सुरेखाताई जरा तणतणतच घरात आल्या आणि सोफ्यावर येऊन बसल्या. चार दिवसांसाठी म्हणून बहिणीच्या घरी राहायला निघाल्या तेव्हा त्या खूपच उत्साहात होत्या. पण आता मात्र त्यांचा मूड काही ठीक वाटत नव्हता. सुहासने त्यांची बॅग त्यांच्या खोलीत नेऊन ठेवली. मंजिरीने त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि लगेच त्यांना नेऊन दिला. सुरेखाताईंनी काहीही न बोलता मंजिरीच्या हातून चहा घेतला. त्यांचं काहीतरी बिनसलंय हे एव्हाना मंजिरीच्या लक्षात आलं देखील. पण तिने त्यांना काही विचारले नाही.
थोड्याच वेळात लहानगा समर्थ शाळेतून आला आणि बाहेरूनच आई आई म्हणत आईला शोधत किचन मध्ये असलेल्या मंजिरीकडे गेला. मंजिरीने त्याला जवळ घेतले. त्याचे कपडे बदलून ती त्याला काही खायला घालणार इतक्यातच सासूबाईंचा आवाज तिला ऐकू आला अन् तिने खोलीतून बाहेर येऊन बघितले. त्या सुहासशी बोलत म्हणाल्या.
” माझी या घरात काही किंमतच नाही… सुधाताईचे दोन्ही नातवंडं शाळेतून आले की पहिल्यांदा आजी जवळ येतात…शाळेत काय काय केलं ते सांगतात…दिवसभर आजीच्या मागेपुढे करतात… आजीशिवाय पान नाही हालत त्यांचं…पण इथे मात्र आजी घरात असून नसल्यासारखी आहे…दिवसभर समर्थ नुसता आईच्या पदराआड लपलेला असतो…मला तर वाटतं त्याची आईच त्याला माझ्या विरोधात काही ना काही भरवत असेल…नाहीतर तो असा माझ्यापासून दूर दूर राहिला असता का..?”
आईच्या तोंडून हे ऐकून सुहासला काय बोलावे आणि काय नाही ते कळत नव्हते. मंजिरीला सुद्धा हे ऐकून खूप वाईट वाटले. सुहास आईला म्हणाला.
” असं काही नाही आई…समर्थ अजून लहान आहे…त्याला एवढी समज नाही…मोठा झाला की कळायला लागेल त्याला…”
” तुला कळत नाही आहे सुहास…मंजिरीला वाटतच नाही की समर्थने माझ्याजवळ यावे…तिला तो नुसता तिच्या मागेपुढे हवा आहे…म्हणूनच त्याला काहीबाही शिकवत असणार ती…” सुरेखाताई आपलं म्हणणं पटवून देत म्हणाल्या.
“मंजिरी का म्हणून त्याला काही वाईट सांगेन…मला वाटतं तू या सगळ्याचा फार विचार करत आहेस…” सुहास विषय टाळत म्हणाला.
मंजिरीला मात्र सासूबाईंच्या बोलण्याचे खूप वाईट वाटले. तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी ती बाळंतपणानंतर माहेराहून सासरी परतली होती. त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा त्या समर्थ ला जवळ घेऊन बसल्या आणि त्याने त्यांच्या अंगावर शू केली तेव्हा किती ओरडल्या होत्या त्या मंजिरीवर. म्हणाल्या होत्या की यानंतर डायपर घातल्याशिवाय त्याला माझ्याकडे देत जाऊ नकोस.
त्यानंतर सुद्धा लहानसहान कामात कधी मदत केली नाही. तशा मदत त्या कधीच करत नसत. पण का कोण जाणे मंजिरीला असे वाटायचे की नातवंडं झाल्यावर त्या बदलतील. निदान बाळाचं कौतुक करत त्याला कडेवर मिरवतील. पण तिने जसा विचार केला तास काहीच घडलं नाही.
सासूबाईंनी तिला आधीच सांगितले होते की बाळाच्या बाबतीत माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नकोस. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरची कामे आणि सोबत समर्थला सांभाळणे मंजिरीला कठीण जाई पण बोलण्याची काही सोय नव्हती. पण या सगळ्यात सुहासने तिला बरीच मदत केली.
ऑफिसला जायच्या आधी तो जमेल तितका वेळ समर्थला सांभाळायचा आणि आल्यावर सुद्धा समर्थशी खेळत बसायचा. त्यामुळे मंजिरीला खूप मदत व्हायची. समर्थ दोन वर्षांचा झाला तेव्हा एक दिवस अचानकच मंजिरीला कळाले की ती पुन्हा एकदा आई होणार आहे. सुहास आणि मंजिरी खुश झाले. पण सुरेखाताई मात्र थंडपणे मंजिरीला म्हणाल्या.
” अगं समर्थ फक्त दोन वर्षांचा आहे आता…अशा अवस्थेत तुझ्याच्याने होणार आहे का त्याला सांभाळणं… पहिलं बाळंतपण तुझ्या माहेरी झालं पण दुसरं बाळंतपण सासरी करावं लागेल…अन् तुझ्या एकटीच्याने होणार आहे का सगळं?…माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नकोस…या वयात माझी तुला काहीच मदत होणार नाही…आम्ही आमची मुलं सांभाळली आता या वयात तरी आम्हाला आराम नको का…मी तर म्हणते आता काही दुसऱ्या बाळाचा विचार नका करू…आता अबोर्शन करून घ्या…समर्थ मोठा झाला की बघता येईल…”
सुरेखाताईंचे बोलणे ऐकून सुहास आणि मंजिरी दोघांनाही धक्का बसला होता. फारशा मदतीची त्यांची अपेक्षा नव्हतीच. पण इतक्या टोकाच्या प्रतिक्रियेची सुद्धा अपेक्षा नव्हती. दोघांच्याही उत्साहावर जणू विरजण पडले होते. पण तरीही मंजिरी आणि सुहासने ह्या बाळाला जन्माला घालण्याचा निर्णय घेतला होता. सुहासची भक्कम साथ असल्याने मंजिरीला तशी फारशी काळजी नव्हती.
तरीही सासूबाई तिला बोलून दाखवायच्या की आमच्याकडे बायका बाळंतपणानंतर एका आठवड्यातच कामाला लागतात. दुसऱ्या बाळंतपणानंतर जास्त झोपून राहत नाही किंवा आराम करत नाहीत. पण मंजिरीने त्यांना उलट उत्तर न देता शांतपणे त्यांचे ऐकून घेतले होते.
मंजिरी आणि सुहासची दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू होती. सुहास आता मंजिरी आणि समर्थची जरा जास्तच काळजी घेत होता. मंजिरीला जरा अशक्तपणा आणि मळमळ जाणवत होती पण तरीही ती स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करत होती. पण गरोदरपणाच्या तिसऱ्याच महिन्यात काही कॉम्प्लिकेशन्स मुळे मंजिरीचा गर्भपात झाला.
मंजिरी आणि सुहासला खूप वाईट वाटले. सुरेखा ताईंना मात्र विशेष असा काहीच फरक पडला नाही. त्यानंतर काही दिवसांनी मंजिरी मागचं सगळं विसरली आणि आपलं सगळं लक्ष समर्थकडे देऊ लागली.
सुरेखाताईंची सुद्धा नेहमीची दिनचर्या सुरूच होती. त्या सकाळी आरामात झोपून उठत. मग उशिरा अंघोळ अन् मग उशिरा जेवण करत. त्यानंतर टीव्ही वगैरे बघत. दुपारी वेळ जायचा नाही म्हणून मग शेजारी त्यांच्या समवयीन मैत्रिणिंकडे जात. तिकडून आल्या की जरा चहा वगैरे घेत आणि संध्याकाळी शेजारच्या बागेत जरा फेरफटका मारायला निघून जात.
संध्याकाळी सुहास घरी यायच्या आधी परत येत आणि समर्थला जवळ घेऊन त्याच्याशी खेळत बसत. मग सुहास आला की समर्थ सुहासजवळ जायचा. मग दोघे बापलेक बराच वेळ खेळत बसत. रात्रीचे जेवण आटोपले की सुरेखा ताई टीव्ही वर उशिरापर्यंत त्यांच्या आवडीचे कार्यक्रम बघायच्या आणि मग झोपून जायच्या. सगळं काही आरामात सुरू होतं.
एकदा सुरेखाताईंना त्यांच्या बहिणीचा तातडीचा फोन आला की बहिणीच्या मुलीचे दुसरे बाळंतपण आहे आणि तिचा पहिला मुलगा शाळेत जातो त्यामुळे तिला बाळंतपणाला माहेरी येणे जमणार नाही. त्यामुळे तिला तिथे कोणीतरी सोबत हवंय म्हणून. त्यावर सुरेखाताई एका पायावर तिथे जायला तयार झाल्या.
मंजिरीला आपल्या सासूचे हे दुटप्पी वागणे अजिबात आवडले नव्हते. स्वतःच्या सुनेचं बाळंतपण करायचं नव्हतं म्हणून तिला सरळ गर्भपात करण्याचा सल्ला देणाऱ्या सासूबाई स्वतःच्या भाचीच्या बाळंतपणासाठी मात्र उत्साहाने तयार झाल्या. तिथे चार महिने राहून सगळं काही व्यवस्थित पार पाडून आल्या सुद्धा. त्या गेल्या तेव्हा मंजिरीला खूप राग आला होता. तिला वाटले होते की सासूबाईंना त्यांच्या या वागण्याचा जाब विचारावा. पण त्या गावाहून परत येईस्तोवर मंजिरीचा राग जरा शांत झाला होता. शिवाय घरात वाद नकोत म्हणून तिने तो विषय काढणे टाळले होते. पण मनात सासुबाईंबद्दल एक अढी निर्माण झाली होती. तरीही सून म्हणून आपलं कर्तव्य ती न चुकता पार पाडत होती.
तिचं वागणं बदललंय हे सुरेखाताईंच्या लक्षात आलं होतं. पण ती नेहमीप्रमाणे सगळं काही आपल्या हातात आणून देते हे पाहून सुरेखा ताईंनी तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले होते. किंवा मंजिरी त्यांच्याबद्दल काय विचार करते हे त्यांच्यालेखी फार महत्त्वाचे नव्हते. त्यांचे स्पष्ट मत होते की सून म्हणून मंजिरी चे कर्तव्य तिने पार पाडायला हवे आणि त्यांना सासूचा मान मिळायला हवा.
क्रमशः