लेट सिंकमध्ये नेवून ठेवली. नेहाला हे बघून आश्चर्य वाटले. लग्नाआधी स्वतःसाठी एक ग्लास पाणीदेखील न घेणारा दादा आज चक्क वहिनीला स्वयंपाकात मदत करतोय हे पाहून नेहाला नवल वाटले. पण नेहाने तसे बोलून दाखवले नाही.
नेहा तिच्या घरात होणारे बदल पाहत होती. मागच्या एक वर्षात खूप बदल झाले होते. सर्वात जास्त बदल तिच्या भावात झालेला होता. त्याचे लग्न व्हायच्या आधी प्रत्येक गोष्टीत त्याला त्याच्या आईची मदत लागायची. अगदी लहान सहान गोष्टींसाठी तो आईवर अवलंबून असायचा. त्याने कधीच स्वतःसाठी पाणी घेतले नसेल किंवा आईला कधीही किचन मध्ये मदत केली नसेल. कधीही दळण दळून आणले नसेल.
पण आता वहिनीच्या खूप धाकात असल्यासारखा वागत होता. अगदी जेवण झाल्यावर स्वतः ताट नेऊन सींकमध्ये ठेवणे, स्वतःसाठी पाणी घेणे, स्वतःच्या कपड्यांची घडी स्वतः करणे, स्वतःचे बूट पॉलिश करणे, वहिनीला स्वयंपाकात मदत करणे अशी बरीच कामे तो स्वतःच करायचा. नेहाला पाहून खूप आश्चर्य वाटायचे. पण नेहाने तसे बोलून दाखवले नाही.
दुपारी रमाकाकु, प्रतीक, राधिका आणि नेहा बसून छान गप्पा मारत बसले होते. गोष्टी ऐन रंगात असताना नेहाला भजी खायची इच्छा झाली. राधिका तडक उठून किचन मध्ये भजी करायला निघून गेली. तिच्याच पाठोपाठ प्रतीक देखील किचन मध्ये तिला मदत करायला गेला. त्याने भरभर कांदा कापून दिला आणि राधिकाने खमंग भजी तळली.
राधिकाने भज्यांसोबत चहा देखील करून आणला. दादाला वहिनीच्या इतकं आहारी गेलेलं पाहून नेहाचा भजी खायचा मूड पार निघून गेला. तिने कशीबशी दोन चार भजी संपवली आणि चहा न घेता तिच्या रूममध्ये निघून आली. तिच्या मूड मध्ये झालेला बदल रमाकाकुंनी अचूक टिपला होता. त्या नेहाच्या पाठोपाठ तिच्या रूम मध्ये आल्या. आणि नेहाला विचारले,
” काय झालं नेहा…तू अशी अचानक उठून का आलीस…?”
” काही नाही आई…सहजच…?” नेहाने आईला टाळण्यासाठी म्हणून उत्तर दिले.
” खरं सांग…काही झालंय का…?” रमा काकू.
” आई… खरं सांगायचं म्हणजे मला तुझी खुप काळजी वाटत आहे ग…” नेहा म्हणाली.
” अगं…माझी कसली काळजी…मला काय झालंय…?” रमाकाकूंनी विचारले.
” आई… अगं दादा खूप बिघडलाय ग…पार बायकोच्या आहारी गेला आहे ग… तो सतत बायकोच्या धाकात असतो…आधी तर तू कधीच त्याला एक ग्लास पाणी देखील स्वतः घेऊ दिले नाहीस…आणि आता तो स्वतः ताट देखील वाढून घेतो…वहिनीला किचन मध्ये मदत करतो…कांदा काय कापून देतो…चहा काय ठेवतो…
अगदी बैल करून ठेवलाय वहिनीने त्याला…तरी बरं वहिनीला काही दुसरे काम नसतात…दिवसभर घरीच तर असते…तरीसुद्धा नवऱ्याकडून कामे करून घेते…आणि तूसुद्धा वहिनीला काही बोलत नाहीस ग…आतापासूनच घरात वहिनीचा हुकुम चालतोय म्हटल्यावर मला तुझी काळजी तर वाटणारच ना…?” नेहा काळजीच्या सुरात म्हणाली.
” अगं पण यात वाईट काय आहे…आणि ह्याचा अर्थ बायकोच्या धाकात असणे नाही तर बायकोची कदर असणे असा आहे…?” रमा काकू म्हणाल्या.
” म्हणजे…तुला यात काहीच वाईट वाटत नाही…दादाने तुला कधीच कुठल्या कामात मदत केली नाही पण वहिनीने न म्हणताच तो तिची मदत करतो ह्याच तुला वाईट वाटत नाही का..?” नेहा म्हणाली.
” नाही…यात वाईट वाटण्यासारखे काय आहे…तुझा दादा बिघडला नाही तर आत्ता कुठे सुधारतो आहे…”
” म्हणजे…?”
” म्हणजे आधी तो कधीच कोणत्याही कामाला हात लावायचा नाही…म्हणजे मी कधी लावू दिलाच नाही…तुम्हा दोघांनाही मी अगदी लाडोबा करून ठेवलं होतं… तुझं लग्न झालं नी जसजशा तुझ्यावर जबाबदाऱ्या पडायला लागल्या तसतशी तू सर्व कामात निपुण झालीस…
पण प्रतीक मात्र लग्न झाल्यावरही अगदी तसाच होता…त्याचा टॉवेल नेहमीच एका कोपऱ्यात पडलेला असायचा…अगदी पाण्याचा ग्लास देखील घ्यायचा नाही…सुरुवातीला राधिकाने त्याला स्वतःची कामे स्वतः करावी म्हणून बजावले पण तो मात्र मुलखाचा आळशी…त्याच्या सवयी काही जातच नव्हत्या…
मग राधिकाने शक्कल लढवली…त्याचा टॉवेल त्याने जिथे भिरकावला असेल तिथेच दिवसभर पडू द्यायची…त्याला हात सुद्धा लावायची नाही…त्याच्या धुतलेल्या कपड्यांची घडीदेखील करायची नाही…त्याच्या अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तूंना तशीच पडू द्यायची…मलासुद्धा त्याची मदत करू दिली नाही…
शेवटी कंटाळून प्रतीक स्वतःची कामे स्वतः करायला लागला…हळूहळू त्याला स्वतःचे काम करायची आवड निर्माण झाली…त्याचा आळस दूर झाला आणि आता स्वतःहून तो घरातल्या इतर कामांमध्ये ही मदत करतो…आता त्याला कोणतेही काम करताना कमीपणा वाटत नाही… ज्याला मी सुधारू शकले नाही त्या तुझ्या दादाला तुझ्या वहिनीने चांगलाच सुधारला आहे…जे मला जमलं नाही ते माझ्या सुनेला छान जमलं बघ…” रमा काकू म्हणाल्या.
” हो ग आई…ह्या गोष्टीचा तर मी विचारच केला नाही बघ…” नेहा म्हणाली.
” हो ग…बायका दिवसभर घरीच असतात हे लोकांना दिसतं पण त्या घरी राहून देखील सतत कामातच असतात हे त्यांना दिसत नाही…कित्येक पुरुषांना तर असंच वाटतं की बायकांचं जन्म फक्त काम करण्यासाठीच झालाय…कित्येक नोकरदार स्त्रियांना तर घरची सर्व कामे आटोपून नोकरीसुद्धा करावी लागते…मग अशा वेळी नवऱ्याने स्वतःहून कधीतरी बायकोची मदत केली तर काय बिघडलं..या अशा लहानसहान गोष्टींमुळेच तर नवरा बायकोचं नातं फुलत जातं…” रमाकाकू नेहाला समजावत म्हणाल्या.
” हो आई…अगदी बरोबर आहे तुझं…खरंच माझा दादा अन् वहिनी लाखात एक आहेत…” असे म्हणत नेहाने तिच्या आईला मिठी मारली.
” चल मग तुझ्या दादा वहिनींच्या हातची गरमागरम भजी खायची आहेत ना तुला…”
” हो…नक्कीच…” नेहा म्हणाली.
आणि दोघी मायलेकी एकमेकींकडे पाहून खळाळून हसल्या.
समाप्त.
©® आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.